|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६९ वा - अन्वयार्थ
देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे - नारदः नरकं निहतं श्रुत्वा - नारद, नरकासुराला मारिलेले ऐकून - तथा च - त्याचप्रमाणे - बह्वीनां योषितां - पुष्कळ स्त्रियांशी - एकेन कृष्णेन - एकटया श्रीकृष्णाने - (कृतम्) उद्वाहं श्रुत्वा - केलेला विवाह ऐकून - तत् दिदृक्षुः (भवति) स्म - ते पाहण्याची इच्छा करणारा झाला. ॥१॥ एकः - एकटा श्रीकृष्ण - एकेन वपुषा - एकाच शरीराने - पृथक् - निरनिराळ्या - गृहेषु - घरात - द्व्यष्टसाहस्रं स्त्रियः - सोळा हजार स्त्रियांशी - युगपत् उदावहत् - एकाच वेळी विवाह लाविता झाला - एतत् बत चित्रं - हे खरोखर मोठे आश्चर्य होय. ॥२॥ इति - असे म्हणून - (तत्) द्रष्टुं उत्सुकः देवर्षिः - ते पाहण्यासाठी उत्कंठित झालेला नारद - पुष्पितोपवनारामद्विजालिकुलनादितां - फुललेली झाडे असलेल्या बगीच्यांतील पक्षी व भुंगे ह्यांच्या थव्यांच्या शब्दांनी गजबजून गेलेल्या - द्वारवतीं आगमत् - द्वारकेला प्राप्त झाला. ॥३॥ उत्फुल्लेन्दीवराम्भोजकह्लारकुमुदोत्पलैः - फुललेल्या अशा इन्दीवर, अंभोज, कल्हार, कुमुद व उत्पल नावाच्या कमळांनी - छुरितेषु सरस्सु - व्याप्त अशा सरोवरांमध्ये - हंससारसैः उच्चैः कूजितां (द्वारवतीं आगमत्) - हंस व सारस पक्षी यांनी मोठमोठे शब्द करून गजबजून टाकिलेल्या द्वारकेला गेला. ॥४॥ स्फाटिकराजतैः - स्फटिकाच्या पाषाणांनी शोभणार्या - महामरकतप्रख्यैः - मोठमोठया पाचूच्या मण्यांनी प्रकाशणार्या - स्वर्णरत्नपरिच्छदैः - सुवर्ण व रत्ने यावर जडविलेल्या - नवभिः प्रासादलक्षैः जुष्टां - नऊ लक्ष राजमंदिरांनी युक्त अशा - द्वारकां आगमत् - द्वारकेत आला. ॥५॥ विभक्तरथ्यापथचत्वरापणैः - आखलेले राजमार्ग, गल्ल्या, चव्हाटे व पेठा यांनी - शालासभाभिः - घरे व सभागृहे यांनी - सुरालयैः - देवळांनी - रुचिरां - शोभणार्या - संसिक्तमार्गांगणवीथिदेहलीं - नीट शिंपिलेले आहेत रस्ते, अंगणे, पायवाटा व उंबरठे जीतील अशा - पतत्पताकाध्वजवारितातपां - हलणार्या अशा पताका व ध्वज यांनी जीतील सूर्यकिरणांचे निवारण झाले आहे अशा. ॥६॥ त्वष्ट्रा - विश्वकर्म्याने - यत्र - ज्या द्वारकेत - स्वकौशलं कार्त्स्येन दर्शितं - स्वतःचे नैपुण्य पूर्णपणे दाखविले आहे अशा - तस्यां - त्या द्वारकेत - सर्वधिष्ण्यपैः अर्चितं - सर्व लोकपालांनी पूजिलेले - श्रीमत् हरेः अन्तःपुरं (अस्ति) - शोभायमान श्रीकृष्णाचे अंतःपुर आहे. ॥७॥ तत्र - तेथे - षोडशभिः सद्मसहस्रैः समलंकृतं - सोळा हजार मंदिरांनी शोभणार्या - शौरेः पत्नीनां - श्रीकृष्णस्त्रियांच्या - एकतमं महत् भवनं विवेश - एका मोठया मंदिरात शिरला. ॥८॥ विद्रुमस्तम्भैः विष्टब्धं - पोवळ्यांच्या खांबावर उभारलेल्या - वैदूर्यफलकोत्तमैः - वैदूर्यांनी जडविलेल्या उत्तम फळ्यांनी कडीपाट केलेल्या - इन्द्रनीलमयैः कुडयैः - इंद्रनीळ मण्यांच्या भिंतींनी - च - आणि - अहतत्विषा - नष्ट झाली नाही कान्ति जीची अशा - (तादृश्या) जगत्या - तसल्याच भूमीने - उपलक्षितं भुवनं विवेश - सजलेल्या घरात शिरला. ॥९॥ त्वष्ट्रा निर्मितैः - विश्वकर्म्याने निर्मिलेल्या - मुक्तादामविलंबिभिः वितानैः - मोत्यांच्या सरांचे आहेत घोस ज्यांना अशा छतांनी - मण्युत्तमपरिष्कृतैः - उत्तम मण्यांनी भूषविलेल्या - दान्तैः आसनपर्यंकैः (उपलक्षितं) - हस्तिदंताच्या आसनांनी व पलंगांनी युक्त अशा - निष्ककंठीभिः सुवासोभिः दासीभिः अलंकृतं - गळ्यात सुवर्णाचे अलंकार घातलेल्या व सुंदर वस्त्रे नेसलेल्या दासींनी शोभणार्या - सकंचुकोष्णीषसुवस्त्रमणिकुण्डलैः पुंभिः (उपलक्षितं) - चिलखत, शिरस्त्राण, सुंदर वस्त्र व मणिखचित कुंडले धारण करणार्या पुरुषांनी युक्त अशा. ॥१०-११॥ अंग - हे राजा - रत्नप्रदीपनिकरद्युतिभिः निरस्तध्वान्तं - रत्नांच्या दीपसमूहांच्या कांतींनी ज्यातील अंधकार नाहीसा झाला आहे अशा - यत्र - जेथे - विचित्रवलभीषु विहिताः शिखण्डिनः - चित्रविचित्र खेचणीवर बसविलेले मोर - अक्षैः निर्यांतं अगुरुधूपं ईक्ष्य - खिडक्यातून बाहेर आलेला अगुरुचा धूर पाहून - घनबुद्धयः - हे मेघच आहेत अशा बुद्धीने - उन्नदन्तः - मोठमोठे शब्द करीत - नृत्यन्ति - नृत्य करितात. ॥१२॥ विप्रः - देवर्षि नारद - तस्मिन् - त्या अन्तःपुरात - समानगुणरूपवयःसुवेषदासीसहस्रयुतया - सारखे आहेत गुण, रूप, वय व मंगल वेष ज्यांचे अशा हजारो दासींनी युक्त - रुक्मदण्डेन चमरव्यजनेन सात्वतपतिं अनुसवं परिवीजयन्त्या - सुवर्णाचा दांडा असलेल्या चवरीने श्रीकृष्णाला सारखा वारा घालणार्या - गृहिण्या (सह स्थितं कृष्णं) ददर्श - पत्नीसह बसलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥१३॥ सकलधर्मभृतां वरिष्ठः भगवान् - संपूर्ण धर्माचरणी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा श्रीकृष्ण - तं सन्निरीक्ष्य - त्या नारदाला पाहून - सहसा श्रीपर्यङकतः उत्थितः - एकाएकी रुक्मिणीच्या पलंगावरून उठून - किरीटजुष्टेन शिरसा - मुकुट घातलेल्या मस्तकाने - (तस्य) पादयुगलं आनम्य - नारदाच्या दोन्ही पायांना नमस्कार करून - साञ्जलिः (तं) स्वे आसने अवीविशत् - हात जोडून त्याला आपल्या आसनावर बसविता झाला. ॥१४॥ जगद्गुरुतरः अपि सतां पतिः - सर्व जगद्गुरूंमध्ये श्रेष्ठ व साधूंचा अधिपति असाहि श्रीकृष्ण - तस्य चरणौ अवनिज्य - त्या नारदाचे पाय धुवून - तत् अपः स्वमूर्ध्ना अबिभ्रत् - ते उदक आपल्या मस्तकावर धारण करिता झाला - ब्रह्मण्यदेवः इति यत् गुणनाम (तत्) तस्य एव युक्तं - ब्राह्मणांचे कल्याण करणारा देव असे जे याचे गुण व नाव ते त्या श्रीकृष्णालाच योग्य आहे - हि - कारण - यच्चरणशौचं - ज्याच्या चरणापासून निघालेले शुद्ध गंगोदक - अशेषतीर्थं (अस्ति) - सर्व जगाला पवित्र करणारे आहे. ॥१५॥ नरसखः पुराणः ऋषिः नारायणः - अर्जुनाचा मित्र पुराणपुरुष महर्षि श्रीकृष्ण - उदितेन विधिना - शास्त्रात सांगितलेल्या पूजाविधीने - देवऋषिवर्यं संपूज्य - देवर्षि नारदाची पूजा करून - अमृतमिष्टया मितया वाण्या अभिभाष्य - अमृताप्रमाणे मधुर अशा मोजक्या शब्दांनी बोलून - प्रभो - हे समर्थ नारदा - भगवते किं करवामहे - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा तुमचे आम्ही कोणते कार्य करावे - (इति) तं प्राह - असे त्या नारदाला म्हणाला. ॥१६॥ अखिललोकनाथ उरुगाय विभो - हे त्रैलोक्याधिपते समर्थ श्रीकृष्णा - सकलेषु जनेषु मैत्री - सर्व प्राणिमात्रांवरील प्रेम - खलानां दमः - दुष्टांना शासन - (इदं) त्वयि अद्भुतं न एव - हे तुझ्या ठिकाणी आश्चर्य नाहीच - हि - कारण - जगत्स्थितिरक्षणाभ्यां - जगाची उत्पत्ति व रक्षण ह्या योगे - निःश्रेयसाय - कल्याण करण्याकरिता - (तव) स्वैरावतारः (भवति) - तुझा स्वेच्छेने अवतार होतो - सुष्ठु विदाम - आम्ही चांगले जाणतो. ॥१७॥ जनतापवर्गं - लोकांना मोक्ष देणारे - अगाधबोधैः ब्रह्मादिभिः - अपरिमित आहे ज्ञान ज्यांचे अशा ब्रह्मदेवादिकांनी - हृदि विचिन्त्यं - हृदयात चिंतिण्यास योग्य असे - संसारकूपपतितोत्तरणावलम्बं - संसाररूपी विहिरीत पडलेल्यांना वर येण्यास आधार असे - तव अङ्घ्रियुगलं - तुझे दोन चरण - दृष्टम् - दृष्टीस पडले - (तत्) ध्यायन् चरामि - त्या पायांचे चिंतन करीत मी हिंडतो - यथा (तस्य) स्मृतिः स्यात् (तथा) अनुगृहाण - जेणेकरून तुझ्या पायांची स्मृति राहील तशी कृपा कर. ॥१८॥ अंग - हे राजा - ततः सः नारदः - नंतर तो नारद - योगेश्वरेश्वरस्य योगमायाविवित्सया - मोठमोठया योग्यांचा अधिपति अशा श्रीकृष्णाची योगमाया जाणण्याच्या इच्छेने - कृष्णपत्न्याः अन्यत् गेहं आविशत् - श्रीकृष्णाच्या दुसर्या एका स्त्रीच्या घरात शिरला. ॥१९॥ तत्र अपि - तेथेहि - प्रियया च उद्धवेन च अक्षैः दीव्यन्तं (तम् अद्राक्षीत्) - प्रिय पत्नी व उद्धव यांसह फाशांनी खेळणार्या कृष्णाला पाहता झाला - परया भक्त्या प्रत्युत्थानासनादिभिः पूजितः (च) - आणि मोठया भक्तीने सामोरे जाणे, बसावयाला आसन देणे इत्यादि उपचारांनी पूजिला गेला. ॥२०॥ भवान् कदा आयातः - आपण केव्हा आलात - च अपूर्णैः अस्मदादिभिः - आणि पूर्ण मनोरथ न झालेल्या आमच्यासारख्यांनी - पूर्णानां (वः) किं नु क्रियते - निरिच्छ अशा तुमचे कोणते कार्य करावे - इति अविदुषा इव - अशा रीतीने जसे काही आपणाला माहीतच नाही असे दाखवून - असौ पृष्टः - तो नारद विचारिला गेला. ॥