श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय ८ वा

भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करून नित्य-नैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता. राजा, त्याचवेळी तहानेने व्याकूळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली. ती पाणी पीत असतानाच जवळच गर्जना करणार्‍या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली. स्वभावतःच भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहात जात असता जेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली, तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले. तहान तर अजून भागली नव्हती; परंतु आता तर प्राणावर बेतले होते. म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली. (१-४)

तिच्या पोटामध्ये गर्भ होता. उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला. सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरिणीचा गर्भपात झाला. त्यामुळे, तसेच कळपापासून ताटातूट झाल्याकारणाने ती अत्यंत दुःखी झाली. त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली. (५-६)

राजर्षी भरताने बिचारे हरिणीचे पाडस आपल्या आईची ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहात आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला. त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढतच गेली. तो नेहमी त्याचे पालन-पोषण करणे, त्याचे लाड करणे, त्याला चुचकारणे यासारख्या चिंतेतच मग्न झाला. थोडयाच दिवसात त्याचे यम, नियम आणि भगवत्पूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एकेक करून कमी होत होत शेवटी सर्वच बंद झाली. त्याचा आता असा विचार सुरू झाला. "पहा ना ! केवढी खेदाची गोष्ट आहे ! या गरीब बिचार्‍या मृग पाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप, सुहृद आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले. हे मलाच आपला माता-पिता, भाऊबंद आणि कळपातील सोबती समजत आहे. त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे. शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो. म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तर्‍हेने पालन-पोषण आणि लाड केले पाहिजेत. शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठयातल्या मोठया स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाहीत." (७-१०)

अशा प्रकारे त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता-बसता, झोपताना, फिरताना कोठेही थांबताना आणि भोजन करतेवेळीसुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहात असे. जेव्हा त्याला दर्भ, फुले, समिधा, पाने किंवा फळे-मुळे आणावयाची असत, तेव्हा लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे. वाटेत इकडे तिकडे कोवळे गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरिण पाडस थांबत असे, तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई. कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे. राजराजेश्वर भरत नित्य-नैमित्तिक कर्मे करतेवेळी सुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाही आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे, तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे. त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे - वत्सा, तुझे सर्वत्र कल्याण असो. (११-१४)

जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकूळ होऊन करुणेने त्याच्याविषयीच शोक करीत मोहाने तो असे म्हणे. अहो ! आईविना असलेले गरीब पाडस दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन नीचावर विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना ? पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंतांच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना ? एखादा लांडगा, कुत्रा, कळपाने हिंडणारी डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना ? अरे ! संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रगट होणारा वेदत्रयीरूप भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहात आहे; तरी त्या हरिणीची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही. तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपाडसाला शोभणार्‍या निरनिराळ्या मनोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय ? कधी कधी मी लटक्या रागाने खोटया समाधीचा बहाणा करून डोळे मिटून बसत असे, तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूंसारख्या कोमल शिंगांच्या टोकांनी माझे अंग खाजवीत असे. मी कधी दर्भांवर हवनसामग्री ठेवीत असे, तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करीत असे. त्यावर मी रागावल्यानंतर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे. (१५-२२)

(त्याच्या खुरांच्या खुणा जमिनीवर पाहून) अहो ! या तपस्विनी धरतीने असे कोणते तप केले आहे की, जी त्या अतिनम्र कृष्णमृगपाडसाच्या छोटया छोटया सुंदर, सुखद आणि कोमल खुरांच्या खुणांनी पाडसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकूळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवीत आहे. आणि स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हांनी शोभिवंत करून स्वर्गमोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणांसाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे. (ज्या जमिनीवर काळवीट वावरतात, ती जमीन शास्त्राने यज्ञाला योग्य मानली आहे) (चंद्रावरील हरीण पाहून) ज्याची आई सिंहाच्या भयाने मेली होती, तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण तर करीत नसेल ना ? किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप वडवानलाच्या प्रखर ज्वालांनी हृदय होरपळल्याने मी एका मृगबालकाचा आश्रय घेतला होता. आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले. म्हणून हा (चंद्र) आपल्या शीतल, शांत, स्नेहपूर्ण अशा मुखातून निघणार्‍या पाणीरूपी अमृत-किरणांनी मला शांत करीत असेल का ? (२३-२५)

अशा रीतीने, जे पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते, अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकूळ होऊ लागले. मृगबालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्धकर्मामुळे बिचारा भरत भगवद्-आराधनारूप कर्म आणि योगानुष्ठान यांपासून दूर गेला. नाहीतर, ज्याने मोक्षमार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता, त्याचीच मनुष्येतर हरीणपाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती ? अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योगसाधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृगबालकाच्या पालन-पोषण आणि लाड-प्रेमात मग्न राहून आत्म स्वरूपाला विसरला. याचवेळी, अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ, उंदराच्या बिळात साप घुसावा, तसा त्याच्या शरीरात घुसला. त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिले होते. अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला. त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्यांप्रमाणे त्याला मृगयोनीच मिळाली. परंतु त्याची पूर्वजन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती. भगवद्-आराधनेच्या प्रभावाने या योनीतसुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चात्ताप करीत म्हणू लागला. अहो ! केवढी ही खेदाची गोष्ट ! मी संयमशील महानुभवांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तेथे राहून जे चित्त मी सर्वभूतात्मा श्रीवासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण, मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून, स्थिरभावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते. पण अज्ञानी अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरीणशिशूच्या मागे लागून आपल्या ध्येयापासून ढळले. (२६-२९)

अशा प्रकारे हरीण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्यभावना जागृत झाली, ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी-मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून (निघून) पुन्हा शांतस्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलस्त्य आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंतांच्या शालग्रामतीर्थामध्ये आला. तेथेही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठया भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोट भरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणार्‍या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. (३०-३१)

स्कंध पाचवा - अध्याय आठवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP