श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २० वा - अन्वयार्थ

ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग -

अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा श्रीकृष्ण - ईश्वरस्य ते - तू जो ईश्वर, सर्व जगताचा प्रभु त्या तुझे - विधिः च प्रतिषेधः च निगमः - विधि व निषेध वेदच सांगतो - कर्मणां गुणदोषं च अवेक्षते हि - कर्माच्या गुणदोषांचा विचार तुझेच वेद सांगतात ना ? ॥१॥

प्रतिलोमानुलोमंज वर्णाश्रमविकल्पं च - कनिष्ठ वर्णाचा वर वरिष्ठ वर्णाच्या वधूने केल्यास प्रतिलोम विवाह होतो आणि श्रेष्ठ वर्णातील वराने कनिष्ठवर्णी वधूशी विवाह केल्यास तो अनुलोम ठरतो - द्रव्यदेशवयः कालान् - त्याचप्रमाणे विषय, देश, वय व काल यांतील गुणदोष हा स्वतः वेदोराशीच सांगत असतो - स्वर्गं, नरकं एव च - स्वर्गफल व नरकफल ही गुणदोषात्मक फले तुझ्या वेदानेच निर्माण केली आहेत. ॥२॥

गुणदोषभिदादृष्टिं अंतरेण - गुणावह कोणते, दोषात्मक कोणते, यांची भिदा-दृष्टि अंतरेण म्हणजे तारतम्यदृष्टि - तारतम्यज्ञान असल्यावाचून - निषेधविधिलक्षणं तव नृणां निःश्रेयसं वचः - निषेध व विधि, हेच लक्षण ज्या तुझ्या जीवांस सांगणार्‍या मोक्षरूपी वचनाचे ते - कथं - कसे सिद्ध होणार ? ॥३॥

अनुपलब्धे अर्थे - प्रत्यक्षादि प्रमाणास अगोचर असणार्‍या अदृष्ट फलासंबंधी - साध्यसाधनयोः अपि - तसेच साध्य काय व साधने कोणती यासंबंधी - पितृदेवमनुष्याणां - पितर, देव व मनुष्यांस - ईश्वर - हे जगच्चालका प्रभो - चक्षुस्तु तववेदः तुझे आज्ञारूप वचन म्हणजे वेदच नेत्र - श्रेयः (च) - व अत्यंत कल्याणकारक आहे. ॥४॥

हि ते निगमात् - कारण, तू उत्पन्न किंवा प्रकट केलेल्या वेदामुळे मात्र - न स्वतः - जीवांच्या स्वबुद्‌ध्‌यनुसार नव्हे - गुणदोषभिदादृष्टिः - अमुक गुणावह, तमुक दोषास्पद असे ज्ञान असते - निगमेन अपवादः च - अपवाद म्हणजे नाश कसा होईल - भिदाया इति ह - हा जो गुणदोषभेद आहे तो सत् की असत् असा - भ्रमः - मला भ्रम आहे. ॥५॥

श्रेयोविधित्सया - कल्याण व्हावे या हेतूने - मया त्रयः योगाः नृणां प्रोक्ताः - मी तीन योग जीवांस सांगितले आहेत - ज्ञानं, कर्म च, भक्तिः च - ज्ञान, कर्म व भक्ति हे ते तीन योग होत - कुत्रचित् अन्यः उपायः न अस्ति - मोक्षाला याशिवाय चवथा उपाय नाहीच आहे. ॥६॥

इह - यांमध्ये - कर्मसु निर्विण्णानां न्यासिनां - कर्म व तत्फल यांसंबंधाने विरक्त होऊन कर्मन्यास म्हणजे कर्मत्याग करणार्‍या ज्ञानी पुरुषांस - ज्ञानयोगः - ज्ञानयोग सांगितला - तु तेषु अनिर्विण्णचित्तांना कामिनां - पण, कर्मामध्येच अनासक्त नसणारे म्हणजे आसक्त असणार्‍या काम्यांसाठी - कर्मयोगः - कर्मयोग सांगितला. ॥७॥

तु - परंतु - यः पुमान् - ज्या पुरुषाला - यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धः - यदृच्छेनेच माझ्या कथांच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली - न निर्विण्णः न अतिसक्तः - जो विरक्तही नाही व फारसा आसक्तही नाही - अस्य - त्यांच्यासाठी - सिद्धिदः भक्तियोगः - सिद्धिप्रद भक्तियोग सांगितला. ॥८॥

यावता न निर्विद्येत - जोपावेतो पूर्ण वैराग्य प्राप्त झाले नाही - वा - अथवा - यावत् मत्कथाश्रवणादौ श्रद्धा न जायते - माझ्या गुणांच्या अनुवादादिमध्ये जोपावेतो श्रद्धा उत्पन्न होत नाही - तावत् - तोपर्यंत - कर्मांणि कुर्वीत - वेदविहित कर्मे केलीच पाहिजेत. ॥९॥

उद्धव - उद्धवा - अनाशीःकामः - फलकामना नसणारा - स्वधर्मस्थः - वर्णाश्रमांतील स्वकर्तव्ये करणारा - यज्ञैः यजन् - वेदविहित यज्ञांचे यजन करीत असेल तर - यदि अन्यत् न समाचरेत् - जर त्याने विहितांचे उल्लंघन व अविहितांचा स्वीकार केला नसेल - स्वर्गनरकौ न याति - स्वर्गालाही जात नाही किंवा नरकातही पडत नाही. ॥१०॥

अस्मिन् लोके वर्तमानः - ह्या भूमिलोकातच राहून - स्वधर्मस्थः - वर्णाश्रमविहित आचरण करणारा - अनघः शुचिः - निष्पाप आणि शुद्ध असेल तर - विशुद्धं ज्ञानं आप्नोति - निर्मल ज्ञान प्राप्त करून घेतो - वा - किंवा - यदृच्छया मद्‌भक्तिं (आप्नोति) - केव्हा केव्हा ईशेच्छेने माझी भक्ति करून मद्‌भक्त होतो. ॥११॥

स्वर्गिणः अपि - स्वर्गवासी सुद्धा - तथा निरयिणः - तसेच इतर म्हणजे उदाहरणार्थ नरकवासी दैत्यादि - एतं लोकं - ह्या मृत्युलोकाची - इच्छंति - इच्छा करतात - ज्ञानभक्तिभ्यां साधकं - हा भूलोक ज्ञानाच्या व भक्तिच्या द्वारा मोक्षाचा साधक आहे - उभयं - स्वर्गलोक व नरकलोक हे दोन्ही - तदसाधकं - ते मोक्षपद मिळवून देण्याला सर्वथा असमर्थ आहेत. ॥१२॥

विचक्षणः नरः - विवेकी पुरुषाने - न स्वर्गतिं नारकीं वा कांक्षेत् - स्वर्गाची अथवा नरकाची इच्छा करूच नये - न इमं लोकं च कांक्षेत् - या भूलोकी पुनः येण्याचीही इच्छा धरू नये - देहावेशात् प्रमाद्यति - देहाच्या अभिमानामुळे विषयांशी आसक्त होऊन प्रमाद करण्याचा संभव आहे. ॥१३॥

एतत् विद्वान् सः - हे सर्व विवेकपूर्वक जाणणारा जो त्याने - मृत्योः पुरा - मृत्यु येण्याच्या पूर्वीच - अभवाय घटेत - पुनः जन्म येणारच नाही असा प्रयत्न करावा - इदं मर्त्यं अपि अर्थसिद्धिदं - हा भूलोकी असलेला नरदेह मर्त्य आहे, तरी मोक्षाची सिद्धि करून देणारा आहे - ज्ञात्वा - असे निश्चितपणे जाणून - अप्रमत्तः - सदैव सावधपणे मोक्षोपकारक शील ठेवावे. ॥१४॥

कृतनीडं वनस्पतिं - आपले घरटे ज्यावर बांधले आहे, असा जो वृक्ष तो - एतैः यमैः छिद्यमानं - ह्या प्रत्यक्ष दिसणार्‍या यमतुल्य पुरुषांकडून तोडला जात आहे - अलंपटः खगः - आसक्त न झालेला खग म्हणजे पक्षी - स्वकेतः उत्सृज्य - घरटयाला आश्रय देणारा वृक्ष टाकून देतो - क्षेमं याति हि - सुरक्षित स्थानी जातो. ॥१५॥

अहोरात्रैः छिद्यमानं आयुः - प्रत्येक दिवस आणि रात्र ही आपले आयुष्य एकसारखे तोडीत आहेत असे - बुद्‌ध्वा - जाणून - भयवेपथुः - मृत्युभयाने थरथर कापणार्‍या पुरुषाने वेळीच सावध होऊन - मुक्तसंग - अनासक्त, निःसंग होऊन - परं बुद्‌ध्वा - परमात्मास्वरूप जाणून - निरीहः - निरिच्छ व निष्कर्मा होऊन - उपशाम्यति - निर्भय विरक्तिसुखाचा आस्वाद घेणारा व्हावे. ॥१६॥

आद्यं - सर्व देहांत श्रेष्ठ - सुलभं - ईश्वरेच्छेने मात्र लाभलेला - सुदुर्लभं - स्वप्रयत्नाने मिळण्यास अति कठीण असणारा - सुकल्पं - मोक्षोपयोगी सर्व उपकरणांनी सज्ज असलेला - गुरुकर्णधारं - हितकर्ता गुरु हा ज्याचा नावाडी आहे असा - अनुकूलेन मया नभस्वता ईरितं - सदा अनुकूल असणारा जो मी परमेश्वर, त्या उपकारक वायुरूपी परमेश्वराने चालविलेला - प्लवं नृदेहं (प्राप्य) - नौकारूप मानवी देह प्राप्त झाला असताही - (यः) पुमान् - जो पुरुष - भवाब्धिं न तरेत् - संसारसागर तरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत नाही - सः आत्महा - तो खरोखर आत्मघाती होय. ॥१७॥

यदा - जेव्हा - आरंभेषु निर्विण्णः - कर्मांसंबंधाने वीट येऊन - विरक्तः - वैराग्य पावतो - संयतेंद्रियः - आपली सर्व ज्ञानकर्मेंद्रिये निग्रहून - आत्मनः योगी - आत्मयोग करणारा जो पुरुष त्याने - अभ्यासेन - दृढ अभ्यास करून - मनः अचलं धारयेत् - मनाला निश्चल करून ठेवावे. ॥१८॥

धार्यमाणं मनः - अशा रीतीने निश्चल झालेले मन - यर्हि - जेव्हा - आशु भ्राम्यत् - लवकरच भ्रमण करू लागते - अनवस्थितं - स्थानापासून भ्रष्ट होते - अनुरोधेन मार्गेण - मनाला प्रिय असणार्‍या मार्गानेच - अतंद्रितः - निरलसपणे व काळजीपूर्वक - आत्मवशं नयेत् - आपल्या आत्म्याच्या स्वाधीन होईल असे करावे. ॥१९॥

मनोगतिं न विसृजेत् - मनाची गति लक्षपूर्वक अवलोकावी - जितप्राणः - प्राणायामाने प्राणावर प्रभुत्व स्थापावे - जितेंद्रियः - इंद्रिये स्वाधीन करून घ्यावी - सत्त्वसंपन्नया बुद्‍ध्या - सत्त्वगुणांच्या संपत्तीने सुसंस्कृत झालेल्या बुद्धिसाह्याने - मनः - मन - आत्मवशं नयेत् - आपल्या ताब्यात ठेवावे. ॥२०॥

एषः मनसः संग्रहः - मनाला रुचिकर असणार्‍या मार्गाने त्याला वश करणे हाच - परमः योगः वै स्मृतः - मोक्षोपकारक योग उत्तमोत्तम आहे, असे म्हणतात - हृदयज्ञत्वं अन्विच्छन् - हा योग हृदयाचा म्हणजे मनाचा स्वभाव जाणून त्याच्या कलानेच आत्मप्राप्ति करून देतो - मुहुः दम्यस्य अर्वतः इव - अवखळ घोडयाला ताब्यात आणण्यासाठी घोडयाच्या खोडया जाणणारा चाबुकस्वार त्याच्या कलाने वागून त्याला ताब्यात आणतो-तसे. ॥२१॥

सांख्येन - सांख्यप्रणीत तत्त्वविवेकाने - सर्वभावानां प्रतिलोमानुलोमतः - प्रतिलोममार्गे म्हणजे देहाचा पंचभूतांत, त्यांचा क्रमशः तन्मात्रांत, त्यांचा अहंकारमहदादिकांत लय म्हणजे मूळ प्रकृतीत प्रविष्ट होण्याच्या मार्गाने आणि अनुलोममार्गे म्हणजे प्रकृति-महत्-अहंकार, तन्मात्र पंचमहाभूते यांस जन्म देणार्‍या मार्गाने - भवाप्ययौ - जन्म व मरण या अवस्थांचे - यावत् मनः प्रसीदति - मन शांत व प्रसन्न होईपर्यंत - अनुध्यायेत् - वारंवार चिंतन करावे. ॥२२॥

निर्विण्णस्य - विषयांचा वीट आलेल्या - विरक्तस्य - विरक्त झालेल्या - उक्तवेदिनः - गुरुच्या उपदेशानुरूप चालण्याचा निर्धार झालेल्या - पुरुषस्य - पुरुषाचे - मनः - मन - चिंतितस्य अनुचिंतया - चिंतित आत्मविषयाचेच वारंवार, अखंड चिंतन करिते म्हणून - दौरात्म्यं - देहादिकांचा अभिमान - त्यजति - टाकून देते. ॥२३॥

यमादिभिः योगपथैः - यमनियमप्रभृति आहेत ज्यांमध्ये अशा योगमार्गांनी - आन्वीक्षिक्या च विद्यया - तत्त्वशोधन करणार्‍य़ा विद्येनेही - वा - अथवा - मम अर्चोपासनाभिः - माझे पूजन, भजन, सेवा या साधनांनीच - मनः - मन - योग्यं स्मरेत् - योग्य अशा परमात्म्याचेच स्मरण करीत राहील, किंवा मनाला परमात्मस्मरण करण्यास लावावे - न अन्यैः - योग, आन्वीक्षिकी अथवा भक्ति या व्यतिरिक्त अन्य उपाय मनाला ईशस्मरणासाठी करू देऊ नयेत. ॥२४॥

यदि प्रमादेन - जर कदाचित प्रमत्त होऊन - योगी - ज्ञानी पुरुष - विगर्हितं कर्म कुर्यात् - निंद्य कर्म करील - अंहः - पापकर्म - योगेन एव दहेत् - ज्ञानयोगानेच योग्याने जाळावे - तत्र - तेथे - कदाचन - केव्हाही - अन्यत् न - अन्य उपाय करू नये. ॥२५॥

स्वे स्वे अधिकारे या निष्ठा - स्वतःच्या वर्णाचे व आश्रमाचे कर्तव्यांच्या ठिकाणी जी दृढ निष्ठा असते - सः गुणः परिकीर्तितः - तो उत्तमोत्तम गुणच होय, असे ज्ञाते म्हणतात - कर्मणां जात्यशुद्धानां - कर्म म्हटले की ते जन्मतःच अशुद्ध, पापात्मक असते - संगानां त्याजनेच्छया - कर्मासक्तीचा व कामासक्तीचा जीवांनी त्याग करावा, असे शास्त्राचे मनोगत असल्यामुळे - अनेन गुणदोषविधानेन नियमः कृतः - शास्त्राने, शास्त्रांतील गुणांच्या व दोषांच्या विधानांनी प्रवृत्तीला नियमित केले आहे. ॥२६॥

मत्कथासु जातश्रद्धः - माझ्या चरित्रावर ज्याची श्रद्धा बसू लागल्यामुळे - सर्वकर्मसु निर्विण्णः - सर्व कर्मांचा त्याला वीट येऊ लागतो - दुःखात्मकान् कामान् वेद - यच्चावत् सर्व कामना दुःखात्मक आहेत असे कळले तरी - परित्यागे अपि अनीश्वरः - कामना नष्ट करण्याच्या कामी तो असमर्थच असतो. ॥२७॥

श्रद्धालुः दृढनिश्चयः - माझ्यावर श्रद्धा ठेवली असता सर्व मनोरथ पूर्ण होतील असा पक्का निश्चय झाला म्हणजे - ततः - नंतर - मां प्रीतः भजेत - माझ्यावरच प्रेम ठेऊन माझी भक्ति करावी - च - आणि - तान् कामान् जुषमाणः - ते इष्ट विषय सेवीत असतानाच - दुःखोदर्कान् च गर्हयन् - विषय दुःखात्मकच होत अशी त्या विषयांची निर्भत्सना करावी. ॥२८॥

प्रोक्तेन भक्तियोगेन - मागे जो भक्तियोग सांगितला आहे त्याचा स्वीकार करून - असकृत् मा भजतः मुनेः - अखंडपणे माझे भजन चिंतन करणार्‍या मुनींचे - सर्वे हृदय्याः कामाः नश्यंति - अंतःकरणात राहणारे सर्व काम नष्ट होतात - मयि हृदि स्थिते - मी परमेश्वर त्याच्या अंतःकरणात वास्तव्य करीत असतो. ॥२९॥

मयि अखिलात्मनि दृष्टे - सर्वांचा आत्मा जो मी त्याचे दर्शन झाले असता - हृदयग्रंथिः भिद्यते - हृदयातील अज्ञानाची गाठ फुटते - सर्वसंशयाः छिद्यंते - सर्व संशयांचा उच्छेद होतो - अस्य कर्माणि क्षीयंते च - व मद्‍भक्ताची सर्व पूर्वसंचित कर्मे नष्टफल होतात. ॥३०॥

तस्मात् - म्हणून - मदात्मनः मद्‍भक्तियुक्तस्य योगिनः - माझ्या आत्मत्वाने माझेच चिंतन करणार्‍या योग्याला - न ज्ञानं न च वैराग्यं इह प्रायः श्रेयः भवेत् वै - ज्ञान व वैराग्य येथे सामान्यतः कल्याणवह होणे असंभवनीय आहे. ॥३१॥

यत् कर्मभिः, यत् तपसा, यत् ज्ञानवैराग्यतः च - जे वेदविहित कर्मांनी, तपाने ज्ञानयुक्त वैराग्याने अथवा वैराग्ययुक्त ज्ञानाने आणि - योगेन, दानधर्मेण, इतरैः श्रेयोभिः अपि - योगाभ्यासाने, दानधर्मांनी, इतर मोक्षोपकारक साधनांनी. ॥३२॥

मद्‍भक्तियोगेन - माझ्या भक्तीने - मद्‍भक्तः सर्वं अंजसा लभते - माझ्या निष्काम भक्ताला सहज व अनायासे मिळते - कथंचित् यदि वांछति - जर कधीकाळी चुकून वांछा झालीच तर - स्वर्गापवर्गं, मद्‍धाम - स्वर्ग, मोक्ष, किंवा माझे धाम वैकुंठ हवे ते मिळते. ॥३३॥

साधवः धीराः मम एकांतिनः भक्ताः - साधुवृत्ति धैर्यवंत व बुद्धिवंत असे माझी अनन्य भक्ति करणारे जे मद्‍भक्त त्यांना - नहि किंचित् वांच्छंति - काही सुद्धा इच्छा नसते - अपि मया दत्तं अपुनर्भवं कैवल्यं - मी स्वतः होऊन त्यास अर्पण केलेली जन्ममरणशून्य, मुक्तस्थितीही त्यास नको असते. ॥३४॥

नैरपेक्ष्यं परं अनल्पकं - निरपेक्षता हेच अति श्रेष्ठ, अति महत्त्वाचे व महनीय - निःश्रेयसं प्राहुः - निःश्रेयस-सर्वोत्तम कल्याण होय असे म्हणतात - तस्मात् - म्हणून - निराशिषः निरपेक्षस्य - सर्वथा निरपेक्ष असल्यामुळे जो काही न मागणारा असतो त्याला - मे भक्तिः भवेत् - माझी भक्ति जडेल. ॥३५॥

मयि एकांतभक्तानां - माझ्या ठिकाणी अनन्य भक्ति असलेले - साधूनां - साधू - समचित्तानां - समचित्त - बुद्धेः परं उपेयुषां - बुद्धीच्या पलीकडे असणार्‍याची गाठ पडलेले जे मद्‍भक्त त्यांस - गुणदोषोद्‍भवा गुणाः न - विहिताचरणापासून होणारे गुण व निषिद्धाचरणापासून होणारी पापे नसतात. ॥३६॥

एवं मया आदिष्टान् एतान् मे पथः - याप्रमाणे मी सांगितलेल्या या माझ्या प्राप्तीच्या उपायांचे - अनुतिष्ठंति - अनुष्ठान करतात - क्षेमं मत्स्थानं विंदंति - ते सर्वथा निर्भय असे माझे धाम प्राप्त करून घेतात - यत् परमं ब्रह्म विदुः - ज्या स्थानालाच परब्रह्म असे म्हणतात. ॥३७॥

अध्याय विसावा समाप्त

GO TOP