श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ८ वा

ध्रुवाचे वनात जाणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणतात - शत्रुंजय विदुरा, सनकादिक, नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही. अधर्म हाही ब्रह्मदेवांचाच पुत्र होता, त्याच्या पत्‍नीचे नाव मृषा (असत्य) होते. तिला दंभ आणि माया अशी दोन मुले झाली. त्या दोघांना संतती नसलेला निऋती घेऊन गेला. हे बुद्धिमान विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती (लबाडी) यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा तसेच त्यांच्याहीपासून कली (कलह) आणि त्याची बहीण दुरुक्ती (अपशब्द) उत्पन्न झाले. हे साधुशिरोमणे, नंतर कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले. तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय (नरक) ही जोडी उत्पन्न झाली. हे विदुरा, अशा प्रकारे मी संक्षेपाने तुला प्रलयाला कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला. हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य-संपादनाला कारणीभूत होते. म्हणून याचे वर्णन तीन वेळा ऐकून मनुष्य़ आपल्या मनाची मलिनता दूर करतो. हे कुरुनंदना, आता मी श्रीहरीचे अंश (ब्रह्मदेव) यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती महाराज स्वायंभुव मनूच्या पुत्रांच्या वंशाचे वर्णन करतो. (१-६)

महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वायंभुव मनू यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र झाले. भगवान वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यात तत्पर असत. उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक दोन पत्‍न्या होत्या. त्यांपैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती; सुनीती नव्हती. तिचा पुत्र ध्रुव. (७-८)

एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता. त्याचवेळी ध्रुवसुद्धा मांडीवर बसू इच्छित होता; परंतु राजाने त्याला बसू दिले नाही. त्यावेळी अत्यंत गर्विष्ठ सुरुचीने आपल्या सवतीचा पुत्र ध्रुव याला तसे करताना पाहून रागाने राजासमोर म्हटले. "मुला ! तुला सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही. कारण तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस. तू अजून लहान आहेस. तू दुसर्‍या कोणत्यातरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस, हे तुला अजून माहीत नाही; म्हणूनच तू अशा दुर्लभ गोष्टींची इच्छा करीत आहेस. जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल, तर तपश्चर्या करून श्रीनारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे." (९-१३)

मैत्रेय म्हणतात - ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फूत्कार टाकू लागतो, त्याप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्ध होऊन क्रोधामुळे तो उसासे टाकू लागला. गुपचुपपणे हे सर्व पाहणार्‍या वडिलांना सोडून तो रडत रडत आपल्या मातेकडे गेला. त्याचे दोन्ही ओठ थरथर कापत होते आणि तो स्फुंदून स्फुंदून रडत होता. सुनीतीने मुलाला मांडीवर घेतले आणि जेव्हा महालातील दुसर्‍या लोकांकडून सुरुचीने बोललेले तिने ऐकले, तेव्हा तिलासुद्धा फार दुःख झाले. तिचा धीर सुटला. वणव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली. सवतीचे बोलणे आठवून तिच्या कमळासारख्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. ती बिचारी आपल्या दुःखाला अंत नाही, असे पाहून सुस्कारे टाकीत ध्रुवाला म्हणाली - "पुत्रा, तू दुसर्‍याचे वाईट चिंतू नकोस. कारण जो मनुष्य दुसर्‍यांना दुःख देतो, त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते. सुरुची जे काही म्हणाली, ते योग्यच आहे. कारण महाराजांना माझा ‘पत्‍नी’ म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते. तू मज अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्याच दुधावर वाढलास. बाळ, तुझी सावत्र माता जे म्हणाली, तेच द्वेषबुद्धी सोडून कर. जर तुला राजकुमार उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल, तर भगवंतांच्या चरणकमलांची आराधना कर. (१४-१९)

जगाचे पालन करण्यासाठी सत्त्वगुणाचा अंगीकार करणार्‍या त्या श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच श्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणार्‍या मुनींनाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले. तसेच तुझे आजोबा स्वायंभुव मनूंनीसुद्धा मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणार्‍या यज्ञांच्या द्वारा अनन्य भावाने त्याच भगवंतांची आराधना केली होती. म्हणूनच त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी इहलोकीची सुखे, पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्षसुख प्राप्त झाले. बाळा, तूसुद्धा त्या भक्तवत्सल श्रीभगवंतांचाच आश्रय घे. जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षुलोक नेहमी त्यांच्याच चरणकमलांच्या मार्गाचा शोध करीत असतात. तू स्वधर्मपालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्रीपुरुषोत्तम भगवंतांना बसवून अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच भजन कर. अरे, त्या कमलदललोचन श्रीहरींना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणी दिसत नाही. पहा ! जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अन्य देव धुंडत असतात, ती कमलधारिणी श्रीलक्ष्मीसुद्धा नेहमी त्या श्रीहरींनाच शोधीत असते." (२०-२३)

मैत्रेय म्हणतात - इष्ट वस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखविणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला. हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तेथे आले. त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवीत मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले. मानभंग सहन न होणार्‍या क्षत्रियांचे तेज पहा ना ! हा मुलगा लहान असूनसुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटू वचनांनी घर केले आहे. (२४-२६) नारद म्हणाले- मुला, खेळण्याबागडण्यात रमावयाच्या या बालवयात काही बोलण्याने तुझा मान किंवा अपमान होत असेल, असे आम्हांला नाही वाटत ! जर मानापमानासंबंधीच म्हणशील, तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही. संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान-अपमान किंवा सुख-दुःख प्राप्त होते. (२७-२८)

म्हणून बाबा रे, भगवंतांच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योगसाधनाद्वारे ज्या भगवंतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहेस, त्यांना प्रसन्न करून घेणे सामान्य माणसांना अवघड आहे, असे मला वाटते. योगी लोक अनेक जन्मांत अनासक्त राहून समाधियोगाच्या द्वारा मोठ मोठया कठोर साधना करतात; परंतु भगवंतांच्या स्थानाचा त्यांना पत्ता लागत नाही. म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा. मोठा झाल्यावर जेव्हा परमार्थसाधनेची वेळ येईल, तेव्हा त्यासाठी प्रयत्‍न कर. विधात्याच्या विधानानुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल, त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमय संसारातून पार पडतो. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणार्‍याला पाहून प्रसन्न व्हावे, जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्यानेच दुःखाने तो खचून जात नाही. (२९-३४)

ध्रुव म्हणाला - भगवन, सुख-दुःखामुळे ज्यांचे चित्त चंचल होते, त्यांच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे. परंतु माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. याखेरीज मला भयंकर असा क्षत्रियस्वभाव प्राप्त झाला आहे. म्हणून माझ्यात नम्रतेचा अभाव आहे. सुरुचीने आपल्या कटुवचनरूपी बाणांनी माझे हृदय विदीर्ण केले आहे. त्यामुळे आपला हा उपदेश माझ्या हृदयात शिरत नाही. हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणार्‍या पदावर अधिकार मिळवू इच्छितो. जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाहीत, त्याच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा चांगला मार्ग सांगा. आपण भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही वीणा वाजवीत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करीत आहात. (३५-३८)

मैत्रेय म्हणतात-ध्रुवाचे बोल ऐकून देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्यावर कृपा करून त्याला सदुपदेश करू लागले. (३९)

नारद म्हणाले - पुत्रा, तुझ्या मातेने तुला जो सांगितला, तोच तुझ्या परम कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर. ज्याला धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षरूप पुरुषार्थाची अभिलाषा आहे, त्याला त्यांच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीहरींच्या चरणांचे सेवन करणे हाच होय. म्हणून मुला, तुझे कल्याण असो. आता तू यमुना नदीच्या तटावरील परम पवित्र मधुवनात जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून, नित्यकर्मे करून, विधीनुसार आसन घालून त्यावर बैस. नंतर पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळू हळू प्राण, मन आणि इंद्रियांचे दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरू श्रीभगवंतांचे ध्यान कर. (४०-४४)

भगवंतांचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न असून ते प्रसन्नतापूर्वक भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहेत. त्यांचे नाक, भुवया आणि गाल अत्यंत नयनरम्य आहेत. ते सर्व देवांमध्ये परम सुंदर आहेत. ते तरुण आहेत, त्यांचे सर्व अंग मनोरम आहे, लाल लाल ओठ आणि लालसर नेत्र आहेत. ते शरणागतांना आश्रय देणारे, अपार सुखदायक, शरणागतवत्सल आणि दयेचा सागर आहेत. त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिह्न आहे, त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. त्या परमपुरुष श्यामसुंदरांनी गळ्यात वनमाला धारण केली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म शोभून दिसत आहे. त्यांच्या मस्तकावर किरीट, कानांत कुंडले, बाहूंत केयूर आणि हातात कंकणे शोभून दिसत आहेत. कौस्तुभमणी गळ्याची शोभा वाढवीत आहे. तसेच त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला आहे. त्यांच्या कटिप्रदेशावर सुवर्णाचा कमरपट्टा आणि पायांत सुवर्णाचे नूपुर शोभून दिसत आहेत. भगवंतांचे स्वरूप अत्यंत दर्शनीय, शांत, तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहे. जे लोक प्रभूंची मानसपूजा करतात, त्यांच्या अंतःकरणात ते हृदयकमलाच्या कर्णिकेवर आपल्या नख-मणिमंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात. अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल, तेव्हा त्या वरदायी प्रभूचे मनोमन अशा प्रकारे ध्यान करावे की, ते आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंद हास्य करीत आपल्याकडे पाहात आहेत. भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करण्याने मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाते आणि पुन्हा तिथून मागे फिरत नाही. (४५-५२)

