श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६४ वा

नृग राजाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणातात- परीक्षिता ! एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले. तेथे पुष्कळा वेळापर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता. त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू लागले. परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली. जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले. भगवान श्रीकृष्णांच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रगट झाला. आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता; आणि त्याच्या शरीरावर अद्‍भूत वस्त्रे, अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले होते. या दिव्य पुरुषाला सरड्याची योनी का प्राप्त झाली, हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते, तरीसुद्धा ते कारण सर्वसाधारण माणसांना माहीत व्हावे म्हणून त्यांनी त्याला विचारले, "हे महाभागा ! तू अत्यंत रूपवान आहेस. कोण तू ? खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावास, असेच मला वाटते. हे कल्याणमूर्ते ! कोणत्या कर्मामुळे तुला या योनीमध्ये यावे लागले ? तुझी अशी दशा होणे योग्य नव्हते. आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो. तो आम्हांला सांगणे तुला योग्य वाटत असेल, तर सांग." (१-८)

श्रीशुक म्हणतात- जेव्हा अनंतमूर्ती श्रीकृष्णांनी राजाला असे विचारले, तेव्हा त्याने आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंतांच्या चरणांवर टेकवून त्यांना प्रणाम करून म्हटले. (९)

नृग म्हणाला- प्रभो ! मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे. जर एखाद्याने आपल्यासमोर दानशूर पुरूषांचा उल्लेख केला असेल, तर त्यावेळी माझे नाव आपल्या कानांवर आले असेल. हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांच्या अंत:करणाचे साक्षी आहात. काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. म्हणून आपल्याला अज्ञात असे काय असणार आहे ? असे असूनही ’ आपली आज्ञा’ म्हणून मी सांगतो. हे भगवन ! पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्यच्या जेवढ्या धारा पडतात, तितक्या गायी मी दान केल्या होत्या. त्या गाई दुधाळ, तरुण, साध्या, सुंदर सुलक्षणी आणि कपिला होत्या. न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केल्या होत्या. सर्वांना वासरे होती. त्यांची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि खूर चांदीने, रेशमी वस्त्रे, हार आणि दागिन्यांनी त्यांना सजविले होते. अशा गायी मी दान दिल्या होत्या. जे श्रेष्ठ ब्राह्मणकुमार सद्‌गुणी, शीलसंपन्न, कुटुंबपोषणास असमर्थ, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे, चारित्र्यसंपन्न आणि तरुण होते, त्यांना मी वस्त्रे, अलंकार देऊन गाईंचे दान करीत असे. अशा प्रकारे मी पुष्कळशा गायी, जमीन, सोने, घरे, घोडे, हत्ती, दासींसहित कन्या, तिळांचे पर्वत, चांदी, अंथरुणे, वस्त्रे, रत्‍ने, गृहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले. अनेक यज्ञ केले आणि पुष्कळशा विहिरी, तलाव इत्यादी बांधले. (१०-१५)

एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळाली. मला याची कल्पना नव्हती. मी नकळत ती गाय दुसर्‍या एका ब्राह्मणाला दान दिली. जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला, तेव्हा त्या गाईचा मूळ मालक त्याला म्हणाला, "ही गाय माझी आहे. " दान घेणारा ब्राह्मण म्हणाला, "ही माझी आहे. कारण नृग राजाने मला ही दान दिली आहे. " ते दोघे ब्राह्मण आपापसात भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे, हे पटविण्यासाठी माझ्याकडे आले. एकजण म्हणाला, " ही गाय आपण मला दिली आहे; " व दुसरा म्हणाला, " असे असेल तर तू माझ्या गाईची चोरी केली आहेस." ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले. मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की, " हिच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गाई देईन. आपण ही गाय मला परत द्या. मी आपला सेवक आहे. नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातुन वाचवा. " " राजन ! मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही. " असे म्हणून गाईचा मूळ मालक निघून गेला. " तू हिच्या बदल्यात एक लक्षच काय दहा हजार आणखी गाई दिल्यास तरीसुद्धा मला नकोत, " असे म्हणून दुसरा ब्राह्मणसुद्धा निघून गेला. देवाधिदेव जगदीश्वरा ! आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतांनी मला यमपुरीला नेले. तेथे यमराजाच्या दूतांनी मला विचारले. राजा ! तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितोस की पुण्याचे ? तू केलेले दान आणि धर्म याचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की, ज्याला तोड नाही. प्रभो ! तेव्हा मी यमराजाला म्हणालो, "देवा ! मी अगोदर पापाचे फळ भोगू इच्छितो. " आणि त्याचक्षणी यमराज म्हणाला, ’पड जा’. त्याने असे म्हणताच मी तेथून खाली पडत असतानाच पाहिले की, आपण सरडा झालो आहे. हे प्रभो ! मी ब्राह्मणांचा सेवक, दानशूर आणि आपला भक्त होतो. आपले दर्शन व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा होती. आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली नाही. भगवन ! आपण परमात्मा आहात. शुद्ध अंत:करणाने योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वत:च्या हृदयात आपले ध्यान करीत असतात. हे इंद्रियातीत परमात्मन ! सरडा होण्याच्या मोठ्या दु:खामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात? जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते, तेव्हाच आपले दर्शन होते. हे देवदेवा ! हे पुरुषोत्तमा ! गोविन्दा ! हे अविनाशी अच्युता ! पवित्रकीर्ते ! हे नारायणा ! हे हृषीकेशा ! हे प्रभो ! मी आता देवलोकी चाललो. आपण मला अनुमती द्यावी. हे श्रीकृष्णा ! मी कोठेही असलो, तरी माझे चित्त नेहेमी आपल्या चरणकमलांवर स्थिर असावे. सर्व विश्वरूप, अनंतशक्ती, ब्रह्मस्वरूप अशा आपणांस मी नमस्कार करीत आहे. हे वासुदेवा ! श्रीकृष्णा ! योगेश्वरा ! मी आपणांस नमस्कार करीत आहे. (१६-२९)

असे म्हणून नृगाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि आपल्या मुगुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण पाहात असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसला. (३०)

ब्राह्मणांना देव मानणारे, धर्माचा आधार असलेले देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तेथे उपस्थित असलेल्यांना म्हणाले. " जे लोक अग्नीसारखे तेजस्वी असतात, तेसुद्धा ब्राह्मणांचे अल्पसेसुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत. तर मग स्वत:ला लोकांचे स्वामी समजणारे राजे कसे पचवू शकतील ? मी हालाहल विषाला विष मानीत नाही. कारण त्याच्यावर उपाय आहे. पण ब्राह्मणांचे धनच महान विष आहे. ते पचविण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही. विष केवळ खाणार्‍याचेच प्राण घेते. आग पाण्याने विझविली जाऊ शकते. परंतु ब्राह्मणांच्या धनरूप अग्नीपासून जी आग उत्पन्न होते, ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते. जर ब्राह्मणाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचे धन उपभोगले, तर ते तीन पिढ्यांना नष्ट करते आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला, तर त्यामुळे भोगणार्‍याच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या आणि भविष्यातीलसुद्धा दहा पिढ्या नष्ट होतात. जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊ इच्छितात, ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात. स्वत:ला अध:पतनाच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागेल, हे ते पाहात नाहीत. ज्या उदारहृदय, कुटुंबवत्सल ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते, त्यांच्या रडण्याने पडणार्‍या त्यांच्या अश्रूंच्या थेंबांनी जमिनीवरील जितके धूलिकण भिजतात, तितकी वर्षेपर्यंत ब्राह्मणांचे धन हिरावून घेणार्‍या उच्छृंखल राजांना आणि त्यांच्या वंशजांना कुंभपाक नरकांमध्ये दु:ख भोगावे लागते. जो माणूस आपण किंवा दुसर्‍यांनी ब्राह्मणांना दिलेली वृत्ती हिरावून घेतो, तो साठ हजार वर्षे विष्ठेतील किडा होतो. म्हणून मला वाटते की, ब्राह्मणांचे धन नजरचुकीनेसुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये. कारण जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात, ते या जन्मामध्ये अल्पायुषी, शत्रूंकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात. तसेच मृत्युनंतरसुद्धा दुसर्‍यांना त्रास देणारे सापच होतात. म्हणून माझ्या आप्तांनो ! ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरीसुद्धा त्यांचा द्वेष करू नका. त्यांनी जरी मारले किंवा पुष्कळसे शिव्याशाप दिले, तरी तुम्ही त्यांना नेहेमी नमस्कारच करा. मी जसा सावध राहून वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो, त्याचप्रमाणे तुम्हीही करा. जे असे करणार नाहीत, त्यांना मी शिक्षा करीन. नकळतही ब्राह्मणाचे हिरावून घेतलेले धन हिरावून घेणार्‍याचा अध:पात करते. जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा नृगाला सरडा केले. सर्व लोकांना पवित्र करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकावासियांना अशाप्रकारे उपदेश करून ते आपल्या महालात निघून गेले.(३१-४४)

अध्याय चौसष्ट समाप्त

GO TOP