श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १५ वा

भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भगवान श्रीकृष्ण म्हणातात - योगी जेव्हा इंद्रिये, प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझे ठिकाणी एकाग्र करतो, तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहातात. (१)

उद्धव म्हणाला - हे अच्युता ! आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे, हे मला सांगा. (२)

श्रीकृष्ण म्हणाले - उद्धवा ! धारणा योगातील निष्णात योग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यांपैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या दहा सत्त्वगुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात. त्यांपैकी ‘अणिमा‘ ‘महिमा, आणि ‘लघिमा‘ या तीन सिद्धी शरीराशी संबंधित आहेत ‘प्राप्ती‘ नावाची इंद्रियांची सिद्धी आहे लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी ‘प्राकाम्य‘ नावाची सिद्धी आहे माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालविणे या सिद्धीला ‘ईशिता‘ असे म्हणतात. विषयांमध्ये राहूनसुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला ‘वशिता‘ म्हणतात आणि ज्याची ज्याची इच्छा करावी, ती पूर्णपणे मिळवणे, ती ‘कामावसायिता‘ नावाची आठवी सिद्धी होय या आठ सिद्धी माझ्या ठायी स्वभावतःच आहेत. देहावर तहानभुकेचा परिणाम न होणे, पुष्कळ लांबची वस्तू दिसणे, पुष्कळ लांबचे ऐकू येणे, मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणे, पाहिजे ते रूप घेणे, दुसर्‍या शरीरात प्रवेश करणे, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे, अप्सरांबरोबर होणार्‍या देवक्रीडेचे दर्शन होणे, जो संकल्प कराल तो सिद्ध होणे, सगळ्या ठिकाणी, सगळ्यांकडून आपल्या आज्ञेचे पालन होणे, या दहा सिद्धी सत्त्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात. तिन्ही काळातील गोष्टी समजणे, शीतउष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे, दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात. योगधारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्यांचे मी नावांसह वर्णन केले आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी, कशी प्राप्त होते, ते सांगतो, ऐक. (३-९)

प्रिय उद्धवा ! तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप, ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो, त्याला ‘अणिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते. आपल्या मनाला महत्तत्त्वरूप माझ्यामध्ये जो धारण करतो, त्याला महत्तत्त्वाकार ‘महिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे एकेका महाभूतामध्ये त्याने मनाची धारणा केली, तरीसुद्धा त्याला त्या त्या महाभूताएवढी ‘महिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते. जो योगी आपले चित्त भूतांच्या परमाणुस्वरूप माझ्या ठिकाणी लावतो, त्याला ‘लघिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते व त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणूएवढे रूप घेता येते. योग्याने जर सात्त्विक अहंकाररूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले, तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त ‘प्राप्ती‘ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. महत्तत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली, तर ‘प्राकाम्य‘ नावाची सिद्धी प्राप्त होते तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णुस्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील, त्याला ईशित्व‘ सिद्धी प्राप्त होते त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. विराट, हिरण्यगर्भ व कारण या तीन उपाधींनी रहित म्हणून ‘तुरीय‘ व सहा ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून ‘भगवान‘ अशी ज्यांना नावे आहेत, त्या माझ्या नारायणस्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो, त्याचे ठिकाणी माझे गुण येतात असा योगी ‘वशिता‘ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते हिला ‘कामावसायिता‘ नावाची सिद्धी म्हणतात. श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपले चित्त स्थिर करतो, तो तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. आकाशात्मा जो समष्टिप्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनाने अनाहतनादाचे चिंतन करतो, तो ‘दूरश्रवण‘ नावाच्या सिद्धीने युक्त होतो या सिद्धीमुळे त्या योग्याला आकाशातील निरनिराळ्या वाणी ऐकू येतात. जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यांमध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हींमध्ये मनाने माझे ध्यान करतो, त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला ‘दूरदर्शन‘ नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो. मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो, त्याला ‘मनोजव‘ नावाची सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तो योगी जेथे मन जाईल, तेथे शरीराने त्याच क्षणी जाऊ शकतो. ज्यावेळी योगी मनाला उपादानकारण बनवून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो, ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण, त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते. जो योगी दुसर्‍या शरीरात प्रवेश करू इच्छितो, त्याने अशी भावना करावी की, आपण त्याच शरीरात आहोत असे केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसर्‍या फुलावर सहज जातो, त्याप्रमाणे तो आपले शरीर सोडून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो. योग्याला जर शरीराचा त्याग करावयाचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. देवतांच्या विहारस्थलांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्त्वगुणाचे ध्यान करावे त्यामुळे सत्त्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. (१०-२५)

माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने, सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो मनाने ज्या वेळी जो संकल्प तो करतो, त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. ‘ईशित्व‘ आणि ‘वशित्व‘ अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो, माझ्याप्रमाणेच त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. माझी धारण करीत करीत ज्या योग्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झाले असेल, त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळांतील सर्व गोष्टी समजतात. पाण्यात राहणार्‍या प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले आहे, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. जो योगी श्रीवत्स इत्यादी चिह्ने आणि शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचे ध्यान करतो, तो अजिंक्य होतो. (२६-३०)

अशा प्रकारे जो माझे चिंतन करणारा पुरूष योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात. ज्याने आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार ? परंतु श्रेष्ठ पुरूष असे सांगतात की, जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत, त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे कारण यांच्यामुळे भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. जन्म, औषधी, तपश्चर्या आणि मंत्र इत्यादींमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत्प्राप्ती, ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितली आहेत त्यांचा तसेच सर्व सिद्धींचे कारण, पालन करणारा आणि प्रभू मीच होय. ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आतबाहेर पंचमहाभूतेच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपाने आणि बाहेर दृश्यरूपाने आहे कारण मी कोणतेही आवरण नसलेला, सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. (३१-३६)

अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP