श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ३ रा

राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय - नामसंकीर्तन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - राजे लोक आपल्याला जिंकण्यासाठी उतावीळ झालेले पाहून पृथ्वी त्यांना हसते आणि म्हणते, " केवढे आश्चर्य आहे पहा ! जे स्वत: मृत्यूच्या हातातील बाहुले आहेत, ते मला जिंकून घेऊ इच्छितात. जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर फाजील विश्वास ठेवतात, त्या सुजाण राजांचीही ही इच्छा फोल ठरते. ते असाही विचार करतात की, आपण प्रथम मनासह आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळवू. त्यानंतर आपल्या मंत्री, अमात्य, नागरिक, बांधव आणि सर्व सेनेलासुद्धा वश करून घेऊ. अशा रीतीने शत्रूला जिंकून क्रमाने समुद्रवलयांकित पृथ्वी जिंकू. अशा प्रकारे मनात मनोरे रचणारे ते जवळ आलेल्या मृत्यूला पाहात नाहीत. समुद्रवलयांकित मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात. अंत:करणजयाच्या तुलनेत हे किती क्षुद्र फळ आहे ! कारण मनोजयाचे फळ मुक्ती हे आहे. परीक्षिता ! मनू आणि त्यांचे पुत्र ज्या मला सोडून जेथून आले तेथे रिकाम्या हातांनी परत गेले, त्या मला हे मूर्ख राजे आता युद्धात जिंकून घेऊ इच्छितात. ’ही पृथ्वी आपली आहे,’ ही गोष्ट ज्यांच्या चित्तात ठाण देऊन बसली आहे, त्या दुष्टांच्या राज्यात माझ्यासाठी पिता-पुत्र आणि भाऊ-भाऊ सुद्धा आपापसात लढाई करतात. (१-७)

ते एकमेकांना म्हणतात, " अरे मूर्खा ! ही सगळी पृथ्वी माझी आहे. तुझी नाही. " अशा प्रकारे माझ्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करणारे राजे एकमेकांना मारतात आणि स्वत:ही मरतात. पृथू, पुरूरवा, गाधी, नहुष, भरत, सहस्त्रबाहू अर्जुन, मांधाता, सगर, राम, खट्‍वांग, धुंधुमार, रघू, तृणबिंदू, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, कुवलयाश्व, ककुत्स्थ, नल, नृग, हिरण्यकशिपू, वृत्रासुर, लोकद्रोही रावण, नमूची, शंबर, भौ‍मासुर , हिरण्याक्ष, तारकासुर, इतर अनेक दैत्य आणि शक्तिशाली राजे होऊन गेले. हे सर्वजण ज्ञानी होते, शूर होते, सर्वांना जिंकणारे होते, अजिंक्य होते, तरीसुद्धा हे सगळे मरण पावले. राजन ! त्यांनी अगदी अंत:करणापासून माझ्यावर ममत्व बाळगले. परंतु हे राजा ! काळाने त्यांची इच्छा धुळीला मिळावून त्यांची कहाणीच फक्त शिल्लक ठेवली. " परीक्षिता ! सर्व लोकांत यशाचा विस्तार करून, मरून गेलेल्या महान पुरुषांच्या या कथा मी तुला सांगितल्या. ज्ञान वैराग्याचा उपदेश करण्यासाठीच हा वाणीचा विलास आहे. यामध्ये पारमार्थिक सत्य काहीच नाही. भगवान श्रीकृष्णांचे गुणकीर्तन सर्व अमंगलाचा नाश करणारे आहे. महात्मे नेहमी त्यांचेच गायन करीत असतात. श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा असेल, त्याने नेहमी त्यांचेच श्रवण करावे. (८-१५)

परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! या कलियुगात कलीचे असंख्य दोष लोक कोणत्या उपायांनी नाहीसे करू शकतील ? याशिवाय युगांचे स्वरूप, त्यांचे धर्म, कल्पाची स्थिती आणि प्रलयकालाचे प्रमाण, तसेच सर्वव्यापक , सर्वशक्तिमान भगवंतांच्या कालरूपाचे सुद्धा मला वर्णन करून सांगावे. (१६-१७)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असतात. त्या युगातील लोक चतुष्पाद धर्माचे पालन करतात. सत्ययुगातील बहुतेक लोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रियनिग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे असतात. परीक्षिता ! अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत. यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये हळू हळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात. त्या युगात ब्राह्मणांचे आधिक्य असणारे चार वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्रीलंपटता विशेष नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ व काम यांचे सेवन करतात. अधिकांश लोक वेदांत पारंगत असतात. द्वापार युगामध्ये अधर्माच्या हिंसा , असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते. तसेच यामुळे धर्माचे चार पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यांमध्ये अर्ध्याने घट होते. त्या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन-अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक धनाढ्य कुटुंबवत्सल आणि सुखी असतात. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते. कलियुगात अधर्माच्या चारी पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळेच धर्माचे चारही पाय क्षीण होऊ लागतात व त्यांपैकी एक चतुर्थांश भाग शिल्लक राहातो. शेवटी तोही नाहीसा होईल. कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकरण वैर धरणारे, भाग्यहीन आणि आशाळभूत असतात. त्या युगात लोकांमध्ये शूद्र, कोणी यांचे वर्चस्व असते. (१८-२५)

सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्त्वगुणाचा प्रभाव असतो, तेव्हा सत्ययुग आहे असे समजावे. त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांची आवड असते. हे बुद्धिमान परीक्षिता ! जेव्हा माणसांची भक्ती धर्म, अर्थ आणि काम यांवर असते, तसेच अंत:करणात रजोगुण प्रबळ असतो, तेव्हा त्रेतायुग आहे, असे समजावे. ज्यावेळी रज-तम प्रबळ झाल्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान , दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात, तसेच माणसांना सकाम कर्मे आवडतात, तेव्हा द्वापार युग आहे, असे समजावे. ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, तेव्हा तमोगुणप्रधान कलियुग आहे, असे समजावे. कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल, अधिकांश लोक अभागी व खादाड असतील, दरिद्री असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील. स्त्रिया स्वैराचारी होतील. देशात चोर-लुटारूंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील. ब्राह्मण पोट भरणे आणि कामवासना तृप्त करणे यातच मग्न असतील. ब्रह्मचारी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणार नाहीत व अवित्रपणे राहू लागतील. गृहस्थाश्रमी, भीक मागू लागतील. वानप्रस्थ, गावामध्ये राहू लागतील आणि संन्यासी धनाचे लोभी होतील. स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार जास्त असेल. त्यांना संतती पुष्कळ होईल. त्या निर्लज्ज , नेहमी कर्कश बोलणार्‍या आणि चोरी व कपट करण्यात मोठ्या धाडसी होतील. व्यापारी हलक्या वृत्तीचे व कपटाने व्यापार करणारे होतील. संकटकाळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्य मानलेला व्यापार ते उचित समजून करू लागतील. (२६-३५)

मालक सर्वश्रेष्ठ असला तरी निर्धन असल्यास सेवक त्याला सोडून जातील. सेवक संकटात असला तरी मालक त्याला सोडून देईल. गाय दूध देणे बंद करील, तेव्हा लोक तिचाही त्याग करतील. (३६)

कामवासना तृप्त करण्यासाठी प्रेम करणारी कलियुगातील माणसे स्त्रीलंपट व दीन होतील. ती माता-पिता, बंधू, मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण-भावांकडून सल्ला घेऊ लागतील. शूद्र तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील. आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चसनावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील. हे राजा ! दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील. अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी व्याकूळ राहील. कलियुगातील प्रजा अन्न -वस्त्र, पाणी, झोप, कामसुख, स्नान , अलंकार यांपासून वंचित राहील. लोकांचे दिसणे, पिशाच्चासारखे असेल. कलियुगात लोक, काही कवड्यांसाठीसुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे तर आपल्या सग्या-सोयर्‍यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील. परीक्षिता ! कलियुगातील क्षुद्र माणसे फक्त कामवासनापूर्ती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील. ती आपल्या म्हातार्‍या आई-बापांचे रक्षण करणार नाहीत आणि आई-वडिलसुद्धा सर्व कामांत कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील. (३७-४२)

परीक्षिता ! इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी त्रैलोक्याचे अधिपतीसुद्धा ज्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक लववतात, त्या जगताचे परम गुरू भगवंतांचीही कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसे बहुधा पूजा करणार नाहीत. एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुळतेने किंवा पडताना, घसरताना, अगतिक होऊन जरी भगवंतांचे नाव घेतले, तरीसुद्धा त्याची सर्व कर्मबंधने तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंतांच्या आराधनेला विन्मुख होतील. (४३-४४)

कलियुगामुळे वस्तू, ठिकाणे आणि अंत:करणे यांमध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंतांचे स्मरण केले असता नाहीसे होतात. हृदयत असलेले भगवान, श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. जसा सोन्याशी संबंध आल्यावर अग्नी त्या धातूतील हीण नाहीसे करतो, त्याप्रमाणे भगवान विष्णू साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. भगवान पुरुषोत्तम हृदयामध्ये विराजमान झाल्यावर मनुष्याचे अंत:करण जसे शुद्ध होते, तसे ते विद्या, तपश्चर्या, प्राणायाम, सर्व प्राण्यांविषयी मैत्रीचा भाव, तीर्थस्नान, व्रत, दान, जप इत्यादी कोणत्याही साधनाने होत नाही. (४५-४८)

परीक्षिता ! आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे . म्हणूनच एकाग्रचित्ताने सर्वभावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदयसिंहासनावर स्थापना कर. असे केल्याने तुला परमगती प्राप्त होईल. (४९)

मृत्युकाळ जवळ आलेल्यांनी भगवंतांचेच ध्यान करावे. परीक्षिता ! असे केल्याने सर्वांचे परम आश्रय आणि सर्वात्मा भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. परीक्षिता ! दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठायी एक मोठा गुण आहे. तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्णांचे फक्त संकीर्तन केल्यानेच सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. सत्ययुगात भगवंतांच्या ध्यानाने , त्रेतायुगात यज्ञांनी, द्वापारयुगात पूजा-सेवेने जे फळ मिळते, ते कलियुगामध्ये फक्त भगवन्नमाचे कीर्तन केल्यानेच प्राप्त होते. (५०-५२)

अध्याय तिसरा समाप्त

GO TOP