२१॥ ब्रह्मन् - हे नारदा - अथ अपि - तरीसुद्धा - नः ब्रूहि - आम्हाला सांग - एतत् जन्म शोभनं कुरु - हा आमचा जन्म सफल कर - विस्मितः सः तु - आश्चर्यचकित झालेला तो नारद तर - उत्थाय - उठून - तूष्णीं अन्यत् गृहं अगात् - काहीएक न बोलता मुकाटयाने दुसर्या घरी गेला. ॥२२॥ तत्र अपि - तेथेहि - शिशून् सुतान् लालयन्तं - लहान पुत्रांना खेळविणार्या - गोविन्दं अचष्ट - श्रीकृष्णाला पाहता झाला - ततः अन्यस्मिन् गृहे - नंतर दुसर्या घरी - मज्जनाय कृतोद्यमं (कृष्णं) अपश्यत् - स्नान करण्यास केली आहे सिद्धता ज्याने अशा कृष्णाला पाहता झाला. ॥२३॥ (क्व) च वितानाग्नीन् जुह्वन्तं - कोठे अग्निहोत्रविधीने आहवनीय अग्नीला हविर्भाग देत आहे अशा - (क्व अपि) पञ्चभिः मखैः यजन्तं - कोठे पंचमहायज्ञ करीत आहे अशा - क्व अपि द्विजान् भोजयन्तं - एका घरी ब्राह्मणांना भोजन घालीत आहे अशा - (क्व अपि) अवशेषितं भुञ्जानं (कृष्णं अचष्ट) - एका ठिकाणी हविर्भाग देऊन उरलेल्या अन्नाचे सेवन करीत आहे अशा श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२४॥ क्व अपि - एका ठिकाणी - संध्याम् उपासीनं - संध्या करीत आहे अशा - वाग्यतं ब्रह्म जपन्तं - मौन धरून गायत्रीमंत्राचा जप करीत आहे अशा - एकत्र च - व एके ठिकाणी - असिचर्मभ्यां - तरवार व ढाल घेऊन - असिवर्त्मसु चरन्तं - तरवारीचे हात फिरवीत आहे अशा. ॥२५॥ क्व अपि - दुसर्या एका घरामध्ये - अश्वैः गजैः रथैः विचरन्तं - हत्ती, रथ व घोडे ह्यांवरून हिंडत असलेल्या - गदाग्रजं (अचष्ट) - श्रीकृष्णाला पाहता झाला - क्वचित् पर्यङके शयानं - एका ठिकाणी पलंगावर शयन केलेल्या - बन्दिभिः च स्तूयमानं (श्रीकृष्णं अपश्यत्) - आणि स्तुतिपाठक भाटांनी स्तविल्या जाणार्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२६॥ कस्मिंश्चित् (गृहे) च - दुसर्या एका घरामध्ये तर - उद्धवादिभिः मन्त्रिभिः मन्त्रयन्तं - उद्धवादि प्रधानांबरोबर गुप्त विचार करणार्या - क्व च अपि - आणि कोठे तर - वारमुख्याबलावृतं - प्रमुख वारांगनांनी वेष्टिलेल्या - जलक्रीडारतं (कृष्णम् अपश्यत्) - जलक्रीडा करण्यात आसक्त झालेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२७॥ कुत्रचित् - एका घरी - स्वलंकृताः गाः द्विजमुख्येभ्यः ददतं - उत्तमप्रकारे शोभित केलेल्या गाई श्रेष्ठ ब्राह्मणांना देणार्या - च - आणि - मङगलानि इतिहासपुराणानि शृण्वन्तं (कृष्णम् अचष्ट) - मंगलकारक इतिहास व पुराणे श्रवण करणार्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२८॥ कदाचित् गृहे - एका घरामध्ये - प्रियया हास्यकथया हसन्तं - प्रियपत्नीसह हसण्यासारख्या गोष्टी सांगून हसणार्या - क्व अपि - एका घरी - धर्मं सेवमानं - धर्माचरण करणार्या - कुत्रचित् च अर्थकामौ सेवमानम् - आणि एका घरामध्ये अर्थ व काम ह्या पुरुषार्थांचे सेवन करणार्या. ॥२९॥ प्रकृतेः परं एकं पुरुषं ध्यायन्तं - प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या एकच अद्वितीय अशा परमेश्वराचे ध्यान करीत - आसीनम् - बसलेल्या - क्व अपि - एके ठिकाणी - कामैः भोगैः सपर्यया (च) - इष्ट भोग्य पदार्थांनी व पूजासाहित्याने - गुरून् शुश्रूषन्तं (कृष्णं अपश्यत्) - गुरूची सेवा करणार्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३०॥ कैश्चित् विग्रहं कुर्वन्तम् - कोठे कलह करणार्या - अन्यत्र च सन्धिं (कुर्वन्तं) - आणि दुसर्या ठिकाणी सख्य करणार्या - कुत्र अपि - एका ठिकाणी - रामेण सह - बलरामासह - सतां शिवं चिन्तयन्तं केशवं (अपश्यत्) - साधूंच्या हिताविषयी चिंतन करीत बसलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३१॥ पुत्राणां दुहितृणां च - मुलगे व मुली यांचे - काले - योग्यकाळी - तत्सदृशैः विभूतिभिः - त्यांना साजेल अशा ऐश्वर्यांनी - दारैः वरैः विध्युपयापनं कल्पयन्तं - स्त्रियांशी व पतींशी विधियुक्त विवाह जमविणार्या. ॥३२॥ येषां अपत्यानां प्रस्थापनोपायनैः - ज्या मुलामुलींना सासरी पाठविणे व माहेरी आणणे इत्यादि प्रसंगांनी - योगेश्वरस्य उत्सवान् वीक्ष्य - योगाधिपति श्रीकृष्णाचे महोत्सव पाहून - लोकाः विसिस्मिरे - लोक आश्चर्य करिते झाले. ॥३३॥ क्व अपि - एके ठिकाणी - ऊर्जितैः क्रतुभिः - योग्य यज्ञांनी - सकलान् देवान् यजन्तं - सर्व देवतांचे पूजन करणार्या - क्वचित् - काही ठिकाणी - कूपाराममठादिभिः - विहिरी, बागा, आश्रम अशा उपयोगी कृत्यांनी - धर्मं पूर्तयन्तं - धर्मांची पूर्तता करणार्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३४॥ क्व अपि - एका ठिकाणी - सैन्धवं हयं आरुह्य - सिंधुदेशीय अश्वावर बसून - मृगयां चरन्तं - मृगया करणार्या - ततः मेध्यान् पशून् घ्नन्तं - तेथे यज्ञाला योग्य अशा पशूंना मारणार्या - यदुपुङगवैः परी (तं अचष्ट) - श्रेष्ठ यादवांनी वेष्टिलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३५॥ क्वचित् - एके ठिकाणी - तत्तद्भावबुभुत्सया - त्यांचे अभिप्राय जाणण्याच्या इच्छेने - प्रकृतिषु - लोकांमध्ये - अन्तःपुरगृहादिषु - अन्तःपुरातील गृहादि ठिकाणी - अव्यक्तलिङगं चरन्तं योगेशं (अपश्यत्) - गुप्तरीतीने संचार करणार्या योगाधिपति श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३६॥ अथ - नंतर - नारदः - नारद - मानुषीं गतिं ईयुषः - मनुष्यजन्माला आलेल्या श्रीकृष्णाचा - योगमायोदयं वीक्ष्य - योगमायेसंबंधी उत्कर्ष पाहून - प्रहसन् इव - जणू थटटा करीत - हृषीकेशम् उवाच - श्रीकृष्णाला म्हणाला. ॥३७॥ योगेश्वर - हे श्रीकृष्णा - मयिनाम् अपि दुर्दर्शाः - मायावी पुरुषांनाहि दिसण्यास कठीण अशा - भवत्पादनिषेवया आत्मन् निर्भाताः - तुमच्या चरणसेवेने अन्तःकरणात प्रकाशलेल्या - ते योगमायाः विदाम - तुझ्या योगमाया मी जाणत आहे. ॥३८॥ देव - हे श्रीकृष्णा - मां अनुजानीहि - मला जाण्याची आज्ञा दे - भुवनपावनी तव लीलां उद्गायन् - त्रैलोक्याला पवित्र करणार्या तुझ्या लीला गात - ते यशसा आप्लुतान् लोकान् पर्यटामि - तुझ्या कीर्तीने भरलेल्या लोकांमध्ये मी फिरत राहीन. ॥३९॥ पुत्र - हे बाळा नारदा - ब्रह्मन् - हे ब्रह्मस्वरूपा - अहं धर्मस्य वक्ता - मी धर्माचा उपदेश करणारा आहे - (धर्मस्य) कर्ता तदनुमोदिता (च अस्मि) - धर्माचरण करणारा व धर्माला अनुमोदन देणारा आहे - तत् शिक्षयन् - त्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी - इमं लोकम् आस्थितः - ह्या भूलोकी अवतार धारण केला आहे - मा खिदः - दुःख करू नको - इति गृहमेधिनां पावनान् सद्धर्मान् आचरन्तं - याप्रमाणे गृहस्थाश्रमांचे पवित्र धर्म आचरणार्या - सर्वगेहेषु सन्तं - व सर्वांच्या घरात राहणार्या - तम् एव - त्या श्रीकृष्णाला - एकं ददर्श ह - एकालाच पाहता झाला. ॥४०-४१॥ ऋषिः - नारद - अनंतवीर्यस्य कृष्णस्य - अगणित पराक्रम करणार्या श्रीकृष्णाच्या - योगमायामहोदयं दृष्टवा - योगमायेचा उदय पाहून - मुहुः विस्मितः जातकौतुकः अभूत् - वारंवार आश्चर्यचकित होऊन कौतुक करीत राहिला. ॥४२॥ इति - याप्रमाणे - अर्थकामधर्मेषु श्रद्धितात्मना कृष्णेन - अर्थ, काम व धर्म ह्या तीन पुरुषार्थांची ठिकाणी श्रद्धा ठेवणार्या श्रीकृष्णाने - सम्यक् सभाजितः प्रीतः (नारदः) - उत्तम रीतीने पूजिलेला व प्रसन्न झालेला नारद - तम् एव अनुस्मरन् ययौ - त्या श्रीकृष्णाचेच स्मरण करीत निघून गेला. ॥४३॥ अंग - हे राजा - नारायणः - श्रीकृष्ण - एवं मनुष्यपदवीं अनुवर्तमानः - याप्रमाणे मनुष्यांच्या मार्गाचे अनुसरण करीत - अखिलभवाय गृहीतशक्तिः - सर्वांच्या उत्कर्षाकरिता शक्ति धारण करणारा असा - षोडशसहस्रवराङगनानां - सोळा हजार स्त्रियांच्या - सव्रीडसौहृदनिरीक्षणहासजुष्टः - लज्जायुक्त प्रेमदृष्टीने अवलोकिलेला व हास्यरसाने सेविलेला असा - रेमे - रममाण झाला. ॥४४॥ अंग - हे राजा - विश्वविलयोद्भववृत्तिहेतुः हरिः - जगताची उत्पत्ति, स्थिति व संहार करण्यास कारणीभूत असा श्रीकृष्ण - इह - ह्या ठिकाणी - यानि अनन्यविषयाणि कर्माणि चकार - जी अलौकिक कृत्ये करिता झाला - (तानि) यः तु गायति - त्यांचे जो कोणी गायन करितो - शृणोति अनुमोदते वा - श्रवण करितो किंवा अनुमोदन देतो - अपवर्गमार्गे भगवति - मोक्षाचा मार्ग अशा भगवंताच्या ठिकाणी - भक्तिः भवेत् हि - खरोखर भक्ति उत्पन्न होईल. ॥४५॥ अध्याय एकोणसत्तरावा समाप्त |