श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २० वा

ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनक म्हणाले - सूतमहोदय, पृथ्वीचा आधार मिळाल्यावर स्वायंभुव मनूने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोण-कोणते उपाय अवलंबिले ? विदुर मोठा भगवद्‌भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुहृद होता. म्हणून तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता. तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र होता आणि महत्तेत कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता. तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्णभक्तांचा अनुयायी होता. तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण आणखीच शुद्ध झाले होते. त्याने कुशावर्तक्षेत्रात (हरिद्वार) राहणार्‍या तत्त्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेयांकडे जाऊन आणखी काय विचारले ? सूतमहोदय, त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील. ज्या त्यांच्या चरणांपासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणार्‍या आहेत. सूतमहोदय, आपले कल्याण असो. आपण आम्हांला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा. प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य असतेच. जो श्रीहरींच्या लीलामृताचे पान करून तृप्त होईल, असा कोणी रसिक असेल काय ? (१-६)

नैमिषारण्यात निवास करणार्‍या मुनींनी अशाप्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रवा सूतांनी भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले, ‘ऐका.’ (७)

सूत म्हणाले - आपल्या मायेने वराहरूप धारण करणार्‍या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्षाला मारून टाकणे, या लीला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रेयांना म्हणाला. (८)

विदुर म्हणाला- हे ब्रह्मन, आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात. म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवांनी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढविण्यासाठी काय केले ते सांगा. मरीची आदी मुनीश्वरांनी आणि स्वायंभुव मनूने सुद्धा ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली ? त्यांनी हे जग पत्‍नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली ? (९-११)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध, प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतूंनी, तसेच भगवंतांच्या सान्निध्याने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्तत्त्व उत्पन्न झाले. दैवाच्या प्रेरणेने रजःप्रधान महत्तत्त्वापासून सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. त्याने आकाशादी पाच पाच तत्त्वांचे अनेक वर्ग प्रगट केले. ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी भगवंतांच्या शक्तीने एकमेकांशी संगठित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंडयाची रचना केली. ते अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून रहिले. नंतर त्यात श्रीभगवंतांनी प्रवेश केला. त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून हजार सूर्यांच्या तेजासमान अत्यंत दैदीप्यमान असे एक कमळ प्रगट झाले. ते संपूर्ण जीवसमुदायांचे आश्रयस्थान होते. स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातूनच आविर्भाव झाला. (१२-१६)

जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणार्‍या श्रीनारायणदेवांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नाम-रूपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह, अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली. आपले हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. ज्याच्यामुळे तहान-भुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रिरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले. त्यावेळी तहान-भूक लागल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले, "याला ठेवू नका, खाऊन टाका," कारण ते तहान-भुकेने व्याकूळ झाले होते. घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "अरे यक्ष-राक्षसांनो ! तुम्ही माझे संतान आहात. म्हणून माझे भक्षण करू नका, माझे रक्षण करा," (त्यांपैकी "खाऊन टाका" असे जे म्हणाले, त्यांना राक्षस असे नाव पडले.) (१७-२१)

नंतर ब्रह्मदेवांनी सत्त्वगुणाच्या प्रभावाने दैदीप्यमान होऊन मुख्य मुख्य देवतांची निर्मिती केली. त्यांनी खेळता-खेळता, ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले. यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले. ते अत्यंत कामलोलुप असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. हे पाहून पहिल्यांदा त्यांना हसू आले. परंतु पुन्हा ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पळू लागले. तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणार्‍या, शरणागतवत्सल, वरदायक अशा श्रीहरींच्याकडे जाऊन ते म्हणाले. हे परमात्म्या, माझे रक्षण करा ! मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती, परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे. नाथ, आपणच एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत, त्यांना दुःख देणारेही एकमात्र आपणच आहात. (२२-२७)

भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत. ब्रह्मदेवाची व्याकूळ स्थिती पाहून ते म्हणाले, "तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर !" भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले. (शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे.) (२८)

ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराचे एका सुंदर स्त्रीत-संध्यादेवीत रूपांतर झाले. तिच्या चरणकमलातील नूपुर झंकारत होते. तिचे डोळे अत्यंत मादक होते आणि कमरपट्टयाने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होती. तिचे उत्तुंग स्तन अशाप्रकारे एकमेकांना चिकटले होते की, त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते. तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते. तसेच ती मधुर हास्य करीत, हावभाव करीत, असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहात होती. काळ्याभोर केसांच्या बटांनी सुशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदराआड लपवत होती. हे विदुरा, त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले. "अहो, हिचे किती विलक्षण रूप ! केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय ! पहा ना ! आम्हा कामातुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे !" (२९-३२)

अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी स्त्रीरूपिणी संध्यादेवीच्या विषयी निरनिराळे तर्क-वितर्क करून, नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले. "हे सुंदरी, तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस ? भामिनी, तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय ? तू तुझ्या या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हां अभाग्यांना का त्रास देत आहेस ? अबले, तू कोणी का असेनास ! आम्हांला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तू तर चेंडू खेळत खेळत आम्हा पहाणार्‍यांचे मन मोहित करीत आहेस. सुंदरी, जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तळहाताने थापटी मारतेस, तेव्हा तुझे चरणकमल एका जागी स्थिर राहात नाहीत. तुझी कंबर स्थूल स्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासते आणि तुझ्या निर्मल दृष्टीतूनसुद्धा थकावट डोकावते. "अग ! तुझा केशसंभार किती सुंदर आहे !" अशा प्रकारे स्त्रीरूपाने प्रगट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामासक्त बनविले आणि त्या मूर्खांनी तिला कोणी रमणीरत्‍न समजून तिचे ग्रहण केले. (३३-३७)

त्यानंतर ब्रह्मदेवांनी गंभीरपणाने हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या, अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला. त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केले. (३८-३९)

यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत-पिशाच्च उत्पन्न केले. त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीराला भूत-पिशाच्चांनी ग्रहण केले. हिला निद्रा असेही म्हणतात, जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते. जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला, तर भूत-पिशाच्चे त्याच्यावर आक्रमण करतात. त्यालाच उन्माद म्हणतात. (४०-४१)

नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्यरूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केले. पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले. हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आदिद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात. (४२-४३)

ब्रह्मदेवांनी आपल्या तिरोधानशक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतर्धाननामक अद्‌भुत शरीर दिले. एक वेळ ब्रह्मदेवांनी आपले प्रतिबिंब पाहिले. तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किंपुरुष उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब-शरीर ग्रहण केले. म्हणून ते सर्वजण उषःकाली आपल्या पत्‍नींसह ब्रह्मदेवांच्या गुण-कर्माचे गायन करतात.(४४-४६)

सृष्टीची वाढ होत नाही, असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हात-पाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधावशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला. त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले. तसेच त्यांच्या हात-पाय आखडून चालण्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले, ज्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते.(४७-४८)

एकदा ब्रह्मदेवांनी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला. त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली. हे सर्वजण प्रजेची वृद्धी करणारे आहेत. मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला. मनूंना पाहून त्यांच्याआधी उत्पन्न झालेले देव-गंधर्व आदी ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले. ते म्हणाले -"विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, आपली ही सृष्टी फारच सुंदर आहे. हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत. यांच्या साहाय्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू." (४९-५१)

नंतर आदिऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रियसंयमपूर्वक तप, विद्या, योग आणि समाधीने संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषिगणांची निर्मिती केली आणि त्यांपैकी प्रत्येकाला आपल्या समाधी, योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्यमय शरीराचा अंश दिला. (५२-५३)

स्कंध तिसरा - अध्याय विसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP