|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ७ वा
राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीष होता, असे मी पूर्वी सांगितले. त्याचा आजोबा युवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यौवनाश्व आणि यौवनाश्वाचा पुत्र हारीत झाला. मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन, वध करण्यायोग्य गंधर्वांना, पुरुकुत्साने मारले. यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की, जो या प्रसंगाचे स्मरण करील, त्याला सापांपासून भिती राहणार नाही. पुरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हर्यश्व. त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत. हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. (वडिलांना त्रास देणे, गुरूंची गाय मारणे आणि प्रोक्षण न करता वस्तू वापरणे हे तीन दोष खिळ्यासारखे त्याला टोचत, म्हणून तो त्रिशंकू) त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता, तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके वर पाय करून पडला. परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले. तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो. (१-६) त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांनी याच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले. हरिश्चंद्राला संतान नव्हते. म्हणून तो अतिशय उदास असे. नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की, "प्रभो ! मला पुत्रप्राप्ती व्हावी. महाराज ! जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करेन." वरुण म्हणाले - "ठीक आहे." तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरुण येऊन म्हणाले - "हरिश्चंद्रा ! तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. आता याच्याद्वारे माझा यज्ञ कर." हरिश्चंद्र म्हणाला - "हा यज्ञपशू दहा दिवसांनंतर यज्ञाला योग्य होईल." दहा दिवसानंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले - "आता माझा यज्ञ कर." हरिश्चंद्र म्हणाला - "जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडात दात येतील, तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल." दात आल्यानंतर वरुण म्हणाले, "आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर." हरिश्चंद्र म्हणाला, "जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील, तेव्हा या यज्ञासाठी योग्य होईल." दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाले, "आता या यज्ञपशूचे दात पडले आहेत; माझा यज्ञ कर." हरिश्चंद्र म्हणाला, "जेव्हा याला दुसर्यांदा दात येतील, तेव्हा हा पशू यज्ञासाठी योग्य होईल." दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, "आता माझा यज्ञ कर." हरिश्चंद्र म्हणाला, "वरुण महाराज ! क्षत्रिय पशू जेव्हा कवच धारण करू लागतो. तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो." अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळु लागला. तो जी जी वेळ सांगे, त्याची वरुण वाट पाहात असत. रोहिताला जेव्हा समजले की, वडील आपले बलिदान करू इच्छितात. तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसानंतर त्याला समजले की, वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे. यामुळे त्याला जलोदर झाला आहे. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला. परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले. ते रोहिताला म्हणाले, "पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले." इंद्रांचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर वनातच राहिला. अशा प्रकारे दुसर्या. तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला. परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत. अशाप्रकारे सहा वर्षे रोहित वनातच राहिला. सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला, तेव्हा त्याने अजीगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शुनःशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशू बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी, श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरुण इत्यादि देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले. संयमी जमदग्नी अध्वर्यू झाले. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला. (७-२३) शुनःशेपाचे माहात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणार्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून, आकाशाला अहंकारामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. यानंतर निर्वाणसुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला. (२४-२७) अध्याय सातवा समाप्त |