श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४८ वा

भगवंतांचे कुब्जा अणि अक्रूराच्या घरी जाणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण, त्यांना भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले. बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते. शृंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तेथे रचलेली होती. ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या. चांदवे लावलेले होते. शय्या अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती. धुपाचा सुगंध दरवळत होता. दिवे प्रकाशत होते. फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्ये ठेवलेली होती. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांसह पुढे होऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली. त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली. परंतु तो सन्मानासाठी तिने दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला. श्रीकृष्णही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्येवर जाऊन बसले. तेव्हा कुब्जेने स्नान करून उटणे, रेशमी वस्त्रे, अलंकार, पुष्पहार, गंध, विडा, सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजविले, आणि लज्जायुक्त स्मितहास्य व हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहात पाहात ती भगवंतांच्याकडे आली. मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुब्जा संकोचाने थोडीशी थबकली. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला आपल्याजवळ बोलाविले आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममाण झाले. या जन्मामध्ये कुब्जेने भगवंतांना फक्त सुगंधी उटणे अर्पण केले होते. त्या एका शुभकर्माचे हे फळ होते. भगवान श्रीकृष्णांचे चरण कुब्जेने आपले कामसंतप्त हृदय, वक्षःस्थळ आणि डोळ्यांवर ठेवून घेऊन त्यांचा दिव्य सुगंध ती घेऊ लागली. अशाप्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली. आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुब्जेने प्रदीर्घ कालापासूनचा आपला विरहताप शांत केला. कुब्जेने फक्त सुगंधी उटणे दिले होते. तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु त्या अभागिनीने मात्र हेच मागितले. "हे प्रियकरा ! आपण काही दिवस येथेच राहून माझ्याबरोबर रमावे. कारण हे कमलनयना ! माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही." सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन, उद्धवाबरोबर ते आपल्या संपन्न घरी परतले. आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्वदेवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषयसुख मागतो, तो निश्चितच मूर्ख होय. (१-११)

त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि उद्धवासह, अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्याच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. आपले बांधव असणारे ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रूराने पाहिले आणि तातडीने उठून तो सामोरा गेला आणि आनंदाने त्यांचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले. अक्रूराने राम-कृष्णांना नमस्कार केला. तसाच त्या तिघांनी अक्रूरालाही केला. सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली. परीक्षिता ! प्रथम त्याने भगवंतांचे चरणोदक मस्तकी धारण केले. नंतर दिव्य वस्त्रे, गंध, माळा, मौल्यवान अलंकार इत्यादी पूजासामग्रीने त्यांचे पूजन केले, मस्तक लववून त्यांना नमस्कार केला व त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला. त्याचवेळी विनम्र भावाने तो राम-कृष्णांना म्हणाला. "तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसह मारले, हे छान झाले ! त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचविले आणि तो वंश समृद्ध केला. आपण दोघे जगाचे कारण आणि जगत्स्वरुप आदिपुरूष आहात. आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही. हे परमात्मन ! आपणच निर्माण केलेल्या या विश्वात ज्या ज्या वस्तू पाहिल्या आणि ऐकल्या जातात, त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो. जसे पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांपासून जी स्थावर-जंगम शरीरे बनतात, त्यात तीच महाभूते वेगवेगळ्या रूपांमध्ये अनुभवाला येतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वेच्छेने अनेक रूपांमध्ये प्रतीत होता. प्रभो ! आपण आपल्या रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणरूप शक्तींनी विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करता. परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्या द्वारा होणार्‍या कर्मांनी बंधनात पडत नाही. कारण आपण शुद्धज्ञानस्वरूप आहात. तर मग आपल्याला बंधनाचे कारण कोणते असणार ? प्रभो ! स्थूलदेह, सूक्ष्मदेह इत्यादी उपाधी आत्म्याला नसल्यामुळे त्याला जन्म-मृत्यू नाही की त्याच्याहून दुसरा कोणता पदार्थ नाही. म्हणूनच आत्मस्वरुप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही. तरीही आत्म्याविषयी बंधमोक्षाची जी कल्पना असते, ती केवळ आमच्या अविवेकामुळे. आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रगट केला आहे. या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिकवृत्तीच्या दुष्टांकडून पायमल्ली होते, तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता. प्रभो ! तेच आपण यावेळी आपले अंश श्रीबलराम यांचेसह पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी येथे वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात. असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो अक्षौहिणी सेनेचा आपण संहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल. हे परमात्मन ! सर्व देव, पितर, भूतगण, मनुष्य आणि वेद (हे पाच यज्ञ) या आपल्या मूर्ती आहेत. आपले चरणतीर्थ अशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते. आपण जगद्‍गुरू आहात. तेच आपण आज आमच्या घरी आला आहात. आज आमचे घर धन्य धन्य झाले. त्याच्या भाग्याला सीमाच उरली नाही. प्रभो ! आपण भक्तप्रिय, सत्यवक्ते, अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात. आपण आपले भजन करणार्‍या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता; एवढेच काय पण स्वतःलाही देऊन टाकता. तरीही आपल्यामध्ये कमी-जास्तपणा उत्पन्न होत नाही. अशा तुम्हांला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसर्‍या कोणाला शरण जाईल ? हे प्रभो ! मोठेमोठे योगी आणि देवराजसुद्धा ज्यांचे स्वरुप जाणू शकत नाहीत; त्या आपले आम्हांला साक्षात दर्शन झाले, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे ! प्रभो ! आम्ही स्त्री, पुत्र, धन, स्वजन, घर, देह इत्यादी रूप मोहाच्या दोरीने बांधले गेलो आहोत. हा आपल्याच मायेचाखेळ आहे. कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका. (१२-२७)

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! भक्त अक्रूराने अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली. नंतर त्यांनी स्मित हास्य करून, त्यांना जणू मोहित करीत आपल्या मधुर वाणीने म्हटले. (२८)

श्रीकृष्ण म्हणाले- काका ! आपण आमचे हितोपदेशक, चुलते आणि आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचे रक्षण, पालन करून आमच्यावर कृपा करायची. जे आपले कल्याण इच्छितात, त्यांनी आपल्यासारख्या परम पूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत. कारण देवता स्वार्थी असतात, संतांचे ठिकाणी स्वार्थ नसतो. फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे, फक्त माती आणि पाषाण यांनी बनविलेल्या मूर्तीच देवता नव्हेत. कारण तीर्थे व देव कालान्तराने पवित्र करतात; परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात. आपण आमच्या पांडवांचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तिनापुरला जावे. (२९-३२)

आम्ही ऐकले आहे की, पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले होते. धृतराष्ट्राने आता त्यांना राजधानीत आणले असून ते तेथेच राहतात. धृतराष्ट्र एक तर अंध आहे आणि मनाने कणखर नाही. दुष्ट पुत्रांच्या अधीन झाल्याकारणाने तो भावाच्या मुलांशी आपल्या पुत्रांसारखा व्यवहार खात्रीने करत नसणार. म्हणून आपण तेथे जावे आणि त्यांची स्थिती चांगली आहे की वाईट, हे जाणून घ्यावे. ते समजताच त्या आप्तांना सुख कसे मिळेल, ते आपण पाहू. भगवान श्रीकृष्ण, अक्रूराला असेसांगून बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतले. (३३-३६)

अध्याय अठ्ठेचाळिसावा समाप्त

GO TOP