श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १३ वा

ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! तू फार भाग्यवान आहेत. भगवंतांच्या भक्तांमध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे. म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास. तुला वारंवार भगवंतांच्या कथा ऐकावयास मिळतातच. तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यांत आणखी नाविन्य आणतोस. जीवनाचे सार जाणणार्‍या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंतांच्या लीलेची गान, श्रवण आणि चिंतन करीत असते. त्यांचा हा स्वभावच असतो की, त्यांना प्रतिक्षणी भगवंतांच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात. ज्याप्रमाणे स्त्रीलंपट पुरुषांना स्त्रियांसंबंधीच्या गोष्टी आबडतात. राजा ! तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. भगवंतांची ही लीला रहस्यमय असूनसुद्धा मी तुला ती ऐकवितो; कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात. भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व मुलांचा मृत्यूरूप अघासुराच्या जबड्यातून वाचविले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून सोडले. मित्रांनो ! यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे. पहा ना ! इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे. आम्हांला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे. पहा ! एकीकडे रंगी-बेरंगी कमळे उमलली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत; तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत. त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवीत आहेत. आता आपण भोजन करू. कारण दिवस बराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकूळ झालो आहोत. वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील. (१-६)

"ठीक आहे." असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्या शिदोर्‍या उघडून भगवंतांच्याबरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले. गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारी बाजूंनी पुष्कळ्शा गोलाकार पंक्ती बनविल्या आणि ते श्रीकृष्णांकडे तोंडे करून बसले. यावेळी सर्वांच्या डोळ्यांतून आनंद ओसंडत होता. कमळाच्या गड्ड्याच्या चारी बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या, तसे ते सारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते. कोणी फुले, कोणी जून पाने, कुणी कोवळी पाने, अंकूर, फळे, शिंकी, साली, दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले. भगवान श्रीकृष्ण आणि बाल-गोपाल असे सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत, एकमेकांना हसत हसवत भोजन करू लागले. त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती. शिंग आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती. सुंदर हातात दहीभाताचा घास होता. बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती. आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवीत होते. जे सर्व यज्ञांचे भोक्ते तेच आज मुलांसमवेत बाल लीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पहात होते. (७-११)

हे भारता अशा प्रकारे बाल गोपाल भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली. गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले, तेव्हा ते घाबरले. त्यावेळी विश्वातील भयाला भिवविणारे श्रीकृष्ण म्हणाले, "मित्रांनो ! तुम्ही जेवण भांबवू नका. मी वासरांना येथे घेऊन येतो." भगवंत श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पहाड, दर्‍या, कुंज, गुहा इत्यादि ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले. परीक्षिता ! ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते. प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. लीलेने मनुष्य-बालक झालेल्या भगवंतांचा आणखी एकादा मनोहर महिमा पहावा, असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वतः अंतर्धान पावले. (१२-१५)

वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले. येऊन पाहिले तर गोपालसुद्धा नाहीत. तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूला जाऊन त्यांना शोधले. सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाल आणि वासरे कोठेच दिसली नाहीत, तेव्हा त्यांनी लगेच ताडले की, ही ब्रह्मदेवाची करणी आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी, वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवालासुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली. यात त्यांना अशक्य ते काय ? कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत ना ! ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती, जेवढी लहान त्यांची शरीरे होती, त्यांचे हात-पाय जसजसे होते, त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या, शिंगे, बासर्‍या, पाने आणि शिंकी होती, जसे आणि जितके वस्त्रालंकार होते, त्यांचे स्वभाव, गुण, नावे, रूपे आणि वय जसजसे होते, ज्याप्रकारे ते खाणे-पिणे इत्यादि व्यवहार करीत, अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्वस्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यावेळी "हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे" ही वेदवाणी सार्थ झाली. सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाल झाले. आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजामध्ये प्रवेश केला. राजा ! ज्या गोपाळांची जी वासरे होती, त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यांत बांधले आणि ते त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेले. (१६-२१)

बासरीची तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या. गोपाळ बनलेल्या प्ररब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुले समजून, हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले. आणि प्रेमामुळे स्तनातून पाझरणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना पाजू लागल्या. परीक्षिता ! अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकुष्ण त्या गोपाळांच्या रूपांत वनांतून परत येत आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करीत. त्या माता त्यांना उटणे लावीत, न्हाऊ घालीत, चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत. नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत. अशा रीतीने त्यांचे लालन-पालन करीत. गाईसुद्धा धावत धावत गोठ्यांत येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात. तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडांतून पाझरणारे दूध त्यांना पाजीत. या गाई आणि गौळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता. मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त होते. तसेच भगवानसुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत. परंतु भगवंतांचे ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता. आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळू-हळू वाढतच गेले. एवढेच नव्हे तर, श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते, तसेच त्यांना आपल्या या बालकांबद्दलही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले. अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बनून स्वतःच स्वतःचे पालन करीत एक वर्षपर्यंत वनांत आणि गौळवाड्यांत क्रीडा करीत राहिले. (२२-२७)

जेव्हा एक वर्ष पूर्ण होणास पाच-सहा दिवस शिल्लक होते, तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चारीत वनात गेले. त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गाई चरत होत्या. तेथून त्यांनी व्रजाजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले. वासरांना पाहताच गाईंचे वात्सल्य उफाळून आले. त्यांचे भान हरपले आणि गुराख्यांच्या अडविणाची पर्वा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते, त्या वाटेनेही हंबरत जणू दोनच पाय असल्यासारख्या अतिशय वेगाने पळत सुटल्या. त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा वाहात होत्या. माना वशिंडाकडे वळवून व शेपट्या आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या. ज्या गाईंना आणखी वासरे झाली होती, त्या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध पाजू लागल्या. त्यावेळी त्या आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटीत होत्या की, जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय ! गोपांनी त्यांना अडविण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला, पण ते सर्व प्रयत्‍न व्यर्थ गेले. आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडी लाज वाटली आणि गायींचा अतिशय राग आला. जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिले. आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उचंबळून आले. प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणो कुठच्या कुठे पळून गेला. त्यांना आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळले आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून ते अत्यंत आनंदित झाले. आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला. नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते ह्ळू- हळू निघून गेले. गेल्यानंतरसुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात राहिले. (२८-३४)

ज्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते, त्या बालकांवरसुद्धा गाई आणि गौळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले . कारण त्यांना त्याचे कारण माहित नव्हते. "हे काय आश्चर्य आहे ! व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे, तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे ! ही कोणती माया आहे ? कुठून आली ? ही एकाद्या देवतेची, मनुष्याची की असुराची आहे ? नाही. हे शक्य नाही. कारण ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे. कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही." (३५-३७) असा विचार करून बलरामांनी ज्ञानदृष्टीने पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ही सर्व वासरे आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्णच आहेत. तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले - "भगवन् ! हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत. या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊनसुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात. आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात, ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा." तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली. (३८-३९)

तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आले. त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी (तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा) इतका काळच झाला होता. त्यांनी पाहिले की, भगवान श्रीकृष्ण, गोपाल आणि वासरांच्याबरोबर एक वर्षापूर्वी प्रमाणेच क्रीडा करीत आहेत. ते विचार करू लागले, "गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत. तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त, हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे, हे एक वर्षापासून भगवंतांच्या बरोबर खेळत आहेत, ते कुठून आले ?" ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार करूनही या दोहोपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाहीत. स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणार्‍या श्रीकृष्णांना, ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करण्यास निघाले होते. परंतु ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले. ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसही लागत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग क्रतात, तेव्हा ते त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत. उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात. (४०-४५)

तेवढ्यात ब्रह्मदेवांना समोरच, सर्व गोपाळ आणि वासरे श्रीकृष्णांच्या रूपात दिसू लागले. ते सर्वजण ढगांप्रमाणे श्यामवर्ण, पीतांबरधारी, शंख, चक्र, गदा आणि पद्म यांनी युक्त असे चार हात असलेले, मस्तकांवर मुगुट, कानांमध्ये कुंडले, कंठामध्ये मोत्यांचे हार व वनमाळा धारणे केलेले दिसत होते. त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्हे, बाहूमध्ये बाजूबंद, मनगटांमध्ये शंखाकार रत्‍नजडित कडी, पायांमध्ये नूपूरे आणि कडी, कमरेला करदोटे व बोटांमध्ये आंगठ्या झगमगत होत्या. त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर, अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या. त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहात होते. असे वाटत होते की, जणू काही या दोहोंच्याद्वारा सत्त्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनांत इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत. स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत-गात अनेक प्रकारच्या पूजासामग्रीने भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांचीच उपासना करीत आहेत. अणिमा, महिमा इत्यादि सिद्धी, माया, विद्या इत्यादि विभूती आणि महत्तत्त्व इत्यादि चोवीस तत्त्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले आहे. काल, स्वभाव, संस्कार, कामना, कर्म, विषय इत्यादि सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत. भगवंतांच्या समोर ती सर्व तत्त्वे आपले अस्तित्व गमावून बसली होती. ते सर्व सत्य, ज्ञान, अनंत, आनंदस्वरूप आहेत, एकरस आहेत. तसेच तत्त्वज्ञान्यांची सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करू शकत नाही. अशाप्रकारे ब्रह्मदेवांनी एकाच वेळी पाहिले की, ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे, त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत. (४६-५५)

हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले. त्यांची अकराही इंद्रिये भान विसरली. भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले. जणू काही व्रजाच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी. ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलिकडे आहे, ज्यांचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश, आनंदस्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहेत, वेदांत सुद्धा ज्यांचे साक्षात् वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंदस्वरूप ब्रह्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो, त्या भगवंतांच्या दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे, हे न कळल्याने दिङ्‌मूढ झाले व त्यांच्या रूपांना पाहाण्यासही असमर्थ ठरले. हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला. यामुळे ब्रह्मदेवांना बाह्यज्ञान झाले. ते जणू मरून पुन्हा जिवंत झाले. त्यांनी कसेबसे डोळे उघडले. तेव्हा कुठे त्यांना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले. नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले, तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले, सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणार्‍या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले. तेथे श्रीकृष्णाचा वास असल्यामुळे, क्रोध, लोभ इत्यादि दोष तेथून पळून गेले आहेत आणि तेथे स्वभावतःच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षीसुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहात आहेत. वृंदावन पाहतांना ब्रह्मदेवांना दिसले की, अद्वितीय परब्रह्म, गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहे. एक असूनही त्यांना मित्र आहेत, अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधीत आहेत. भगवंतांना पाहाताच ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणार्‍या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातले. त्यांनी आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून लोटांगण घालीत. अशाप्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंतांच्या चरणांवरच पडून राहिले. नंतर हळू हळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले. भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले. ते थरथर कापू लागले. नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने, सद्‌गदित वाणीने ते भगवंतांची स्तुती करू लागले. (५६-६४)

अध्याय तेरावा समाप्त

GO TOP