श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५९ वा

भौ‍मासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षीत म्हणाला- ज्या भौ‍मासुराने त्या स्त्रियांना बंदिगृहात कोंडून ठेवले होते, त्याला श्रीकृष्णांनी कसे मारले ? त्या शार्ङ्गधनुष्यधारी श्रीकृष्णाचा तो पराक्रम आपण मला सांगावा. (१)

श्रीशुक म्हणाले- वरुणाचे छत्र, अदितीची कुंडले आणि मेरु पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान, भौ‍मासुराने हिसकावून घेतले होते. ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली. तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौ‍मासुराची राजधानी प्राग्‌‍ज्योतिषपूर येथे गेले. प्राग्‌‍ज्योतिषपूरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. तेथे चारी बाजूंनी डोंगरांची रांग होती, त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवली होती, त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते, त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता. त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते. श्रीकृष्णांनी गदेच्या प्रहारांनी डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी बाणांनी छिन्नविछिन्न करुन टाकली. सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी वायूचे तट उध्वस्त करुन टाकले. तसेच मूर दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले. यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदये, शंखानादाने विदीर्ण करुन टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उध्वस्त करुन टाकले. (२-५)

भगवंतांच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता. तो ऐकून पाच डोक्याचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला. तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता. तो इतका भयंकर होता की, त्याच्याकडे डोळे वर करून पाहाणेसुद्धा कठीण होते. त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो, त्याप्रमाणे तो भगवंतांच्या अंगावर धावला. त्यावेळी असे वाटत होते की, जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गिळून टाकील. त्याने आपला त्रिशूल प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर गर्जना करु लागला. त्याने केलेला प्रचंड आवाज सर्व ब्रह्मांडात घुमू लागला. मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले. त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले. त्याचबरोबर मूर दैत्याच्या तोंडातसुद्धा भगवंतांनी पुष्कळसे बाण मारले. यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतांवर आपली गदा फेकली. परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने, मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चुरा करुन टाकला. आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला. तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली. मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो, त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला. ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसू, वसू, नभस्वान आणि अरूण असे मूर दैत्याचे सात पुत्र होते. आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले. पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून, भौ‍मासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णांवर चढाई केली. तेथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर बाण, खड्ग, गदा, शक्ती, ऋष्टी, त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला. भगवंतांची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे तिळतिळ तुकडे केले. भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके, मांड्या, हात, पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसदनाला पाठविले. जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की, भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणांनी आपल्या सेनापतींचा संहार झाला आहे, तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मद पाझरणार्‍या उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला. त्याने पाहिले की, सूर्याच्या वर विजेसह पावसाळ्यातील काळा मेघ शोभावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्‍नीसह आकाशात गरुडावर बसले आहेत. भौ‍मासुराने स्वत: भगवंतांवर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनीसुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्रे सोडली. भगवान श्रीकृष्ण चित्रविचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले. त्यामुळे लगेचच भौ‍मासुराच्या सैनिकांचे हात, मांड्या, मुंडकी आणि धडे तुटून खाली पडू लागली. हत्ती आणि घोडेसुद्धा मरून पडले. (६-१६)

परीक्षिता ! भौ‍मासुराच्या सैनिकांनी भगवंतांवर जी जी शस्त्रास्त्रे चालविली होती, त्यांपैकी प्रत्येक, भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली. त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते, तो आपल्या पंखांनी हत्तींना मारीत होता. तसेच चोचीने आणि नखांनी त्याने हत्तींना घायाळ केले, तेव्हा ते घाबरुन रणांगण सोडून नगरामध्येच घुसले. तेथे आता एकटा भौ‍मासुर लढत राहिला. गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्रालासुद्धा निष्प्रभ्र करणारी शक्ती फेकली. परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही. फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नये तसा. सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला. परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धारेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भौ‍मासुराचे मस्तक उडविले. त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले. ते पाहून भौ‍मासुराचे संबंधी " हाय हाय " करु लागले. ऋषी " वाहवा ! वाहवा ! " म्हणू लागले आणि देव भगवंतांवर पुष्पवृष्टि करीत स्तुती करु लागले. (१७-२२)

तेव्हा पृथ्वी भगवंतांकडे आली. तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून, अदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्‍नजडित कुंडले भगवंतांना दिली. त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्‍न त्यांना दिले. राजन ! मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून, हात जोडून, भक्तिभावयुक्त अंत:करणाने पृथ्वीदेवी त्यांची स्तुती करु लागली. (२३-२४)

पृथ्वी म्हणाली - हे शंखचक्रधारी देवदेवेश्वरा ! मी आपणास नमस्कार करीत आहे. हे परमात्मन ! आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रुप प्रकट करता. आपणास मी नमस्कार करते. प्रभो ! आपल्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे. आपण कमळांची माळ गळ्यात घालता. आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमलाप्रमाणे सुकुमार आहेत. आपणास मी वारंवार नमस्कार करीत आहे. आपण सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात. आपण सर्वव्यापक असूनही स्वत: वसुदेवपुत्राच्या रुपाने प्रगट झाला आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. आपण सर्व कारणांचेही परम कारण आदिपुरूष आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. आपण स्वत: जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात. जगाचे जे काही कार्यकारणमय रुप आहे. जे चराचर आहे, ते सारे आपलेच स्वरुप आहे. हे परमात्मन ! आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो ! (२५-२८)

प्रभो ! जेव्हा आपण जग उत्पन्न करु इच्छिता, तेव्हा उत्कट रजोगुणाचा, जेव्हा प्रलय करु इच्छिता, तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करु इच्छिता, तेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करता. परंतु या तिन्ही गुणांनी आपण झाकले जात नाही. हे जगत्पते ! आपण स्वत:च प्रकृती, पुरूष आणि काळ आहात. तसेच या तिन्हींच्या पलीकडील आहात. हे भगवान ! मी (पृथ्वी), जल, अग्नी, वायू, आकाश, पंचतन्मात्रा, मन, इंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता, अहंकार व महत्तत्त्व असे हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये भ्रमामुळेच पाहात आहे. हे शरणागतभयभंजना, प्रभो ! माझा पुत्र असलेल्या भौ‍मासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे. मी याला आपल्या चरणकमलांजवळ घेऊन आले आहे. प्रभो ! आपण याचे रक्षण करावे आणि जे सार्‍या जगाचे पाप-ताप नष्ट करणारे आहे, ते करकमल याच्या मस्तकावर ठेवावे. (२९-३१)

श्रीशुक म्हणतात- पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करुन प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी भगदत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौ‍मासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की, भौ‍मासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी तेथे आणून ठेवल्या होत्या. अंत:पुरात आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिले, तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन प्रियतम पती म्हणून वरले. त्या राजकुमारींपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की, "हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी. " अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करवून, पालख्यांत बसवून द्वारकेला पाठविले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळसे धन, रथ, घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठविली. ऐरावताच्या वंशात जन्मलेले, अत्यंत वेगवान, चार चार दातांचे, शुभ्र असे चौसष्ट हत्तीसुद्धा भगवंतांनी तेथून द्वारकेला पाठविले. (३२-३७)

यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले. तेथे देवराज इंद्राने पत्‍नी इंद्राणीसह सत्यभामा आणि श्रीकॄष्णांची पूजा केली, तेव्हा भगवंतांनी अदितीची कुंडले तिला दिली. तेथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी तेथील पारिजातक उपटून गरुडावर ठेवला. तेव्हा विरोध करणार्‍या इंद्रासह सर्व देवांना जिंकले आणि तो द्वारकेत घेऊन आले. भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला. त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली. त्या वृक्षाबरोबरच त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेत आले होते. जेव्हा इंद्राने आपले काम साधावयाचे होते, तेव्हा त्याने आपले मस्तक लववून मुकुटाच्या टोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करुन त्यांच्याकडून साहाय्यची भिक्षा मागितली होती, परंतु जेव्हा काम झाले, तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णांशी लढाई केली. खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो ! (३८-४१)

यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर, निरनिराळ्या भवनांमध्ये, वेगवेगळी रूपे धारण करून, एकाच वेळी, त्या सर्व राजकुमारींचे शास्त्रोक्त विधीने पाणिग्रहण केले. त्या महामांमध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की, त्याच्या बरोबरीची जगात कोठेही असणार नाही. मग अधिकाची तर गोष्टच सोडा ! त्या महालांमध्ये राहून अतर्क्य लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप अशा त्या पत्‍नींबरोबर, जसा एखादा सामान्य गृहस्थाश्रमी राहातो, त्याप्रमाणे राहून गृहस्थधर्मप्रमाणे आचरण करीत रमत होते. परिक्षिता ! ब्रह्मदेवादिकांनाही ज्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही, त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते. आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती. त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त कटाक्ष, नवसमागम, प्रेमलाप व प्रेमभाव वाढविणार्‍या लज्जेने युक्त होऊन भगवंतांची सर्वभावे सेवा करीत होत्या. (४२-४४)

पत्‍न्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहात असत. तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत, तेव्हा त्या स्वत: पुढे होऊन आदराने त्यांना घेऊन येत, श्रेष्ठ आसनावर बसवीत, उत्तम सामग्रींनी त्यांची पूजा करीत, चरणकमले धूत, विडा करून देत, पाय चेपून थकवा दूर करीत, पंख्याने वारा घालीत, चंदन इत्यादी लावीत, फुलांचे हार घालीत, केस विंचरीत, झोपवीत, स्नान घालीत आणि अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत. अशा रीतीने स्वत:च्या हातांनी भगवंतांची सेवा करीत. (४५)

अध्याय एकोणसाठावा समाप्त

GO TOP