श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ८ वा

मार्कंडेयाची तपश्चर्या आणि वरप्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनका म्हणाला - हे साधो सूता ! तुला उदंड आयुष्य मिळो ! तू वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकत असतात, त्यांना तू परमात्म्याचा साक्षात्कार करवितोस. आता आम्हांला यासंबंधी सांग. लोक सांगतात की, मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहे. ज्यावेळी प्रलयाने सर्व जग गिळून टाकले होते, त्यावेळी सुद्धा तो वाचला. तो तर याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे आणि आतापर्यंत प्राण्यांचा कोणताही प्रलय झालेला नाही. अशा स्थितीमध्ये हे खरे असू शकेल, की ज्यावेळी मार्कंडेय मुनीने त्यामधून फिरत असताना वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पहुडलेल्या अत्यंत अद्‍भुत अशा पुरूषाला पाहिले ! हे सूता ! आमच्या मनामध्ये हा मोठाच संशय उत्पन्न झाला आहे. आणि हे समजून घेण्याची आम्हांला अतिशय उत्कंठा आहे. तू महान योगी आहेस. शिवाय पुराणे जाणणारा म्हणून प्रसिद्ध आहेस. तरी आमच्या या संशयाचे निराकरण करावे. (१-५)

सूत म्हणाले - शौनका ! तू विचारलेल्या प्रश्र्नामुळे लोकांच्या मनातील शंका नाहीशी होईल. शिवाय या कथेमध्ये भगवान नारायणांचा महिमा कथन केलेला आहे. जो या कथेचे गायन करतो, त्याचे कलियुगामुळे उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात. मृकंड ऋषीने आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक सर्व संस्कार त्या त्या वेळी केले. नंतर विधिपूर्वक वेदांचे अध्ययन करून मार्कंडेय तपश्चर्या आणि स्वाध्याय करीत होता. त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केले होते. तो शांत भावाने राहात होता. मस्तकावर जटा होत्या. झाडांच्या सालीच तो वस्त्र म्हणून नेसत असे. हातात तो कमंडलू आणि दंड धारण करी. त्याच्या अंगावर जानवे आणि मेखला शोभून दिसत असे. काळे मृगचर्म, रुद्राक्षांची माळ आणि कुश, एवढेच साहित्य त्याच्याजवळ होते. आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्याने हे सर्व ग्रहण केले होते. सायंकाळी आणि प्रातःकाळी तो अग्निहोत्र, सूर्योपस्थान, गुरुवंदन, ब्राम्हणसत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणे इत्यादी प्रकारांनी भगवंतांची आराधना करी. संध्याकाळी-सकाळी भिक्षा मागून ती गुरूदेवांच्या चरणांशी ठेवून तो मौन राही. गुरूजींची आज्ञा झाली, तरच एक वेळ भोजन करी, नाहीतर उपवास करी. मार्कंडेयाने अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय यांमध्ये तत्पर राहून कोट्यावधी वर्षेपर्यंत भगवंतांची अराधना केली आणि जिंकण्यास कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला. त्यामुळे ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष, ब्रह्मदेवाचे अनेक अन्य पुत्र तसेच मनुष्य, देवता, पितर व इतर सर्व प्राणी अत्यंत आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे नैष्ठिक ब्रह्मचर्य-व्रत धारण केलेला योगी मार्कंडेय याने तपश्चर्या, स्वाध्याय आणि संयम यांच्या द्वारा अविद्या इत्यादी सर्व क्लेश नाहीसे करून शुद्ध अंतःकरणाने तो इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागला. योगी मार्कंडेय-मुनी महायोगाच्या द्वारे आपले चित्त भगवंतांच्या स्वरूपाशी एकरूप करीत राहिला. असे करता करता सहा मन्वन्तरे उलटून गेली. (६-१४)

ब्रह्मन ! या सातव्या मन्वन्तरामध्ये इंद्राला जेव्हा हे समजले, तेव्हा तो त्याच्या तपश्चर्येने भयभीत झाला. म्हणून त्याने त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणणे सुरू केले. (१५)

मार्कंडेय मुनीच्या तश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी इंद्राने त्याच्या आश्रमावर गंधर्व, अप्सरा, काम, वसंत, मलय पर्वतावरील वारा, रजोगुणाचे अपत्य लोभ आणि मद यांना पाठविले. महर्षे ! ते सर्वजण हिमालयाच्या उत्तरेकडे त्याच्या आश्रमावर गेले. तेथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहाते आणि तिच्याजवळ चित्रा नावाची एक शिळा आहे. मार्कंडेय मुनींचा आश्रम अत्यंत पवित्र होता. तेथे पवित्र वृक्ष आणि वेली होत्या. पुण्यात्मा ऋषिकुलांनी तो गजबजलेला होता. तेथे अतिशय पवित्र व स्वच्छ जलाशय होते. कोठे धुंद भ्रमर गुंजारव करीत होते, तर कोठे आनंदी कोकीळ पंचम स्वरात कूजन करीत होते. काही ठिकाणी मदोन्मत्त मोर आपले पंख पसरून कलापूर्ण नृत्य करीत असत, तर काही ठिकाणी मदधुंद पक्ष्यांचे थवे किलबिल करीत. तेथे इंद्राने पाठविलेल्या वायूने थंडगार झर्‍यांच्या जलबिंदूंसह प्रवेश केला. सुगंधित फुलांच्या परागकाणांनी युक्त असा तो कामभावना उत्तेजित करीत वाहू लागला. रात्रीच्या प्रारंभी चंद्र उदयाला आला होता. वसंतामुळे वेलींच्या जाळ्यांसह असलेले पुष्कळ फांद्यांचे वृक्ष, पाने, फळे आणि फुलांचे गुच्छ यांनी शोभून दिसत होते. वसंतामागोमाग गाणी-बजावणी करणार्‍या गंधर्वांच्या तांड्यांबरोबर स्वर्गीय अप्सरा-समूहाचा नायक कामदेव हातात धनुष्य बाण घेऊन तेथे आला. (१६-२२)

मार्कंडेय मुनी त्यावेळी अग्निहोत्र आटोपून भगवंतांची उपासना करीत होता. त्याने डोळे मिटले होते. तो मूर्तिमंत अग्नीच वाटत होता. त्याला पराभूत करणे अतिशय कठीण होते. इंद्राच्या सेवकांनी त्याला अशा अवस्थेमध्ये पाहिले. अप्सरा त्याच्यासमोर नृत्य करू लागल्या. गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. तर काहीजण मृदंग, वीणा, ढोल इत्यादी वाद्ये अतिशय मनोहर स्वरात वाजवू लागले. त्यावेळी कामदेवाने आपल्या धनुष्याला शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन अशी पाच मुखे असलेला बाण लावला. त्याचवेळी वसंत आणि लोभ हे इंद्राचे सेवक, मार्कंडेय मुनीचे मन विचलित करण्याच्या बेतात होते. पुंजकास्थळी नावाची अप्सरा त्याच्यासमोर चेंडू खेळत होती. स्तनांच्या भारामुळे तिची कंबर वारंवार लचकत होती. वेणी विस्कटलेली असून तीत माळलेला गजरा घरंगळत होता. ती नेत्रकटाक्षांनी इकडे-तिकडे पाहात होती. ती चेंडूच्या पाठीमागे पळत जात असता तिच्या कमरेचा करदोटा तुटला आणि तिची तलम साडी वारा उडवू लागला. आता आपण मार्कंडेय मुनीला जिंकले, असे समजून कामदेवाने त्याच्यावर आपला बाण सोडला. परंतु जसे अशक्त माणसाचे प्रयत्‍न विफल होतात, त्याप्रमाणे मार्कंडेय मुनीवर त्याने केलेला प्रयोग निष्फळ ठरला. हे शौनका ! त्याला तपोभ्रष्ट करण्यासाठी आलेले ते सर्वजण त्या महामुनीच्या तेजाने होरपळू लागले आणि जशी लहान मुले झोपलेल्या सापाला जागे करून पळून जातात, त्याप्रमाणे पळून गेले. हे शौनका ! अशा प्रकारे इंद्राच्या सेवकांनी मार्कंडेय मुनीला पराजित करण्याची इच्छा केली, परंतु तो जराही विचलित झाला नाही, की त्याच्या मनात या घटनेमुळे अहंकार सुद्धा उत्पन्न झाला नाही. महापुरूषांच्या बाबतीत हे काही आश्चर्य नव्हे, हेच खरे ! देवराज इंद्राने पाहिले की, कामदेव आपल्या सेनेसह निस्तेज होऊन परत आला आहे. तसेच ब्रह्मर्षी मार्कंडेय मुनीचा प्रभाव ऐकून इंद्राला फारच आश्चर्य वाटले. (२३-३१)

मार्कंडेय मुनी तपश्चर्या, स्वाध्याय, धाराणा, ध्यान आणि समाधी यांच्याद्वारा भगवंतांचे ठिकाणी चित्त एकाग्र करी. तेव्हा त्याच्यावर कृपा करण्यासाठी नर-नारायण-स्वरूप हरी प्रगट झाले. त्या दोघांपैकी एकाचे शरीर गौरवर्ण होते तर दुसर्‍याचे कृष्णवर्ण. नुकत्याच उमलेल्या कमलाप्रमाणे त्यांचे डोळे होते. त्यांना चार हात होते. एकाने मृगचर्म तर दुसर्‍याने वल्कल परिधान केले होते. हातामध्ये कुशपवित्रे घातली होती आणि गळ्यांत तिपेडी जानवी शोभून दिसत होती. कमंडलू आणि वेळूचे सरळ दंड त्यांनी धारण केले होते. कमळाच्या बियांची माळ, वेद आणि जन्तूंना पिटाळण्याची चवरी त्यांच्याजवळ होती. ब्रह्मदेव, इंद्र इत्यादींना सुद्धा पूज्य असे भगवान नर-नारायण उंचे-पुरे होते. चमकणार्‍या विजेप्रमाणे पिवळ्या रंगाचे त्यांचे तेज होते. मूर्तिमंत तपच असे ते भासत होते. भगवंतांचे साक्षात स्वरूप असे नर-नारायण ऋषी आले आहेत, असे पाहून तो अत्यंत आदराने उठून उभा राहिला आणि त्यांना त्याने साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने त्याचे शरीर इंद्रिये आणि अंतःकरण शांतिसमुद्रामध्ये डुंबू लागले. शरीर पुलकित झाले. डोळे अश्रूंनी एवढे भरुन आले की, तो त्यांना पाहूसुद्धा शकत नव्हता. त्यानंतर तो नम्रपणे हात जोडून उभा राहिला. त्याच्या ह्रदयामध्ये उत्सुकता एवढी दाटून आली होती की, तो जणू भगवंतांना आलिंगनच देत होता. त्याच्या तोडून शब्द फुटत नव्हता. ‘नमस्कार ! नमस्कार !’ एवढेच तो सद्‍गदित वाणीने त्या दोघांना म्हणाला. यानंतर त्याने दोघांना आसन देऊन मोठ्या प्रेमाने त्यांचे चरण धुतले आणि अर्घ्य, चंदन, धूप आणि पुष्पमाळा इत्यादींनी त्यांची पूजा केली. भगवान नर-नारायण सुखाने आसनावर बसले होते आणि मार्कंडेय मुनीवर ते प्रसन्न होते. मार्कंडेयाने त्या सर्वश्रेष्ठ मुनिवेषधारी नर-नारायणांच्या चरणांना पुन्हा नमस्कार केला आणि त्यांची अशी स्तुती केली. (३२-३९)

मार्कंडेय म्हणाला - भगवन ! अल्पज्ञ असा मी जीव आपल्या महिम्याचे वर्णन कसे बरे करू ? आपल्या प्रेरणेनेच सर्व ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देहधार्‍याच्या तसेच माझ्या शरीरामध्येसुद्धा प्राणशक्तीचा संचार होतो आणि नंतर तिच्यामुळेच वाणी, मन व इतर इंद्रियांना प्रेरणा मिळते. अशा प्रकारे परतंत्र अशा इंद्रियांनी आपले भजन केले तरी आपण भक्तांच्या प्रेमबंधनाने बांधले जाता. हे प्रभो ! फक्त विश्वाचे रक्षण करण्यासाठी आपण जसे मत्स्य, कूर्म इत्यादी अनेक अवतार ग्रहण केलेत, तसेच आपण ही दोन्ही रूपेसुद्धा त्रैलोक्याचे कल्याण, त्याच्या दुःखाची निवृत्ती आणि विश्वातील प्राण्यांना मृत्यूवर विजय प्राप्त करता यावा, यासाठी ग्रहण केली आहेत. आपण रक्षण तर करताच. शिवाय कोळी-कीटकाप्रमाणे आपल्यापासूनच हे विश्व प्रगट करता आणि पुन्हा आपल्यामध्येच ते विलीनही करून घेता. आपण चराचराचे पालन आणि नियमन करणारे आहात. मी आपल्या चरणकमलांना नमस्कार करीत आहे. जे आपल्या चरणकमलांना शरण येतात, त्यांना कर्म, गुण आणि काळानुसार निर्माण होणारे क्लेश स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. वेदांचे मर्मज्ञ मुनी आपल्या प्राप्तीसाठी नेहमी आपले स्तवन, वंदन, पूजन आणि ध्यान करीत असतात. हे प्रभो ! चारही बाजूंनी भयाने ग्रासलेल्या लोकांना मोक्षस्वरूप अशा तुमच्या चरणप्राप्तीशिवाय दुसरा कल्याणकारक उपाय आम्हांला माहीत नाही. आपल्या काळस्वरूपाला दोन परार्ध आयुष्य असणारा ब्रह्मदेवसुद्धा भिऊन असतो. तर मग त्यांनी उत्पन्न केलेल्या भौतिक शरीरधारी प्राण्यांबद्दल काय सांगावे? हे भगवन ! आपण सर्व जीवांचे परम गुरू आणि सत्य-ज्ञानस्वरूप आहात. म्हणून आत्मस्वरूपाला झाकून टाकणार्‍या देह-घर इत्यादी निष्फळ, असत्य, नाशिवंत आणि फक्त इंद्रियांच्या अनुभवाला येणार्‍या या सर्व पदार्थांचा त्याग करून मी आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. कोणताही प्राणी जर आपल्याला शरण आला, तर तो त्याचे इच्छित सर्व पदार्थ प्राप्त करून घेऊ शकतो. हे जीवांच्या बन्धो ! या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी अनेक मायामय लीला करण्यासाठी सत्व, रज, तम अशा तिन्ही गुणांच्या ब्रह्मा, रुद्र इत्यादी मूर्ती जरी आपल्याच असल्या, तरीसुद्धा सत्वगुणमय मूर्तीच जीवाला परम शांती प्रदान करते. दुसर्‍या नाहीत. त्यांच्यापासून दुःख, मोह आणि भय हेच मिळते. हे भगवन ! म्हणूनच बुद्धिमान पुरूष आपल्या आणि आपल्या भक्तांच्या परम प्रिय तसेच शुद्ध- अशा नर-नारायणांच्याच मूर्तीची उपासना करतात. पांचरात्र सिद्धांताचे अनुयायी विशुद्ध सत्वालाच आपला अवतार मानतात. त्याच्याच उपासनेने आपले नित्यधाम जे वैकुंठ, त्याची प्राप्ती होते. तसेच अभय आणि आत्मसुख मिळते. दुसर्‍या दोन गुणांना ते स्वीकारीत नाहीत. भगवन ! आपण अंतर्यामी, सर्वव्यापक, सर्वस्वरूप, जगद्‍गुरू, परम आराध्यदैवत आणि शुद्ध स्वरूप आहात. सर्व लौकीक आणि वैदिक वाणी आपल्या अधीन आहे. आपणच वेदमार्गाचे प्रवर्तक आहात. मी आपल्या या युगलस्वरूप नरोत्तम नर आणि ऋषिवर नारायण यांना नमस्कार करतो. प्रत्येक जीवाची इंद्रिये, त्यांचे विषय, प्राण आणि ह्रदयामध्ये जरी आपण असलात, तरीसुद्धा आपल्या मायेने जीवाची बुद्धी इतकी मोहित होऊन जाते, की ती निष्फळ आणि खोट्या इंद्रियांच्या जाळ्यात अडकून आपल्याला जाणत नाही. आपल्या मायेने बुद्धी झाकून गेलेला ब्रह्मदेवसुद्धा सर्वांचे गुरू असलेल्या तुमच्याकडून वेद मिळवितो, तेव्हाच त्याला आपले साक्षात दर्शन होते. हे प्रभो ! आपला साक्षात्कार करून देणारे ते ज्ञान वेदांमध्ये पूर्णपणे विद्यमान आहे की, जे आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रकट करते. ब्रह्मदेव इत्यादी मोठेमोठे ज्ञानी ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्‍न करीत असूनही मोहामध्ये अडकतात. आपणसुद्धा वेगवेगळ्या मतांचे विद्वान आपल्यासंबंधी जसा विचार करतात, तसे रूप धारण करून आपण त्यांच्यासमोर प्रगट होता. आपण देह इत्यादी सर्व उपाधींच्या आत लपलेले विशुद्ध ज्ञानच आहात. हे पुरूषोत्तमा ! मी आपणास वंदन करीत आहे. (४०-४९)

अध्याय आठवा समाप्त

GO TOP