श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १५ वा

जय-विजय यांना सनकादिकांचा शाप -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - विदुरा, आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील, या शंकेने दितीने दुसर्‍यांच्या तेजाचा नाश करणारे, कश्यपांचे ते तेज (वीर्य) शंभर वर्षांपर्यंत आपल्या उदरात ठेवले. त्या गर्भस्थ तेजामुळेसुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला. तसेच इंद्रादी लोकपालही तेजोहीन झाले. तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की, सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे. (१-२)

देव म्हणाले - भगवन, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही. म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहात नाही. या अंधकाराविषयीही आपण जाणत असालच. आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत. देवाधिदेवा, आपण जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात. आपण लहान-मोठया सर्व जीवांचे भाव जाणत आहात. देवा, आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात. आपण मायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार केला आहे. आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही. आपणांस नमस्कार असो. आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे. हे कार्यकारणरूप विश्व आपले शरीर आहे; परंतु आपण याच्याही पलीकडे आहात. सर्व जीवांचे उत्पत्तिस्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात, ते आपल्या कृपाकटाक्षाने कृतकृत्य होतात. तसेच प्राण, इंद्रिये आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असतो, अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही. दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते, त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणांस नमस्कार असो. हे भूमन्, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झाले आहेत, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत. त्यामुळे ते दुःखी झाले आहेत. त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने पहा. देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते, त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चालला आहे. (३-१०)

मैत्रेय म्हणाले - महाबाहो, देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले. (११)

श्रीब्रह्मदेव म्हणाले - देवांनो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक लोकांबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत. एकदा ते शुद्ध-सत्त्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले. जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात, ते लोक विष्णुरूप हो‌ऊन तेथे राहातात. तेथे वेदांताने वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हां भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्त्वमय स्वरूप धारण करून राहातात. त्या लोकात निःश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणार्‍या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी सहाही ऋतूंच्या शोभेने संपन्न असते. (१२-१६)

तेथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूंच्या, लोकांचे पाप नाहीसे करणार्‍या पवित्र लीलांचे गायन करीत असतात. त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो; परंतु ते त्याच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणार्‍या वायूलाच दोष देतात. ज्या वेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोडया काळासाठी कबुतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो. श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भूषवितात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात, हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमळ, अर्ण, पुन्नाग, नागकेसर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजात ही फुले सुगंधी असूनसुद्धा तुळशीच्या तपाचीही प्रशंसा करतात. तो लोक वैडूर्य, मरकतमणी आणि सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे. केवळ श्रीहरींच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते. त्या विमानात बसलेल्या भगवद्‌भक्तांच्या चित्तात, मोठे नितंब असणार्‍या स्त्रियासुद्धा मंद हास्य आणि हावभावांनी कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत. (१७-२०)

जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगण सुद्धा प्रयत्‍नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भवनामध्ये राहाते. ज्या वेळी ती आपल्या चरणकमलातील नूपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीलाकमल फिरविते, त्या वेळी त्या सुवर्णमहालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की, ती, त्या भिंती जणू कमळाने साफ करीत आहे. जेव्हा ती दासींना आपल्याबरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसीदलाने भगवंतांचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोवळ्याचे घाट असलेल्या सरोवरात, आपले सुंदर केशपाश आणि उभार नासिकेने शोभणारे मुख पाहून याचे भगवंतांनी कौतुक केले होते, याची तिला आठवण होते. जे लोक भगवंतांच्या पाप हरण करणार्‍या लीलाकथांना सोडून बुद्धी नष्ट करणार्‍या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंद्य कथा ऐकतात, ते त्या वैकुंठलोकात जाऊ शकत नाहीत. अरेरे ! जेव्हा हे अभागी लोक अशा असार गोष्टी ऐकतात, तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या घोर नरकात टाकतात. अहो ! आम्ही देवसुद्धा या मनुष्ययोनीची इच्छा धरतो. कारण यातच तत्त्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते. अशी मनुष्ययोनी मिळूनही जे लोक भगवंतांची आराधना करीत नाहीत, ते वास्तविक त्यांच्या सर्वव्याप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात. देवाधिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून यमराज दूर राहातात, आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने सद्‌गद होऊन ज्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात, तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो, असे परम भागवतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठधामात जातात. जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरू श्रीहरींचे निवासस्थान, त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानांनी विभूषित, अशा त्या परम दिव्य आणि अद्‌भुत वैकुंठधामाला आपल्या योगमायाबलाने पोहोचले, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. (२१-२६)

भगवद्‌दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे सहा तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते सातव्या दरवाजाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेले, एकाच वयाचे दोन देव दृष्टीस पडले. ते बाजूबंद, कुंडले, किरीट इत्यादी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांच्या चार श्यामवर्ण भुजांभोवती भुंगे गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती. चढवलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहर्‍यावर काहीसा रागीट भाव दिसत होता. ते अशा रीतीने पाहात असूनसुद्धा, ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्ण आणि वज्रमय असे पहिले सहा दरवाजे ओलांडून ते आले होते, त्याचप्रमाणे याही दारातून आत गेले. समान दृष्टीने ते सगळीकडे पाहात होते, त्यामुळे निःशंक मनाने सगळीकडे ते जात होते. ते चारही कुमार पूर्ण तत्त्वज्ञानी होते. तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वांत ज्येष्ठ असूनही पाच वर्षाच्या बालकांसारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती. त्यांना अशा प्रकारे निःसंकोचपणे आत जाताना पाहून भगवंतांच्या ब्राह्मणांचा आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणार्‍या त्या द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडविले. वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते. वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालांनी त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडविले, तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाले. (२७-३१)

मुनी म्हणाले - अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंतांची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन येथे निवास करतात, ते तर भगवंतांच्या सारखेच समदर्शी असतात. तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून स्वभावात एवढी विषमता कशी ? भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणाशीही विरोध नाही. तर मग ज्याच्याविषयी संशय घ्यावा, असा येथे कोण असणार ? तुम्ही स्वतः संशयी आहात, म्हणून आपल्याप्रमाणे दुसर्‍यावर संशय घेत आहात. भगवंतांच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे म्हणून इथे राहाणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानीत नाहीत. उलट महाकाशात घटाकाश असावे त्याप्रमाणे भगवंतांत आपल्याला अनुस्यूत समजतात. तुम्ही देवरूपधारी आहात. मग तुम्हांला येथे असे काय दिसते की, ज्यामुळे तुम्ही भगवंतांच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणार्‍या भयाची कल्पना केलीत ? आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात, परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत. या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा. जेथे काम, क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे तीन शत्रू निवास करतात. (३२-३४)

सनकादिकांचे हे कठोर वचन ऐकून आणि ब्राह्मणांचा शाप कोणत्याही शस्त्रसमूहाने निवारण होत नाही, हे जाणून श्रीहरीच्या त्या दोन पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले. त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा ब्राह्मणांना अतिशय घाबरतात. हे त्यांना माहीत होते. नंतर ते म्हणाले, भगवन, आम्ही अपराधी आहोत. म्हणून आम्हांला जो दंड दिला आहे, तो आम्हांला मिळालाच पाहिजे. त्यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हांला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल. आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल, तर अशी कृपा करा की जेणे करून त्या अधमाधम योनीत जाऊनही आम्हांला भगवंतांची स्मृती नाहीशी करणारा मोह होऊ नये. (३५-३६)

इकडे साधुजनांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाभ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला, तेव्हा परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्रीलक्ष्मीसह ते तेथे आले. सनकादिकांनी पाहिले की, आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्रीवैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्र चामरे घेऊन पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र चवर्‍या ढाळल्या जात आहेत. चवर्‍यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्यांची झालर अशी हालत आहे की, जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. प्रभू सर्व सद्‌गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटत होते की, ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमय दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षःस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती, तिच्या शोभेने ते समस्त दिव्यलोकांचा चूडामणी असलेल्या वैकुंठधामाला सुशोभित करीत होते. त्यांच्या पीतांबरमंडित विशाल नितंबांवर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाला विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेला एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता, तर दुसर्‍या हाताने ते कमलपुष्प फिरवीत होते. त्यांचे सुंदर गाल विजेच्या प्रभेला लाजविणार्‍या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवीत होते. उत्तुंग नासिका असलेले, मोहक मुख होते. मस्तकावर रत्‍नजडित मुकुट होता. तसेच चारी हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. भगवंतांचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते. त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की, यांच्या समोर लक्ष्मीचा सौंदर्याभिमानही गळून पडला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, देवहो, अशाप्रकारे माझ्यासाठी, महादेवांसाठी आणि तुमच्यासाठी परम सुंदर रूप धारण करणार्‍या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लववून नमस्कार केला. ते त्यांचे अद्‌भुत रूप पाहाता पाहाता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. (३७-४२)

सनकादी मुनीश्वर नेहमी ब्रह्मानंदात निमग्न राहात असत. परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलांतील मकरंदात मिसळलेल्या तुलसी-मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला, त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांची मनेही विचलित झाली. भगवंतांचे मुख नीलकमलासारखे होते, अतिशय सुंदर ओठ आणि कुंदकळीसारखे मनोहर हास्य यांमुळे त्यांची शोभा आणखीच वाढली होती. ते पाहूनच ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणार्‍या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरींची स्तुती करू लागले. जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणार्‍या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारे अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढविणारे पुरुषरूप प्रगट करतात. (४३-४५)

सनकादी मुनी म्हणाले - हे अनंता, जरी आपण अंतर्यामीरूपाने अशुद्धचित्त असणार्‍या पुरुषांच्या हृदयामध्ये असता, तरीसुद्धा त्यांना कधीच दिसत नाहीत. प्रभो, ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने ब्रह्मदेवांनी आपले रहस्य वर्णन केले होते, त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता. परंतु प्रत्यक्ष दर्शनमात्र आम्हांला आजच झाले आहे. भगवन, आपल्याला आम्ही साक्षात परमात्मतत्त्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्त्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणार्‍या, आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहातात. हे प्रभो, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि सांसारिक दुःखांची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणांशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत, ते आपला आत्यंतिक प्रसाद जो मोक्ष, त्याचीही पर्वा करीत नाहीत; तर मग ज्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते, त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा ? भगवन, जर आमचे चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलांशीच रममाण होईल, आमची वाणी तुळसीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयशरूप अमृताने परिपूर्ण होतील, तर आमच्या पापांमुळे उत्पन्न आमचा जन्म नरकादी योनींत होऊ दे. त्याची आम्हांला चिंता नाही. हे विपुलकीर्ती प्रभो, आपण आमच्यासमोर हे जे मनोहर रूप प्रगट केले आहे, त्यामुळे आमच्या डोळ्य़ांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त अजितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यांसमोर प्रकट झालेले आहात. आम्ही आपणांस प्रणाम करीत आहोत. (४६-५०)

स्कंध तिसरा - अध्याय पंधरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP