श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६५ वा - अन्वयार्थ

श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे -

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा - भगवान् बलभद्रः - भगवान बलराम - सुहृद्दिदृक्षुः उत्कण्ठः - मित्रांना पहाण्यास उत्सुक झालेला असा - रथम् आस्थितः - रथात बसून - नंदगोकुलं प्रययौ - नंदाच्या गोकुळात गेला ॥१॥

चिरोत्कण्ठैः गोपैः गोपीभिः च एव - फार दिवस उत्कंठित झालेल्या गोपगोपींनीहि - परिष्वक्तः रामः - आलिंगिलेला बलराम - पितरौ अभिवाद्य - मात्यापित्यांना वंदन करून - आशीर्भिः अभिनन्दितः - आशीर्वादांनी त्यांच्याकडून अभिनंदिला गेला ॥२॥

दाशार्ह - हे बलरामा - सानुजः जगदीश्वरः (त्वं) - श्रीकृष्णासह जगत्पति असा तू - नः चिरं पाहि - आमचे चिरकाळ रक्षण कर - इति (तं) अङ्कं आरोप्य - असे म्हणून त्याला मांडीवर बसवून - आलिङ्ग्य - आलिंगन देऊन - नेत्रैः जलैः सिषिचतुः - नेत्रोदकांनी आज स्नान घालिते झाले ॥३॥

यथावयः - वयाला अनुसरून - यथासख्यं - मैत्रीला अनुसरून - यथा आत्मनः संबन्धं - जसा ज्याचा आपल्याशी संबंध होता त्याप्रमाणे - यविष्टैः विधिवत् अभिवन्दितः (रामः) - लहानांनी यथाविधि वंदिलेला बलराम - गोपवृद्धान् च (ववन्दे) - वृध्द गोपांनाहि वंदन करिता झाला ॥४॥

अथ - नंतर - गोपालान् समुपेत्य - गोपाळांजवळ जाऊन - हास्यहस्तग्रहादिभिः - हसणे, एकमेकांचा हात धरणे इत्यादिकांनी - तान् प्रीणयांचकार - त्यांना संतोष देता झाला - पर्युपागताः (ते) - सभोवार जमलेले ते गोपाळ - विश्रान्तं सुखं आसीनं (तं कुशलं) पप्रच्छुः - विसावा घेतल्यावर सुखाने बसलेल्या त्या बलरामाला खुशाली विचारिते झाले ॥५॥

च - आणि - कमलपत्राक्षे कृष्णे - कमळाच्या पानांप्रमाणे नेत्र असलेल्या श्रीकृष्णासाठी - संन्यस्ताखिलराधसः - टाकिले आहेत सर्व विषय ज्यांनी असे ते गोप - प्रेमगद्‍गदया गिरा - प्रेमाने गद्‍गद झालेल्या वाणीने - (रामेण अपि) स्वेषु अनामयं पृष्टाः - बलरामाकडून स्वकीयांविषयी कुशल विचारिले गेले ॥६॥

राम - हे बलरामा - नः सर्वे बान्धवाः - आमचे सर्व बांधव - कुशलं आसते कश्चित् - खुशाल आहेत ना? - राम - हे बलरामा - दारसुतान्विताः यूयं - स्त्रीपुत्रांनी युक्त झालेले तुम्ही - नः स्मरथ कश्चित् - आमची आठवण करिता काय? ॥७॥

दिष्ट्या पापः कंसः हतः - सुदैवाने पापी कंस मारिला गेला - दिष्ट्या सुहृज्जनाः मुक्ताः - सुदैवाने मित्रमंडळी दुःखमुक्त झाली - रिपून् निहत्य निर्जित्य - शत्रूंना मारून व जिंकून - दिष्ट्या दुर्गं समाश्रिताः - सुदैवाने तुम्ही दुर्गाचा आश्रय केला ॥८॥

रामसंदर्शनादृताः हसन्त्यः गोप्यः - बलरामाच्या दर्शनाविषयी आदरयुक्त होऊन हास्य करणार्‍या गोपी - पुरस्त्रीजनवल्लभः कृष्णः सुखं आस्ते कच्चित् - नागरिक स्त्रियांना प्रिय असा श्रीकृष्ण खुशाल आहे ना? - (इति) पप्रच्छुः - असे विचारित्या झाल्या ॥९॥

सः - तो कृष्ण - पितरं च मातरं वा बन्धून् - माता, पिता व बंधु यांना - स्मरति कच्चित् - स्मरतो काय? - असौ - तो - मातरं द्रष्टुं - मातेला भेटण्यासाठी - सकृत् अपि आगमिष्यति अपि - एकदा तरी येईल काय? - महाभुजः - दीर्घबाहु - अस्माकं अनुसेवां - तत्परत्वेकरून आम्ही केलेल्या सेवेचे - अपि वा स्मरते - कधी स्मरण करतो काय ॥१०॥

