श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३ रा

भगवंतांच्या अन्य लीला-चरित्रांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

उद्धव म्हणतो - त्यानंतर आपल्या माता-पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंच सिंहासनावरून खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले. सांदीपनी मुनींनी एकदाच शिकविलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला. भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित हो‌ऊन किंवा रुक्मीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते, त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्वविधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे, गरुडाने अमृतकलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले. स्वयंवरात, वेसण नसलेल्या सात बैलांना वेसण घालून, नाग्नजिती(सत्यभामा) हिच्याशी विवाह केला. याप्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळविण्याचे ठरविले, तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारले. भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत, आपली प्रिय पत्‍नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष(पारिजात) उपटून आणला. त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकांसहित भगवंतांवर चाल करून आला. कारण तो तर आपल्या पत्‍नीच्या हातचे खेळणे होता. आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणार्‍या आपल्या पुत्राला-भौ‌मासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी भौ‌‍मासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्याच्या अंतःपुरात प्रवेश केला. त्या अंतःपुरात भौ‌मासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या. दीनबंधू श्रीकृष्णांना पाहाताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष, लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले. (१-७)

तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालांत एकाच मुहूर्तावर विधिपूर्वक पाणिग्रहण केले. स्वतःच अनेक रूपांनी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्या सारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला. जेव्हा कालयवन, जरासंध आणि शाल्व आदी राजांनी आपल्या सेनांच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले, तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारविले होते. शंबर, द्विविद, बाणासुर, मुर, बल्वल, दंतवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः, तर काहींना दुसर्‍यांच्या करवी मारविले. यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजांचाही संहार केला. त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोहोचली, तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती. कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्हीही नष्ट झाले होते, तसेच भीमसेनाच्या गदेने ज्याची मांडी तुटली होती, त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्‍यांसह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही. ते असा विचार करू लागले की, जरी द्रोण, भीष्म, अर्जुन आणि भीमसेन यांच्या द्वारा या विपुल अशा अठरा अक्षौहिणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल ? अजूनहि माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुःख तर तसेच आहे ! जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील, त्यामुळेच यांचा नाश होईल. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. खरे पाहाता, माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील. (८-१५)

असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसविले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले. अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पुरुवंशाचे बीज स्थापित केले होते, ते सुद्धा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते; परंतु भगवंतांनी ते वाचविले. त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठिरसुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या साहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला. विश्वात्मा श्रीभगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले; परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत. मधुर हास्य, स्नेहपूर्ण दृष्टी, अमृतासारखी वाणी, निर्मल चारित्र्य, आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक-परलोक तसेच यादवांना आनंदित केले. रात्रीच्या वेळी पत्‍नींसह क्षणभर प्रेममय हो‌ऊन त्यांनाही सुख दिले. अशा प्रकारे अनेक वर्षे सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थाश्रमासंबंधी उपभोगसामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले. विषयोपभोग आणि जीवसुद्धा दैवाधीन आहेत. जर योगेश्वर श्रीकृष्णांनासुद्धा त्याबाबत वैराग्य निर्माण झाले, तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयांवर विश्वास कसा ठेवील ? (१६-२३)

एकदा द्वारकेत खेळत असता यदुवंशी आणि भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडविले. भगवंतांना यदुकुलाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला. काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेले वृष्णी, भोज आणि अंधक वंशातील यादव मोठया आनंदाने रथात बसून प्रभासक्षेत्री गेले. त्यांनी तेथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर, देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान दिल्या. त्यांनी सोने, चांदी, बिछाने, वस्त्रे, मृगचर्म, कांबळी, वाहने, रथ, हत्ती, कन्या, उपजीविका होऊ शकेल अशी शेतजमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले. त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणार्‍या त्या वीरांनी जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला. (२४-२८)

स्कंध तिसरा - अध्याय तिसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP