श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १३ वा

वराह अवताराची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणाले - हे राजन, मैत्रेयांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून, भगवंतांच्या लीलाकथांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने विचारले. (१)

विदुर म्हणाला - मुनिवर, स्वयंभू ब्रह्मदेवाचा, प्रिय पुत्र महाराज स्वायंभुव मनू यांनी आपली प्रिय पत्‍नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले ? हे साधुशिरोमणी, आपण मला आदिराज राजर्षी स्वायंभुव मनूंचे पवित्र चरित्र सांगावे. ते श्रीविष्णूंचे भक्त होते. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे. विद्वानांचे असे श्रेष्ठ मत आहे की, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीमुकुंदांचे चरणारविंद विराजमान आहेत, त्या भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसांनी पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे. (२-४)

श्रीशुकाचार्य म्हणाले - राजन, सहस्रशीर्षा भगवान श्रीहरींचे चरणाश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंतांच्या कथा सांगण्याची विनंती केली, तेव्हा मुनिवर मैत्रेयांचे अंग रोमांचित झाले. ते म्हणाले. (५)

मैत्रेय म्हणाले - जेव्हा आपली पत्‍नी शतरूपेसह स्वायंभुव मनूंचा जन्म झाला, तेव्हा मोठया नम्रतेने हात जोडून ते श्रीब्रह्मदेवाला म्हणाले. भगवन, आपणच एकमेव सर्व जीवांचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात. तरीसुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल ? हे पूज्यपाद, आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हांला आज्ञा करावी, ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात (आम्हांला) सद्‌गती मिळेल. (६-८)

श्रीब्रह्मदेव म्हणाले - पुत्रा, पृथ्वीपते, तुम्हां उभयतांचे कल्याण असो ! मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. कारण तुम्ही सरळ भावाने ‘मला आज्ञा करा,’ असे म्हणून आत्मसमर्पण केले. हे वीरा, पुत्रांनी आपल्या पित्याची अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे. दुसर्‍याशी ईर्षा न करता जेवढे होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे आदरपूर्वक दक्षतेने पालन करणे, हेच योग्य आहे. तू या आपल्या भार्येपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरींची आराधना कर. राजन, प्रजापालन हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील. यज्ञमूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत, त्यांचे सर्व श्रम व्यर्थ होत, कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचाच अनादर करतात. (९-१३)

मनू म्हणाले - पापांचा नाश करणारे तात ! मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन; परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा. हे देवा, सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडालेली आहे. या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्‍न करा. (१४-१५)

मैत्रेय म्हणाले - पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडालेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की, हिला कशी (बाहेर) काढू ? ज्यावेळी मी सृष्टिरचना करीत होतो, त्यावेळी पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती. सृष्टिकार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे, यासाठी आम्हांला आता काय केले पाहिजे ? ज्यांच्या संकल्पाने माझा जन्म झाला आहे, त्या सर्वशक्तिमान श्रीहरींनीच आता मला प्रेरणा द्यावी. (१६-१७)

विदुरा, ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होते, तेवढयात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठयाएवढा एक वराह-शिशू बाहेर पडला. हे भारता, मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की, आकाशात असलेला तो वराह-शिशू ब्रह्मदेवांच्या देखतच मोठा हो‌ऊन क्षणात हत्तीएवढा झाला. त्या विशाल वराह-मूर्तीला पाहून मरीची आदी मुनिजन, सनकादिक आणि स्वायंभुव मनूसह ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले. अहो ! आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रगट झाला आहे ? केवढे आश्चर्य हे ! हा तर आताच माझ्या नाकातून निघाला होता. पहिल्यांदा तर हा अंगठयाच्या पेराएवढा दिसत होता. परंतु एका क्षणातच हा मोठया शिलेच्या आकाराचा झाला. हे यज्ञमूर्ती भगवानच निश्चितपणे आमच्या मनाला मोहित करीत असावेत. ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते, तेवढयात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार हो‌ऊन गर्जना करू लागले. सर्व शक्तिमान श्रीहरींनी आपल्या गर्जनांचा दिशांतून प्रतिध्वनी उमटवून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले. आपला खेद नाहीसा करणारी, मायामय वराह भगवानांची गर्जना ऐकून जनोलोक, तपोलोक, आणि सत्यलोकातील मुनिगण वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. भगवंतांच्या स्वरूपाचे वेदांमध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे. म्हणून त्या मुनीश्वरांनी जी स्तुति केली, ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्त्तीसारखी लीला करीत ते पाण्यात घुसले. त्या वराहरूपी भगवानांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठया वेगाने आकाशात उसळी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फारून खुरांच्या आघातांनी ढगांना विखरून टाकले. त्यांचे शरीर अत्यंत कठोर होते. त्वचेवर राठ केस होते. सफेत दाढा होत्या आणि डोळ्यांत तेज होते. असे ते शोभायमान दिसत होते. भगवान स्वतः यज्ञपुरुष आहेत. तथापि वराहरूप धारण केल्यामुळे आपल्या नाकांनी वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या. आपली स्तुती करणार्‍या मरीची आदी मुनींच्याकडे सौ‌म्य दृष्टीने पाहात त्यांनी पाण्यात प्रवेश केला. ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले, तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटच फाटले आणि त्यातून ढगांच्या गडगडाटासारखा भीषण आवाज झाला. त्यावेळी असे वाटले की, जणू काही आपले प्रदीर्घ तरंगरूप हात उंच करून तो मोठया आर्तस्वराने "हे यज्ञेश्वरा ! माझे रक्षण करा" अशी प्रार्थना करीत आहे. तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या तीक्ष्ण खुरांनी पाणी कापीत त्या अगाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोहोचले. तेथे रसातळात त्यांनी सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली. त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात सामावून घेतले होते. (१८-३०)

नंतर पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर घेऊन ते रसातळाच्या वर आले. त्यावेळी ते मोठे शोभिवंत दिसत होते. पाण्यातून बाहेर येतेवेळी त्यांना अडविणार्‍या महापराक्रमी हिरण्याक्षाने पाण्याच्या आतच त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले. त्यावेळी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्र झाला आणि त्यांनी त्याला लीलया असे मारले की, जसा सिंह हत्तीला मारतो. त्यावेळी त्याच्या रक्ताने त्यांचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की, एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे. विदुरा, ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातांवर कमल धारण करतो, त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांच्या टोकांवर पृथ्वी ठेवून आलेल्या तमालपत्राप्रमाणे नीलवर्ण वराहभगवानांना पाहून ब्रह्मदेव आदींनी त्यांना हे भगवंतच आहेत, असे ओळखून, हात जोडून ते वेदवाक्यांनी त्यांची स्तुती करू लागले. (३१-३३)

ऋषी म्हणाले - भगवन अजित, आपला जयजयकार असो. हे यज्ञपते, आपण आपले वेदत्रयीरूप शरीर थरथरवीत आहात. आपल्याला नमस्कार असो. आपल्या रोम-रोमात सर्व यज्ञ सामावले आहेत. पृथ्वीला वर आणण्यासाठी वराहरूप धारण करणार्‍या आपल्याला नमस्कार असो. हे देवा, आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. कारण हे यज्ञरूप आहे. याच्या त्वचेमध्ये गायत्री आदी छंद,रोमांत कुश, डोळ्यांमध्ये तूप, आणि चारी चरणांमध्ये होता, अध्वर्यू, उद्‌गाता, आणि ब्रह्मदेव या चारी ऋत्विजांचे कर्म आहे. हे देवा, आपल्या मुखाच्या अग्रभागी स्त्रुक् आहे. नासिकाछिद्रात स्त्रुवा, पोटामध्ये इडा (यज्ञीय भक्षणपात्र), कानांमधे चमस, मुखामध्ये प्राशित्र (ब्रह्मभागपात्र) आणि कंठछिद्रात ग्रह (सोमपात्र) आहे. भगवन ! आपले जे चर्वण आहे, तेच अग्निहोत्र होय. यज्ञस्वरूप अशा आपले वारंवार अवतार घेणे दीक्षणीय इष्टी आहे, मान उपसद (तीन इष्टी), दोन्ही दाढा प्रायणीय (दीक्षेनंतरची इष्टी) आणि उदयनीय (यज्ञसमाप्तीची इष्टी), जीभ प्रवर्ग्य (प्रत्येक उपसदाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नावाचे कर्म), मस्तक सभ्य (होमरहित अग्नी) आणि आवसथ्य (औपासनाग्नी) आहे. तसेच प्राण चित्ती (इष्टिकाचयन) आहे. देवा, आपले वीर्य सोम आहे. आसन (बसणे) प्रातः सवनादी तीन सवन, सात धातू अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम नावाच्या सात संस्था आहेत. तसेच शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ (सोमरहित याग) आणि क्रतू (सोमसहित याग) रूप आहात. यज्ञानुष्ठानरूप इष्टी आपल्या अंगांना एकत्रित ठेवणार्‍या मांसपेशी आहेत. सर्व मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ आणि कर्म आपलेच स्वरूप आहे. आपणांस नमस्कार असो. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो, ते आपलेच स्वरूप आहे. तसेच आपण सर्वांचे विद्यागुरू आहात. आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हे पृथ्वीला धारण करणार्‍या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर ठेवलेली, पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की, जसे पाण्यातून बाहेर आलेल्या हत्तीने दातांवर पत्रयुक्त कमळवेल ठेवली आहे. आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडलामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की, जसे शिखरांवर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभावेत. नाथ, चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्‍नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा. आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नी स्थापन करतात, त्याप्रमाणे आपण हिच्यात धारणशक्तिरूप आपले तेज स्थापित केले आहे. आम्ही आपणासह या पृथ्वीमातेला नमस्कार करीत आहोत. प्रभो, रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत होते ? ज्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आणि जे सर्व आश्चर्यांची खाण आहे, त्या आपल्याबाबतीत यात आश्चर्य ते काय ! हे देवा, आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थरथरवता, त्यावेळी आपल्या मानेवरील केसांतील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात. त्यामुळे जनोलोक, तपोलोक, आणि सत्यलोक यांत राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो. जे पुरुष आपल्या कर्मांचा ठावठिकाणा लावू पाहातात, ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत. कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही. आपल्याच योगमायेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले आहे. भगवन, आपण याचे कल्याण करा. (३४-४५)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, त्या ब्रह्मवादी मुनींनी अशाप्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणार्‍या वराह भगवानांनी आपल्या खुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विष्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. (४६-४७)

विदुरा, भगवंतांचे लीलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे. आणि त्यात रममाण झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पाप-ताप नाहीसे करते. जो त्यांची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा ऐकवितो, त्याच्यावर भक्तवत्सल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात. भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे ? म्हणून तुच्छ इच्छांची आवश्यकताच काय ? जे लोक त्यांचे अनन्यभावाने भजन करतात, त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदच प्रदान करतात. अहो ! या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा असा कोण आहे की, जो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडविणार्‍या भगवंतांच्या प्राचीन कथांपैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानांची ओंजळ करून एक वेळ जरी श्रवण करील, तरी त्याचे मन तेथून दूर जाईल ? (४८-५०)

स्कंध तिसरा - अध्याय तेरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP