श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २२ वा

तत्त्वांची संख्या आणि पुरूषप्रकृतिविवेक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धव म्हणाला हे प्रभो ! हे विश्वेश्वर ! तत्त्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे ? आपण तर नुकतीच नऊ, अकरा, पाच आणि तीन म्हणजेच एकूण अठ्ठावीस तत्त्वे सांगितलेली ऐकली काहीजण सव्वीस तत्त्वे सांगतात, तर दुसरे काहीजण पंचवीस काहीजण सात, नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात, तर काहीजण अकरा ! काहीजण सतरा, काहीजण सोळा, तर काहीजण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा ! इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात ? आपण कृपा करून ते आम्हांला सांगावे. (१-३)

श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! यांविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात, ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्त्वे सर्वांच्यामध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे ? "तुम्ही जे म्हणता, ते बरोबर नाही मी जे सांगतो, तेच बरोबर" अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद, सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. सत्त्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच, केवळ नावरूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे वादविवाद करणार्‍यांच्या वादाचा हाच विषय आहे जेव्हा इंद्रिये आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते, तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वादसुद्धा शांत होतो. हे पुरूषश्रेष्ठा ! तत्त्वे एकमेकात प्रवेश करू शकतात, म्हणून तत्त्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो, त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो. एकाच कारणरूप तत्त्वामध्ये किंवा कार्यरूप तत्त्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्त्वे मिसळलेली दिसतात. यांची गणती जे जे करू इच्छितात, त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये अंतर्भूत करून तत्त्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे, ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे. (४-९)

जीव अनादी कालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसर्‍या सर्वज्ञाची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रकृतीची चोवीस तत्त्वे, पुरूष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्त्वे आहेत. या शरीरामध्ये असणार्‍या जीव आणि ईश्वरामध्ये किंचितही भेद नाही म्हणून त्यांना वेगळे मानू नये ज्ञान हा सत्त्वगुणात्मक प्रकृतीचा गुण आहे. (अशा प्रकारे २४ जड तत्त्वे आणि एक चेतन पुरूष मिळून २५ तत्त्वे झाली). तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे स्वरूप आहे म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. या विवेचनात सत्त्वगुणच ज्ञान आहे, रजोगुणच कर्म आहे आणि तमोगुणच अज्ञान म्हटले गेले आहे तसेच गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काळ आहे आणि सूत्र म्हणजे महत्तत्त्वच स्वभाव होय. (१०-१३)

पुरूष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही नऊ तत्त्वे, मी अगोदरच सांगितली आहेत कान, त्वचा, डोळे, नाक आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही पाच कम]द्रिये तसेच कम]द्रिये व ज्ञानेंद्रिये असे उभयरूप मन, अशी अकरा इंद्रिये आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय अशा प्रकारे तीन, नऊ, अकरा आणि पाच अशी सर्व मिळून अठ्ठावीस तत्त्वे होतात कम]द्रियांच्या द्वारे होणारी, चालणे, बोलणे, मलमूत्र त्याग आणि काम करणे या पाच कर्मांमुळे तत्त्वांची संख्या वाढत नाही यांना कम]द्रियस्वरूप मानावे. सृष्टीच्या प्रारंभी कार्य. (अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते) आणि कारण. (महत्तत्त्व इत्यादी) यांच्या रूपाने प्रकृतीच असते तीच सत्त्वादी गुणांच्या रूपाने विश्व स्वतःमध्ये धारण करते अव्यक्त परमात्मा या प्रकृतीचा फक्त साक्षी असतो. महत्तत्त्व इत्यादी प्रकृतीचे कार्य व अहंकारादिकांचे कारण असणारे पदार्थ आदिपुरूषाच्या संकल्पामुळे शक्ती प्राप्त करून घेऊन एकमेकांत मिसळतात आणि प्रकृतीच्या साह्याने ब्रह्मांड निर्माण करतात. (१४-१८)

उद्धवा ! जे लोक तत्त्वांची संख्या सात मानतात, त्यांच्या विचारसरणीनुसार आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते, सहावा जीव आणि सातवा परमात्मा होय तो जीव व जग या दोहोंचा आधार आहे या सातांपासून देह, इंद्रिये व प्राण उत्पन्न होतात म्हणून ते स्वतंत्र मानले नाहीत. जे फक्त सहा तत्त्वांचा स्वीकार करतात, ते असे म्हणतात की, पाच महाभूते आणि सहावा परमात्मा तो परमात्मा आपण निर्माण केलेल्या पंचमहाभूतांनी युक्त होऊन देह इत्यादींची सृष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करतो. काहीजण आत्म्यापासून तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आहे, म्हणून ही चारच तत्त्वे आहेत असे म्हणतात कारण सर्व कार्यांचा जन्म यांच्यापासूनच आहे. काही लोक पंच महाभूते, पाच तन्मात्रा, पाच ज्ञानेंद्रिये, एक मन आणि एक आत्मा, अशी तत्त्वांची संख्या सतरा सांगतात. जे तत्त्वांची संख्या सोळा सांगतात, ते आत्म्यामध्येच मनाचाही समावेश करतात जे लोक तेरा तत्त्वे मानतात, ते म्हणतात की, पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा आणि परमात्मा. अकरा संख्या मानणारे पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये आणि एक आत्मा मानतात काहीजण पाच सूक्ष्म भूते, मन, बुद्धी, अहंकार, पुरूष ही नऊ तत्त्वे मानतात. ऋषींनी अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींनी तत्त्वांची गणना केली आहे सगळ्यांचे म्हणणे युक्तिसंगत असल्यामुळे उचितच आहे नाहीतरी विद्वानांना काय शोभत नाही ? (१९-२५)

उद्धव म्हणाला हे कृष्णा ! जरी स्वरूपतः प्रकृती आणि पुरूष हे एकमेकांपासून सर्वथैव वेगळे आहेत, तरीसुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही प्रकृतीमध्ये पुरूष आणि पुरूषामध्ये प्रकृती आहे, असेच वाटते. (२६)

हे कमलनयना ! अशा प्रकारे, यांची भिन्नता आणि अभिन्नता पाहून माझ्या अंतःकरणामध्ये फार मोठा संशय निर्माण झाला आहे हे सर्वज्ञा ! आपल्या युक्तिसंगत वाणीने माझ्या या संशयाचे निराकरण करा. भगवन ! आपल्याच कृपेने जीवांना ज्ञान होते आणि आपल्याच अविद्याशक्तीने त्यांच्या ज्ञानाचा नाश होतो या आपल्या मायेचे हे स्वरूप आपणच जाणता दुसरे कोणीही नाही. (२७-२८)

श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! प्रकृती आणि पुरूष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे कारण गुणांच्या क्षोभाने सृष्टी उत्पन्न होते म्हणून ती विकारांनी युक्त आहे. उद्धवा ! माझी माया त्रिगुणात्मिका आहे तीच आपल्या गुणांनी अनेक प्रकारच्या भेदवृत्ती निर्माण करते हिची कार्ये जरी अनेक असली तरीसुद्धा त्यांची अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या तीन भागांमध्ये विभागणी केली जाते. जसा, डोळा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळ्यांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे हे तिघेही एकमेकांच्या आश्रयाने राहातात परंतु आकाशातील सूर्य एक असून तो स्वतःसिद्ध आहे तसाच आत्मासुद्धा तिन्ही भेदांचे मूलकारण असल्यामुळे एकरूप असून त्यांच्याहून वेगळा आहे तो स्वयंप्रकाश असून आपल्या प्रकाशाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे त्वचा, कान, जीभ, नाक आणि चित्त इत्यादींचे सुद्धा तीनतीन भेद आहेत**. त्वचा, स्पर्श, वायू; कान, शब्द, दिशा; जीभ, रस, वरुण; नाक, वास, अश्विनीकुमार; चित्त, चिंतनविषय, वासुदेव प्रकृतीपासून महत्तत्त्व आणि महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो म्हणून हा अहंकार गुणांच्या क्षोभाने उत्पन्न झालेल्या प्रकृतीचेच कार्य आहे अहंकाराचे तीन भेद आहेत, वैकारिक. (सात्त्विक), ऐंद्रिय. (राजस) आणि तामस हा अहंकारच अज्ञान आणि सृष्टीच्या विविधतेचे कारण आहे. (२९-३२)
**त्वचा, स्पर्श, वायू, कान, शब्द, दिशा, जीभ, रस, वरुण, नाक, वास, अश्विनीकुमार, चित्त, चिंतनविषय, वासुदेव.

आत्म्याच्या अज्ञानामुळे तो आहे किंवा नाही, हा वाद आहे पदार्थांविषयीची भेदबुद्धीही आत्म्याच्या अज्ञानामुळे आहे हे सर्व अर्थशुन्य असूनही ज्ञानस्वरूप अशा मला जे लोक विन्मुख आहेत, त्यांचा हा वाद संपत नाही. (३३)

उद्धवाने विचारले भगवान ! आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्चनीच योनींमध्ये जातयेत राहातात. हे गोविंदा ! ज्या लोकांना आत्मज्ञान नसते, त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे हे जाणत नाहीत म्हणून आपणच मला याचे रहस्य सांगा. (३४-३५)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले - मनुष्यांचे मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे त्या संस्कारांनुसार भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन पाच इंद्रियांसह एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जात असते. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो त्यामुळे त्याला सुद्धा आपले जाणेयेणे भासू लागते. कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकांशी संबंधीत विषयांचे चिंतन करीत असते जेव्हा ते नव्या विषयाचे चिंतन करते, तेव्हा ते पहिला विषय विसरते त्यावेळी त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला, पहिल्या देहाचे विस्मरण होते कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणे. (किंवा त्याला पूर्णपणे विसरणे) म्हणजेच मृत्यू होय. हे उदार उद्धवा ! मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो, तोच त्याचा जन्म होय ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराचा आपले म्हणून स्वीकार करतो. नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिले स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचेच असूनही नव्यानेच उत्पन्न झालो आहो, असे मानतो. मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम व अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो तसाच आतबाहेर हा भेद उत्पन्न होतो जसा दृष्ट पुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांचा शत्रू किंवा मित्र बनतो. उद्धवा ! काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीरांशी उत्पत्ती आणि नाश असूनही ते दिसून येत नाहीत. कालाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरील फळांच्या अवस्था बदलत असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था इत्यादीसुद्धा बदलत असतात. त्याच ज्योतीचा हा दिवा आहे, प्रवाहातील पाणी तेच आहे, असे समजणे आणि म्हणणे जसे खोटे आहे, त्याचप्रमाणे विषयचिंतनामध्ये आपले आयुष्य व्यर्थ घालविणार्‍या अविवेकी पुरूषांचे तोच हा मनुष्य असे म्हणणे आणि समजणे सर्वथैव खोटे आहे. तो अविवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही की मरतही नाही परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसे वाटते जसा लाकडाशी संयोग झाल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विझतो असे वाटते वास्तविक अग्नी नित्य आहे. (३६-४५)

उद्धवा ! गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारूण्य, म्हातारपण आणि मृत्यू या नऊ अवस्था शरीराच्याच आहेत. जीवापासून वेगळे असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत परंतु अज्ञानामुळे, गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे जन्म आणि मृत्यू असणार्‍या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. झाडाचे बी आणि त्याची परिपक्वता पाहाणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहातो या दोन्ही गोष्टी पाहाणारा जसा झाडाहून वेगळाच असतो, तसा शरीराचे जन्ममृत्यू पाहाणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो. अज्ञानी पुरूष, प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळल्यामुळे विषयभोगांनाच खरे सुख मानून त्यातच गुरफटून जातो आणि जन्ममरणरूप संसारचक्रात सापडतो. जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत असतो, तेव्हा सात्त्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी, देव या योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य, असुर या योनींमध्ये आणि तामस कर्मांच्या आसक्तीने भूतप्रेत, पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेतो. जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचतानागाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. जलाशयामधील पाणी हलण्याने त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हालत असल्यासारखी दिसतात किंवा डोळे फिरविले असता पृथ्वीसुद्वा फिरताना दिसते, किंवा जसे मनातील विचार अथवा स्वप्नातील पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे, हे उद्धवा ! आत्म्याचा विषयानुभवरूप संसारसुद्धा खोटा आहे. जशी स्वप्नातील अनर्थपरंपरा ते पाहात असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जो जीव त्यांचेच चिंतन करीत राहातो, तोपर्यंत त्याचे हे संसारचक्र थांबत नाही. (४६-५५)

म्हणून उद्धवा ! या नाठाळ इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेऊ नकोस आत्म्याच्या अज्ञानामुळे भासणारा हा भेदभ्रम आहे, असे समज. दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवले, उपजीविकेचे साधन काढून घेतले, अंगावर थुंकले, मूत्रविसर्जन केले किंवा निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्‍न केला किंवा अशा तर्‍हेचे कोणतेही संकट असले, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, त्याने आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणींपासून स्वतःचे रक्षण करावे. (५६-५८)

उद्धव म्हणाला भगवन ! हे ज्ञान देण्यात आपणच कुशल आहात दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाहीत म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की, जेणेकरून मी हे आचरणात आणू शकेन. हे विश्वात्मन ! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येत नाही. (५९-६०)

अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP