श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८० वा - अन्वयार्थ

सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत -

प्रभो भगवन् - हे समर्थ शुकाचार्या - अनन्तवीर्यस्य महात्मनः मुकुन्दस्य - अगणित पराक्रम करणार्‍या महात्म्या श्रीकृष्णाची - यानि च अन्यानि वीर्याणि (सन्ति) - आणखी जी दुसरी पराक्रमाची कृत्ये आहेत - (तानि) श्रोतुम् इच्छामहे - ती मी श्रवण करू इच्छितो. ॥१॥

ब्रह्मन् - हे मुने - कः नु विशेषज्ञः - कोणता बरे तत्त्व जाणणारा पुरुष - काममार्गणैः विषण्णः - कामबाणांनी दुःखी झालेला असा - सकृत् उत्तमश्लोकसत्कथाः श्रुत्वा - एक वार भगवंताच्या कथा ऐकिल्यानंतर - (ताभ्यः) विरमेत - त्यापासून परावृत्त होईल ? ॥२॥

यया तस्य गुणान् गृणीते सा (एव) वाक् - जिने त्या भगवंताचे गुणानुवाद मनुष्ये वर्णितो तीच खरी वाणी होय - (यौ) च तत्कर्मकरौ (तौ एव) करौ - आणि जे भगवद्विषयक कर्म करणारे तेच हात होत - (यत्) च स्थिरजङ्‌गमेषु वसन्तं (भगवन्तम्) स्मरेत् - आणि जे स्थावरजंगमामध्ये वास करणार्‍या भगवंताचे स्मरण करील - (तत् एव) मनः - तेच खरे मन - (यः) तत्पुण्यकथाः शृणोति सः (एव) कर्णः - जो भगवंताच्या पुण्यकारक कथा ऐकतो तोच कान. ॥३॥

(यत्) तस्य उभयलिङगं तु आनमेत् तत् एव शिरः - जे भगवंताच्या स्थावरजंगमात्मक मूर्तीला नमन करील तेच मस्तक होय - यत् पश्यति तत् हि चक्षुः - जो पहातो तोच नेत्र होय - अथ - त्याचप्रमाणे - घानि विष्णोः पादोदकं नित्यं भजन्ति - जे भगवंताच्या पादोदकाला नित्य भजतात - तत् जनानां अङगानि - तेच लोकांचे खरे अवयव होत. ॥४॥

विष्णुरातेन संपृष्टः बादरायणिः भगवान् - परीक्षिताने प्रश्न केलेला व्यासपुत्र शुक - वासुदेवे भगवति निमग्नहृदयः अब्रवीत् - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले आहे चित्त ज्याचे असा बोलू लागला. ॥५॥

ब्रह्मवित्तमः कश्चित् ब्राह्मणः - ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असा कोणी एक ब्राह्मण - कृष्णस्य सखा आसीत् - कृष्णाचा बालमित्र होता - इन्द्रियार्थेषु विरक्तः - विषयांच्या ठिकाणी वैराग्य धारण केलेला - प्रशान्तात्मा जितेन्द्रियः (च आसीत्) - शांत आहे चित्त ज्याचे व जिंकिली आहेत इंद्रिये ज्याने असा होता. ॥६॥

गृहाश्रमी (सः) - गृहस्थाश्रमी असा तो - यदृच्छया उपपन्नेन वर्तमानः - आपोआप जे मिळेल तेवढयावरच निर्वाह करणारा - कुचैलस्य तस्य भार्या च - व जीर्ण वस्त्रे धारण करणार्‍या त्या ब्राह्मणाची स्त्री - तथाविधा क्षुत्क्षामा - त्याच्या प्रमाणेच क्षुधेने कृश झाली होती. ॥७॥

दरिद्रा सीदमाना वेपमाना च - दारिद्र्यात दिवस कंठणारी व दुःखित झालेली आणि जिचे शरीर कापत आहे अशी - सा पतिव्रता - ती साध्वी स्त्री - पतिम् अभिगम्य - पतीजवळ जाऊन - म्लायता वदनेन प्राह - म्लान मुखाने बोलू लागली. ॥८॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मवित् पते - साक्षात् श्रियः पतिः - प्रत्यक्ष लक्ष्मीचा पति - ब्रह्मण्यः शरण्यः च - ब्राह्मणांचे व शरणागतांचे कल्याण करणारा - सात्वतर्षभः च भगवान् - आणि यादवश्रेष्ठ असा भगवान श्रीकृष्ण - भगवतः (तव) ननु सखा - ज्ञानसंपन्न अशा तुमचा खरोखर मित्र आहे. ॥९॥

महाभाग - हे भाग्यवंता - साधूनां च परायणं तम् उपेहि - साधूंचा मोठा आश्रय अशा श्रीकृष्णाजवळ जा - ते सीदते कुटुंबिने (सः) भूरि द्रविणं दास्यति - दुःखी व कुटुंबवत्सल अशा आपणाला तो पुष्कळ द्रव्य देईल. ॥१०॥

भोजवृष्ण्यंधकेश्वरः (सः) - भोज, वृष्णि आणि अंधक यांचा अधिपति असा तो श्रीकृष्ण - अधुना - सांप्रत - द्वारवत्यां आस्ते - द्वारकेत रहात आहे - (आत्मनः) पादकमलं स्मरतः भजतः (च) - आपल्या चरणकमलाचे स्मरण करणार्‍या व सेवन करणार्‍या पुरुषाला - (सः जगद्‌गुरुः) आत्मानम् अपि यच्छति - तो जगद्‌गुरु श्रीकृष्ण आत्मस्वरूपहि देतो - नात्यभीष्टान् अर्थकामान् किम् नु (यच्छति) - मग फारसे प्रिय नव्हेत असे जे अर्थ व काम ते का बरे देणार नाही ? ॥११॥

एवं भार्यया बहुशः मृदु प्रार्थितः सः विप्रः - याप्रमाणे पत्‍नीने पुष्कळ प्रकाराने सौ‌म्यपणाने प्रार्थिलेला तो ब्राह्मण - उत्तमश्‍लोकदर्शनं अयं हि परमः लाभः - श्रीकृष्णाचे दर्शन हा खरोखर मोठा लाभ होय. ॥१२॥

इति मनसा संचिन्त्य - असा मनात विचार करून - गमनाय मतिं दधे - जाण्याच्या उद्योगाला लागला - कल्याणि - हे स्त्रिये - अपि किञ्चित् उपायनं गृहे अस्ति - काही तरी भेट नेण्यासारखा पदार्थ घरात आहे काय - (अस्ति चेत्) दीयतां - असेल तर दे. ॥१३॥

चतुरः मुष्टीन् पृथुकतण्डुलान् विप्रान् याचित्वा - चार मुठी पोहे ब्राह्मणांजवळून याचना करून आणून - तान् चैलखण्डेन बध्वा - ते जीर्णवस्त्राच्या एका चिंधीत बांधून - उपायनम् (इति) भर्त्रे प्रादात् - भेट देण्याचा पदार्थ म्हणून पतीच्या हातात देती झाली. ॥१४॥

सः विप्राग्र्यः - तो श्रेष्ठ ब्राह्मण - तान् आदाय - पोहे घेऊन - मह्यं कृष्णसंदर्शनं कथं स्यात् - मला श्रीकृष्णाचे दर्शन कसे होईल - इति चिन्तयन् द्वारकां किल प्रययौ - असा विचार करीत द्वारकेला खरोखर जाऊन पोचला. ॥१५॥

सद्विजः (सः) विप्रः - दुसर्‍या द्विजासह तो ब्राह्मण - त्रीणि गुल्मानि तिस्रः च कक्षाः अतीताय - तीन सैन्याची ठाणी व तीन चौक उल्लंघून पुढे गेला - अच्युतधर्मिणां अगम्यांधकवृष्णीनां गृहेषु - श्रीकृष्ण हाच आहे धर्म ज्यांचा अशा व जिंकण्यास अशक्य अशा अंधक व वृष्णि यांच्या घरांमधील. ॥१६॥

हरेः द्‌व्यष्टसहस्राणां महिषीणां एकतमं श्रीमत् गृहम् - श्रीकृष्णाच्या सोळा हजार स्त्रियांच्या घरांतील एका सुंदर घरात - (सः) द्विजः - तो ब्राह्मण - यथा ब्रह्मानन्दं गतः (तथा) - जसा ब्रह्मानंदी निमग्न झालेला पुरुष तसा - विवेश - शिरला. ॥१७॥

