श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ६ वा

भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभासक्षेत्री
जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात एकदा द्वारकेत आपले पुत्र सनक इत्यादी, देव आणि प्रजापतींसह ब्रह्मदेव, भूतगणांसह सर्वेश्वर महादेव, मरूद्गणांसह देवराज इंद्र, बारा आदित्य, आठ वसू, अश्विनीकुमार, ऋभू, अंगिरस, अकरा रूद्र, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर इत्यादी देवगण, मनुष्यासारखा मनोहर वेष धारण करून ज्यांनी आपल्या श्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरविली, त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध असलेल्या त्या देदीप्यमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणार्‍या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले, तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते. स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थांनी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. (१-६)

देव म्हणाले "हे स्वामी ! कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करीत असतात, त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिये, प्राण, मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करीत आहोत. हे अजित ! आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेने व्यक्तरूपात आपल्यातच उत्पत्ती, पालन आणि संहार करता पण या कर्मांनी आपण लिप्त होत नाही कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निमग्न असता. हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन ! ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषादिकांनी कलुषित झालेली असते, ते उपासना, वेदाध्ययन, दान, तपश्चर्या, यज्ञइत्यादी कर्मांनी तशी शुद्ध होत नाही, जशी शुद्धान्तःकरण मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने होते. मोक्षप्राप्तीसाठी मननशील मुमुक्षू ज्यांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात, पांचरात्रविधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरूद्ध या चतुर्व्यूहाच्या ठिकाणी जितेंद्रिय भक्त स्वर्गलोकाच्या पलीकडील भगवद्धामाच्या प्राप्तीसाठी त्रिकाळ ज्यांची पूजा करतात, याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हविर्द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात, तुमचेच स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगीजन हृदयाच्या आत ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तजनांना जे परम इष्ट वाटतात, तेच आपले चरण हे प्रभो ! आमच्या सर्व अशुभ वासना, भस्म करण्यासाठी अग्निस्वरूप होवोत. हे प्रभो ! ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षःस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सवतीप्रमाणे मत्सर करीत असते तरीसुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात, ते आपले चरण नेहमी आमच्या विषयवासनांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होवोत !. हे भगवन अनंता ! वामन अवतारामध्ये बलीच्या बंधनासाठी ज्याने तीन पावले टाकली होती, जो सत्यलोकावरील विजयध्वजच वाटत होता, ब्रह्मदेवांनी जो धुतला तेव्हा त्यातून कोसळणार्‍या गंगेच्या तीन धारा तीन पताकांसारख्या वाटत होत्या, ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत आणि देवसेना निर्भय झाली होती, जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुरांना पाताळात नेणारा होता, तो आपला चरण आम्हा भजन करणार्‍यांचे सगळे पाप धुऊन टाको !. आपापसात भांडून कष्टी होणारे ब्रह्मदेव इत्यादी शरीरधारी, वेसण घातलेले बैल मालकाच्या ताब्यात असावेत, त्याप्रमाणे ज्याच्या अधीन आहेत, जो कालस्वरूप व प्रकृतिपुरूषांच्या पलीकडे असणार्‍या आपला पुरूषोत्तमाचा चरण आहे, तो आमचे कल्याण करो !. हे प्रभो ! या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे आपण परम कारण आहात कारण शास्त्रे म्हणतात की, आपण प्रकृती, पुरूष आणि महत्तत्त्व यांचेसुद्धा नियंत्रण करणारे काल आहात तोच हा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीन रूपांनी युक्त असणार्‍या संवत्सराच्या रूपाने सर्वांना विनाशाकडे घेऊन जाणारा आहे तो अतिशय वेगवान काळ म्हणजे आपण पुरूषोत्तम आहात. हा पुरूष आपल्याकडे शक्ती प्राप्त करून घेऊन अमोघवीर्य बनतो आणि नंतर मायेमध्ये विश्वाच्या गर्भरूप महत्तत्त्वाची स्थापना करतो यानंतर तेच महत्तत्त्व त्रिगुणमय मायेच्या साह्याने पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनेरी ब्रह्मांडाची रचना करते. म्हणून, हे हृषीकेशा ! आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात; याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणार्‍या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत असतानाही आपण त्याने लिप्त होत नाही आपल्या व्यतिरिक्त इतर, स्वतः त्यांचा त्याग करूनसुद्धा त्या विषयांना भीत असतात. सोळा हजारांहून अधिक राण्या आपल्या मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी प्रगट केलेल्या भावामुळे मनोहर दिसणार्‍या भुवयांच्या इशार्‍याने प्रेमभाव प्रगट करण्यात निपुण असणारे सम्मोहक कामबाण आपल्यावर सोडून आणि कामकलांचे प्रदर्शन करूनही आपले मन जराही विचलित करू शकल्या नाहीत. त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुऊन टाकण्यासाठी दोन पवित्र नद्या समर्थ आहेत एक आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथानदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहाणार्‍या पाण्याने भरलेली गंगानदी ! म्हणूनच आश्रमधर्म पाळणारे लोक कानांनी आपल्या कथानदीमध्ये आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात. (७-१९)

श्रीशुक म्हणतात ब्रह्मदेवांनी, सर्व देव आणि शंकर यांच्यासह अशाप्रकारे भगवंतांची स्तुती केली नंतर नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले. (२०)

ब्रह्मदेव म्हणाले सर्वात्मन प्रभो ! आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा, अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती ते काम चांगल्या तऱ्हेने पूर्ण केले आहे. सत्यपरायण साधुपुरूषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केलीत आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरविली. आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या. हे प्रभो ! जी सज्जन माणसे कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवणकीर्तन करतील, ती या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. हे पुरूषोत्तम प्रभो ! आपण यदुवंशात अवतार घेतल्याला एकशे पंचवीस वर्षे झाली आहेत. हे सर्वाधार ! आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही आपले हे कुळसुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळ जवळ नष्ट झालेलेच आहे. म्हणून, हे वैकुंठनाथ ! आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परम धामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा. (२१-२७)

श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रह्मदेवा ! तू म्हणालास, तसेच मी अगोदरच ठरवले आहे तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे. परंतु हे यादवकुळ पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे हे सर्व पृथ्वी गिळून टाकील किनारा समुद्राला रोखून धरतो, त्याप्रमाणे मी यांना रोखून धरले आहे. या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो, तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील. हे पुण्यशील ब्रह्मदेवा ! ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरूवात झाली आहे याचा अंत झाला की, मी स्वधामाला परत येईन. (२८-३१)

श्रीशुक म्हणतात अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले. नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकून होऊ लागले ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठश्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले. (३२-३३)

श्रीकृष्ण म्हणाले जेथे जिकडेतिकडे आजकाळ मोठमोठे अपशकुन होत आहेत शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे म्हणून सज्जन हो ! आपल्याला जर जगायचे असेल तर आपण येथे राहू नये म्हणून आता उशीर करून नका आपण आचज परम पवित्र अशा प्रभासक्षेत्री जाऊ. दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासले, त्यावेळी त्याने तेथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या. आपणसुद्धा तेथे जाऊन स्नान करू देवता आणि पितरांचे तर्पण करू त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पक्वान्ने तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दानदक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा, त्याप्रमाणे दानांनी आपण संकटे पार करून जाऊ. (३४-३८)

श्रीशुक म्हणतात - हे कुलनंदना ! भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली, तेव्हा यादवांनी प्रभासक्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले. परीक्षिता ! उद्धव श्रीकृष्णांचा एकान्त भक्त होता जेव्हा त्याने ती तयारी पाहिली भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकुन झाल्याचेही पाहिले, तेव्हा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणार्‍या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला, त्यांच्या चरणावर डोके टेकवून त्यांना त्याने नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागला. (३९-४१)

उद्धव म्हणाला हे योगेश्वर देवाधिदेव ! आपल्या लीलांचे श्रवणकीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही यावरून मला वाटते की, आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकाचा त्याग करणार, हे निश्चित ! (४२)

परंतु हे केशवा ! आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठीसुद्धा सोडू शकत नाही हे स्वामी ! आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला. हे कृष्णा ! आपली लीला माणसांसाठी परम मंगल आणि कानांना अमृतस्वरूप आहे ज्याला एक वेळ तिची गोडी लागली, त्याच्या मनात नंतर दुसर्‍या कोणत्याही वस्तूची इच्छाच शिल्लक राहात नाही प्रभो ! आम्ही तर झोपणे बसणे, हिंडणे, फिरणे, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगांत आपल्याबरोबरच असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसे सोडू ? आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू. अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात अशा त्या संन्याशांचे हृदय निर्मळ होते, तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात. हे महायोगेश्वर ! आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करीत आपण जे काही केलेत, किंवा सांगितलेत, त्यांचे स्मरणकीर्तन करीत राहू त्याचप्रमाणे आपले चालणेबोलणे, हास्ययुक्त पाहाणे आणि थट्टाविनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू. (४३-४९)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली, तेव्हा ते आपल्या अनन्यप्रेमी सखा व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले. (५०)

अध्याय सहावा समाप्त

GO TOP