|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ८ वा
ब्रह्मदेवाची उत्पत्ती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणाले- विदुरा ! तू भगवद्भक्त लोकपाल यमराज आहेस. तू पुरुवंशात जन्म घेतल्याने तो वंश साधुपुरुषांनाही सेवनीय झाला आहे. तू पदोपदी श्रीहरींची कीर्तिरूप माळ नित्य ताजी टवटवीत ठेवीत आहेस. क्षुद्र विषयसुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढवून घेणार्या लोकांच्या दुःखनिवृत्तीसाठी आता मी श्रीमद्भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो. हे पुराण स्वतः श्री संकर्षण भगवानांनी सनकादी ऋषींना सांगितले होते. (१-२) अखंड ज्ञानसंपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताल लोकात होते. सनत्कुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून श्रेष्ठ अशा श्रीवासुदेवांचे तत्त्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला. ज्यांना ‘वासुदेव ’या नावाने संबोधतात, त्या आपले आश्रय असणार्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते. कमळाच्या कळीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनत्कुमारादींच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मीलित केले. (३-४) सनत्कुमार आदी ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणाचे आसन असलेल्या कमल पुष्पाला स्पर्श केला, ज्या कमलपुष्पांची नागराजकुमारी सुयोग्य वर मिळण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात. (५) सनत्कुमारादी ऋषी त्यांच्या लीलांचे जाणकार आहेत. त्यांनी वारंवार सद्गदित वाणीने त्यांच्या लीला गाइल्या, त्यावेळी शेषभगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरील किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नांची छटा चकचकीत किरणांनी झळकत होती. हे विदुरा, निवृत्तिपरायण सनत्कुमारांना भगवान संकर्षणांनी हे भागवत ऐकविले होते, हे प्रसिद्धच आहे. नंतर सनत्कुमारांनी हे परम व्रती सांख्यायन मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले होते. परमहंसांचे प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य, आमचे गुरू पराशरमुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले. यानंतर परम दयाळू पराशरांनी पुलस्त्य मुनींच्या सांगण्यावरून हे आदिपुराण मला सांगितले. वत्सा, श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे पुराण मी सांगतो. (६-९) सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते. त्यावेळी एकमात्र श्रीनारायण शेषशय्येवर पहुडले होते. त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोळे मिटून घेतले होते. सृष्टिकर्मांपासून विश्रांती घेऊन ते आत्मानंदातच मग्न होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता. ज्याप्रमाणे अग्नी आपली दाहक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून असतो, त्याचप्रमाणे श्रीभगवंतांनी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात शयन केले. निर्मितिकाल आल्यावर पुन्हा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे ठेवले. याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत चिच्छक्तीसह एक हजार युगचौकडयापर्यंत जलात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले. जेव्हा भगवंतांची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत असलेल्या लिंगशरीर इत्यादी सूक्ष्मतत्त्वांवर गेली, तेव्हा ते कालाला अनुसरणार्या रजोगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टिरचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभिप्रदेशातून बाहेर पडले. कर्मशक्तीला जागृत करणार्या कालामुळे श्रीनारायणाच्या नाभीतून प्रगट झालेल्या सूक्ष्मतत्त्वरूप कमलकोशाने, सूर्यासमान आपल्या तेजाने त्या अथांग जलराशीला दैदीप्यमान केले. सर्व गुणांना प्रकाशित करणार्या त्या सर्व लोक असलेल्या कमलामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामीरूपाने प्रविष्ट झाले. तेव्हा त्यातून न शिकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती श्रीब्रह्मदेव प्रगट झाले. म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात. त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत, तेव्हा डोळे फिरवून, आकाशात चारी दिशांना मान वळवून ते पाहू लागले, तेव्हा त्यांना चारी दिशांना चार तोंडे उत्पन्न झाली. त्यावेळी प्रलयकालीन वार्याच्या प्रचंड वेगाच्या मार्याने पाण्यावर उसळणार्या तरंगांमुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमलावर बसलेल्या आदिदेव ब्रह्मदेवांना स्वतःचे तसेच त्या लोकतत्त्वरूप कमळाचे काहीच रहस्य समजले नाही. (१०-१७) ते विचार करू लागले की, ‘या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे ? कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कमळ कोठून उत्पन्न झाले ? याच्या खाली निश्चित काही तरी वस्तू असली पाहिजे, ज्याच्या आधारावर हे कमळ आहे. (१८) असा विचार करून ते त्या कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात घुसले, परंतु देठाच्या मार्गाने शोधीत शोधीत नाभिप्रदेशाजवळ जाऊनही त्यांना कोणतीही वस्तू दिसली नाही. विदुरा, त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्तिस्थानाला शोधण्यात ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यतीत झाला. हा काळ म्हणजेच भगवंतांचे (काल) चक्र आहे, जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो. शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर बसून हळू हळू प्राणवायूवर विजय मिळवून, चित्तातील सर्व संकल्प काढून टाकून, समाधीत स्थिर झाले. अशा प्रकारे दिव्य शंभर वर्षे चांगल्या तर्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले, तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी असे पाहिले की, त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमलाच्या देठासारख्या गोर्या आणि विशाल शय्येवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडले आहेत. शेषनागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरल्या आहेत. त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडविली होती त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे. ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्नपर्वताच्या शोभेवर मात करीत आहेत. त्यांच्या कमरेचा पीतांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचे सौंदर्यही धूसर करीत आहे. मस्तकावरील सुशोभित सुवर्णमुकुट सुवर्ण शिखरांनाही मान खाली घालावयास लावीत आहे. त्यांच्या गळ्यातील वनमाला पर्वतावरील रत्ने, धबधबे, वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तेज करून टाकीत आहे आणि त्यांचे बाहू बांबूंचा आणि चरण वृक्षांचा तिरस्कार करीत आहेत. त्यांच्या शरीराच्या लांब-रूंद विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखे वाटते. ते आपल्या शोभेने, निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना, आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पीतांबर इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत. आपापल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणार्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणार्या चरणकमलांचे दर्शन देत आहेत. त्यांची सुंदर बोटे नखचंद्रिकांमुळे वेगवेगळी अशी स्पष्ट चमकत आहेत. सुंदर नासिका, रेखीव भुवया, कानातील झगमगणार्या कुंडलांची शोभा, यांनी लालसर ओठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुखकमल याने ते आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत. वत्सा, त्यांच्या कमरेवर कदंबफुलातील केसराप्रमाणे पीतांबर आणि सुवर्णमेखला शोभत आहेत. तसेच अमूल्य हार आणि सुंदर श्रीवत्सचिन्ह वक्षःस्थळावर शोभून दिसत आहे.ते अव्यक्त मूळ असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत. महामूल्य उत्तमोत्तम मण्यांनी सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणू त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्यांच्या खांद्यांना शेषनागाने लपेटले आहे. नागराज अनंताचे बंधू श्रीनारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत. ते संपूर्ण चराचराचे आश्रय आहेत. हजारो मुकुट ही त्या पर्वताची जणू सुवर्णमंडित शिखरेच आहेत. तसेच त्यांच्या वक्षःस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी जणू पर्वतातून प्रगट झालेले रत्नच आहे. प्रभूंच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप भ्रमर गुंजारव करीत असलेली कीर्तिमय वनमाला विराजत आहे. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी आदी देवताही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्रिभुवनात स्वैरपणे संचार करणार्या सुदर्शन चक्रासारखी आयुधे प्रभूंच्या आजूबाजूलाच फिरतात, त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे. (१९-३१) तेव्हा विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भगवंतांच्या नाभिसरोवरातून प्रगट झालेल्या कमल, जल, आकाश, वायू आणि आपले शरीर ह्याच केवळ पाच वस्तू पाहिल्या. याशिवाय त्यांना दुसरे काहीही दिसले नाही. रजोगुणाने व्याप्त झालेले ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते. त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणार्या या पाचच वस्तू पाहिल्या, तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्या कारणाने त्यांनी अचिंत्यगती श्रीहरींमध्ये आपले चित्त एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभूची ते स्तुती करू लागले. (३२-३३) स्कंध तिसरा - अध्याय आठवा समाप्त |