प्रभो दाशार्ह - हे समर्थ यादवा बलरामा - यदर्थे - ज्याच्यासाठी - मातरं पितरं भ्रातृन् - आई, बाप, भाऊ - पतीन् पुत्रान् स्वसॄः अपि - पति, पुत्र व बहिणी याही - दुस्त्यजान् स्वजनान् - टाकण्यास कठीण अशा आप्तेष्टांना - जहिम - आम्ही टाकून दिले ॥११॥

संच्छिन्नसौह्रदः - तोडून टाकिला आहे प्रेमभाव ज्याने असा श्रीकृष्ण - ताः नः सद्यः परित्यज्य गतः - त्या आम्हाला तत्काळ सोडून गेला - स्त्रीभिः - स्त्रियांनी - तादृशं भाषितं - तशा रीतीच्या भाषणावर - कथं नु न श्रध्दीयेत - कसा बरे विश्वास ठेवू नये? ॥१२॥

बुधाः पुरस्त्रियः - शहाण्या म्हणविणार्‍या नागरिक स्त्रिया - अनवस्थितात्मनः कृतन्घस्य वचः - अव्यवस्थित व चंचल चित्ताच्या त्या कृतघ्न अशा कृष्णाच्या भाषणाचा - कथं नु गृह्‌णन्ति - का बरे स्वीकार करितात - चित्रकथस्य - अद्‌भुत आहेत कथा ज्याच्या अशा ह्या श्रीकृष्णाच्या - सुंदरस्मितावलोकोच्छ्वसितस्मरातुराः (भूत्वा) - सुंदर मंदहास्यपूर्वक अवलोकनाने प्रज्वलित झालेल्या कामाग्नीने पीडित होऊन - (अस्य वचः) वै गृह्‌णन्ति - ह्याच्या भाषणाचा खरोखर स्वीकार करितात ॥१३॥

गोप्यः - अहो गोपींनो - तत्कथया नः किम् - त्याच्या कथा सांगून आम्हाला काय? - अपराः कथाः कथयत - दुसर्‍या काहीतरी कथा सांगा - यदि - जर - तस्य कालः - श्रीकृष्णाचा वेळ - अस्माभिः विना याति - आमच्याशिवाय जातो - तथा एव नः (यायात्) - तसाच आमचाहि जाईल ॥१४॥

इति - असे म्हणून - शौरेः - श्रीकृष्णाचे - जल्पितं प्रहसितं - भाषण, हसणे - चारु वीक्षितं - सुंदर अवलोकन - गतिं प्रेमपरिष्वङगं - गमन व प्रेमालिंगन - स्मरंत्यः स्त्रियः - स्मरणार्‍या स्त्रिया - रुरुदुः - रडू लागल्या ॥१५॥

नानानुनयकोविदः भगवान् संकर्षणः - अनेकप्रकारे सान्त्वन करण्यात कुशल असा भगवान संकर्षण - कृष्णस्य हृदयंगमैः संदेशैः - श्रीकृष्णाच्या मनोहर निरोपांनी - ताः सान्त्वयामास - त्या स्त्रियांचे सांत्वन करिता झाला ॥१६॥

भगवान् रामः - भगवान बलराम - क्षपासु - रात्री - गोपीनां रतिम् आवहन् - गोपस्त्रियांना आनंद देत - तत्र - त्या गोकुळात - मधुं च माधवम् एव च द्वौ मासौ - मधु व माधव असे दोन महिने - अवात्सीत् - राहता झाला ॥१७॥

स्त्रीगणैः वृतः (सः) - स्त्रीगणांनी वेष्टिलेला तो बळराम - पूर्णचंद्रकलामृष्टे - पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांनी प्रकाशित झालेल्या - कौ‍मुदीगन्धवायुना सेविते - चंद्रविकासिनी कमळांच्या सुगंधांनी सेविलेल्या - यमुनोपवने रेमे - यमुनेच्या तीरावरील बागेत क्रीडा करिता झाला ॥१८॥

वरूणप्रेषिता वारुणी देवी - वरुणाने पाठविलेली वारुणी नावाची देवी - वृक्षकोटरात् पतन्ती - वृक्षाच्या ढोलीतून पडणारी - स्वगन्धेन तत् सर्वं वनम् अध्यवासयत् - आपल्या वासाने सर्व बाग सुगंधित करिती झाली ॥१९॥

बलः - बलराम - वायुना उपहृतं - वायूने जवळ आणिलेल्या - मधुधारायाः तं गन्धं आघ्राय - मद्याच्या धारेचा तो वास येताच - ललनाभिः समं तत्र उपगतः - स्त्रियांसह तेथे गेला - (मद्यं च) पपौ - आणि मद्य पिता झाला ॥२०॥

वनिताभिः उपगीयमानचरितः - स्त्रियांनी ज्याचे चरित्र गायिले आहे असा - हलायुधः - बलराम - क्षीबः मदविह्‌वललोचनः - मत्त व मदाने चंचल झाले आहेत नेत्र ज्याचे असा - वनेषु व्यचरत् - बागेत संचार करिता झाला ॥२१॥

वैजयंत्या मालया स्त्रग्वी - वैजयंती नावाच्या माळेने माळाधारी - एककुंडलः च - व एकाच कानात कुंडल धारण करणारा - मत्तः - मद्याने मत्त झालेला - स्वेदप्रालेयभूषितं - घाम हेच जणू दव त्याने शोभणार्‍या - स्मितमुखाम्भोजं - मंद हास्य करणार्‍या मुखकमळाला - बिभ्रत् - धारण करणारा - सः ईश्वरः बलः - तो ऐश्वर्यवान बलराम - जलक्रीडार्थं यमुनां आजुहाव - जलक्रीडा करण्यासाठी यमुनेला बोलविता झाला - मत्तः इति निजं वाक्यं अनादृत्य अनागतां - हा मद्याने मत्त झाला आहे असे समजून स्वतःच्या शब्दाला अवमानून न आलेल्या - आपगां - यमुना नदीला - कुपितः - रागावलेला बलराम - हलाग्रेण विचकर्ष ह - नांगराने ओढून आणिता झाला ॥२२-२३॥

पापे - हे पापी यमुने - मया आहूता त्वं - मी बोलावलेली अशी तू - माम् अवज्ञाय - माझा अपमान करून - यत् न आयासि - ज्याअर्थी येत नाहीस - कामचारिणीं त्वां - मनाला वाटेल त्याप्रमाणे हिंडणार्‍या तुला - लाङ्गलाग्रेण शतधा नेष्ये - नांगराच्या टोकाने शंभर मार्गांनी नेईन ॥२४॥

नृप - हे राजा - एवं निर्भर्त्सिता भीता - याप्रमाणे तिरस्कारिलेली व त्यामुळे भिऊन गेलेली - चकिता यमुना - कापू लागलेली यमुना - पादयोः पतिता - पाया पडून - यदुनंदनं - बलरामाशी - वाचं उवाच - भाषण करू लागली ॥२५॥

जगतः पते महाबाहो राम राम - हे जगन्नाथा, हे महाबाहो बलरामा - यस्य एकांशेन जगती विधृता - ज्याच्या एका अंशाकडून पृथ्वी धारण केली जाते - (तस्य) तव विक्रमं न जाने - त्या तुझा पराक्रम मला माहीत नाही ॥२६॥

विश्वात्मन् भक्तवत्सल - हे विश्वात्म्या, हे भक्तवत्सला - भगवान् (त्वं) - सर्वैश्वर्यसंपन्न तू - भगवतः परं भावं अजानतीं - भगवंताचा श्रेष्ठ अभिप्राय न जाणणार्‍या - प्रपन्नां मां - शरण आलेल्या मला - मोक्तुं अर्हसि - सोडून देण्यास योग्य आहेस ॥२७॥

ततः - नंतर - भगवान् बलः - भगवान बलराम - याचितः - याचिला असता - यमुनां व्यमुञ्चत् - यमुनेला सोडून देता झाला - इभराट् करेणुभिः इव - जसा गजपति हत्तिणींबरोबर तसा - स्त्रीभिः जलं विजगाह - स्त्रियांसह उदकांत जलक्रीडा करिता झाला ॥२८॥

कांतिः - लक्ष्मी - कामं विहृत्य - यथेच्छ क्रीडा करून - सलिलात् उत्तीर्णाय (बलाय) - उदकातून बाहेर आलेल्या बलरामाला - असिताम्बरे महार्हाणि भूषणानि शुभां स्त्रजम् ददौ - काळी दोन वस्रे, अति मूल्यवान अलंकार व सुंदर माळा देती झाली ॥२९॥

नीले वाससी वसित्वा - काळी वस्त्रे धारण करून - काञ्चनीं मालां आमुच्य - सुवर्णाची माळा धारण करून - लिप्तः स्वलंकृतः (बलः) - अंगाला उटी लाविलेला व अलंकार धारण केलेला बलराम - माहेन्द्रः वारणः इव रेजे - इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभला ॥३०॥

राजन् - हे राजा - यमुना - यमुना - आकृष्टवर्त्मना - ओढून आणिलेल्या मार्गाने - अनंतवीर्यस्य बलस्य - अगणित पराक्रम करणार्‍या बलरामाच्या - वीर्यं सूचयती इव - पराक्रमाला जणू सुचवीत आहे अशी - अद्यापि दृश्यते हि - अजूनहि खरोखर दिसत आहे ॥३१॥

एवं व्रजे रमतः - याप्रमाणे गोकुळात क्रीडा करणार्‍या - व्रजयोषितां माधुर्यैः आक्षिप्तचित्तस्य रामस्य - गोपस्त्रियांच्या सुंदर विलासांनी ज्याचे अंतःकरण मोहून गेले आहे अशा बलरामाच्या - सर्वाः निशाः - सर्व रात्रि - एका इव याताः - एका रात्रीप्रमाणे गेल्या ॥३२॥

अध्याय पासष्टावा समाप्त

GO TOP