हे राजकुमारा ! या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्राचा जप केला पाहिजे, तो पण सांगतो, ऐक. याचा सात रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणार्‍या सिद्धांचे दर्शन होते. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजासाहित्याने भगवंतांची द्रव्यमय पूजा करावी. प्रभूंचे पूजन पवित्र पाणी, फुले, फळे, वनातील कंदमुळे, पूजेला योग्य अशी कोवळी पाने, वल्कले, त्यांना प्रिय तुळस, इत्यादी अर्पण करून करावे. पाषाण इत्यादींची मूर्ती मिळाली तर तिचे, नाहीतर पृथ्वी, पाणी इत्यादींमध्येही भगवंतांची पूजा करावी. नेहमी संयतचित्त, मननशील, शांत आणि मौन धारण करून रानातीलच वस्तूंचा परिमित आहार घ्यावा. याखेरीज पुण्यकीर्ती श्रीहरी अनिर्वचनीय अशा आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी जी मनोहर कार्ये करतात, त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे. प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे, ते ते मंत्रमूर्ती श्रीहरींना द्वादशाक्षर मंत्राने अर्पण करावेत. (५३-५८)

अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी, आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाते, तेव्हा ते निश्चलभावाने, चांगल्या तर्‍हेने, भजन करणार्‍या आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवितात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात. जर उपासकाला इंद्रियांसंबंधी भोगांबद्दल वैराग्य असेल, तर त्याने मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंतांचे भजन करावे. (५९-६१)

श्रीनारदांनी असा उपदेश केला, तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिह्नांनी अंकित अशा, परम पवित्र मधुवनात गेला. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात पोहोचले. राजाने त्यांचे यथायोग्य उपचारांनी पूजन केले, तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारले. (६२-६३)

श्रीनारद म्हणाले - राजन, तुमचे मुख म्लान झाले आहे. तुम्ही बर्‍याच वेळापासून कोणत्या विचारात गढला आहात ? तुमच्या धर्म, अर्थ आणि काम यांपैकी कशात कमतरता तर आली नाही ना ? (६४)

राजा म्हणाला - ब्रह्मन, मी स्त्रीलंपट आणि निर्दय आहे. अरेरे ! मी माझ्या पाच वर्षांच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढले. त्याचे कमळासारखे कोमल मुख भुकेने म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल. मुनिवर्य, त्या असहाय मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झाले ! अहो, पत्‍नीचा गुलाम झालेल्या माझा दुष्टपणा तर पहा ! जो प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहात होता, त्या बाळाला मी दुष्टाने बसू दिले नाही की हो ! (६५-६७)

श्रीनारद म्हणाले - राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस. त्याचे रक्षणकर्ते भगवान आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही. त्याचे यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल. तोच तुझे यश वाढवील. (६८-६९)

मैत्रेय म्हणतात - देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकून उत्तानपाद राजा राज्याबाबत उदासीन होऊन मुलाचीच चिंता करू लागला. इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून श्रीनारदांच्या उपदेशानुसार एकाग्रचित्ताने श्रीनारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. त्याने तीन तीन रात्रींनंतर फक्त शरीरनिर्वाहापुरती कवठ आणि बोराची फळे खाऊन श्रीहरींची उपासना करीत एक महिना काढला. दुसर्‍या महिन्यात त्याने सहा-सहा दिवसांच्या अंतराने वाळलेले गवत आणि गळून पडलेली पाने खाऊन भगवंतांची उपासना केली. तिसरा महिना नऊ-नऊ दिवसांनंतर केवळ पाणी पिऊन समाधियोगाने श्रीहरींची आराधना करीत व्यतीत केला. चौथ्या महिन्यात त्याने श्वासावर नियंत्रण मिळवून बारा-बारा दिवसांनंतर केवळ वायू पिऊन ध्यानयोगद्वारा भगवंतांची आराधना केली. पाचवा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरीच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कोठेही जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने महदादी तत्त्वांचा आधार आणि प्रकृती व पुरुषाचेही अधीश्वर अशा परब्रह्माच्या ठिकाणी धारणा केली, त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्याच्या तेजाने तिन्ही लोकांचा थरकाप झाला. जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला, तेव्हा त्याच्या अंगठयाने पृथ्वी दबली जाऊन, एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या-उजव्या बाजूला हेलकावे खाते, तशी डगमगू लागली. ध्रुव आपली इंद्रियद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरीचे ध्यान करू लागला, तेव्हा त्याची समष्टिप्राणांशी अभिन्नता झाल्याने सर्व जीवांचा श्वासोच्छ्‌वास रोखला गेला. यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले. (७०-८०)

देव म्हणाले - भगवन, सर्व स्थावर-जंगम जीवांच्या शरीरातील प्राण एकदमच रोखला गेला आहे. असा अनुभव यापूर्वी आम्हांला कधी आला नव्हता. आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात. आपल्याला शरण आलेल्या आम्हांला या दुःखापासून सोडवा. (८१)

श्रीभगवान म्हणाले - देवांनो, तुम्ही भिऊ नका. ध्रुवाने आपले चित्त मज विश्वात्म्यात लीन केले आहे. यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हा सर्वांचा श्वास थांबला आहे. आता आपण आपापल्या लोकी जावे. त्या बालकाला मी या दुष्कर तपापासून परावृत्त करीन. (८२)

स्कंध चवथा - अध्याय आठवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP