श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५२ वा - अन्वयार्थ

द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे -

अङ्‌ग - हे परीक्षित राजा - कृष्णेन इत्थं अनुगृहीतः सः - श्रीकृष्णाने याप्रमाणे अनुग्रह दिलेला तो - इक्ष्वाकुनंदनः - इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झालेला मुचुकुंद - तं परिक्रम्य संनम्य (च) - त्या श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घालून व नमस्कार करून - गुहामुखात् निश्चकाम - गुहेच्या द्वारातून बाहेर पडला. ॥१॥

सः - तो मुचुकुंद - मर्त्यान् पशून् वीरुद्वनस्पतीन् क्षुल्लकान् वीक्ष्य - मनुष्ये, पशु, वेली व वृक्ष हे खुजट व ठेंगणे आहेत असे पाहून - कलियुगं प्राप्तं मत्वा - कलियुग चालू झाले असे मानून - उत्तरां दिशं जगाम - उत्तर दिशेला गेला. ॥२॥

तपःश्रद्धायुतः धीरः - तपश्चर्येवर ज्याची निष्ठा आहे असा गंभीर बुद्धीचा - निःसङगः मुक्तसंशयः (सः) - सर्वसंगपरित्याग केलेला व सर्व संशय ज्याचे नष्ट झाले आहेत असा तो मुचुकुंद - कृष्णे मनः समाधाय - कृष्णावर मन ठेवून - गंधमादनं प्राविशत् - गंधमादन पर्वतावर गेला. ॥३॥

नरनारायणालयं बदर्याश्रमम् आसाद्य - नरनारायण जेथे राहतात त्या बदरिकाश्रमात येऊन - सर्वद्वंद्वसहः शान्तः (सः) - सुखदुःखादि सर्व द्वंद्वे सहन करणारा तो शांत मुचुकुंद - तपसा हरिं आराधयत् - तपश्चर्येने भगवंताची आराधना करिता झाला. ॥४॥

भगवान् - श्रीकृष्ण - पुनः - पुनः - यवनवेष्टितां पुरीं आव्रज्य - कालयवनाच्या म्लेच्छसैन्याने वेढिलेल्या मथुरानगरीत येऊन - म्लेच्छबलं हत्वा - म्लेच्छसैन्याचा नाश करून - तदीयं धनं द्वारकां निन्ये - त्यांचे सर्व द्रव्य द्वारकेत नेता झाला. ॥५॥

अच्युतचोदितैः नृभिः गोभिः च - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेल्या मनुष्यांकडून व बैलांकडून - धने नीयमाने - द्रव्य नेले जात असता - त्रयोविंशत्यनीकपः जरासंधः - तेवीस अक्षौहिणी सैन्यांचा अधिपति बनलेला जरासंध - तत्र आजगाम - तेथे आला ॥६॥

राजन् - हे परीक्षित राजा - मनुष्यचेष्टाम् आपन्नौ माधवौ - मनुष्याप्रमाणे लीला करणारे बलराम व श्रीकृष्ण - रिपुसैन्यस्य वेगरभसं विलोक्य - शत्रुसैन्याच्या वेगाचे सामर्थ्य पाहून - द्रुतं दुद्रुवतुः - लवकर पळून जाते झाले ॥७॥

अभीतौ (तौ) - वस्तुतः न भ्यालेले असे बलराम व कृष्ण - प्रचुरं वित्तं विहाय - पुष्कळसे द्रव्य तेथेच टाकून - भीरुभीतवत् - घाबरटासारखे भ्याल्याप्रमाणे दाखवून - पद्मपलाशाभ्यां पद्‌भ्यां - कमलपत्राप्रमाणे कोमल अशा पायांनी - बहुयोजनं चेलतुः - कित्येक योजने चालून गेले ॥८॥

बली मागधः - बलवान असा जरासंध - तौ पलायमानौ दृष्ट्वा - बलराम व श्रीकृष्ण हे पळत आहेत असे पाहून - प्रहसन् - हास्य करीत - ईशयोः अप्रमाणवित् - बलराम व श्रीकृष्ण यांचे सामर्थ्य न जाणणारा - रथानीकैः अन्वधावत् - रथ व सैन्य यांसह पाठलाग करिता झाला ॥९॥

दूरं प्रद्रुत्य संश्रान्तौ - दूरपर्यंत धावून थकलेले ते बलराम व श्रीकृष्ण - भगवान् यत्र नित्यदा वर्षति - इंद्र जेथे नेहमी पाऊस पाडितो - (तं) प्रवर्षणाख्यं तुङ्गं गिरिम् आरुहतां - त्या प्रवर्षण नावाच्या उंच पर्वतावर चढले ॥१०॥

नृप - हे राजा - (तौ) गिरौ निलीनौ आज्ञाय - ते दोघे पर्वतावर दिसत नाहीसे झाले असे जाणून - (तयोः) पदं न अधिगम्य - त्यांच्या पावलांच्या खुणाहि न दिसल्यामुळे - समन्तात् अग्निम् उत्सृजन् - पर्वताच्या सभोवार अग्नि लावून - एधोभिः गिरिं ददाह - काष्ठाच्या योगे पर्वताला जाळिता झाला. ॥११॥

उभौ - ते दोघे बलराम व श्रीकृष्ण - दशैकयोजनोत्तुंगात् - चव्वेचाळीस कोस उंच अशा - ततः दह्यमानतटात् - त्या पर्वताच्या जळणार्‍या कडयावरून - तरसा उत्पत्य - एकाएकी वेगाने उडी मारून - अधः भुवि निपेततुः - खाली जमिनीवर उतरले. ॥१२॥

नृप - हे राजा - सानुगेन रिपुणा अलक्ष्यमाणौ - अनुचरांसह शत्रूने न पाहिलेले - यदूत्तमौ - बलराम व श्रीकृष्ण - समुद्रपरिखां स्वपुरं - जिच्या सभोवार समुद्र हाच खंदक आहे अशा द्वारका नगरीला - पुनः आयातौ - पुनः आले. ॥१३॥

बलकेशवौ दग्धौ - बलराम व श्रीकृष्ण जळून गेले - इति मृषा मन्वानः स मागधः अपि - असे खोटेच मानणारा तो जरासंधहि - सुमहत् बलम् आकृष्य - मोठे सैन्य परत फिरवून - मगधान् ययौ - आपल्या मगध देशाला परत जाता झाला. ॥१४॥

आनर्ताधिपतिः श्रीमान् रैवतः - आनर्त देशाचा राजा रैवत - ब्रह्मणा चोदितः - ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून - रेवतीं सुतां - रेवती नावाच्या कन्येला - बलाय प्रादात् - बलरामाला देता झाला - इति पुरा उदितम् - असे पूर्वी सांगितले. ॥१५॥

कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठ परीक्षित राजा - भगवान् गोविन्दः अपि - भगवान श्रीकृष्णसुद्धा - श्रियः मात्रां - लक्ष्मीचाच अंश अशा - वैदर्भीं भीष्मकसुतां - विदर्भराजा जो भीष्मक त्याच्या कन्येला - स्वयंवरे उपयेमे - स्वयंवरामध्ये वरिता झाला. ॥१६॥

चैद्यपक्षगान् शाल्वादीन् राज्ञः तरसा प्रमथ्य - शिशुपालादि चेदि देशांतील लोकांच्या पक्षाला मिळालेल्या शाल्वादि राजांना वेगाने जिंकून - सर्वलोकानां पश्यताम् - सर्व लोकांच्या समक्ष - तार्क्ष्यपुत्रः सुधाम् इव - गरूड जसा अमृताला त्याप्रमाणे. ॥१७॥

भगवान् - श्रीकृष्ण - रुचिराननां भीष्मकसुतां रुक्मिणीं - सुंदर मुखाच्या भीष्मककन्या रुक्मिणीला - राक्षसेन विधानेन उपयेमे - राक्षसविधीने वरिता झाला - इति श्रुतम् - असे आम्ही ऐकिले आहे. ॥१८॥

भगवन् - हे शुकाचार्य - यथा मागधशाल्वादीन् जित्वा - ज्या रीतीने जरासंध व शाल्व इत्यादि राजांना जिंकून - कन्याम् उपाहरत् - भीष्मकाच्या कन्येचे हरण करिता झाला - (तत्) अमिततेजसः कृष्णस्य (चरित्रं) - ते अत्यंत पराक्रम करणार्‍या श्रीकृष्णाचे चरित्र - श्रोतुम् इच्छामि - ऐकण्याची मला इच्छा आहे. ॥१९॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - पुण्याः माध्वीः - पुण्यकारक व मधुर - लोकामलापहाः नित्यनूतनाः कृष्णकथाः - लोकांचे पाप नाहीसे करणार्‍या व नित्य नवीन वाटणार्‍या श्रीकृष्णाच्या कथा - शृण्वानः श्रुतज्ञः कः - ऐकणारा कोणता ज्ञानी पुरुष - न तृप्येत - तृप्त होईल बरे ॥२०॥

विदर्भाधिपतिः - विदर्भ देशावर राज्य करणारा - महान् भीष्मकः नाम राजा आसीत् - मोठा भीष्मक नावाचा राजा होता - तस्य एका वरानना कन्या - त्याला एक सुंदर मुलगी - पञ्च पुत्राः च अभवन् - आणि पाच मुलगे झाले. ॥२१॥

अग्रजः रुक्मी अनन्तरः रुक्मरथः रुक्मबाहुः - त्यात वडील पुत्र रुक्मी व त्याच्या खालचे रुक्मरथ व रुक्मबाहु - रुक्मकेशः रुक्ममाली च - रुक्मकेश व रुक्ममाली - एषां स्वसा सती रुक्मिणी - ह्या सर्वांची बहीण अशी साध्वी रुक्मिणी. ॥२२॥

सा - ती रुक्मिणी - गृहागतैः गीयमानाः - घरी आलेल्या सत्पुरुषांनी गायिलेले - मुकुन्दस्य रूपवीर्यगुणश्रियः - श्रीकृष्णाचे स्वरूप, पराक्रम, गुण व ऐश्वर्य - उपश्रुत्य - श्रवण करून - तं सदृशं पतिं मेने - त्याला योग्य पति असे मानिती झाली. ॥२३॥

कृष्णः च - कृष्णसुद्धा - बुद्धिलक्षणौदार्यरूपशीलगुणश्रियाम् - तरतरीत बुद्धि, उत्तम लक्षणे, औदार्य, सौंदर्य, उत्तम आचरण व गुण यांचे स्थान अशा - तां सदृशीं भार्यां समुद्वोढुं - त्या योग्य स्त्रीला वरण्याचे - मनः दधे - मनांत आणिता झाला. ॥२४॥

नृप - हे परीक्षित राजा - ततः - नंतर - कृष्णद्विट् रुक्मी - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा रुक्मी - कृष्णाय भगिनीं दातुं इच्छतां बंधूनां - श्रीकृष्णाला बहीण देण्याविषयी इच्छिणार्‍या बंधूंना - निवार्य - अडथळा करून - चैद्यम् अमन्यत - शिशुपालाला मानिता झाला. ॥२५॥

तत् - ते - अवेत्य - जाणून - असितापाङगी वैदर्भी - कृष्णवर्णाचे कटाक्ष असणारी रुक्मिणी - भृशं दुर्मनाः (भूत्वा) - अत्यंत खिन्न होऊन - कंचित् द्विजं आप्तं विचिन्त्य - कोणा एका ब्राह्मणाला विश्वासू समजून - कृष्णाय द्रुतं प्राहिणोत् - कृष्णाकडे लवकर पाठविती झाली. ॥२६॥

सः - तो ब्राह्मण - द्वारकां - द्वारकेस - प्रतीहारैःप्रवेशितः - द्वारपालांनी आत नेलेला - काञ्चनासने आसीनं - सुवर्णाच्या आसनावर बसलेल्या - आद्यं पुरुषं - पुराणपुरुष अशा श्रीकृष्णाला - अपश्यत् - पहाता झाला. ॥२७॥

ब्रह्मण्यदेवः - ब्राह्मणांचे कल्याण करणारा श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या ब्राह्मणाला पाहून - निजासनात् अवरुह्य - आपल्या आसनावरून खाली उतरून - (तं) उपवेश्य - त्याला आसनावर बसवून - यथा दिवौकसः आत्मानं - जसे देव स्वतःला पूजितात त्याप्रमाणे - (तं द्विजं) अर्हयांचक्रे - त्या ब्राह्मणांची पूजा करिता झाला. ॥२८॥

सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण - भुक्तवन्तं विधान्तं तम् उपागम्य - भोजन करून विश्रान्ति घेतलेल्या त्याच्याजवळ जाऊन - पाणिना पादौ अभिमृशन् - हाताने पायांना स्पर्श करून - अव्यग्रः - स्वस्थपणाने - तम् अपृच्छत - त्याला विचारिता झाला. ॥२९॥

द्विजवरश्रेष्ठ - हे श्रेष्ठ ब्राह्मणा - सदा संतुष्टमनसः ते - नित्य संतुष्ट अन्तःकरणाच्या तुझा - वृद्धसंमतः धर्मः - वृद्धांना मान्य असा धर्म - अतिकृच्छ्रेण न वर्तते कच्चित् - मोठया कष्टात सापडलेला नाही ना ॥३०॥

यर्हि - जर - स्वात् धर्मात् अहीयमानः - आपल्या धर्मापासून भ्रष्ट न होणारा - ब्राह्मणः - ब्राह्मण - येनकेनचित् संतुष्टः वर्तेत - जे काही मिळेल त्याने संतुष्ट असेल - तर्हि - तर - सः हि - तो धर्म खरोखर - अस्य अखिलकामधुक् (भवति) - त्याच्या इच्छा पूर्ण करणारा होतो. ॥३१॥

सुरेश्वरः अपि - देवेंद्र सुद्धा - असंतुष्टः - संतुष्ट न झाल्यामुळे - असकृत् - वारंवार - लोकान् आप्नोति - लोकांना प्राप्त होतो - अकिंचनः अपि - दरिद्री सुद्धा - संतुष्टः - संतुष्ट होऊन - सर्वाङगविज्वरः शेते - सर्व दुःखापासून मुक्त होऊन स्वस्थ झोपतो. ॥३२॥

स्वलाभसंतुष्टान् - आपोआप जे मिळेल त्यावर संतुष्ट असणार्‍या - साधून् - सज्जन - भूतसुहृत्तमान् - प्राण्यांवर पित्याप्रमाणे प्रेम करणार्‍या - निरहंकारिणः - अहंकाररहित अशा - शान्तान् - शांत - विप्रान् - ब्राह्मणांना - शिरसा असकृत् नमस्ये - मस्तकाने मी वारंवार नमस्कार करीन. ॥३३॥

ब्राह्मण - हे ब्राह्मणा - वः कुशलं कच्चित् - तुमचे कुशल आहे ना - हि - कारण - राजतः यस्य विषये - राज्य करणार्‍या ज्या राजाच्या देशात - पाल्यमानाः प्रजाः - रक्षिलेल्या प्रजा - सुखं वसन्ति - सुखाने रहातात - सः मे प्रियः - तो राजा मला प्रिय आहे. ॥३४॥

त्वं - तू - यतः - ज्या ठिकाणाहून - यदिच्छया - ज्याच्या इच्छेने - दुर्गं निस्तीर्य - समुद्र ओलांडून - इह आगतः - येथे आलास - अगुह्यं चेत् - गुप्त नसेल तर - सर्वं नः ब्रूहि - सर्व आम्हाला सांग - ते किं कार्यं करवाम - आम्ही तुझे काय काम करावे. ॥३५॥

लीलागृहीतदेहेन परमेष्ठिना - लीलेसाठी घेतला आहे अवतार ज्याने अशा परमेश्वराने - एवं संपृष्टसंप्रश्नः ब्राह्मणः - याप्रमाणे विचारिला आहे प्रश्न ज्याला असा ब्राह्मण - तस्मै सर्वं अवर्णयत् - त्या परमेश्वराला सर्व सांगता झाला. ॥३६॥

भुवनसुंदर अच्युत - हे त्रैलोक्यसुंदरा श्रीकृष्णा - शृण्वतां - ऐकणार्‍यांच्या - कर्णविवरैः निर्विश्य - कर्णांच्या छिद्रातून आत शिरून - अंगतापं हरतः ते - शरीराच्या तापाला दूर करणार्‍या तुझे - गुणान् - गुण - (च) दृशिमतां दृशां अखिलार्थलाभं रूपं - व डोळसांच्या दृष्टींना सर्व अर्थांची प्राप्ति करून देणारे रूप - श्रुत्वा - ऐकून - मे चित्तं - माझे अन्तःकरण - अपत्रपं - निर्लज्जपणे - त्वयि आविशति - तुझ्या ठिकाणी प्रविष्ट होत आहे. ॥३७॥

नृसिंह मुकुन्द - हे पुरुषश्रेष्ठा श्रीकृष्णा - का धीरा महती कुलवती कन्या - गंभीर व मोठया मनाची सत्कुलात उत्पन्न झालेली कोणती कन्या - कुलशीलरूपविद्यावयोद्रविणधामभिः - कुल, स्वभाव, स्वरूप, ज्ञान, वय, ऐश्वर्य व पराक्रम यांनी - आत्मतुल्यम् - स्वतःच्या बरोबरीच्या - नरलोकमनोभिरामम् - मनुष्यलोकांचे मनोरंजन करणार्‍या - त्वा - तुला - काले - योग्य काळी - पतिं न वृणीत - पति म्हणून वरणार नाही. ॥३८॥

अङग अम्बुजाक्ष विभो - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - तत् - म्हणून - मे भवान् पतिः वृतः खलु - माझ्याकडून तू पति म्हणून खरोखर वरिला गेला आहेस - आत्मा च अर्पितः - आणि आत्मा अर्पिला आहे - अत्र भवतः जायां विधेहि - ह्या ठिकाणी तू मला स्वतःची पत्‍नी कर - चैद्यः - शिशुपाल - मृगपतेः बलिं गोमायुवत् - सिंहाच्या वाटयाला जसा कोल्ह्याने स्पर्श करावा तसा - आरात् - दुरूनहि - वीरभागं मा अभिमर्शतु - वीरपुरुषाचा वाटा अशा मला स्पर्श न करो. ॥३९॥

यदि - जर - परेशः भगवान् - श्रीकृष्ण परमेश्वर - पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेव विप्रगुर्वर्चनादिभिः - धर्मार्थ विहिरी खणणे, होमहवन करणे, दानधर्म करणे, नियमांचे व व्रताचे पालन करणे, देव, ब्राह्मण व गुरू ह्यांची पूजा करणे इत्यादि कर्मांनी - अलं आराधितः (चेत्) - चांगल्या रीतीने जर पूजिला असेल - (तर्हि) गदाग्रजः - तर श्रीकृष्ण - एत्य मे पाणिं गृह्‌णातु - येऊन माझे पाणिग्रहण करो - अन्ये दमघोषसुतादयः (पाणिं) न (गृह्‌णन्तु) - दुसरे शिशुपालादिक माझे पाणिग्रहण न करोत. ॥४०॥

अजित - हे अजिंक्य श्रीकृष्णा - पृतनापतिभिः परीतः त्वं - सेनापतींनी वेष्टिलेला असा तू - श्वोभाविनि उद्वहने - उद्या होणार्‍या विवाहप्रसंगी - विदर्भान् गुप्तःसमेत्य - विदर्भ देशामध्ये गुप्तरीतीने येऊन - चैद्यमगधेन्द्रबलं निर्मथ्य - शिशुपालादि चैद्य राजे व जरासंधादि मागध राजे ह्यांच्या सैन्याचे मंथन करून - प्रसह्य - बलात्काराने - वीर्यशुल्कां मां - पराक्रमच आहे मूल्य जिचे अशा मला - राक्षसेन विधिना उद्वह - राक्षसविधीने वर. ॥४१॥

अन्तःपुरान्तरचरीं त्वां - अन्तःपुरात हिंडणार्‍या तुला - बन्धून् अनिहत्य कथम् उद्वहे - तुझ्या बंधूंना मारल्याशिवाय कसे वरू - इति (चेत्) उपायं प्रवदामि - असे जर तू म्हणशील तर मी तुला एक उपाय सांगते - पूर्वेद्युः महती कुलदेवियात्रा अस्ति - आदल्या दिवशी मोठी कुलदेवीची यात्रा भरते - यस्यां नववधूः बहिः गिरिजाम् उपेयात् - ज्या यात्रेमध्ये नवरीमुलगी बाहेर दर्शनाकरिता येत असते. ॥४२॥

अम्बुजाक्ष - कमलनेत्रा श्रीकृष्णा - महान्तः - महात्मे - आत्मतमोपहत्यै - स्वतःचे अज्ञान दूर करण्याकरिता - उमापतिः इव - शंकरांप्रमाणे - यस्य अङ्‌घ्रिपङ्‌कजरजःस्नपनं वाञ्छन्ति - ज्याच्या चरणकमळाच्या परागांचे स्नान इच्छितात - भवत्प्रसादं न लभेय - त्या तुमचा प्रसाद जर मला मिळाला नाही तर - व्रतकृशान् असून् जह्याम् - व्रताने कृश झालेले प्राण मी टाकून देईन - (येन) शतजन्मभिः (त्वत्प्रसादः) स्यात् - ज्यामुळे शंभर जन्मांनी तरी तुझा प्रसाद होईल. ॥४३॥

यदुदेव - हे यादवश्रेष्ठा श्रीकृष्णा - इति एते गुह्यसंदेशाः - असे हे गुप्त निरोप - मया आहृताः - मी आणिले आहेत - अत्र विमृश्य - ह्या बाबतीत विचार करून - यत् च कर्तुं (उचितम्) - जे काही करणे योग्य असेल - तत् अनन्तरं क्रियताम् - ते ह्यानंतर आपण करावे. ॥४४॥

अध्याय बावन्नावा समाप्त

GO TOP