प्रियापर्यंकम् आस्थितः अच्युतः - पत्‍नीच्या पलंगावर बसलेला श्रीकृष्ण - दूरात् तं विलोक्य - दुरूनच त्या ब्राह्मणाला पाहून - सहसा उत्थाय - एकाएकी उठून - अभ्येत्य च - आणि जवळ येऊन - मुदा दोर्भ्यां पर्यग्रहीत् - आनंदाने दोन बाहूंनी आलिंगिता झाला. ॥१८॥

प्रीतः पुष्करेक्षणः - प्रसन्न झालेला कमलनेत्र श्रीकृष्ण - प्रियस्य सख्युः विप्रर्षेः अंगसंगातिनिर्वृतः - प्रिय मित्र अशा ब्राह्मणाच्या आलिंगनाने सुखी झालेला - नेत्राभ्यां अब्बिन्दून् व्यमुञ्चत् - नेत्रांतून अश्रुबिंदु सोडिता झाला. ॥१९॥

राजन् - हे परीक्षित राजा - अथ - मग - लोकपावनः भगवान् - त्रैलोक्याला पवित्र करणारा श्रीकृष्ण - (तं) पर्यङ्‌के उपवेश्य - त्या ब्राह्मणाला पलंगावर बसवून - स्वयं समर्हणं उपहृत्य - स्वतः पूजासाहित्य आणून - अस्य सख्युः पादौ अवनिज्य - त्या मित्राचे दोन्ही पाय धुवून - पादावनेजनीः (आपः) शिरसा अग्रहीत् - पादोदक मस्तकावर धारण करिता झाला - दिव्यगन्धेन चन्दनागुरुकुंकुमैः (च तं) व्यलिम्पत् - आणि स्वर्गीय सुगंधी पदार्थ व चंदन, कृष्णागरु व केशर यांची त्या ब्राह्मणाला उटी लाविता झाला. ॥२०-२१॥

सुरभिभिः धूपैः - सुगंधी धूपांनी - प्रदीपावलिभिः - दिव्यांच्या रांगांनी - मुदा मित्रं अर्चित्वा - मोठया आनंदाने मित्राची पूजा करून - ताम्बूलं गां च आवेद्य - विडा व गाय देऊन - स्वागतं अब्रवीत् - कुशल प्रश्न विचारता झाला. ॥२२॥

साक्षात् देवी - प्रत्यक्ष लक्ष्मी रुक्मिणी - चामरव्यजनेन - चवरीच्या पंख्याने - कुचैलं मलिनं क्षामं धमनिसंततं द्विजं - जीर्णवस्त्र नेसलेल्या, मलीन, कृश व नुसत्या शिरांनी व्यापिलेल्या त्या ब्राह्मणाची - वै पर्यचरत् - खरोखर शुश्रूषा करिती झाली. ॥२३॥

अमलकीर्तिना कृष्णेन - निर्मल कीर्तीच्या श्रीकृष्णाने - अतिप्रीत्या सभाजितं अवधूतं दृष्टवा - अत्यंत प्रेमाने पूजिलेल्या त्या विरक्त ब्राह्मणाला पाहून - अंतःपुरजनः - अंतपुरातील स्त्रिया - विस्मितः अभूत् - विस्मित झाल्या. ॥२४॥

श्रिया हीनेन - लक्ष्मीरहित - अस्मिन् लोके गर्हितेन च - व ह्या लोकी निंदिल्या गेलेल्या - अवधूतेन - निष्पाप अशा - अनेन अधमेन भिक्षुणा - ह्या हीनवृत्ति ब्राह्मणाने - किं पुण्यं कृतं - कोणते पुण्य केले होते. ॥२५॥

यः असौ - जो हा ब्राह्मण - त्रिलोकगुरुणा श्रीनिवासेन - त्रैलोक्याचा गुरु अशा श्रीकृष्णाकडून - संभृतः - सत्कारिला गेला - यथा अग्रजः - जसा वडील बंधु तसा - पर्यङ्‌कस्थां श्रियं हित्वा परिष्वक्तः - पलंगावर बसलेल्या साक्षात लक्ष्मीला सोडून आलिंगिला गेला. ॥२६॥

राजन् - हे परीक्षित राजा - गुरुकुले सतोः (तयोः) - गुरुगृही असतानाच्या त्यांच्या - आत्मनः ललिताः गाथाः - स्वतःला प्रिय अशा गोष्टी - करौ गृह्य (तौ) परस्परं कथयाञ्चक्रतुः - हातात हात घालून ते परस्परांस सांगते झाले. ॥२७॥

धर्मज्ञ ब्रह्मन् - हे धर्म जाणणार्‍या ब्राह्मणा - लब्धदक्षिणात् गुरुकुलात् समावृत्तेन भवता - मिळाली आहे दक्षिणा ज्याला अशा गुरूच्या घराहून परत घरी आलेल्या तुझ्याकडून - अपि सदृशी भार्या ऊढा न वा - योग्य अशी स्त्री वरिली गेली किंवा नाही. ॥२८॥

विद्वन् - हे विद्वान ब्राह्मणा - ते चित्तं - तुझे अंतःकरण - प्रायः गृहेषु अकामविहतम् - बहुधा घरांतील विषयांमध्ये आसक्त नाही - तथा - त्याचप्रमाणे - धनेषु न एव अतिप्रीयसे - द्रव्यांच्या ठिकाणीहि तू मोठी प्रीती करीत नाहीस - (इति) हि मे विदितं - असे मला कळले आहे. ॥२९॥

दैवीः प्रकृतीः त्यजन्तः केचित् - देवमायेचा त्याग करणारे कित्येक - यथा अहं लोकसंग्रहम् (करोमि) - जसा मी लोकांचे कल्याण करतो - कामैः अहतचेतसः - विषयांनी ज्यांच्या अन्तःकरणाला त्रस्त केले नाही असे - कर्माणि कुर्वन्ति - कर्मे करीत असतात. ॥३०॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - नौ गुरुकुले वासः स्मरसि काच्चित् - आपण उभयतां गुरुगृही राहिलो होतो ह्याची तुला आठवण आहे काय - यतः विज्ञेयं विज्ञाय - गुरूपासून ज्ञान प्राप्त करून घेऊन - द्विजः तमसः पारं अश्रुते - ब्राह्मण अज्ञानरूप संसाराचे पैलतीर गाठतो. ॥३१॥

अंग - हे मित्रा - इह - या संसारात - यत्र संभवः (भवति) - ज्यापासून जन्म प्राप्त होतो - सः वै आद्यः गुरुः - तो खरोखर पहिला गुरु होय - (यत्र) द्विजातेः सत्कर्मणां (संभवः भवति) - ज्यापासून द्विजत्व येऊन सत्कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त होतो - (यः) साक्षात् आश्रमिणां ज्ञानदः - जो प्रत्यक्ष चारी आश्रमांतील पुरुषांना ज्ञान देणारा - यथा अहम् - जसा मी आहे. ॥३२॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - इह - या संसारात - ये - जे - मया गुरुणा - मी जो गुरु त्याच्या सहाय्याने - वाचा - उपदेशाच्या योगाने - अंजसा भवार्णवं तरंति - सहजगत्या संसारसमुद्र तरून जातात - ननु वर्णाश्रमवताम् अर्थकोविदाः (सन्ति) - चारी वर्ण व चारी आश्रम यांतील पुरुषांमध्ये खरोखर पुरुषार्थ जाणणारे होत. ॥३३॥

सर्वभूतात्मा अहं - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणारा मी - यथा गुरुशुश्रूषया (तुष्यामि) - जसा गुरूच्या सेवेने संतुष्ट होतो - इज्याप्रजातिभ्यां तपसा उपशमेन वा न तुष्येयं - यज्ञाने, उत्तम जन्माने, तपश्चर्येने किंवा शमाच्या योगे संतुष्ट होणार नाही. ॥३४॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - क्वचित् - एका प्रसंगी - गुरौ निवसतां - गुरुगृही रहात असताना - गुरुदारैः इन्धनानयने चोदितानां नः वृत्तम् - गुरूपत्‍नीने लाकडे आणण्याकरिता पाठविलेल्या आपले वृत्त - स्मर्यते अपि - आठवते काय ? ॥३५॥

द्विज - हे ब्राह्मणा - महारण्यं प्रविष्टानां (नः) - मोठया अरण्यात आपण गेलो असता - अपर्तौ - अकाली - सुमहत् तीव्रं वातवर्षम् अभूत् - मोठे भयंकर वादळ होऊन पाऊस पडला - निष्ठुराः स्तनयित्‍नवः (च अभवन्) - व भयंकर मेघांचा गडगडाट झाला. ॥३६॥

तावत् सूर्यः अस्तं गतः - तितक्यात सूर्य मावळला - दिशः च तमसा आवृताः - व दिशा अंधकाराने व्यापिल्या गेल्या - निम्नं कूलं च जलमयं (अभवत्) - सखल व उंच असे सर्व प्रदेश पाण्याने भरून गेले - किंचन न प्राज्ञायत - काहीएक ओळखू येत नाहीसे झाले. ॥३७॥

अथ - नंतर - अम्बुसंप्लवे तत्र वने - पाण्याच्या पूर असलेल्या त्या अरण्यात - महानिलाम्बुभिः मुहुः भृशं निहन्यमानाः वयं - मोठा वारा व पाऊस यांनी वारंवार अत्यंत पीडिलेले आम्ही - दिशं अविदन्तः - दिशा न ओळखणारे असे - आतुराः - भ्यालेले - परस्परं गृहीतहस्ताः परिबभ्रिम - एकमेकांचे हात धरून जिकडे तिकडे भटकत होतो. ॥३८॥

आचार्यः - आम्हाला विद्या शिकविणारा - सांदीपनिः गुरुः - सांदिपनी गुरु - एतत् विदित्वा - हे जाणून - रवौ उदिते - सूर्य उगवला असता - अन्वेषमाणः (सन्) - शोधणारा होत्साता - शिष्यान् नः आतुरान् अपश्यत् - आम्हा शिष्यांना भ्यालेले असे पहाता झाला. ॥३९॥

हे पुत्रकाः - अहो मुलांनो - अहो यूयं अस्मदर्थे अतिदुःखिताः - कितीहो तुम्ही आमच्यासाठी मोठे क्लेश सोशिले - प्राणिनां वै आत्मा प्रेष्ठः - प्राण्यांना खरोखर स्वतःचा जीव फारच प्रिय असतो - तं अनादृत्य मत्पराः (जाताः) - त्या जीवाचा अनादर करून तुम्ही माझ्या ठिकाणी आसक्त झालात. ॥४०॥

यत् वै - जे खरोखर - विशुद्धभावेन गुरौ सर्वार्थात्मार्पणं - शुद्ध भक्तीने गुरूच्या ठिकाणी सर्व पुरुषार्थरूपी देहाचे अर्पण करणे - एतत् एव हि - हेच खरोखर - सच्छिष्यैः गुरुनिष्कृतं कर्तव्यम् - सदाचारी शिष्यांनी गुरूच्या उपकारांची फेड करणे होय. ॥४१॥

भो द्विजश्रेष्ठाः - अहो श्रेष्ठ ब्राह्मण हो - अहं तुष्टः - मी संतुष्ट झालो आहे - (युष्माकं) मनोरथाः सत्याः सन्तु - तुमच्या इच्छा पूर्ण होवोत - इह परत्र च - ह्या लोकी व परलोकी - छंदांसि अयातयामानि भवन्तु - वेद उज्वलित राहोत. ॥४२॥

गुरुवेश्‍मसु वसतां (नः) - गुरुगृही रहाणार्‍या आमची - एवंविधानि अनेकानि (कर्माणि अभवन्) - अशा प्रकारची अनेक कर्मे झाली - गुरोः अनुग्रहेण एव - गुरूच्या कृपेनेच - पुमान् पूर्णः (भूत्वा) प्रशान्तये (कल्पते) - पुरुष पूर्ण मनोरथ होऊन शांती मिळविण्यास समर्थ होतो. ॥४३॥

देवदेव जगद्‌‍गुरो - हे देवाधिदेवा जगन्नाथा श्रीकृष्णा - अस्माभिः किं अनिर्वृत्तं - आम्ही केले नाही असे काय आहे - येषां गुरौ वासः - ज्यांचा गुरुगृही निवास - सत्यकामेन भवता (सह) अभूत् - सत्य आहेत इच्छा ज्याच्या अशा तुझ्यासह झाला - तैः अस्माभिः किम् अनिर्वृत्तम् - त्या आम्हाकडून करावयाचे राहिले असे काय आहे. ॥४४॥

विभो - हे सर्वव्यापी परमेश्‍वरा - श्रेयसां आवपनं छंदोमयं ब्रह्म - कल्याणाचे माहेरघर असे वेदस्वरूपी ब्रह्म - यस्य देहः (अस्ति) - ज्याचे शरीर आहे - तस्य (तव) गुरुषु वासः - त्या तुझा गुरुगृही निवास हा - अत्यन्तविडम्बनम् (अस्ति) - मोठी विटम्बनाच होय. ॥४५॥

ऐंशीवा अध्याय समाप्त

GO TOP