|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १० वा
दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] विदुर म्हणाला - मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांपासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली ? भगवन, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत. कारण आपण सर्वज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. (१-२) सूत म्हणाले - शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. (३) मैत्रेय म्हणाले - अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त आपला आत्मा श्रीनारायण यांचे ठायी तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षांपर्यंत तप केले. ब्रह्मदेवांनी असे पाहिले की, प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे, अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की, पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन. भगवंतांनी सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भूः भुवः आणि स्वः असे तीन भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की, त्याचे चौदा किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. जीवांची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रांत वर्णन आले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत, त्यांना महर्लोक, तपोलोक जनोलोक आणि सत्यलोकरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. (४-९) विदुर म्हणाला - ब्रह्मन, आपण अद्भुतकर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या कालनामक शक्तीविषयी सांगितले होते, त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हांला सांगा. (१०) मैत्रेय म्हणाले - विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे. तो काल स्वतः निर्विशेष, अनादी आणि अनंत आहे. त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लीलेने सृष्टीच्या रूपांत प्रगट करतात. अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते. त्यालाच भगवंतांनी अव्यक्तमूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केले. हे जग आता जसे आहे, तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील. या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते. तसेच प्राकृत-वैकृत भेदाने एक दहावी सृष्टीही आहे. तसेच याचा प्रलय काल, द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकारांनी होतो. पहिली सृष्टी महत्तत्त्वाची, भगवंतांच्या प्रेरणेने सत्त्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची; जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्रवर्ग राहातो. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे; ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे. सहावी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह, आणि महामोह या पाच गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या सहा सृष्टी प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टी आहेत, त्यांचेही वर्णन ऐक. (११-१७) भगवंतांचे चिंतन करणार्यांचे दुःख दूर करणार्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणार्या भगवंतांची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, वीरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. आठवी सृष्टी पशु-पक्ष्यांची आहे. ही अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते. यांच्यात विचारशक्ती नसते.हे विदुरा, या पशुयोनींमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचे हरीण, मेंढा, आणि उंट हे दोन खुरांचे पशू होत. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरीण, चित्ता, आणि वनगाय हे एक खूर असलेले आहेत. आता पाच नखे असलेल्या पशूंची नावे ऐक. कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड मगर, इत्यादी होत. बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. विदुरा, नववी सृष्टी मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्ये रजोगुणप्रधान, कर्मपरायण, आणि दुःखरूप विषयांतच सुख मानणारी असतात. स्थावर, पशु-पक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी, तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग, या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महत्तत्त्वादिकरूप वैकारिक देवसर्ग आहे, त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनत्कुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे, तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. (१८-२६) देव, पितर, असुर, गंधर्व-अप्सरा, यक्ष-राक्षस, सिद्ध-चारण-विद्याधर, भूत-प्रेत-पिशाच्च, आणि किन्नर-किंपुरुष-अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगत्कर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वन्तर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टीरचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात.(२७-२९) स्कंध तिसरा - अध्याय दहावा समाप्त |