श्रीमद् भागवत महापुराण

माहात्म्य (श्रीस्कान्दे) - अध्याय ४ था

श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता-वक्त्यांची लक्षणे, श्रवण विधी आणि माहात्म्य -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनकादी ऋषी म्हणाले - सूत महोदय ! आपणास उदंड आयुष्य मिळो आणि आपण आम्हांला असाच उपदेश दीर्घकाळपर्यंत करीत राहावा. आम्ही आपल्या तोंडून श्रीमद्‌भागवताचे अपूर्व माहात्म्य एकले. सूत महोदय ! आता आपण आम्हांला श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, त्याचे प्रमाण, ते श्रवण करण्याची पद्धत, तसेच वक्‍ता आणि श्रोते यांची लक्षणे सांगावीत. (१-२)

सूत म्हणतात - श्रीमद्‌भागवत आणि श्रीभगवंतांचे स्वरूप सदासर्वदा एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंदरूप हेच. भगवान श्रीकृष्णांचे ठायी ज्यांचे प्रेम आहे , त्या भक्‍तांच्या हृदयामध्ये भगवंतांचे माधुर्य अभिव्यक्‍त करणारे काव्य म्हणजेच श्रीमद्‌भागवत होय. जे वाड्मय ज्ञान, विज्ञान , भक्‍ती व त्याच्या प्राप्तीच्या साधन-चतुष्टयाला प्रकाशित करणारे असून, मायेचे समूळ उच्चाटन करणारे आहे, ते म्हणजे श्रीमद्‌भागवत समज. (३-५)

श्रीमद्‌भागवत अनंत अक्षरस्वरूप आहे. त्याचे प्रमाण कोण जाणू शकेल बरे ? प्रथम विष्णूंनी ब्रह्मदेवांना चार श्र्लोकांच्या द्वारे याची केवळ दिशा दाखविली होती. विप्रगणहो ! या भागवताच्या अतिशय खोल असलेल्या पाण्यात बुडी मारून त्यातून आपल्यासाठी इष्ट वस्तू प्राप्त करण्यास फक्‍त ब्रह्मदेव विष्णू , शंकर इत्यादीच समर्थ आहेत. परंतु ज्यांच्या बुद्धी इत्यादी वृत्ती मर्यादित आहेत. त्या माणसांनी आपले हित साधावे, म्हणून श्रीव्यासमुनींनी परीक्षित आणि शुकदेव यांच्यात झालेल्या संवादरूपाने जे कथन केले, त्याचेच नाव श्रीमद्‌भागवत आहे. या ग्रंथाची श्र्लोकसंख्या अठरा हजार आहे. जे लोक लकिरूप अजगराच्या विळख्यात सापडले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे. (६-९)

भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करणार्‍या श्रोत्यांविषयी आता सांगतो. उत्तम आणि अधम असे श्रोत्यांचे दोन प्रकार मानलेले आहेत. चातक, हंस, शुक, मीन इत्यादी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत. वृक, भूरूंड, वृष, उष्ट्र इत्यादी अधम श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद सांगितले आहते. चातक ढगातून पाडणार्‍या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन फक्‍त श्रीकृष्णांसंबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो, त्याला चातक म्हटले आहे. हंस ज्याप्रमाणे पाणी मिसळलेल्या दुधातून शुद्ध तेवढे घेतो, त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यातील सार तेवढे घेतो, त्याला हंस म्हणतात. ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने शिक्षविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसेच येणार्‍या इतरांनासुद्धा प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि थोडक्या शब्दात दुसर्‍यांना ऐकवितो व त्यायोगे व्यास व इतर श्रोत्यांना आनंद देतो, त्याला शुक म्हणतात. जशी क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहात राहून दुग्धपान करते, त्याप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता अखंड कथारसाचाच आस्वाद घेत राहातो, तो प्रेमी श्रोता मीन म्हटला गेला आहे. (१०-१५)

वनामध्ये बासरीचा मधुर आवाज ऐकण्यात मग्न झालेल्या हरिणांना लांडगा जसा भयानक ओरडण्याने भिववितो, त्याचप्रमाणे मूर्ख माणूस कथा श्रवण करीत असतांना रसिक श्रोत्यांना डिवचीत मध्येच मोठ्याने बोलतो, तो वृक म्हणावा. हिमालयाच्या शिखरावर असलेला भूरुंड नावाचा पक्षी कोणाची तरी उपदेशपर वाक्ये ऐकून तसेच बोलतो, परंतु स्वतः त्यापासून बोध घेत नाही. याप्रमाणे जो उपदेशपर गोष्टी ऐकून त्या दुसर्‍यांना शिकवितो, परंतु स्वतः तसे आचरण करीत नाही, अशा श्रोत्याला भूरुंड म्हणतात. बैलासमोर द्राक्षे येऊ देत किंवा कडवट पेंड, दोन्ही तो एकाच चवीने खाते, त्याप्रमाणे जो ऐकलेले सारेच ग्रहण करतो, परंतु घेण्याजोगे काय व टकण्याजोगे काय हे ठरविण्यास ज्याची बुद्धी असमर्थ असतो, असा श्रोता वृष म्हटला जातो. उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून फक्‍त कडूलिंबाचा पालाच चघळतो, त्याप्रमाणे जो भगवंतांच्या मधुर कथा ऐकण्याचे सोडून त्याऐवजी संसारातील गोष्टीत रममाण होतो, त्याला उंट म्हणतात. असे काही थोडेसे भेद सांगितले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्‍तसुद्धा उत्तम-अधम अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे ’भ्रमर’,’गाढव’ इत्यादी अनेक भेद आहेत. हे भेद त्या त्या श्रोत्यांच्या स्वाभाविक आचार-व्यवहारावरून ओळखता येतात. जो वक्‍त्याला योग्य रीतीने प्रणम करून त्याच्यासमोर बसतो आणि इतर संसारातील गोष्टी सोडून फक्‍त श्रीभगवंतांच्या कथाच ऐकण्याची इच्छा ठेवतो, समजून घेण्यात अत्यंत कुशल असतो, नम्र असतो, हात जोडलेले असतात, शिष्यभावनेने श्रद्धा ठेवून, ऐकले असेल त्याचे सतत चिंतन करीत राहातो, जे समजले नसेल ते विचारतो, पवित्र भावनेने वागतो, तसेच श्रीकृष्णभक्‍तांवर सदैव प्रेम करतो, अशाच श्रोत्याला वक्‍ते लोक उत्तम श्रोता म्हणतात. आता वक्‍त्याची लक्षणे सांगतात. ज्याचे मन नेहमी भगवंतांच्या चरणी लागलेले असते, ज्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते, जो सर्वांचा प्रिय सखा आणि दीनांवर दया करणारा असतो, तसेच अनेक उदाहरणे देऊन तत्त्वाचा अर्थ सांगण्यात चतुर असतो, असा वक्‍ता मुनींना सन्माननीय वाटतो. (१६-२२)

विप्रगण हो ! भारतवर्षाच्या भूमीवर श्रीमद्‌भागवत कथेचे सेवन करण्याचा जो आवश्यक विधि आहे, तो मी आता सांगतो, ऐका. ज्यामुळे सुख अधिकाधिक वाढते. सात्त्विक, राजस, तामस, आणि निर्गुण हे श्रीमद्‌भागवत-सेवनाचे चार प्रकार आहेत. एखाद्या यज्ञासारखा निरनिरळ्या प्रकारच्या पूजा-सामग्रीने मोठ उत्सव केला जातो, अतिशय परिश्रमपूर्वक घाईगडबडीत, सात दिवसात आनंदाने पारायण केले जाते, ते राजस म्हटले जाते. कथेच्या रसाचा आस्वाद घेत, अति परिश्रम न घेता, एक किंवा दोन महिनेपर्यंत जेव्हा श्रवण केले जाते, ते पूर्ण आनंद वाढविणारे सात्त्विक सेवन म्हटले जाते. श्रद्धेने आरंभ करून श्रवण थांबते. आठवण झाल्यावर पुन्हा सुरू केले जाते, अशा प्रकारे आळसामुळे जे वर्षभर सेवन केले जाते, ते तामस सेवन होय. हे सुद्धा सुख देणारेच असते. जेव्हा वर्ष, महिने आणि दिवस या नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्‍तियुक्‍त अंतःकरणाने श्रवण केले जाते, ते सेवन निर्गुण मानले गेले आहे. परीक्षित आणि शुकदेव यांच्यातील संवादरूपाने सुद्धा जे भागवताचे सेवन झाले होते, तेही निर्गुणच होय. तेथे जी सात दिवसांची मर्यादा आहे, ती राजाच्या उरलेल्या आयुष्याच्या दिवसांच्या संख्येमुळे आहे. सप्ताह कथेचा नियम म्हणून नव्हे. (२३-२९)

भारतवर्षाव्यतिरिक्‍त इतर ठिकाणी सुद्धा त्रिगुण किंवा निर्गुण कोणत्याही प्रकारे का होईना, श्रीमद्‌भागवताचे सेवन करावे. फक्‍त श्रीकृष्णांच्या लीलांचेच श्रवण, कीर्तन व रसास्वादनासाठी जे लोक हापापलेले असतात आणि मोक्षाचीसुद्धा अपेक्षा ठेवीत नाहीत, त्यांचे श्रीमद्‌भागवत हेच धन आहे. त्याचप्रमाणे जे संसारातील दुःखांना भिऊन मुक्‍ती मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा हे भवरोगावरील औषध आहे. म्हणून या कलियुगात प्रयत्‍नपूर्वक याचे सेवन केले पाहिजे. वरील लोकांखेरीज लोक विषयातच रमणारे आहेत, ज्यांना नेहमी संसारातील सुखेच मिळावीत अशी इच्छा असते, त्यांच्यासाठी सुद्धा, आता या कलियुगात सामर्थ्य, धन आणि वैदिक कर्मांचे ज्ञान नसल्याने, कर्ममार्गानेच मिळणारी सिद्धी भागवतकथेचेच सेवन करावे. ही भागवताची कथा धन, पुत्र , स्त्री, वाहने, इत्यादी यश, घर आणि निष्कंटक राज्यसुद्धा देऊ शकते. या भागवताचा आश्रय घेणारे लोक या संसारातील मनाजोगते उत्तम भोग भोगून भागवताची संगत धरल्याने शेवटी श्रीहरींचे परमधाम प्राप्त करून घेतात. (३०-३६)

जेथे श्रीमद्‌भागवताचे कथा-कथन चालू असते, तसेच जे लोक ही कथा श्रवण करण्यात तत्पर झालेले असतात, त्यांची सेवा शरीराने व धनाने करावी. त्या लोकांच्या कृपेने अशी मदत करणार्‍यांनासुद्धा भागवतसेवनाचे पुण्य प्राप्त होते. श्रीकृष्णांखेरीज ज्या अन्य कशीचीही इच्छा केली जाते, त्या सर्वांना धन अशी संज्ञा आहे. श्रोता वक्‍ता हे सुद्धा दोन प्रकारचे मानले गेले आहेत; एक श्रीकृष्णांची इच्छा करणारे आणि दुसरे धनाची ! जसा वक्‍ता तसाच श्रोता जर असेल, तर त्या ठिकाणी कथेच्या सुखामध्ये वाढ होते. जर दोघांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतील, तर कथेची गोडी वाढत नाही आणि फळ मिळत नाही. परंतु जर दोघेही श्रीकृष्णप्राप्तीची इच्छा करणारे असतील तर त्यांना उशिरा का होईना, सिद्धी अवश्य प्राप्त होते. धनार्थीचे अनुष्ठान व्यवस्थितपणे पार पडले तरच त्याला सिद्धी प्राप्त होते. परंतु श्रीकृष्णांची इच्छा करण्यार्‍याच्या विधीमध्ये काही कमतरता राहिली, तरीसुद्धा जर त्याच्या हृदयात प्रेम असेल तर ते प्रेमच त्याच्यासाठी सर्वोत्तम विधी आहे. सकाम पुरुषाने कथा समाप्त होईपर्यंत स्वतः सर्व विधींचे पालन केले पाहिजे. दररोज प्रातःकाळी स्नान व नित्यकर्म पूर्ण करावे. नंतर भगवंतांचे चरणामृत घेऊन पूजेच्या साहित्याने ग्रंथ आणि गुरू (व्यास) यांचे पूजन करावे. त्यानंतर प्रसन्न मनाने श्रीमद्‌भागवताची कथा सांगावी किंवा ऐकावी. दूध किंवा हविष्यान्नाचे भोजन मौन पाळून करावे. दररोज ब्रह्मचर्याचे पालन करून भूमीवर झोपावे. क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा. दररोज कथा संपल्यानंतर कीर्तन करावे आणि कथा समाप्त होईल, त्या दिवशी रात्री जागरण करावे. ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. (३७-४५)

कथेचे वाचन करणार्‍या गुरूला वस्त्र, अलंकार इत्यादी देऊन गाईचेही दान करावे. अशा प्रकारे विधान पूर्ण केल्याने माणसाला स्त्री, घर, पुत्र, राज्य, धन इत्यादी जे जे पाहिजे, ते सर्व मनोवांछित फळ प्राप्त होते. परंतु हा सकामभाव वाईटच. श्रीमद्‌भागवताच्या कथेला तो शोभत नाही. (ही कथा वाचून वा ऐकान श्रीभगवंतांच्या ठिकाणीच प्रेम निर्माण झाले पाहिजे. प्रपंचावर नव्हे.) श्रीशुकदेवांनी सांगितलेले हे श्रीमद्‌भागवत शास्त्र कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारे आणि नित्य प्रेमानंदरूप फळ देणारे आहे. (४६-४८)

अध्याय चवथा समाप्त
॥ समाप्तमिदं श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम् ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु
॥ हरिः ॐ तत्सत ॥

GO TOP