|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय ३० वा
यदुकुळाचा संहार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले महाभागवत उद्धव बदरिकाश्रमाला निघून गेल्यावर, सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये काय केले ? हे प्रभो ! आपले कुळ ब्राह्मणांच्या शापाने ग्रस्त झाल्यावर यदुवंशशिरोमणींनी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार्या आपल्या लीलाविग्रहाचा कसा त्याग केला ? भगवान श्रीकृष्णांचे ते रूप इतके सुंदर होते की, जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पाहात, तेव्हा तेथून आपली नजर काढून घेऊ शकत नसत जेव्हा भक्तांच्या कानांवर त्यांचे वर्णन येई, तेव्हा ते त्यांच्या चित्तातून निघून जात नसे त्यांची शोभा कवींना वर्णनाचे प्रेम निर्माण करी आणि त्यायोगे त्यांचा मान वाढवी अर्जुनाच्या रथामध्ये बसलेल्या त्या रूपाला पाहात पाहात युद्धामध्ये ज्यांनी प्राण सोडले, ते सुद्धा त्यांच्या सारूप्याला प्राप्त झाले. (१-३) श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये मोठमोठे अपशकुन होत असलेले पाहून सुधर्मा सभेमध्ये असलेल्या यादवांना असे म्हटले. "हे श्रेष्ठ यादवांनो ! द्वारकेत हे मोठमोठे भयंकर उत्पात होऊ लागले आहेत ते जणू यमराजाचे ध्वज आहेत आता आपण येथे एक मुहूर्तसुद्धा थांबता कामा नये. स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांनी शंखोद्धारक्षेत्री जावे आणि जेथे सरस्वती नदी पश्चिमेकडे वाहाते, त्या प्रभासक्षेत्री आपण जाऊ, तेथे आपण स्नान करून पवित्र होऊ, उपवास करू आणि एकाग्र चित्ताने अभिषेक, चंदन इत्यादी सामग्रीने देवतांची पूजा करू तेथे आपण पुण्याहवाचनानंतर गाई, भूमी, सोने, वस्त्रे हत्ती, घोडे, रथ आणि निवासस्थाने श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करू. हा विधी अमंगलाचा नाश करणारा आणि परम मंगल करणारा आहे देवता, ब्राह्मण आणि गाईची पूजाच मनुष्यांना परम लाभदायक आहे". (४-९) श्रीकृष्णांचे हे म्हणणे ऐकून, सर्व वृद्ध यादव "ठीक आहे" असे म्हणून नावांमधून समुद्र पार करून, रथातून प्रभासक्षेत्राकडे गेले. तेथे गेल्यावर यदुदेव भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार, यादवांनी अत्यंत भक्तीने सर्व प्रकारची मंगलकृत्ये केली. तेथेच दैवाने बुद्धी भ्रष्ट झालेल्या त्यांनी मैरेयक नावाची मदिरा मोठ्या प्रमाणात घेतली नाहीतरी मद्याने बुद्धी भ्रष्ट होतेच. मदिरेच्या अतिसेवनाने धुंद झालेले ते गर्विष्ठ वीर एकमेकांशी लढूझगडू लागले वास्तविक श्रीकृष्णांच्या मायेनेच ते भ्रमिष्ट झाले होते. (मदिरा हे निमित्त होते). रागाच्या भरात विवेकहीन होऊन ते त्या किनार्यावरच धनुष्ये व तलवारी, भाले, गदा व तोमर, ऋष्टी इत्यादी शस्त्रांनी एकमेकांशी युद्ध करू लागले. अत्यंत उन्मत्त झालेले यादव रथ, हत्ती, घोडे, गाढवे, उंट, खेचरे, बैल, रेडे आणि माणसांवरसुद्धा स्वार होऊन एकमेकांना बाणांनी घायाळ करू लागले जसे जंगली हत्तींनी एकमेकांना घायाळ करावे तसे त्यावेळी त्यांच्या वाहनांवर ध्वज फडकत होते. प्रद्युम्न सांबाशी, अक्रूर भोजाशी, अनिरूद्ध सात्यकिशी, सुभद्र संग्रामजिताशी, गद गद नावाच्या पुतण्याशी, आणि सुमित्र सुरथाशी युद्ध करू लागला ते भयंकर योद्धे क्रोधाने एकमेकांचा विनाश करण्यासाठी सज्ज झाले होते. यांच्याव्यतिरिक्त निशठ, उल्मुक, सहस्त्रजित, शतजित, भानू इत्यादी यादवसुद्धा मदधुंद होऊन एकमेकांना भिडले श्रीकृष्णांच्या मायेनेच अतिशय मोहित होऊन ते एकमेकांना मारू लागले. दाशार्ह, वृष्णी, अंधक, भोज, सात्वत, मधू, अर्बुद, माथुर, शूरसेन, विसर्जन, कुकुर आणि कुंती वंशातील लोक आपापसातील प्रेम विसरून एकमेकांना मारू लागले. (१०-१८) बुद्धिभ्रंश झालेले पुत्र पित्याशी, भाऊ भावाशी, भाचे मामांशी, नातू आजोबांशी, मित्र मित्रांशी, सुहृद सुहृदांशी, काका पुतण्याशी व नातलग नातलगांशी आपापसात लढून मरूमारू लागले. शेवटी जेव्हा बाण संपून धनुष्ये मोडली आणि शस्त्रास्त्रे संपली तेव्हा त्यांनी हातांत समुद्रतटावर उगवलेले लव्हाळे उपटून घेतले ते लव्हाळे ऋषींच्या शापामुळे उत्पन्न झालेल्या लोखंडी मुसळाच्या चूर्णापासून तयार झालेले असल्यामुळे वज्राप्रमाणे शक्तिशाली लोहदंड बनले आता तेच एकमेकांवर मारू लागले श्रीकृष्णांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर ते मायामाेेहित अविचारी त्यांना आणि बलरामांनाच आपले शस्त्रू समजून त्यांनासुद्धा मारण्यासाठी सरसावले. हे कुरूनंदना ! तेव्हा तेही संतप्त होऊन युद्धभूमीवर इकडेतिकडे फिरत हातात लव्हाळ्यांचे परिघ घेऊन त्यांना मारू लागले. जसा बांबूंच्या एकमेकावर घासण्याने निर्माण झालेला अग्नी त्यांचेच भस्म करून टाकतो, त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या शापाने शापित आणि श्रीकृष्णांच्या मायेने मोहित झालेल्या यादवांना स्पर्धामूलक क्रोधाने नष्ट करून टाकले. आपल्या सर्व कुळांचा संहार झाला, तेव्हा पृथ्वीवरील उरलासुरला भारसुद्धा नाहीसा झाला, असे श्रीकृष्णांना वाटले. (१९-२५) बलरामांनी समुद्रकिनार्यावर बसून एकाग्रचित्ताने परमात्मचिंतन करीत आत्म्याला परमात्म्याशी जोडून मनुष्यदेहाचा त्याग केला. बलराम स्वरूपात लीन झालेले पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरच गप्प बसले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारे चतुर्भुज रूप धारण केले होते धूर नसलेल्या अग्नीप्रमाणे ते दिशा प्रकाशमान करीत होते. त्यांच्या मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्यासारखी कांती होती वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह शोभत होते त्यांनी रेशमी पीतांबर आणि शेला धारण केला होता त्यांचे हे रूप अतिशय मंगलकारक होते. मुखकमलावर सुंदर हास्य आणि काळे कुरळे केस शोभून दिसत होते कमळाप्रमाणे सुंदर नेत्र होते मकराकृती कुंडले कानात झगमगत होती. कमरेला करदोटा, गळ्यात जानवे, मस्तकावर मुगुट हातांमध्ये कंकण, बाहूंमध्ये बाजूबंद, वक्षःस्थळावर हार, पायांमध्ये नूपुरे, बोटांमध्ये अंगठ्या आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत होता. गळ्यात वनमाळा रूळत होती शंख, चक्र, गदा, पद्य ही आयुधे मूर्तिमंत होऊन जवळ उभी होती त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले होते. (२६-३२) जरा नावाचा एक व्याध होता त्याने शापित मुसळाचा उरलेला लोखंडी तुकडा आपल्या बाणाच्या टोकाला लावला होता त्याने तो बाण हरिणाच्या मुखासारख्या वाटणार्या भगवंतांच्या त्या पायावर मारला. जवळ आल्यावर ते चतुर्भुज भगवान आहेत, असे पाहून त्याला अपराधाची जाणीव झाली म्हणून भिऊन त्याने असुरांचा नाश करणार्या त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. तो म्हणाला, "हे मधुसूदना ! मी पाप्याने हे अजाणतेपणाने केले मी पापी आहे उत्तमकीर्ती पुण्यशील भगवन ! आपण मला क्षमा करावी. हे सर्वव्यापक प्रभो ! ज्यांचे स्मरण माणसांचा अज्ञानांधकार नष्ट करते, त्या आपल्या बाबतीत मी फार वाईट कृत्य केले. हे वैकुंठा ! आपण मलापापी पारध्याला तत्काळ मारून टाका त्यामुळे तरी मी पुन्हा असा महापुरूषांचा अपराध करू धजणार नाही. आपल्या योगमायेचा विलास ब्रह्मदेव, त्यांचे पुत्र रूद्र इत्यादी, किंवा वाणीचे अधिष्ठाता बृहस्पती इत्यादीसुद्धा जाणत नाहीत कारण त्यांचे ज्ञान आपल्या मायेने झाकले गेले आहे मग आमच्यासारखे पापी त्याचे काय वर्णन करू शकणार बरे ? (३३-३८) भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे जरे ! तू भिऊ नकोस ! ऊठ ! हे काम तू माझ्या मनासारखेच केलेस जा ! ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते, त्या स्वर्गात माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास कर. (३९) श्रीशुक म्हणतात आपल्या इच्छेने शरीर धारण करणार्या भगवान श्रीकृष्णांनी व्याधाला असे म्हटले, तेव्हा त्याने त्यांना तीन प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला आणि विमानात बसून तो स्वर्गात गेला. (४०) भगवान श्रीकृष्णांचा सारथी दारूक त्यांचा शोध घेत होता त्यांनी धारण केलेल्या तुळशीच्या सुगंधाच्या वार्यावरून तो त्यांच्यासमोर आला. दारुकाने तेथे जाऊन पाहिले, तर आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसले आहेत असह्य तेजाची आयुधे मूर्तिमंत होऊन तेथे आली आहेत त्यांना पाहून दारूकाच्या हृदयात प्रेमाचा पूर आला डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या रथातून खाली उडी मारून त्याने भगवंतांच्या चरणांवर लोटांगण घातले. दारुकाने म्हटले "हे प्रभो ! रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे आपले हे चरणकमल न दिसल्यामुळे मला दिशा कळेनाशा झाल्या आणि मी अस्वस्थ झालो. श्रीशुक म्हणतात दारूक असे बोलत असताना त्याच्यादेखतच भगवंतांचा गरुडध्वज रथ, ध्वज व घोड्यांसह आकाशात उडाला. त्या पाठोपाठ भगवंतांची दिव्य आयुधेसुद्धा निघून गेली हे सर्व पाहून अत्यंत चकित झालेल्या दारूकाला भगवान म्हणाले. दारूका ! तू द्वारकेला जा आणि तेथील बांधवांना यादवांशी एकमेकांचा केलेला संहार, बलरामदादांची परमगती आणि माझी अवस्था सांग. तसेच त्यांना सांगा की, "आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका मी सोडलेली ती नगरी समुद्र बुडवून टाकील. सर्वांनी आपापली संपत्ती आणि मातापित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावे. मी सांगितलेल्या भागवतधर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो तसेच हे सारे माझी माया समजून शांत हो". (४१-४९) हे ऐकून दारूकाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेवून वारंवार नमस्कार केला त्यानंतर खिन्न मनाने तो द्वारकेला गेला. (५०) अध्याय तिसावा समाप्त |