श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय १२ वा

श्रीमद्‌भागवताची संक्षिप्त विषय-सूची -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणतात - भगवद्‌भक्तिरूप महान धर्माला नमस्कार असो. विश्वविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो. आता मी ब्राम्हणांना नमस्कार करून श्रीमद्‌भगवतोक्त सनातन धर्म सांगतो. हे ऋषींनो ! आपण मला जो प्रश्र्न विचारला होता, त्यानुसार मी भगवान विष्णूंचे हे अद्‌भुत चरित्र सांगितले. हे सर्व पापे नाहीसे करणार्‍या श्रीहरींचेच संकीर्तन झालेले आहे. तेच श्रीहरी सर्वांच्या ह्रदयात विराजमान, सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवनसर्वस्व आहेत. या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ति, स्थिती आणि प्रलय यांची प्रचीती येते. या पुराणात त्याच परमतत्त्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने, यांविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. (१-४)

पहिल्या स्कंधात, भक्तियोग व त्यामुळे उत्पन्न होणार्‍या वैराग्याचे वर्णन आले आहे. तसेच परीक्षिताची कथा आणि नारद-चरित्र आले आहे. ब्राम्हणाचा शाप झाल्यानंतर राजर्षी श्रीशुकांचा व त्याचा संवाद, ही कथा आहे. (५-६)

योगधारणेने आर्चिरादी गती, ब्रह्मदेव-नारद-संवाद, अवतारांचे वर्णन तसेच सुरूवातीपासूनच प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांचे वर्णन दुसर्‍या स्कंधामध्ये आहे. (७)

तिसर्‍या स्कंधामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्रेय यांची भेट व संवाद, राणसंहितेविषयीचा प्रश्र्न आणि प्रलयकाळातील परमपुरूषाची स्थिती यांचे निरूपण केले आहे. नंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महतत्त्व इत्यादी सात प्रकृति-विकृती व यांच्या पासून उत्पन्न झालेली कार्य-सृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरूषाची स्थिती यांचे वर्णन आहे. त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचे स्वरूप, लोक-पद्माची उत्पत्ती, समुद्रातून पृथ्वी वर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध, देवता, पशु-पक्षी आणि मनुष्यांची सृष्टी, रुद्रांची उत्पत्ती, ज्यापासून स्वायंभुव मनू आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य कारणरूप स्त्री शतरूपा यांचा जन्म झाला होता, त्या अर्धनारी- नराच्या स्वरुपाचे विवेचन, कर्दम प्रजापतीचे चरित्र, त्यांच्यापासून मुनिपत्‍न्यांना जन्म, महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि ज्ञानी कपिलदेव व देवहूती यांच्यातील संवाद हे प्रसंग आहेत. (८-१३)

ऋषींनो ! चौथ्या स्कंधामध्ये मरीची इत्यादी नऊ प्रजापतींची उत्पत्ती, दक्षयज्ञानाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथूचे चरित्र, प्राचीनबर्ही व नारद यांच्यामधील संवाद ही वर्णने आहेत. पाचव्या स्कंधामध्ये प्रियव्रताचे उपाख्यान, नाभी, ऋषभ आणि भरताचे चरित्र, द्विप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन, ज्योतिश्चक्राचा विस्तार, त्याचबरोबर पाताळ व नरक यांच्या स्थितीचे निरूपण आले आहे. (१४-१६)

शौनकादी ऋषींनो ! सहाव्या स्कंधामध्ये पुढील विषय आले आहेत. प्रचेतांपासून दक्षाची उत्पत्ती, दक्षकन्यांची संतती व तीपासून देवता, असुर, मनुष्य, पशू, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म आणि वृत्रासुराची उत्पत्ती व त्याला परम गती. सातव्या स्कंधात दितिपुत्र हिरण्यकशपू व हिरण्याक्ष तसेच महात्मा प्रल्हाद यांची चरित्रे आली आहेत. (१७-१८)

आठव्या स्कंधामध्ये मन्वन्तरांची कथा, गजेंद्रमोक्ष, निरनिराळ्या मन्वन्तरांत होणारे जगदीश्वर भगवान विष्णूंचे अवतार कूर्म, मत्स्य, वामन, धन्वन्तरी, हयग्रीव इत्यादी, अमृत मिळविण्यासाठी देव आणि दैत्यांचे समुद्र-मंथन आणि देवासुर संग्राम इत्यादी विषयांचे वर्णन आहे. नवव्या स्कंधामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, महात्मा सुद्युम्न, इला व तारा यांची उपाख्याने, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद, नृग इत्यादी राजांची वर्णने, सुकन्येचे चरित्र, शर्याती, खट्‍वांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान ककुस्थ आणि कोसलेंद्र श्रीरामांचे सर्वपापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकांची उत्पत्ती यांचे वर्णन आहे. भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला पृथ्वीवरील क्षत्रियसंहार, चंद्रवंशी पुरूरवा, ययाती, नहुष, दुष्यंतनंदन भरत, शंतनू व त्याचा पुत्र भीष्म, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजवंशांची वर्णने यात आहेत. (१९-२६)

शौनकादी ऋषींनो ! याच यदुवंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता. त्यांनी अनेक असुरांचा संहार केला. त्यांच्या लीला इतक्या आहेत की, त्यांचा कोणालाही अंत लागत नाही. दहाव्या स्कंधामध्ये त्यांचे वर्णन आहे. वसुदेवांच्या घरी जन्म, गोकुळात मोठे होणे, पूतनेचे प्राण दुधासह पिऊन टाकणे, लहानपणीच शकट उलथून टाकणे, तृणावर्त, बकासुर आणि वत्सासुर यांचा वध, धेनकासुर आणि प्रलंबासुर यांना त्यांच्या परिवारासह मारणे, दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण, कालिया नागाची मस्ती जिरवणे, अजगराच्या मिठीतून नंदबाबांना सोडवणे, गोपकन्यांचे कात्यायनीव्रत, त्यामुळे भगवंतांचे प्रसन्न होणे, यज्ञ-पत्‍न्यांवर कृपा, ब्राम्हणांना पश्चाताप, गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक, शरद ऋतूच्या रात्रींमध्ये गोपींसह रासक्रिडा, दुष्ट शंखचूड, अरिष्ट आणि केशीचा वध, अक्रूराचे आगमन व रामकृष्णांचे मथुरेकडे प्रस्थान, श्रीकृष्णविरहाने गोपींचा आक्रोश, मथुरादर्शन, कुवलयापीड हत्ती, मुष्टिक, चाणूर, कंस इत्यादींचा वध, सांदीपनी गुरूंच्या मृत पुत्राला परत आणणे, मथुरेत, असताना श्रीकृष्णांकडून उद्धव, बलराम यांच्यासह यादवांचे प्रिय करणे, जरासंधाने आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध, कालयवनाचे मुचुकुंदामार्फत भस्म, द्वारकानिर्माण, स्वर्गातून परिजातक आणि सुधर्मा सभा आणणे, भगवंतांकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण, युद्धात महादेवांच्यावर जृम्भणास्त्रप्रयोग, बाणासुराचे हात तोडणे, भीमासुराला मारून कन्यांचे पाणिग्रहण, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट दंतवक्त्र, शंबरासुर, द्विविद, पीठ, मुर, पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन व भगवंतांकडून त्यांचा वध, काशीदहन, पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरविणे. (२७-४०)

अकराव्या स्कंधात भगवंतांकडून ब्राम्हणांच्या शापाचे निमित्त करून यदुवंशाचा संहार, श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्‍भुत संवाद, संपूर्ण आत्मज्ञान व धर्म-निर्णयांचे निरूपण आणि भगवंतांचा आत्मयोगाच्या प्रभावने मर्त्यलोकाचा त्याग हे विषय आले आहेत. (४१-४२)

बाराव्या स्कंधामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणे आणि त्या युगांतील व्यवहार, कलियुगात माणसांची अधर्मप्रवृत्ती, चार प्रकारचे प्रलय, तीन प्रकारच्या उत्पत्ती, ज्ञानी राजर्षी परीक्षिताचा शरीरत्याग, वेदांच्या शाखांची निर्मिती, मार्कंडेय मुनीची सुंदर कथा, भगवंतांच्या अंग-उपांगांचे स्वरूपकथन आणि विश्वात्मा सूर्यांच्या गणांचे वर्णन आले आहे. शौनकादी ऋषींनो ! या ठिकाणी आपण जे काही विचारले होते, ते मी तुम्हांला सांगितले. येथे मी सर्व प्रकारे भगवंतांच्या लीला आणि त्यांच्या अवतार-चरित्रांचेच वर्णन केले आहे. (४३-४५)

जो मनुष्य पडताना, पाय घसरला असता, दुःख भोगत असता, किंवा शिंक आली असता, विवश होऊन का होईना, उच्च स्वरात "हरये नमः" असे म्हणतो, तो सर्व पापांपासून मुक्‍त होतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवितो किंवा सोसाट्याचा वारा ढगांना उधळून लावतो, त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांचे संकीर्तन केले किंवा त्यांच्या लीलांचे श्रवण केले, तर ते स्वतःच येऊन भक्‍तांच्या हृदयात विराजमान होतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीसे करतात. ज्या वाणीने, अधोक्षज भगवंतांसंबंधी बोलले जात नाही, ती वानी निरर्थक, सारहीन होय. आणि जी वाणी भगवांतांच्या गुणांनी परिपूर्ण असते, तीच परम पावन , तीच मंगलमय आणि तीच सत्य आहे. ज्या वचनाने भगवंतांच्या परम पवित्र यशाचे गायन होते, तेच रमणीय, आवडणारे व नव-नवीन मानावे. तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहाते आणि तेच माणसाचा सगळा शोकसागर आटवते. जी वाणी, भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणार्‍या यशाचे कधीच गायन करीत नाही, ती वाणी साहित्यगुणांनी परिपूर्ण असली तरी कावळ्यांसारख्या माणसांनाच आवडायची. ज्ञान्यांना नव्हे. कारण निर्मळ हृदयाचे साधुजन, जेथे भगवंत असतात, तेथेच निवास करतात. या उलट, ज्या वाणीत साहित्यदृष्ट्या दोष आहेत, परंतु जिच्या प्रत्येक श्र्लोकामध्ये भगवंतांची सुयशसूचक नावे गुंफलेली असतात, ती वाणी, लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करीत असतात. निर्मल ब्रह्मज्ञान जर भगवंतांच्या भक्‍ति-विरहित असेल, तर ते मुळीच शोभत नाही. जे कर्म भगवंतांना अर्पन केलेले नसेल, ते कितीही श्रेष्ठ प्रतीचे असले तरी नेहमी अमंगलच होय. ते सुंदर कसे असू शकेल बरे ? वर्ण आणि आश्रम यांनुसार आचरण, तपश्वर्या आणि अध्ययन यांच्यासाठी जे अपरंपार परिश्रम केले जातात, त्यांचे फळ म्हणजे फक्‍त यश किंवा संपत्तीची प्राप्ती. परंतु भगवंतांच्या गुणांचे श्रवण, किर्तन इत्यादी मात्र त्यांच्या श्रीचरणकमलांची स्मृती कधीच नाहीशी करीत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरण-कमलांची नित्य राहाणारी स्मृती, सगळे अमंगल नष्ट करते, परम शांती देते, अंतःकरण शुद्ध करते, भगवंतांची भक्‍ती निर्माण करते आणि वैराग्याने युक्‍त असे भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन साक्षात्कार घडवते. हे ऋषींनो ! आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात. कारण आपण नेहमीच आपल्या हृदयात, सर्वात्मा सर्वशक्‍तिमान, आदिदेव, अशा भगवान नारायणांची स्थापना करून त्यांचे भजन करीत असत. ज्यावेळी राजर्षी परीक्षित अन्न-पाण्याचा त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये श्रीशुकदेव महाराजांच्या तोंडून श्रीमद्‌भागवताची कथा ऐकत होता, त्यावेळी मीही तेथेच बसून त्या परम ऋषींच्या तोंडून हे आत्मतत्त्वाचे श्रवण केले होते. आपण मला यावेळी ती आठवण करून दिलीत. (४६-५६)

शैनकादी ऋषींनो ! ज्यांची प्रत्येक लीला श्रवण, कीर्तन करण्याजोगी असते, त्या भगवान वासुदेवांचे माहात्म्य मी तुम्हांला सांगितले. ते सर्व अशुभ वासना नष्ट करणारे आहे. जो मनुष्य एकाग्रचित्ताने एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना, हे ऐकवितो, आणि जो श्रद्धेने याचे श्रवण करतो, तो स्वतःला खात्रीने पवित्र करून घेतो. जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो, तो दीर्घायुषी होतो आणि जो संयमपूर्वक निराहार राहून याचा पाठ करतो, तो पापरहित होतो. जो मनुष्य अंतःकरण ताब्यात ठेवून उपवास करून, पुष्कर, मथुरा किंवा द्वारकानगरीत या पुराणसंहितेचा पाठ करतो, तो भयापासून मुक्‍त होतो. जो मनुष्य याचे श्रवण किंवा उच्चारण करतो, त्याच्या त्या संकीर्तनाने देवता, मुनी, सिद्ध, पितर, मनू आणि राजे संतुष्ट होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचा पाठ केल्याने ब्राह्मणाला मध, तूप व दुधाच्या नद्या म्हणजेच सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते, तेच फळ श्रीमद्‌भागवताच्या पाठानेसुद्धा मिळते. जो ब्राह्मण संयमपूर्वक या पुराणसंहितेचे अध्ययन करतो, त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमपदाची प्राप्ती होते. हिच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते. क्षत्रियाला समुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य मिळते. वैश्याला कुबेरासारखी संपत्ती मिळते व शूद्राची सर्व पापांपासून सूटका होते. (५७-६४)

सर्वांचे स्वामी आणि कलियुगातील पापांचे ढीग उध्वस्त करणारे जे भगवान श्रीहरी त्यांचे वर्णन करणारी पुराणे पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये सगळीकडे भगवंतांचे वर्णन आढळत नाही. यामध्ये मात्र प्रत्येक कथा-प्रासंगामध्ये पदोपदी सर्वस्वरूप भगवंतांचेच वर्णन केलेले आहे. जे जन्म-मृत्यू इत्यादी विकारांनी रहित, देश, काळ इत्यादी मर्यादांपासून मुक्‍त तसेच स्वतः आत्मतत्त्वसुद्धा आहेत, जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणार्‍या शक्‍तीसुद्धा ज्यांचे स्वरूप आहेत, ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इ. लोकपाल सुद्धा ज्यांची किंचितशीसुद्धा स्तुती करणे जाणत नाहीत, त्या परमात्म्याला मी नमस्कार करीत आहे. (६५-६६)

ज्यांनी आपल्या स्वरूपातच प्रकृती इत्यादी नऊ शक्‍तींचा संकल्प करुन या चराचर जगाची उत्पत्ती केली आणि जे तिचे अधिष्ठानही आहेत, तसेच ज्यांचे परम पद फक्‍त अनुभूतिस्वरूप आहे, त्या सनातन देवाधिदेव भगवंतांना नमस्कार असो. (६७)

श्रीशुकदेव आत्मानंदामध्येच निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी संपूर्णपणे नाहीशी झाली होती. तरीसुद्धा श्यामसुंदरांच्या मनोहर लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. म्हणूनच त्यांनीसुद्धा जगातील प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवत्तत्त्व प्रकाशित करणार्‍या या महापुराणाचा विस्तार केला. त्याच सर्वपापहारी व्यासनंदन श्रीशुकदेवांना मी नमस्कार करतो. (६८)

अध्याय बारावा समाप्त

GO TOP