श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ४ था

हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – हिरण्यकशिपूने जेव्हा ब्रह्मदेवांना अशा प्रकारचे अत्यंत दुर्लभ वर मागितले, तेव्हा त्यांनी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्याकारणाने त्याला ते वर दिले. (१)

ब्रह्मदेव म्हणाले – बाबा रे ! तू मला जे वर मागत आहेस, ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहेत. परंतु दुर्लभ असूनही मी तुला ते सर्व वर देत आहे. (२)

ज्यांचे वरदान कधी खोटे ठरत नाही ते समर्थ भगवान, हिरण्यकशिपूने पूजा केल्यावर प्रजापतींनी केलेली स्तुती ऐकून आपल्या लोकात निघून गेले. ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून घेतल्यानंतर सुवर्णाप्रमाणे कांतिमान शरीर असलेला तो दैत्य भावाच्या हत्येची आठवण होऊन भगवंतांचा द्वेष करू लागला. त्या महादैत्याने सर्व दिशा, तिन्ही लोक, तसेच देव, असुर, राजे, गंधर्व, गरुड, सर्प, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषी, पितरांचे अधिपती, मनू, यक्ष, राक्षस, पिशाचराज, प्रेत, भूतपती तसेच सर्व प्राण्यांच्या राजांना जिंकून आपल्याला वश करून घेतले. एवढेच नव्हे तर त्या विश्वविजयी दैत्याने लोकपालांची शक्ती आणि ठिकाणे सुद्धा हिसकावून घेतली. आता तो नंदनवनादी दिव्य उद्यानांच्या सौंदर्याने युक्त अशा स्वर्गात स्वतः विश्वकर्म्याने तयार केलेल्या इंद्राच्या भवनात राहू लागला. तिन्ही लोकांचे सौंदर्य मूर्तिमान होऊन त्या भवनात निवास करीत होते. तसेच सर्व प्रकारच्या संपत्तींनी ते संपन्न होते. त्या महालात पोवळ्यांच्या पायर्‍या, पाचूच्या फरशा, स्फटिकाच्या भिंती, वैडूर्यमण्याचे खांब आणि माणिकांची आसने होती. तेथील छ्ते रंगीबेरंगी होती. तसेच दुधाप्रमाणे शुभ्र बिछाने व त्यांच्यावर मोत्यांच्या झालरी लावल्या होत्या. सर्वांगसुंदर अप्सरा आपल्या नूपुरांचा रुणु-झुणु आवाज करीत रत्‍नमय जमिनीवर इकडे तिकडे फिरत होत्या आणि काहीजणी त्यात आपली सुंदर मुखे पाहात होत्या. त्या इंद्राच्या महालामध्ये अतिशय बलवान आणि अभिमानी हिरण्यकशिपू सर्व लोकांना जिंकून सर्वांचा एकछत्री सम्राट होऊन विहार करू लागला. त्याचे शासन एवढे कठोर होते की देव-दानवसुद्धा त्याला भिऊन त्याच्या चरणांना वंदन करीत असत. युधिष्ठिरा, उग्र गंध असलेली मदिरा पिऊन तो उन्मत्तपणे राहत असे. त्याचे डोळे लालभडक आणि भेसूर असत. त्यावेळी तो तपश्चर्या, योग, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचे भांडारच होता. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांचेखेरीज सर्व देव आपापल्या हातात भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेत उपस्थित असत. युधिष्ठिरा, जेव्हा तो आपल्या सामर्थ्यावर इंद्रासनावर बसला, तेव्हा विश्वावसू, तुंबुरू तसेच आम्ही सर्वपण त्याच्यासमोर गायन करीत असू. त्याचप्रमाणे गंधर्व, सिद्ध, ऋषिगण, विद्याधर आणि अप्सरा वारंवार त्याची स्तुती करीत असत. (३-१४)

वर्णाश्रमधर्माचे पालन करणारे पुरुष पुष्कळ दक्षिणा देऊन जे यज्ञ करीत, त्यांच्या यज्ञांतील आहुती तो आपल्या सामर्थ्याने हिसकावून घेत असे. पृथ्वीच्या सातही द्वीपांवर त्याचे राज्य होते. नांगरणी न करताच जमिनीतून धान्य येत असे. त्याला पाहिजे असेल, ते अंतरिक्षातून मिळत असे. त्याचप्रमाणे त्याच्या बाबतीत आकाश अनेक आश्चर्यकारक वस्तूंची खाण असे. खारे पाणी, मदिरा, तूप, मध, दही, दूध आणि गोड्या पाण्याचे समुद्रसुद्धा आपल्या पत्‍न्या ज्या नद्या त्यांच्या लाटांतून रत्‍नांच्या राशी त्याच्याकडे पोहोचवित असत. पर्वत आपल्या दर्‍यात क्रीडांगणे उपलब्ध करून देत आणि झाडे सर्व ऋतूंमध्ये फुले-फळे देत असत. सर्व लोकपालांचे वेगवेगळे गुण तो एकटाच धारण करीत होता. अशा प्रकारे दिग्विजयी आणि एकछत्री सम्राट होऊन तो आपल्याला प्रिय असणार्‍या विषयांचा स्वच्छंदपणे उपभोग घेऊ लागला. परंतु इतके विषय सेवन करूनही इंद्रियांवर संयम नसल्यामुळे त्याची तृप्ती होऊ शकली नाही. (१५-१९)

ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता, तोच भगवंतांचा हा पार्षद ऐश्वर्याच्या मदाने उन्मत्त होऊन घमेंडीत शास्त्रमर्यादांचे उल्लंघन करू लागला होता. त्याच्या जीवनाचा खूपसा काळ अशा प्रकारे पाहाता पाहाता निघून गेला. त्याच्या कठोर शासनाने सर्व लोक आणि लोकपाल भयभीत झाले. त्यांना जेव्हा दुसरीकडे कोठेही आश्रय मिळाला नाही, तेव्हा ते भगवंतांना शरण गेले. जेथे सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरी निवास करतात आणि जे प्राप्त केल्यानंतर तेथून शांत आणि निर्मल संन्यासी महात्मे परत येत नाहीत, त्या भगवंतांच्या परम धामाला आम्ही नमस्कार करतो. अशा भावनेने आपल्या इंद्रियांचा संयम आणि मन एकाग्र करून त्यांनी वायुभक्षण करून झोप सोडून निर्मल हृदयाने भगवंतांची आराधना सुरू केली. तेव्हा मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी त्यांना ऐकू आली. त्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमल्या. साधूंना अभय देणारी ती वाणी होती. “श्रेष्ठ देवांनो, भिऊ नका. तुम्हा सर्वांचे कल्याण असो. कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच परम कल्याणाची प्राप्ती होते. या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासूनच कल्पना आहे. ती मी नाहीशी करीन. योग्य वेळ येण्याची वाट पहा. कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि मी यांचा द्वेष करू लागतो, तेव्हा लवकरच त्याचा नाश होतो. जेव्हा हा आपल्या वैरहीन, शांत आणि महात्मा पुत्र प्रल्हादाचा द्वेष करील, तेव्हा वरामुळे शक्तिसंपन्न झाला असला, तरी याला मी अवश्य मारीन. (२०-२८)

नारद म्हणाले – लोकगुरू भगवंतांनी जेव्हा देवांना असे आश्वासन दिले, तेव्हा ते त्यांना प्रणाम करून परत फिरले. त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला आणि आता हिरण्यकशिपू मारला गेला, असेच त्यांना वाटले. (२९)

दैत्यराज हिरण्यकशिपूला अत्यंत अद्‌भुत असे चार पुत्र होते. त्यापैकी प्रल्हाद हा सर्वांत धाकटा, परंतु गुणांच्या बाबतीत सर्वांत श्रेष्ठ आणि संत सेवक होता. तो ब्राह्मणभक्त, सदाचरणी, सत्यप्रतिज्ञ व जितेंद्रिय होता. शिवाय सर्व प्राण्यांच्याबरोबर तो स्वतः सारखेच वर्तन करी आणि सर्वांचा एकमात्र प्रिय असा हितैषी होता. तो श्रेष्ठांपुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत असे. गरिबांच्यावर पित्याप्रमाणे स्नेह करी. जे बरोबरीचे होते, त्यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करी आणि गुरूजनांबद्दल भगवद्‌भाव ठेवीत असे. विद्या, धन, सौंदर्य आणि कुलीनता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला शिवला नाही. संकटांच्या वेळी तो घाबरत नसे. इहलोकपरलोक यांतील विषयांना तो मिथ्या समजत असे. म्हणून त्याच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूबद्दल लालसा नव्हती. इंद्रिये, प्राण, शरीर आणि मन त्याच्या ताब्यात होते. त्याच्या चित्तामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होत नसे. जन्माने असुर असूनही आसुरी दोषांचा त्याच्यामध्ये लवलेशही नव्हता. हे राजा, जसे भगवंतांचे गुण अनंत आहेत, तसेच प्रल्हादामध्ये होते. महात्मे लोक नेहमी त्यांचे वर्णन करून अनुकरण करीत असले तरीसुद्धा ते अजूनही संपलेले नाहीत. युधिष्ठिरा, देव त्याचे शत्रू असूनही भक्तांची चरित्रे ऐकण्यासाठी जेव्हा त्यांची सभा भरते, तेव्हा ते दुसर्‍या भक्तांना प्रल्हादाची उपमा देतात. तर मग आपल्यासारखे भगवद्‌भक्त त्याचा आदर करतील यात काय आश्चर्य ! त्याच्या मोठेपणाचे वर्णन करण्यासाठी अगणित गुण सांगण्या-ऐकण्याची आवश्यकता नाही. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी त्याचे स्वाभाविक प्रेम आहे, एवढा एकच गुण त्याचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. (३०-३६)

खेळणे-बागडणे सोडून प्रल्हाद लहानपणीच भगवंतांच्या ध्यानामध्ये वेड्याप्रमाणे तन्मय होऊन जात असे. श्रीकृष्ण रूप ग्रहाची बाधा झाल्यामुळे त्याला जगाविषयी काहीच शुद्ध नसे. भगवंतांनी आपल्याला मिठीत घेतले आहे, असे वाटत असल्यामुळे त्याला झोपणे, बसणे, खाणे, पिणे, चालणे, फिरणे आणि बोलणे या गोष्टी आपण करतो, असे वाटत नसे. कधी कधी भगवान मला सोडून निघून गेले, या भावनेने त्याचे हृदय व्याकूळ होऊन तो रडू लागे. कधी मनोमन त्यांना आपल्यासमोर पाहून आनंदाच्या उद्रेकाने तो खदखदा हसू लागे; तर कधी त्या आनंदात मोठ्याने गाऊ लागे. तो कधी उत्साहाने ओरडत असे. कधी कधी लोकलज्जा न बाळगता नाचत असे. कधी त्यांच्या लीलांमध्ये तल्लीन होऊन स्वतःची आठवण विसरून त्या लीलांचे अनुकरण करी. कधी भगवंतांच्या कोमल स्पर्शाचा अनुभव येऊन आनंदात मग्न होऊन शांतपणे बसून राही. त्यावेळी त्याचा रोम-न्‍-रोम पुलकित होई. निश्चल प्रेम आणि आनंदाश्रू यांनी त्याचे अर्धोन्मीलित डोळे डबडबलेले असत. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची ही भक्ती निःसंग भगवत्प्रेमी महात्म्यांच्या संगतीने व सेवेने प्राप्त होते. यामुळे तो स्वतः तर परमानंदात मग्न राहीच; पण ज्या बिचार्‍यांचे मन कुसंगतीमुळे अत्यंत हीन-दीन झालेले असे, त्यांनासुद्धा तो वारंवार शांतीचा लाभ करून देत असे. युधिष्ठिरा, प्रल्हाद भगवंतांचा परम भक्त, परम भाग्यवान आणि महात्मा होता. हिरण्यकशिपू मात्र अशा पुत्राचा द्वेष करू लागला. (३७-४३)

युशिष्ठिराने विचारले – हे नामस्मरणव्रत घेतलेल्या देवर्षे, आम्ही आता हे जाणून घेऊ इच्छितो की, पिता असूनसुद्धा हिरण्यकशिपूने अशा शुद्ध हृदय महात्म्या पुत्राशी द्रोह का केला ? पुत्रांवर प्रेम करणारे वडील, मुलगा जर मनाविरूद्ध वागला, तर त्याला सुधारण्यासाठी ते रागावतात, पण शत्रूप्रमाणे वैर तर करीत नाहीत ना ? असे असता मनाप्रमाणे वागणार्‍या, शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवद्‌भाव ठेवणार्‍या पुत्रांचा कोणी द्वेष कसा करील ? नारद महोदय, द्वेषाने पुत्राला मारण्याची इच्छा पित्याने का केली, हे आमचे कुतुहल आपण शांत करा. (४४-४६)

स्कंध सातवा - अध्याय चवथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP