श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १ ला

शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थांतील त्याच्या अस्तित्वावरून (अन्वय) तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते, तर या सर्वांहून तो वेगळा (व्यतिरेक) असल्यामुळे तोच निमित्तकारण आहे, याचा निश्चय होतो. (कारण) तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद, सृष्टिनिर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्त्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली, असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. (तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय.) जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच (रूप मोती) किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठानसत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्मसत्तेमुळे विश्व सत्य वाटते. (या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्त्व-रज-तम हे तीन गुण किंवा पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल.) असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनांतील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवाद्वितीय परम सत्य परमात्म्याचे (माया निरासाठी) आम्ही ध्यान करतो. (१)

महामुनिव्यास-निर्मित या श्रीमद्‌भागवतमहापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणार्‍या सत्पुरुषांनी जाणण्यायोग्य मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे, ते आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात, तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे ?(२)

भक्तिरस जाणणारे भक्तजनहो, हे श्रीमद्‌भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्रीशुकदेवरूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तो पर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवतरसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा. (३)

कथेचा प्रारंभ

भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत्‌ प्राप्तीच्या इच्छेने एक हजार वर्षापर्यंत चालणार्‍या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एक दिवस या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमादिक नित्यकर्मे आटोपून सूतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. (४-५)

ऋषी म्हणाले - सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तर्‍हेने निरूपणही केले आहे. वेद जाणणार्‍यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण (व्यास) आणि भगवंतांच्या सगुण-निर्गुण स्वरूपाला जाणणार्‍या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे, ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की, त्यांतून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय इतर अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. अनेक कर्मांचे वर्णन असलेली, जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हां श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल. (६-११)

सूतमहोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव-देवकीपासून कशासाठी जन्म घेतला, ते आपण जाणताच. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपाकरून त्याचे वर्णन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. हा जीव जन्म-मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला, तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भिते. भगवंतांना शरण गेल्यामुळे परम शांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात, त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे, असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ? ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केले आहे. आम्हां श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. (१२-१७)

अहो बुद्धिमान सूत, सर्वसमर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरींच्या मंगलमय अवतारकथांचे आता वर्णन करा. रसज्ञ श्रोत्यांना पावलापावलागणिक भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्यरूपाने बलरामासहित असे काही पराक्रमही केले की, जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. कलियुग आले आहे, असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाल चालणार्‍या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हांला पुष्कळ वेळ आहे. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणार्‍याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करण्यार्‍या आम्हांला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे. धर्मरक्षक, ब्राह्मणभक्त, असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला, हे आपण सांगावे. (१८-२३)

अध्याय पहिला समाप्त

GO TOP