श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १६ वा

परशुरामांकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी "जशी आपली आज्ञा" म्हणून स्वीकार केला. त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून ते आपल्या आश्रमात परत आले. एकदा रेणुका गंगेवर गेली होती. गंधर्वराज चित्ररथ कमळपुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत, असे तिने तेथे पाहिले. ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. परंतु तेथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला. हवनाची वेळ टळून गेली असे पाहून ती महर्षी जमदग्नी शाप देतील असे वाटून भयभीत झाली. लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. पत्‍नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाले - "पुत्रांनो ! या पापिणीला ठार करा." परंतु त्यांनी तसे केले नाही. यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले. कारण आपल्या पित्याचे योगसामर्थ्य आणि तपश्चर्येचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते. या कृत्यामुळे सत्यवतीनंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले - "पुत्रा ! तुझी इच्छा असेल तो वर माग." परशुराम म्हणाले - "तात ! माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवोत. तसेच मी त्यांना मारले होते, याची त्यांना आठवण न राहो." परशुरामांनी असे म्हणताच झोपेतून उठावे, त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले. परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता. (१-८)

परीक्षिता ! सहस्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते, त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभरसुद्धा चैन पडत नसे. एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेले होते. ही संधी साधून सूड उगविण्यासाठी सहस्रबाहूची मुले तेथे येऊन पोहोचली. त्यावेळी जमदग्नी अग्निशाळेमध्ये पवित्रकीर्ति भगवंतांचेच चिंतन करण्यात मग्न होऊन बसले होते. त्याच वेळी त्या पाप्यांनी त्यांना मारले. परशुरामाची माता रेणुका दीनपणे त्यांना प्रार्थना करीत होती, परंतु ते नीच क्षत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले. सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकूळ झाली. ती हातांनी आपली छाती बडवीत "रामा ! पुत्रा रामा ! लवकर ये." अशा हाका मारीत जोरजोराने रडू लागली. परशुरामांनी लांबूनच आईचा "हे राम !" असा करुण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारले आहे. त्यावेळी परशुरामांना अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर क्रोध, असहिष्णुता, मानसिक व्यथा आणि शोकावेगाने ते दिङ्‌मुढ झाले. "हाय तात ! आपण महात्मे व धर्मनिष्ठ होता. आपण आम्हांला येथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेलात !" अशाप्रकारे विलाप करून त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावांकडे सोपविले आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला. (९-१६)

परीक्षिता ! परशुरामांनी माहिष्मती नगरीत जाऊन सहस्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या (छाटलेल्या) मस्तकांनी नगरीच्या मधोमध एका मोठा पर्वतच उभा केला. त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती, नीच क्षत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती. त्यांच्या रक्ताची एक मोठी नदी वाहू लागली. तिला पाहूनच ब्राह्मणद्रोह्यांचे हृदय भयाने कापत असे. भगवंतांनी पाहिले की, सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत. म्हणून हे राजन ! त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि समंतपंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले. परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्याद्वारे सर्वदेवमय आत्मस्वरूप भगवंतांचे पूजन केले. यज्ञामध्ये त्यांनी पूर्वदिशा होत्याला, दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला, पश्चिम दिशा अध्वर्यूला आणि उत्तर दिशा सामगान करणार्‍या उद्‌गात्याला दिली. तसेच आग्नेय इत्यादि उपदिशा ऋत्विजांना दिल्या. कश्यपांना मध्यभूमी दिली. उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसर्‍या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले. त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापांतून मुक्त झाले आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणार्‍या आकाशातील सूर्याप्रमाचे शोभू लागले. महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली. परशुरामांकडून सन्मानित होऊन सप्तर्षींच्या मंडळात सातवे ऋषी झाले. परीक्षिता ! कमललोचन जमदग्निनंदन भगवान परशुराम पुढील मन्वंतरामध्ये सतर्षींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. ते आजसुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत. तेथे सिद्ध, गंधर्व आणि चारण त्यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात. शर्वशक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशाप्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला. (१७-२७)

प्रज्वलित अग्नीप्रमाणे परम तेजस्वी विश्वामित्र गाधीचे पुत्र झाले. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले. परीक्षिता ! विश्वामित्रांना शंभर पुत्र होते. त्यांपैकी मधल्या पुत्राचे नाव ’मधुच्छंद’ होते. म्हणून सर्व पुत्र ’मधुच्छंद’ नावानेच प्रसिद्ध झाले. भृगुवंशी अजीगर्ताचा पुत्र जो शुनःशेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचे एक नाव देवरात असेही होते. विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले, "तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा." जो हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये यज्ञपशू म्हणून विकत आणला होता, तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी शुनःशेप होय. विश्वामित्रांनी प्रजापती, वरुण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडविले. हाच शुनःशेप देवतांच्या यज्ञात देवांनी विश्वामित्राला दिला होता. म्हणून ’देवैःरातः’ या व्युत्पत्तीनुसार गाधिवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला. विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे ज्येष्ठ होते, त्यांना, शुनःशेपाला मोठा भाऊ मानावा ही गोष्ट आवडली नाही. यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की, "दुष्टांनो ! तुम्ही म्लेंच्छ व्हा." अशाप्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंच्छ झाले, तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुच्छंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की, "तात ! आपण आम्हाला जी आज्ञा कराल, तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत." असे म्हणून मधुच्छंदाने मंत्रद्रष्ट्या शुनःशेपाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले, "आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत." तेव्हा विश्वामित्र आपल्या या आज्ञाधारक मुलांना म्हणाले "तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले. म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की, तुम्हांलासुद्धा सुपुत्र प्राप्त होतील. हा देवरात तुमच्याच गोत्राचा आहे. तुम्ही याच्या आज्ञेत राहा." विश्वामित्रांचे अष्टक, हारीत, जय, क्रतुमान इत्यादि आणखीही पुत्र होते. अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारआणाने त्याचे प्रवरहि अन्य झाले. (२८-३७)

अध्याय सोळावा समाप्त

GO TOP