श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २० वा

भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - राजन, कुलगुरू शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ, राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला - (१)

बली म्हणाला - भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणार्‍यांना तोच धर्म आहे की, ज्यामुळे अर्थ, काम, यश, आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. परंतु गुरुदेव, मी प्रह्लादांचा नातू आहे. आणि एकवेळ देण्याची प्रतिज्ञा करून बसलो आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे "मी तुला देणार नाही" असे या ब्राह्मणाला कसे सांगू ? या पृथ्वीने म्हटले आहे की, "असत्याहून मोठा असा कोणताच अधर्म नाही. सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे. परंतु खोटे बोलणार्‍या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होणार नाही." ब्राह्मणांना फसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकाला, दारिद्र्याला, दुःखाच्या समुद्राला, राज्याच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादी ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देःऊ जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही, तर त्या त्यागापासून काय फायदा ? दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करून सुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे ? हे ब्रह्मन, यापूर्वी ज्या दैत्यराजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक-परलोक तर काळाने खाऊन टाकला; परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. गुरुदेव, युद्धात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत; परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करतात, असे लोक मात्र दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्त्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले ? म्हणून मी या ब्रह्मचार्‍याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन. माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले, तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही. कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे. जर हे पवित्रकीर्ती भगवान विष्णूच असतील, तर यश मिळविल्याखेरीज राहणार नाहीत. युद्धात मला मारूनसुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील, तर युद्धात माझ्याकडून मारले जातील. (२-१३)

श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेने सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु शद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणार्‍या शिष्याला शाप दिला. "मूर्खा ! तू स्वतःला मोठा पंडित समजतोस ! गर्विष्ठ अशा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल." आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतरसुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले. त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्‍नी विंध्यावली तेथे आली. तिने चरणप्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. बलीने मोठ्या आनंदाने स्वतः ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्यांच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. एकाच वेळी हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, किंपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले, हे केवढे कठीण काम केले बरे ! (१४-२०)

त्यावेळी एक मोठी अद्‌भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुणात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशु, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्यांचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंतःकरण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंडर्‍यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्‌गण, बस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्षःस्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्षःस्थळावर हातात कमळे घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादि समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरुण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हास्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले. (२१-२९)

परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांमध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणार्‍या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ङ्‌गधनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिह्ने असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुगुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्षस्थळावर श्रीवत्स चिह्न, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्‍नजडित कमरपट्यासह पीतांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसर्‍या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊन ठेवण्यासाठी बलीची थोडीशी कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, जनलोक आणि तपोलिकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले. (३०-३४)

स्कंध आठवा - अध्याय विसावा समाप्त

GO TOP