श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३६ वा - अन्वयार्थ

अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे -

अथ तर्हि - या नंतर- अङग - हे राजा- महाककुत्कायः - मोठया वशिंडाने युक्त आहे शरीर ज्याचे असा- वृषभासुरः अरिष्टः - बैलाचे रूप घेतलेला दैत्य अरिष्ट- खुरविक्षतां महीं कम्पयन् - खुरांनी ताडन केलेल्या पृथ्वीला कापवीत - गोष्ठम् आगतः - गोकुळात आला. ॥१॥

खरतरं रम्भमाणः - कर्कश रीतीने डुरकत - च - आणि - पदा महीं विलिखन् - पायाने पृथ्वीला ओरखडीत - पुच्छं उद्यम्य - शेपटी उभारून - विषाणाग्रेण वप्राणि उद्धरन् - शिंगाच्या टोकाने टेकाडे उकरीत. ॥२॥

स्तब्धलोचनः (सन्) - स्तब्ध आहेत डोळे ज्याचे असे होत्साता - किञ्चित् किञ्चित् शकृत् मुञ्चन् - थोडेथोडे शेण गाळीत - मूत्रयन् - मुतत - सः आगतः - तो आला - यस्य - ज्याच्या - निष्ठुरेण निह्लादितेन - कर्कश अशा डुरकण्याने ॥३॥

गवां नृणां (च) गर्भाः - गाईंचे व मनुष्य स्त्रियांचे गर्भ - भयेन - भीतीने - अकालतः - अवेळी - पतन्ति स्रवन्ति स्म वै - पतन पावले व गळून पडले - यस्य ककुदि - ज्याच्या वशिंडावर - घनाः (अपि) - ढगहि - अचलशङ्‌कया - पर्वत आहे असे वाटून - निर्विशन्ति - शिरतात. ॥४॥

राजन् - हे राजा - गोपाः गोप्यः च - गोप व गोपी - तीक्ष्णशृङगं तं उद्वीक्ष्य - अणकुची असलेली आहेत शिंगे ज्याची अशा त्याला पाहून - तत्रसुः - भ्याल्या - भीताः पशवः - भ्यालेली जनावरे - गोकुलं संत्यज्य - गौळवाडा सोडून - दुद्रुवुः - पळाली. ॥५॥

ते सर्वे - ते सर्व लोक - कृष्ण कृष्ण इति (उक्त्वा) - हे कृष्णा हे कृष्णा असे म्हणून - गोविंद शरणं ययुः - श्रीकृष्णाला शरण गेले - भगवान् अपि - ही - श्रीकृष्ण तत् गोकुलं भयविद्रुतं वीक्ष्य - तो गौळवाडा भीतीने पळून गेलेला पाहून ॥६॥

मा भैष्ट इति गिरा आश्वास्य - भिऊ नका अशा शब्दाने आश्वासन देऊन - (तं) वृषासुरं उपाह्‌वयत् - त्या बैलाचे रूप घेतलेल्या राक्षसाला जवळ बोलाविता झाला - मन्द - हे मूर्खा - असत्तम - हे अत्यंत दुष्टा - गोपालैः पशुभिः च त्रासितैः किं (भवति) - गोपाळ व जनावरे यांना भिवविल्याने काय होणार. ॥७॥

अहं - मी - त्वद्विधानां दुरात्मनां दुष्टानां - तुझ्या सारख्या दुष्ट आहे अंतःकरण ज्यांचे अशा दुष्टांच्या - बलदर्पहा (अस्मि) - बळाचा गर्व नष्ट करणारा आहे - इति (उक्त्वा) - असे बोलून - तलशब्देन अरिष्टं कोपयन् - टाळीच्या ध्वनीने अरिष्टासुराला क्रोध उत्पन्न करीत - आस्फोटय - दंड थोपटून - अच्युतः हरिः - भगवान श्रीकृष्ण - सख्युः अंसे - मित्राच्या खांद्यावर - भुजाभोगं प्रसार्य - हात सरळ पसरून - अवस्थितः - स्वस्थ राहिला. ॥८॥

एवं कोपितः सः अरिष्टः अपि - याप्रमाणे डिवचलेला अरिष्टहि - क्रुद्धः - रागावलेला असा - खुरेण अवनिं उल्लिखन् - खुराने भूमी ओरखडीत - उद्यपुच्छभ्रमन्मेघः - उभारलेल्या पुच्छामुळे फिरत आहेत मेघ ज्याच्या असा - कृष्णं उपाद्रवत् - श्रीकृष्णावर धावला. ॥९॥

अग्रन्यस्तविषाणाग्रः - पुढे केली आहेत शिंगांची टोके ज्याने असा - स्तब्धासृग्लोचनः - स्तब्ध आहेत रक्तासारखे डोळे ज्याचे असा - अरिष्टः - अरिष्टासुर - अच्युतं कटाक्षिप्य - श्रीकृष्णाकडे वाकडी दृष्टी फेकून - यथा इंद्रमुक्तः अशनिः (तथा) - जसे इंद्राने सोडलेले वज्र त्याप्रमाणे - तूर्णं आद्रवत् - त्वरेने धावला. ॥१०॥

यथा गजः प्रतिगजं (तथा) - ज्याप्रमाणे एक हत्ती प्रतिस्पर्धी हत्तीला त्याप्रमाणे - सः भगवान् - तो श्रीकृष्ण - तं शृङगयोः गृहीत्वा - त्याला दोन्ही शिंगांच्या ठिकाणी धरून - अष्टादशपदानि - अठरा पावले - प्रत्यपोवाह - मागे हटविता झाला. ॥११॥

भगवताअपविद्धः - श्रीकृष्णाने मागे हटविलेला असा - स्विन्नसर्वाङगः - घामाने भिजले आहे सर्व शरीर ज्याचे असा - क्रोधमूर्च्छितः - रागाने भरून गेलेला - निश्वसन् - सुस्कारे टाकीत - सः - तो अरिष्टासुर - पुनः उत्थाय - पुनः उठून - सत्वरः आपतत् - त्वरेने धावून आला. ॥१२॥

सः - तो - आपतन्तं तं - धावून येणार्‍या त्याला - शृङगयोः निगृह्य - दोन्ही शिंगांच्या ठिकाणी पकडून - पदा समाक्रम्य - पायाने दाबून - भूतले निपात्य - जमिनीवर पाडून - यथा आर्द्रं अम्बरं (तथा) - ज्याप्रमाणे ओले वस्त्र त्याप्रमाणे - निष्पीडयामास - पिळून काढिता झाला - (विषाणं) कृत्वा - शिंग उपटून - (तेन) विषाणेन - त्या शिंगाने - (अरिष्टं) जघान - अरिष्टासुराला मारिता झाला - सः अपतत् - तो अरिष्ट पडला. ॥१३॥

असृक् वमन् - रक्त ओकत - मूत्रशकृत् समुत्सृजन् - मूत व विष्ठा गाळीत - अनवस्थितेक्षणः - स्थिर नाहीत डोळे ज्याचे असा - पादान् क्षिपन् - पाय आपटीत - कृच्छ्‌रं जगाम - कष्ट पावला - अथ - आणि मग - निऋतेः क्षयं (जगाम) - मृत्यूच्या घरी गेला - पुष्पैः किरन्तः सुराः - फुलांनी वर्षाव करणारे देव - हरिं ईडिरे - श्रीकृष्णाला स्तविते झाले. ॥१४॥

एवं - याप्रमाणे - ककुद्मिनं हत्वा - बैलाला मारून - स्वजातिभिः स्तूयमानः - स्वतःच्या बांधवांकडून स्तविला गेलेला - गोपीनां नयनोत्सवः - गोपींच्या नेत्रांना आनंद देणारा असा - सबलः (सः) - बळरामासह तो कृष्ण - गोष्ठं विवेश - गोकुळात शिरला. ॥१५॥

अद्‌भतकर्मणा कृष्णेन - आश्चर्यकारक आहेत कृत्ये ज्याची अशा श्रीकृष्णाने - अरिष्टे दैत्ये निहते - अरिष्ट राक्षस मारिला असता - अथ - नंतर - देवदर्शनः भगवान् - असे देवाप्रमाणे दर्शन असणारा भगवान - नारदः कंसाय आह - नारद कंसाला म्हणाला ॥१६॥

कन्यां - योगमायारूपी कन्या - यशोदायाः सुतां - ही यशोदेची मुलगी - च कृष्णं एव - आणि कृष्णच - देवक्याः (पुत्रं) - देवकीचा पुत्र - च रामं रोहिणीपुत्रं - आणि बळराम हा रोहिणीचा मुलगा - बिभ्यता वसुदेवेन (तौ) - भ्यालेल्या वसुदेवाने बळराम व श्रीकृष्ण ह्या दोघांना ॥१७॥

स्वमित्रे नन्देन्यस्तौ - आपला मित्र जो नंद त्याजवळ ठेव म्हणून ठेविले - याभ्यां वै ते पुरुषाः हताः - ज्या दोघांनीच तुझे पुरुष मारून टाकिले - भोजपतिः - कंस - तत् निशम्य - ते ऐकून - क्रोधात् प्रचलितेन्द्रियः (अभवत्) - क्रोधाने कावराबावरा झाला. ॥१८॥

वसुदेवजिघांसया - वसुदेवाला मारण्याच्या इच्छेने - निशातं असिं आदत्त - तीक्ष्ण तरवार घेता झाला - नारदेन निवारितः - नारदाकडून निवारिला गेला - तत्सुतौ - त्या वसुदेवाचे दोघे मुलगे - आत्मनः मृत्युं - आपला मृत्यु - ज्ञात्वा - जाणून ॥१९॥

लोहमयैः पाशैः - लोखंडांच्या पाशांनी - भार्यया सह - स्त्री सह - (तं) बबन्ध - त्या वसुदेवाला बांधिता झाला - देवर्षौ प्रतियाते - देवर्षि परत गेल्यावर - कंसः केशिनं आभाष्य - कंस केशीला जवळ बोलावून. ॥२०॥

भवता रामकेशवौ हन्येताम् - तू राम-कृष्णांना ठार मारावे - इति (उक्त्वा) - असे सांगून - (तं) प्रेषयामास - त्याला पाठविता झाला - ततः - नंतर - मुष्टिकचाणूरशलतोशलकादिकान् - मुष्टिक, चाणूर, शल, तोशलक इत्यादिकांना. ॥२१॥

अमात्यान् - प्रधानांना - हस्तिपान् - माहुतांना - समाहूय - एकत्र बोलावून - भोजराट् आह - भोजराज कंस म्हणाला - भो भो वीर चाणूरमुष्टिकौ - हे पराक्रमी चाणूरा व मुष्टिका - एतत् निशम्यताम् - हे ऐका. ॥२२॥

किल - खरोखर - नन्दव्रजे - नंदाच्या गौळवाडयात - आनकदुन्दुभेः सुतौ - वसुदेवाचे दोन्ही मुलगे - रामकृष्णौ आसाते - बळराम व कृष्ण हे राहात आहेत - ततः - त्यापासून - मह्यं मृत्यूः निदर्शितः - मला मृत्यू सांगितलेला आहे. ॥२३॥

भवद्‌भयां - तुम्हां दोघांकडून - इह सम्प्राप्तौ (तौ) - येथे आलेले ते दोघे - मल्ललीलया - मल्लांच्या युक्तीने - हन्येताम् - ठार मारले जावे - विविधाः मञ्चाः क्रियन्ताम् - निरनिराळ्या प्रकारची उच्चासने सिद्ध करावी - मल्लरङगपरिश्रिताः - मल्लांच्या आखाडयाच्या सभोवार बसलेले - सर्वे पौराः - सर्व नागरिक लोक - जानपदाः - खेडयापाडयातील लोक - स्वैरसंयुगं पश्यन्तु - मोकळेपणाने होणारे युद्ध पाहू द्या. ॥२४॥

भद्र महामात्र - हे सज्जना महामात्रा - त्वया - तू - कुवलयापीडः द्विपः - कुवलयापीड हत्ती - रङगद्वारि उपनीयताम् - आखाडयाच्या दारात न्यावा - तेन - त्याच्याकडून - मम अहितो जहि - माझे दोघे शत्रू ठार मार. ॥२५॥

चतुर्दश्यां - चतुर्दशीच्या दिवशी - यथविधि - यथाशास्त्र - धनुर्यागः - धनुर्याग - आरभ्यताम् - आरंभावा - भूतराजाय मीढुषे - प्राणिमात्रांचा राजा जो वर देणारा शंकर त्याच्यासाठी - मेध्यान् पशून् - यज्ञाला योग्य अशा पशूंना - विशसन्तु - बळी देवोत. ॥२६॥

अर्थतन्त्रज्ञः (कंसः) - राजकारण जाणणारा असा कंस - इति आज्ञाप्य - अशी आज्ञा करून - ततः - नंतर - यदुङगवं अक्रूरं आहूय - यादवांमध्ये श्रेष्ठ अशा अक्रूराला बोलावून - (निजेन) पाणिना तस्य पाणिं गृहीत्वा - आपल्या हाताने त्याचा हात धरून - उवाच ह - म्हणाला. ॥२७॥

भो भो दानपते - हे अक्रूरा - मह्यं मैत्रं क्रियतां - माझ्याशी मैत्री कर - हि - कारण - भोजवृष्णिषु - भोज व वृष्णि यांमध्ये - त्वत्तः अन्यः - तुझ्याहून दुसरा - आदृतः - आदराने युक्त असा - हिततमः - अत्यंत हितकारक असा - (कः अपि) न विद्यते - कोणीही नाही. ॥२८॥

अतः - यास्तव - सौ‌म्य - हे मित्रा - यथा विभुः इन्द्रः - जसा पराक्रमी इंद्र - विष्णुं आश्रित्य - श्रीविष्णूचा आश्रय करून - स्वार्थं अध्यगमत् - स्वतःचे हित मिळविता झाला - कार्यगौरवसाधनं - मोठेपणाने कार्य सिद्धीस नेणार्‍या - त्वा आश्रितः (अस्मि) - तुझा आश्रय केला आहे. ॥२९॥

नन्दव्रजं गच्छ - नंदाच्या गौळवाडयात जा - तत्र आनकदुन्दुभेः सुतौआसाते - तेथे वसुदेवाचे दोन मुलगे रहात आहेत - तौ - त्यांना - अनेन रथेन - ह्या रथाने - इह आनय - येथे आण - मा चिरं - उशीर लावू नको. ॥३०॥

वैकुण्ठसंश्रयैः देवैः - श्रीविष्णूचा आश्रय करणार्‍या देवांनी - मे मृत्यूः निसृष्टः किल - माझा मृत्यू निश्चयाने उत्पन्न केला आहे - साभ्युपायनैः नन्दाद्यैः गोपैः समं - देणग्यांनी युक्त अशा नंदादिक गोपांसह - तौ - त्या दोघांना - आनय - घेऊन ये. ॥३१॥

इहआनीतौ (तौ) - येथे आणिलेल्या त्या दोघांना - कालकल्पेन हस्तिना - काळासारख्या हत्तीकडून - घातयिष्ये - मी मारवीन - यदि ततः (तौ) मुक्तौ - जर त्यातून ते सुटले - वैद्युतोपमैः मल्लैः - वज्रदेही मल्लांकडून - घातये - मी मारवीन. ॥३२॥

तयोः निहतयोः - ते दोघे मारिले असता - तप्तान् - दुःखी झालेल्या - वसुदेवपुरोगमान् - वसुदेव आहे प्रमुख ज्यांमध्ये अशा - वृष्णिभोजदशार्हकान् - वृष्णि, भोज व दाशार्ह यांना - तद्‌बन्धून् - त्यांच्या भाऊबंदांना - निहनिष्यामि - मी ठार मारीन. ॥३३॥

राज्यकामुकं स्थविरं पितरं उग्रसेनं - राज्यलोभी असा म्हातारा पिता जो उग्रसेन त्याला - तदभ्रातरं देवकं - त्याचा भाऊ जो देवक त्याला - च - आणि - ये अन्ये मम विद्विषः (सन्ति) - जे दुसरे माझे शत्रू आहेत - (तान्) निहनिष्यामि - त्यांना मी ठार मारीन. ॥३४॥

मित्र - हे मित्रा अक्रूरा - ततः एषा मही - तेणे करूनही पृथ्वीवर - नष्टकण्टका भवित्री - जिच्यातून शत्रू नाहीसे झाले आहेत अशी होईल - मम गुरूः जरासन्धः - माझा गुरु जरासंध - दयितः सखा द्विविदः - प्रेमळ असा मित्र द्विविद. ॥३५॥

शम्बरः - शंबर - नरकः - नरक - बाणः - बाण - मयि एवकृतसौहृदाः (सति) - माझ्या ठिकाणीच केली आहे मैत्री ज्यांनी असे आहेत - अहं - मी - तैः - त्यांच्या योगाने - सुरपक्षीयान्‌नृपान् हत्वा - देवांच्या पक्षाला असलेल्या राजांना मारून - महीं भोक्ष्ये - पृथ्वी उपभोगीन. ॥३६॥

एतत् ज्ञात्वा - हे जाणून - अर्भकौ रामकृष्णौ - बालवयाच्या अशा त्या राम व कृष्णांना - धनुर्मखनिरीक्षार्थं - धनुर्याग पाहण्यासाठी - यदुपुरश्रियं द्रष्टु - यादवांच्या नगरीची शोभा पाहण्यासाठी - क्षिप्रं इह आनय - लवकर येथे आण. ॥३७॥

राजन् - हे राजा - स्वावद्यमार्जनं - स्वतःच्या मृत्यूचा निरास करणारा - तव (एतत्) मनीषितं सध्य्रक् (अस्ति) - असा तुझा हा विचार चांगला आहे - सिद्‌ध्‌यसिद्‌ध्‌योः - जय किंवा पराजय यांविषयी - समं (भावं) कुर्यात् - सारखीच बुद्धि ठेवावी - हि - कारण - दैवं (एव) फलसाधनं (अस्ति) - दैव हेच फल देणारे आहे. ॥३८॥

जनः - मनुष्य - उच्चैःमनोरथान् करोति - मोठमोठे मनातील बेत करीत असतो - (तान्) दैवहतान् (अपि पश्यति) - ते दैवाने हाणून पाडिलेलेहि पाहतो - (सः) हर्षशोकाभ्यां युज्यते - तो हर्ष आणि शोक यांनी युक्त होत असतो - तथा अपि - तरी सुद्धा - तेआज्ञां करोमि - मी तुझी आज्ञा पाळितो. ॥३९॥

एवं अक्रूरं आदिश्य - याप्रमाणे अक्रूराला आज्ञा करून - च - आणि - मन्त्रिणः विसृज्य - मंत्र्यांना निरोप देऊन - सः कंसः (स्वं) गृहं प्रविवेश - तो कंस आपल्या घरात शिरला - तथा - तसाच - अक्रूरः (अपि) स्वं आलयं (प्रविवेश) - अक्रूरहि आपल्या घरी गेला. ॥४०॥

अध्याय छत्तिसावा समाप्त

GO TOP