श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १३ वा

निमीच्या वंशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वसिष्ठ म्हणाले की, "राजा ! इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा." हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वसिष्ठमुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमीने ’जीव क्षणभंगुर आहे’, असे समजून गुरू वसिष्ठ परतण्या आधीच दुसर्‍या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरू वसिष्ठ परत आहे, तेव्हा त्यांनी निमीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला की, "स्वतःला शहाणा समजणार्‍या निमीचा देह पडो." निमीनेही धर्माप्रमाणे न वागणार्‍या गुरुंना शाप दिला की, "लोभामुळे धर्म न जाणणार्‍या आपलेही शरीर पडो." असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वसिष्ठांनीसुद्धा आपल्या शरीराचा त्याग करून मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला, तेव्हा आलेल्या देवांनी त्यांना प्रार्थना केली. "हे देवांनो ! जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल, तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे." देव म्हणाले - "तथास्तु." त्यावेळी निमी म्हणाला, "मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार, या भितीने ते या शरीराशी कधीही संबंध ठेवीत नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीरालासुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे. (१-१०)

देव म्हणाले - निमिराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहील. तो तेथे राहून सूक्ष्मशरीराने भगवंतांचे चिंतन करील. पापण्यांच्या उघडझापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल, असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव ’जनक’ झाले. देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे ’वैदेह’ आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव ’मिथिल’ असे पडले. त्यानेच ’मिथिलापुरी’ वसविली. (११-१३)

परीक्षिता ! जनकाचा उदावसू, त्याचा नंदिवर्धन, नंदिवर्धनाचा महावीर्य, महावीर्याचा सुधृती, सुधृतीचा धृष्टकेतू, धृष्टकेचा हर्यश्व आणि त्याचा मरू नावाचा पुत्र झाला. मरूचा प्रतीपक, प्रतीपकाचा कृतिरथ, कृतिरथाचा देवमीढ, देवमीढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला. महाधृतीचा कृतिरात, कृतिराताचा महारोमा, महारोमाचा स्वर्णरोमा, आणि स्वर्णरोमाचा पुत्र झाला ह्रस्वरोमा. ह्याच ह्रस्वरोमाचा पुत्र सीरध्वज होता. तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता, तेव्हा त्याच्या सीराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रकट झाली. म्हणून त्याचे नाव "सीरध्वज" असे पडले. सीरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे कृतध्वज आणि मितध्वज असे दोन पुत्र झाले. कृतध्वजाचा केशिध्वज आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला. केशिध्वज आत्मविद्येत प्रवीण होता. (१४-२०)

खांडिक्य कर्मकांड जाणणारा होता. केशिध्वजाला भिऊन तो पळून गेला. केशिध्वजाचा पुत्र भानुमान आणि भानुमानाचा शतद्युम्न होता. शद्युम्नापासून शुची, शुचीपासून सनद्वाज, सनद्वाजापासून ऊर्धकेतू, ऊर्ध्वकेतूपासून अज, अजापासून पुरुजित, पुरुजितापासून अरिष्टनेमी, अरिष्टनेमीपासून श्रुतायू, श्रुतायूपासून सुपार्श्वक, सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला. क्षेमधीपासून समरथ, समरथापासून सत्यरथ, सत्यरथापासून उपगुरू आणि उपगुरूपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला. हा अग्नीचा अंश होता. (२१-२४)

उपगुप्तापासून वस्वनन्त, वस्वनन्ताचा युयुध, युयुधाचा सुभाषण, सुभाषणाचा श्रुत, श्रुताचा जय, जयाचा विजय आणि विजयाचा ऋत नावाचा पुत्र झाला. (२५)

ऋताचा शुनक, शुनकाचा वीतहव्य, वीतहव्याचा धृती, धृतीचा बहुलाश्व, बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला. (२६)

परीक्षिता ! मिथिल वंशांत उत्पन्न झालेले हे सर्व राजे "मैथिल" म्हणविले जातात. हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असूनसुद्धा सुख दुःख इत्याची द्वंद्वांपासून मुक्त होते. कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती. (२७)

अध्याय तेरावा समाप्त

GO TOP