श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय १८ वा

अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्‍गणांच्या उत्पत्तीचे वर्णन -

श्रीशुकदेव म्हणतात - सवित्याची पत्नी पृश्नी हिच्यापासून सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशू, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी आठ संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धी. हिला महिमा, विभू आणि प्रभू हे तीन पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. धात्याला कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती या नावाच्या चार पत्न्या होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे सायं, दर्श, प्रातः आणि पूर्णमास हे चार पुत्र झाले. (१-३)

धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते, त्याची पत्नी क्रिया. तिच्यापासून पुरीष्य नावाच्या पांच अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्म ग्रहण केला. याअगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मीकीसुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचे वाल्मीकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्यस्खलन झाले होते. ते त्या दोघांनी घडयात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ट आणि पिप्पल असे तीन पुत्र झाले. हे परीक्षिता, पुलोमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मीढ्‌वान असे तीन पुत्र झाले. भगवान विष्णूच मायेने वामनरूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती. तिच्यापासून बृहच्छ्‌लोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी तिला अनेक संताने झाली. कश्यपनंदन भगवान वामनांनी अदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले, याचे वर्णन मी पुढे करीन. (४-९)

आता मी कश्यपांची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतानपरंपरेचे वर्णन ऐकवितो. त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीला दैत्य, आणि दानवांना वंदनीय असे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष असे दोनच पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू दानवी होती. तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकशिपूशी करून दिला. कयाधूला संल्हाद, अनुल्हाद, ल्हाद आणि प्रल्हाद असे चार पुत्र झाले. त्यांना सिंहिका नावाची एक बहीण होती. विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी मोहिनीरूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडविले होते, तोच हा राहू. संल्हादाची पत्नी कृती. तिला पंचजन नावाचा पुत्र झाला. ल्हादाची पत्नी धमनी. तिला वातापी आणि इल्वल असे दोन पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तींच्या आतिथ्याचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते. अनुल्हादाची पत्नी सूर्म्या होती. बाष्कल आणि महिष असे तिचे दोन पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन. त्याची पत्नी देवी. तिचा मुलगा बळी. बळीच्या पत्नीचे नाव अशना होते. तिला बाण इत्यादी शंभर पुत्र झाले. बळीच्या स्तुत्य महिम्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाणाने शंकरांची आराधना करून त्यांच्या गणांचा तो प्रमुख बनला. आजसुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहातात. दितीचे आणखी एकोणपन्नास पुत्र होते. त्यांना मरुद्‌गण म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनविले. (१०-१९)

राजाने विचारले - गुरुवर्य, मरुद्‍गणांनी असे कोणते सत्कर्म केले होते की, ज्यायोगे ते आपला जन्मजात आसुरी भाव सोडू शकले आणि इंद्राने त्यांना देव बनविले ? हे ब्रह्मन, माझ्यासह हे ऋषी, ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून आपण हे रहस्य आम्हांला सांगावे. (२०-२१)

सूत म्हणतात - शौनका, राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोडया शब्दांत पण गर्भितार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठया आदराने विचारला होता. म्हणून सर्वज्ञ श्रीशुकाचार्यांनी मोठया प्रसन्न चित्ताने त्याचे कौतुक करीत म्हटले. (२२)

श्रीशुक म्हणाले - भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले. म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली. इंद्र विषयी, क्रूर आणि निर्दय आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले.मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईन ? राजे, देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात; परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जातो. अशा देहासाठी जो दुसर्‍यांना त्रास देतो, त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही. त्यामुळेच त्याला नरकात जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झाला आहे. म्हणून जो इंद्राची घमेंड जिरवील, असा पुत्र मला व्हावा. असा विचार करून दिती सेवा-शुश्रूषा, विनय-प्रेम आणि इंद्रियनिग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली. हे राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम, मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेमकटाक्ष यांनी त्यांचे मन जिंकून घेत असे. कश्यपऋषी विद्वान असूनही चतुर दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन "मी तुझी इच्छा पूर्ण करीन." असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत ह्यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत, असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा, दितीने कश्यपांची अशी सेवा केली. यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाले. (२३-३१)

कश्यप म्हणाले - हे स्तुत्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल, ते मागून घे. पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्ट वस्तू दुर्मिळ आहे ? पती हेच स्त्रियांचे परम दैवत आहे, असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत. पुरुष, नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्य़ा देवांच्या रूपाने त्याच भगवंतांची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंतांचीच पूजा केली जाते. म्हणून हे प्रिये, कल्याण इच्छिणार्‍या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात. हे कल्याणी, तू अशाच भावाने, भक्तीने माझी सेवा केली आहेस. म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. कुलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. (३२-३६)

दिती म्हणाली - ब्रह्मन, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल, तर ज्याने माझे दोन पुत्र मारवून मला निपुत्रिक केले, त्या इंद्राला मारील असा एक अमर पुत्र मला द्या. (३७)

दितीचे हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चात्ताप झाला. अरेरे ! आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अहो, आज मी इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतले. दीनवाण्या मला निश्चितच नरकात जावे लागेल ? यात या स्त्रीचा तरी काय दोष ! कारण ही आपल्या वळणावरच गेली. मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही. खरा स्वार्थ न ओळखणार्‍या माझाच धिक्कार असो. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद्‌ऋतूत उमललेले कमळ ! त्यांचे बोलणे जणू कानांचे अमृत ! परंतु हृदय मात्र जणू सुर्‍याची तीक्ष्ण धारच होय. अशा स्त्रियांचे चरित्र कोण जाणू शकेल ? वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी त्या आपला पती, पुत्र आणि भावालासुद्धा मारतात किंवा मारवितात. मी आता वचन देऊन चुकलो आहे. म्हणून ते खोटे होता कामा नये. परंतु इंद्राचासुद्धा वध होता कामा नये. म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी. हे कुरुपुत्रा, भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःची मनोमन निर्भर्त्सना केली. नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले. (३८-४४)

कश्यप म्हणाले - कल्याणी, मी सांगितलेल्या व्रताचे जर तू एक वर्षपर्यंत विधिपूर्वक पालन केलेस, तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल. परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवांचा मित्र बनेल. (४५)

दिती म्हणाली - ब्रह्मन, मी त्या व्रताचे पालन करीन. आपण सांगा मी काय काय केले पाहिजे ते. कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही ? (४६)

कश्यप म्हणाले - या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. कोणाला शाप देऊ नये. खोटे बोलू नये. नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये. पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये. रागावू नये. दुर्जनांशी बोलू नये. न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसर्‍याने घातलेली माळ कधीही घालू नये. उष्टे खाऊ नये. भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये. शूद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नही खाऊ नये. तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये. काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये. संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये. पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमधे ओलेत्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसर्‍यांबरोबर, नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये. नेहमी पवित्र राहावे. धुतलेले वस्त्र नेसावे. सौभाग्यअलंकारांनी मंडित राहावे. सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणांची पूजा करावी. वेण्या, चंदनादी सुगंधी द्रव्ये, नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी. तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न राहावे. त्याचबरोबर त्यांचेच तेज आपल्या गर्भात आहे, हे लक्षात ठेवावे. या व्रताचे नाव ‘पुंसवन’ असे आहे. कोणतीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे एक वर्षभर पालन करशील, तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. (४७-५४)

परीक्षिता, थोर दितीने "ठीक आहे’ असे म्हणून उदरात कश्यपांचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले. इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. तो दररोज त्या त्या वेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, पाने, अंकूर, माती आणि पाणी आणून देत असे. राजन, जसा शिकारी हरिणाला मारण्यासाठी हरिणासारखा वेष करून त्याच्याजवळ जातो, त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा, कपट-वेष धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. हे राजा, नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली नाही, तेव्हा आपले कल्याण कसे होईल, याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली. (५५-५९)

व्रताच्या पालनाने कृश झालेली दिती एके दिवशी संध्याकाळी उष्टया तोंडाने, तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गेली. योगेश्वर इंद्राने ही संधी साधून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणार्‍या गर्भाचे वज्राने सात तुकडे केले. जेव्हा तो गर्भ रडू लागला, तेव्हा त्याने, "रडू नकोस" असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकडयाचे आणखी सात सात तुकडे केले. राजा, जेव्हा इंद्र त्यांचे तुकडे तुकडे करू लागला, तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, "इंद्रा, आम्हांला का मारतोस ? आम्ही तर तुझे भाऊ मरुद्‌गण आहोत." तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुद्‌गणांना म्हणाला. "ठीक आहे. तुम्ही माझे भाऊ आहात. आता घाबरू नका." परीक्षिता, जसे श्रीहरींच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तुझे काहीच अनिष्ट झाले नाही, त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊनसुद्धा दितीचा गर्भ मेला नाही. कारण जो मनुष्य केवळ एकवेळच आदिपुरुष नारायणांची आराधना करतो, तो त्यांच्यासमान होऊन जातो. दितीने तर एका वर्षाला थोडेच दिवस कमी इतके दिवस भगवंतांची आराधना केली होती. आता ते एकोणपन्नास मरुद्‌गण इंद्रासह पन्नास देव झाले. इंद्रानेसुद्धा मातेमुळे त्यांना आलेला दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनविले. दितीने उठून पाहिले की, तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी एकोणपन्नास बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली. नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली, "बाळा, तुम्हा आदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन व्हावा, या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता. मग हे एकोणपन्नास पुत्र कसे झाले ? बाळा इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहित असेल तर खरे काय ते मला सांग. खोटे बोलू नकोस." (६०-७०)

इंद्र म्हणाला - माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्या जवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती. म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे सात तुकडे केले. तेव्हा ते सात बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे सात सात तुकडे केले. तरीसुद्धा ते मेले नाहीत. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की, परम पुरुष भगवंतांच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाहीत तेच आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होत. भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगांचे वरदान कोण मागेल ? कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात. हे माते, पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाला, ही भाग्याची गोष्ट आहे. (७१-७६)

श्रीशुक म्हणतात - इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुद्‌गणांसह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला. हे मरुद्‍गणांचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होतास, त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखी तुला काय सांगू ? (७७-७८)

स्कंध सहावा - अध्याय अठरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP