श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय २० वा

महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्रीविष्णूंचा प्रादुर्भाव -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - पृथूंच्या नव्याण्णव यज्ञांनी यज्ञभोक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंनासुद्धा फार आनंद झाला. इंद्रासह तेथे येऊन ते त्याला म्हणाले. (१)

श्रीभगवान म्हणाले - राजन ! इंद्राने तुझ्या शंभर अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले. आता तो तुझी क्षमा मागत आहे. तू त्याला क्षमा कर. हे राजा, जे थोर पुरुष साधू आणि सद्‌बुद्धिसंपन्न असतात, ते दुसर्‍या जीवांचा द्रोह करीत नाहीत. कारण हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. जर तुझ्यासारखे लोकसुद्धा देवमायेने मोहित झाले तर समजावे की, पुष्कळ दिवसपर्यंत ज्ञानीजनांच्या केलेल्या सेवेच्या मोबदल्यात केवळ श्रमच पदरी पडले. म्हणून ज्ञानी पुरुष या शरीराला अविद्या, वासना, आणि कर्मांचाच पुतळा समजून यामध्ये आसक्त होत नाही. अशा प्रकारे जो या शरीरातच आसक्त नाही, तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर, पुत्र, धन यांमध्ये कशी ममता ठेवील ? (२-६)

हा आत्मा एक, शुद्ध, स्वयंप्रकाश, निर्गुण, तीन गुणांचे आश्रयस्थान, सर्वव्यापक, माया-आवरणशून्य, सर्वांचा साक्षी तसेच दुसर्‍या आत्म्याने रहित आहे. म्हणून शरीरापासून भिन्न आहे. जो पुरुष या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो, तो प्रकृतीशी संबंध ठेवून सुद्धा तिच्या गुणांनी लिप्त होत नाही. कारण तो मज परमात्म्यामध्ये स्थित असतो. राजन, जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रमधर्मांच्या द्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो, त्याचे चित्त हळू हळू शुद्ध होते. चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहात नाही आणि त्याला तत्त्वज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हा तो माझ्या समतारूप स्थितीला प्राप्त होतो. हीच परम शांती, ब्रह्म किंवा कैवल्य होय. शरीर, ज्ञान, क्रिया आणि मनाचा साक्षी असूनसुद्धा कूटस्थ आत्मा त्यामध्ये गुंतत नाही, तो तटस्थ असतो, हे जो जाणतो तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. (७-११)

जन्म-मरणरूप फेरा पंचमहाभूते, इंद्रिये, इंद्रियाभिमानी देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिलाफ असलेल्या लिंगशरीराला असतो. सर्वसाक्षी आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही. माझ्यामध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्ष-शोकांच्या अधीन होत नाहीत. म्हणून हे वीरवरा, उत्तम, मध्यम, आणि अधम पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुख-दुःख हे एकसारखे समज. तसेच मन आणि इंद्रिये यांच्यावर विजय मिळवून माझ्या इच्छेनेच तुला जोडल्या गेलेल्या मंत्री व सेवकांच्या साहाय्याने सर्व लोकांचे रक्षण कर. प्रजेचे पालन करण्यातच राजाचे कल्याण आहे. यामुळे त्याला परलोकात प्रजेच्या पुण्याचा सहावा भाग पुण्य मिळते. याविरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करीत नाही, परंतु त्यांच्याकडून कर मात्र वसूल करतो, त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रजेच्या पापात भागीदार व्हावे लागते. असा विचार करून तू श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्वपरंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचेच मुख्यतः आचरण करावे आणि कोठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे. त्यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करील आणि थोडयाच दिवसात तुला घरबसल्या सनकादिक सिद्धांचे दर्शन होईल. राजन, तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने मला वश करून घेतले आहे. म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे. यज्ञ, तप, किंवा योगाच्याद्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही. ज्यांच्या चित्तामध्ये समता आहे, त्यांच्याच हृदयात मी राहातो. (१२-१६)

मैत्रेय म्हणतात - सर्वांचे गुरू श्रीहरी यांनी असे म्हटल्यानंतर जगद्विजयी पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली. देवराज इंद्र आपल्या कर्माने लज्जित होऊन त्याच्या चरणांवर लोटांगण घालणार होता, तेवढयात राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्याच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकला. नंतर पृथूने विश्वात्मा भक्तवत्सल भगवंतांचे पूजन केले आणि क्षणोक्षणी उचंबळणार्‍या भक्तिभावात निमग्न होऊन प्रभूंचे चरण धरले. श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते; परंतु पृथूविषयीच्या वात्सल्यभावाने त्यांना तेथेच थांबविले. ते आपल्या कमलदलाप्रमाणे असणार्‍या नेत्रांनी त्याच्याकडे पाहातच राहिले. तेथून त्यांचा पाय निघेना. आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंतांचे दर्शन घेऊ शकत नव्हता. इतकेच काय, पण कंठ सद्‌गदित झाल्याकारणाने काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्याने त्यांना मनाने आलिंगन देऊन हृदयात घट्ट पकडून ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वीला झाला होता. (पण भक्तप्रेमात तल्लीन झाल्यामुळे याचे त्यांना भान नव्हते. वास्तविक देवांच्या चरणांचा स्पर्श जमिनीला होत नाही.) त्यांनी आपला हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता. पृथू डोळ्यांतील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहात बोलू लागला. (१७-२२)

पृथू म्हणाला - मोक्षपती प्रभो, आपण वर देणार्‍या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात. पण बुद्धिमान मनुष्य देहाभिमान्यांनी भोगण्यायोग्य विषय आपल्याकडे कसे मागेल ? ते तर नरकातील जीवांनाही मिळतात. म्हणून हे तुच्छ विषय मी आपणांकडे मागत नाही. हे नाथ, जेथे महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही. (म्हणजेच जेथे आपल्या कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही) अशा मोक्षपदाचीही मला इच्छा नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे की, मला दहा हजार कान द्या (म्हणजे ज्यांनी मी आपले लीला-गुण ऐकत राहीन.) हे पुण्यकीर्ती प्रभो, आपले चरणकमलमकरंदरूपी अमृतकण घेऊन महापुरुषांच्या मुखांतून जो वायू बाहेर पडतो, त्यामध्ये एवढी शक्ती असते की, आपल्या तत्त्वाचे विस्मरण झालेल्या आमच्यासारख्या अभाग्यांना तो पुन्हा तत्त्वज्ञान करून देतो. म्हणून मला दुसरा कोणताही वर नको. हे उत्तम कीर्तिमान प्रभो, सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैववशात एक वेळ ऐकून एखादा पशुबुद्धीचा पुरुष भले तृप्त होवो, पण गुणग्राही ते कसे विसरू शकेल ? सर्व प्रकारच्या पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी स्वतः लक्ष्मीसुद्धा आपले सुयश ऐकू इच्छिते. आता लक्ष्मीप्रमाणे मीसुद्धा अत्यंत उत्सुकतेने सर्वगुणधाम आपणा पुरुषोत्तमाची सेवाच करू इच्छितो. परंतु असे होऊ नये की, एकाच पतीची सेवा करण्यात स्पर्धा लागून आपल्या चरणांशीच मन एकाग्र करण्याने आम्हां दोघांमध्ये कलह निर्माण होईल. जगदीश्वरा, जगज्जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध असण्याची शक्यता तर आहेच. कारण आपल्या ज्या सेवाकार्यात तिला प्रेम वाटते, त्यासाठीच मीसुद्धा उत्सुक आहे. परंतु आपण दीनांवर दया करणारे आहात, त्यांची तुच्छ कर्मेसुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहाता. म्हणून मला आशा आहे की, आमच्या भांडणात आपण माझीच बाजू घ्याल. आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण असता. आपल्याला लक्ष्मीशी तरी काय देणे-घेणे आहे ? मायेचे कार्य अहंकार इत्यादींचा आपल्यामध्ये सर्वथैव अभाव आहे. म्हणूनच निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात. भगवन, आपल्या चरणकमलांचे निरंतर चिंतन करणे याखेरीज सत्पुरुषांचे अन्य कोणतेही प्रयोजन आहे, असे मला वाटत नाही. मी सुद्धा कोणतीही इच्छा मनात न ठेवता आपले भजन करीत आहे. आपण मला म्हणालात की, "वर माग." मला तर आपले हे बोलणे संसारातील मोहात पाडण्यासारखेच वाटते. एवढेच काय, आपल्या वेदरूप वाणीनेसुद्धा जगाला बांधून ठेवले आहे. जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते, तर मोहवश होऊन त्यांनी सकाम कर्म का केले असते ? प्रभो, आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विन्मुख होऊन अज्ञानवश स्त्री-पुत्रादिकांची इच्छा करतो. असे असताही जसे पिता, पुत्राने प्रार्थना न करताही स्वतःहून पुत्राचे कल्याण करतो, त्याप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमच्या हितासाठी स्वतःच प्रयत्न करावा. (२३-३१)

मैत्रेय म्हणतात - आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यानंतर सर्वसाक्षी श्रीहरी त्याला म्हणाले, राजन, तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो. ही मोठी सद्‌भाग्याची गोष्ट आहे की, तुझे चित्त माझ्या ठिकाणी जडले आहे. असे झाले की तो मनुष्य तरून जाण्यास कठीण अशीही माझी माया पार करून जातो की जिला सोडणे किंवा जिच्या बंधनातून सुटणे अत्यंत कठीण आहे. तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर. हे राजा, जो मनुष्य माझ्या आज्ञेचे पालन करतो, त्याचे सर्व ठिकाणी कल्याण होते. (३२-३३)

मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे भगवंतांनी राजर्षी पृथूच्या सारयुक्त गूढ वचनांचा आदर केला. नंतर पृथूने त्यांची पूजा केल्यावर प्रभू त्याच्यावर कृपा करून जाण्यास निघाले. महाराज पृथूने तेथे जे देव, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्षद आले होते, त्या सर्वांचे भगवद्‌बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले. नंतर ते सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले. भगवान अच्युतसुद्धा राजा पृथू आणि त्याच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले. नंतर अव्यक्तस्वरूप असूनही (भक्तांसाठी) आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवाधिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथूसुद्धा आपल्या राजधानीकडे गेला. (३४-३८)

स्कंध चवथा - अध्याय विसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP