|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १ ला
उद्धव आणि विदुर यांची भेट - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणाले - जी गोष्ट तू विचारलीस तीच, सुखसमृद्धियुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रेयांना विचारली होती. जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरला गेले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते. (१-२) राजा परीक्षिताने विचारले - प्रभो, भगवान मैत्रेयांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला, ते आपण आम्हांला सांगावे. पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रेयांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल. कारण मैत्रेयांसारख्या साधुशिरोमणींनीही त्याचा आदर केला होता. (३-४) सूत म्हणाले - राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होउन म्हटले, ते ऐका. (५) श्रीशुकाचार्य म्हणाले - ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्ट पुत्रांचे पालन-पोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली. तसेच ज्या वेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराणी द्रौपदी हिचे केस भर सभेत दुःशासनाने ओढले, त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहात होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षःस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले, तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही. अन्यायाने द्यूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितले, परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही. महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृतासमान वाटणारे भाषण केले. त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही. कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना ! नंतर सल्लामसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले, तेव्हा सर्व मंत्र्यांत श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला, त्या सल्ल्याला नीतिशास्त्र जाणणारे लोक विदुरनीती म्हणतात. (६-१०) विदुर म्हणाला - महाराज, आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधहि ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोटया भावांसह मोठया क्रोधाने फूत्कार टाकीत आहे. पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे. ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत. पृथ्वीवरील मोठमोठया राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत. ज्याचे आपण पुत्र मानून पालन-पोषण करीत आहात, त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे. हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे. म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात. आपल्या कुळाचे कल्याण व्हावे, असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा. (११-१३) साधुजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत, त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण, दुःशासन आणि शकुनीसहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला, "अरे या कपटी दासीपुत्राला येथे कोणी बोलावले ? ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे, त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षाची बाजू घेत आहे ! याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या." बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावादेखत ऐकून, ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंतांच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला. कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवच्चरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करु लागला. जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत, जी जी भगवंतांच्या मूर्तींनी सुशोभित अशी तीर्थस्थाने, नगरे, पवित्र वने, पर्वत, लताकुंज, निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या, सरोवरे इत्यादी होते, त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता. ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाहीत, अशा अवधूत वेषामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता. तो शरीराला सुशोभित करीत नसे. पवित्र आणि साधे भोजन करी. शुद्धवृत्तीने जीवन-निर्वाह चालवी. प्रत्येक तीर्थात स्नान करी. जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणार्या व्रतांचे पालन करीत असे. (१४-१९) अशा प्रकारे भारत वर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने, महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करु लागले होते. तेथे त्याने आपल्या कौरव-बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले, जे आपापसांतील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते; जसे बांबूंचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते. हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला. तेथे त्याने त्रित, उशना, मनू, पृथू, अग्नी, असित, वायू, सुदास, गौ, गुह आणि श्राद्धदेवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थांत स्नान करुन संबंधितांना तिलांजली दिली. याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की, ज्या मंदिरांच्या शिखरांवर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते, अशा मंदिरांचे दर्शन घेतले. तेथून निघून तो धन-धान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र, सौवीर, मत्स्य, कुरुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुनातटावर पोहोचला. तेव्हा तेथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले. तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता. तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता. विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले. (२०-२५) विदुराने विचारले - पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी, आपल्याच नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून, या जगात अवतार घेतला, ते पृथ्वीचा भार उतरविल्यावर सर्वांना आनंद देत आता श्रीवसुदेवांच्या घरी सुखाने रहात आहेत ना ? प्रिय उद्धवा, आम्हां कुरुवंशीयांचे परम सुहृद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतींसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव खुशाल आहेत ना ? हे उद्धवा, जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करुन भगवंतांकडून प्राप्त करुन घेतले, तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना ? सात्वत, वृष्णी, भोज आणि दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना ? त्यांनी राज्य मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती; परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले. हे उद्धवा, आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्णपुत्र सांब खुशाल आहे ना ? हे पार्वतीपुत्र कार्तिकस्वामी होते. अनेक व्रते करुन जांबवतीने यांना जन्म दिला होता. अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरुप आहे ना ? योग्यांनाही दुर्लभ अशी भगवद्गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली. भगवंतांना शरण गेलेला निर्मल अंतःकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना ? तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता. देवमाता अदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना ? जसे तिन्ही वेद यज्ञविस्ताररूप अर्थाला आपल्या मंत्रांमध्ये धारण करतात, त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरुप आहेत ना ? त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त, अहंकार, बुद्धी व मन या अंतःकरणचतुष्टयाच्या चौथ्या तत्वाचा-मनाचा अधिष्ठाता समजले जाते. हे उद्धवा ! आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदीक, सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद इत्यादी सर्वजण सुखरुप आहेत ना ? (२६-३५) अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्ममर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना ? मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता. अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घ काल टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही ? जेव्हा तो गदायुद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे, त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करु शकत नसे. ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेष घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते, तो सेनापतींचे यश वाढविणारा गांडीवधनुष्य़धारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना ? आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिर आदी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालनपालन केले, ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना ? ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते, त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते. अहो ! श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली. ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकटयानेच चारी दिशा जिंकल्या होत्या. हे उद्धवा, ज्याने पांडवांच्या रुपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिले, तो धृतराष्ट्र अधःपतनाकडे जात आहे, हे पाहून मला फार वाईट वाटते. परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही. जगद्विधाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करुन लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात. मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहात इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे. जरी कौरवांनी अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन, विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवीत होते, त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करु इच्छित होते. उद्धवा, भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्म-कर्मे होतात. नाही तर दुसरा अन्य कोण आहे की, जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छील ? म्हणून मित्रा, ज्यांनी अजन्मा असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतला आहे, त्या पवित्रकीर्ती श्रीहरींच्या कथा मला ऐकव. (३६-४५) स्कंध तिसरा - अध्याय पहिला समाप्त |