|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २१ वा
भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - वितथाचा पुत्र मन्यू, मन्यूला बृहत्क्षत्र, जय, महावीर्य, नर आणि गर्ग असे पाच पुत्र झाले. नराचा पुत्र संकृती होता. परीक्षिता ! गुरू आणि रंतिदेव असे संकृतीचे दोन पुत्र होते. रंतिदेवाचे निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गाइले जाते. रंतिदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच दैवयोगाने जे प्राप्त होईल, त्याचा उपभोग घेत असे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली. स्वतः उपाशी राहूनही जे काही मिळेल तेही तो देऊन टाकीत असे. दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता. एकदा अठेठेचाळीस दिवस असे गेले की, त्यांना पाणीसुद्धा मिळाले नाही. एकोणपन्नासाव्या दिवशी सकाळीच त्यांना थोडेसे तूप, शीर, हलवा आणि पाणी मिळाले. संकटात असलेले ते कुटुंब तहान आणि भुकेने व्याकूळ होऊन कापत होते. त्यांनी भोजन करण्याचे तयारी केली, तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला. रंतिदेव सर्वांमध्ये श्रीभगवंतांचेच दर्शन करीत असे. म्हणून त्याने अत्यंत श्रद्धेने, आदरपूर्वक, त्या अन्नातील पुरेसे भोजन त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मण भोजन करून निघून गेला. (१-६) परीक्षिता ! आता उरलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली, त्याचवेळी एक दुसरा शूद्र अतिथी आला. भगवंतांचे स्मरण करीत रंतिदेवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला. (७) शूद्र निघून गेल्यावर कुत्र्यांना घेऊन आणखी एक अतिथी आला. तो म्हणाला. "राजन ! मी आणि माझे हे कुत्रे भुकेलेले आहोत. आम्हांला काहीतरी ख्यायला द्या." जे काही शिल्लक राहिले होते, ते सर्व रंतिदेवाने आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला. आता फक्त पाणीच उरले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्याइतकेच. ते आपापसात वाटून घेणार इतक्यात एक चांडाळ येऊन म्हणाला, "मी चांडाळ आहे. मला पाणी द्यावे." जे उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते, अशी त्या चांडाळाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंतिदेवाचे हृदय दयेने भरून आले आणि तो असे अमृतशब्द बोलला. आठ सिद्धी, परम गती, किंवा मोक्ष मी भगवंतांकडून इच्छित नाही. मी फक्त एवढेच इच्छितो की, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मीच सहन करावे, जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही. हा दीन प्राणी पाणी प्याल्यानेच जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आहे आणि त्यामुळे आता माझी तहान-भूक, शरीराचा अशक्तपणा, दीनता, ग्लानी, शोक, विषाद आणि मोह हे सर्व नाहीसे होणार. रंतिदेव स्वतः जरी पाण्यावाचून तडफडत होता, तरीसुद्धा स्वभावतःच त्याचे हृदय करुणेने भरलेले असल्यामुळे त्याने ते पाणीही त्या चांडाळाला दिले. वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश, असे तिघेही त्याच्यासमोर प्रकट झाले. तो अनासक्त व निःस्पृह असल्यामुळे त्याने भक्तिभावाने आपले मन भगवान वासुदेवांमध्ये तन्मय केले. परीक्षिता ! इतर कोणत्याच वस्तूची इच्छा न करता त्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांकडे लावले, म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया, जागृतीनंतर स्वप्न नाहीसे व्हावे, तशी नाहीशी झाली. रंतिदेवाच्या बरोबर असणारेही त्याच्या संगतीच्या प्रभावाने भगवन्मय योगी झाले. (८-१८) गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला. गार्ग्य जरी क्षत्रिय होता, तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला. महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता. दुरितक्षयाचे त्र्य्यारुणी, कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले. हे तिघेही ब्राह्मण झाले. बृहत्क्षत्राचा पुत्र हस्ती झाला, त्यानेच हस्तिनापूर वसविले होते. हस्तीचे अजमीढ, द्विमीढ आणि पुरुमीढ असे तीन पुत्र होते. अजमीढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमीढाच्या एका पुत्राचे ना बृहदिषू होते. बृहदिषूचा पुत्र बृहद्धनू झाला. बृहद्धनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ हाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजित. सेनजिताचे रुचिराश्व, दृढहनू, काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले. रुचिराश्वाचा पुत्र पार होता आणि पाराच पृथुसेन. पाराच्या दुसर्या पुत्राचे नाव नीप असे होते. त्याचे शंभर पुत्र होते. याच नीपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. ब्रह्मदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विष्वक्सेन नावाच पुत्र झाला. याच विष्वक्सेनाने जैगीषव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विष्वक्सेनाचा पुत्र उदक्स्वन. उदक्स्वनाचा भल्लाद. हे सर्वजण बृहदिषूचे वंशज होते. (१९-२६) द्विमीढाचा पुत्र यवीनर होता, यवीनराचा कृतीमान. कृतीमानाचा सत्यधृती, सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून सन्नतिमान, सन्नतिमानपासून कृती झाला. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि "प्राच्यसाम" नावाच्या ऋचांच्या सहा संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र नीप. नीपाचा उग्रायुध, उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमीढाचा भाऊ पुरुमीढ. याला काही संतान झाले नाही. अजमीढाच्या दुसर्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुज, पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भर्म्याश्व झाला. भर्म्याश्वाचे मुद्गल, यवीनर, बृहदिषू, कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र होते. भर्म्याश्व म्हणाला - "हे माझे पाच पुत्र पाच देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत." म्हणून हे "पांचाल" नावाने प्रसिद्ध झाले. यांच्यापैकी मुद्गलपासून "मौद्गल्य" नावाचे ब्राह्मणगोत्र सुरू झाले. (२७-३३) भर्म्याश्वाचा पुत्र मुद्गल याला जुळे झाले. त्यांपैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. गौतमाचा पुत्र शतानंद. शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता. तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान होते. एके दिवशी उर्वशीला पाहताच शरद्वानाचे वीर्य गवतावर पडले, त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्यांच्यावर पडली. दयाळू अंतःकरणाने त्यने दोघांनाही उचलून घेतले. त्यांपैकी जो पुत्र होता, त्याचे नाव कृपाचार्य झाले. आणि जी कन्या होती, तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोणचार्यांची पत्नी झाली. (३४-३६) अध्याय एकविसावा समाप्त |