|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३३ वा - अन्वयार्थ
महारास - अंग - हे राजा - तत् (तदा) - त्यावेळी - भगवतः - भगवंताची - इत्थं सुपेशलाः - अशाप्रकारची अत्यंत मोहक - वाचः श्रुत्वा - अशी भाषणे ऐकून - उपचिताशिषः गोप्यः - वाढल्या आहेत इच्छा ज्यांच्या अशा गोपी - विरहजं तापं जहुः - वियोगामुळे झालेला ताप टाकित्या झाल्या. ॥१॥ प्रीतैः - आनंदित झालेल्या अशा - अन्योन्याबद्धबाहुभिः - एकमेकींचे धरले आहेत हात ज्यांनी अशा - अनुव्रतैः - एकनिष्ठ अशा - स्त्रीरत्नैः - सुंदर स्त्रियांनी - अन्वितः गोविन्दः - युक्त झालेला श्रीकृष्ण - तत्र - त्याठिकाणी - रासक्रीडां आरभत - रास नामक क्रीडेला आरंभ करता झाला. ॥२॥ द्वयोः द्वयोः प्रविष्टेन - प्रत्येक जोडीमध्ये प्रविष्ट झालेल्या - योगेश्वरेण कृष्णेन - योगिश्रेष्ठ श्रीकृष्णाकडून - कण्ठे गृहीतानां - गळ्यात आलिंगिलेल्या - तासां - त्या गोपींचा - गोपीमंडलमंडितः - गोपींच्या फेर धरण्यामुळे सुंदर दिसणारा असा - रासोत्सवः संप्रवृत्तः - रास नावाचा आनंदाचा खेळ चालू झाला - यं - ज्या श्रीकृष्णाला - स्त्रियः - सर्व स्त्रिया - स्वनिकटं मन्येरन् - आपल्या जवळ असलेला असा मानीत आहेत - तावत् - तितक्यात - नभः - आकाश - औत्सुक्यापहृतात्मनां - उत्सुकतेने हरण केली आहेत अंतःकरणे ज्यांची अशा - सदाराणाम् - स्त्रियांसह असलेल्या - दिवौकसाम् - देवांच्या - विमानशतसंकुलम् (अभवत्) - विमानांच्या शेकड्यांनी गजबजून गेले. ॥३-४॥ ततः - नंतर - दुन्दुभयः नेदुः - दुंदुभि वाजत्या झाल्या - पुष्पवृष्ट्यः निपेतुः - फुलांचे वर्षाव होऊ लागले - सस्त्रीकाः गन्धर्वपतयः - स्त्रियांसह असलेले गंधर्वाचे नायक - अमलं तद्यशः जगुः - निर्मल असे त्या कृष्णाचे यश गाते झाले. ॥५॥ रासमण्डले - रासक्रीडेच्या फेरामध्ये - सप्रियाणां योषिताम् - प्रियकरासह असलेल्या स्त्रियांच्या - वलयानां नूपुराणां किंकिणीनां च - कंकणांचा व पैजणांच्या घागर्यांचा - तुमुलः शब्दः अभूत् - मोठा ध्वनि उत्पन्न झाला॥६॥ हैमानां मणीनां मध्ये - सोन्याच्या मण्यांमध्ये - यथा महामरकतः (तथा) - जसे मोठे पाचूचे रत्न त्याप्रमाणे - तत्र - त्याठिकाणी - ताभिः - त्या स्त्रियांच्या योगाने - भगवान् देवकीसुतः - भगवान, श्रीकृष्ण - अतिशुशुभे - अतिशय शोभला. ॥७॥ पादन्यासैः - पायांच्या हालचालींनी - भुजविधुतिभिः - हाताच्या हालविण्यांनी - सस्मितैः भ्रूविलासैः - हास्यपूर्वक चाललेल्या भुवयांच्या विलासांनी - भज्यन्मध्यैः - वाकणार्या मध्यभागांनी - चलकुचपटैः - हालणार्या स्तनांवरील वस्त्रांनी - गण्डलोलैः - आणि गालांवर लोंबणार्या - कुण्डलैः (च उपलक्षिताः) - कुंडलांनी युक्त अशा - स्विद्यन्मुख्यः - घामाने डवरली आहेत मुखे ज्यांची अशा - कबररशनाग्रन्थयः - वेण्यांना व कमरपट्यांना आहेत गांठी ज्याच्या अशा - तं गायन्त्यः - त्यांचे गायन करणार्या - कृष्णवध्वः - श्रीकृष्णाशी खेळणार्या स्त्रिया - मेघचक्रे तडितः इव विरेजुः - मेघमंडळात जशा विजा तशा शोभल्या. ॥८॥ कृष्णाभिमर्शमुदिताः - श्रीकृष्णाच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या - रतिप्रियाः - खेळाची आवड असणार्या - रक्तकण्ठयः - प्रेमळ आहे कंठ ज्यांचा अशा - नृत्यमानाः (ताः) - नाचणार्या अशा त्या स्त्रिया - उच्चैः जगुः - मोठयाने गात्या झाल्या - येन गीतेन इदं (जगत्) आवृतम् - ज्या गायनाने हे जग व्यापून गेले. ॥९॥ काचित् - कोणीएक स्त्री - मुकुन्देन समं - श्रीकृष्णाच्या बरोबर - अमिश्रिताः - कृष्णाच्या स्वरांशी न मिळणारे - स्वरजातीः उन्निन्ये - असे आलाप उंच स्वराने काढती झाली - प्रीयता तेन - संतुष्ट झालेल्या त्या कृष्णाने - साधु साधु इति पूजिता (सा) - ठीक, चांगले अशा प्रकारे गौरविलेली - तत् एव ध्रुवं उन्निन्ये - तोच आलाप ध्रुव तालावर उंच सुराने काढिती झाली - च - आणि - (सः) तस्यै बहुमानं अदात् - तो तिला फार मान देता झाला. ॥१०॥ रासपरिश्रान्ता - रासक्रीडेने थकलेली अशी - श्लधद्वलयमल्लिका - सैल झाली आहेत कंकणे मोगरीचे गजरे जिचे अशी - काचित् - कोणीएक स्त्री - बाहुना - हाताने - पार्श्वस्थस्य गदाभृतः - बाजूला उभा असलेल्या श्रीकृष्णाचा - स्कन्धं जग्राह - खांदा धरती झाली. ॥११॥ तत्र - त्यापैकी एक स्त्री - उत्पलसौरभं - कमळाप्रमाणे आहे सुवास ज्याचा अशा - चन्दनालिप्तं - चंदनाने माखलेल्या - अंसगतं - खांद्यावर ठेवलेल्या - कृष्णस्य बाहुं - श्रीकृष्णाच्या हाताला - आघ्राय - हुंगून - हृष्टरोमा (सती) - उभे राहिले आहे रोमांच जीचे अशी होत्साती - चुचुम्ब ह - चुंबिती झाली. ॥१२॥ (स्वस्य) गण्डे - आपल्या गालाजवळ - नाटयविक्षिप्तकुण्डलत्विषमण्डितं - नाचताना हालणार्या कुंडलांच्या कांतीने - गण्डं - शोभणारा गाल - संदधत्याः कस्याश्चित् - भिडविणार्या कोण्या एका स्त्रीला - ताम्बूलचर्वितम् अदात् - विडा चावून देता झाला. ॥१३॥ कूजन्नूपूरमेखला - अस्पष्ट शब्द करीत आहेत पैंजण व कमरपट्टा जिचा अशी - नृत्यन्ती गायती श्रान्ता - नाचून व गाऊन दमलेली - पार्श्वस्था काचित् - बाजूला उभी असलेली कोणी एक स्त्री - शिवं - शुभ असा - अच्युतहस्ताब्जम् - श्रीकृष्णाचा कमळासारखा हात - स्तनयोः अधात् - स्तनांवर ठेविती झाली. ॥१४॥ श्रियः एकान्तवल्लभं अच्युतं - लक्ष्मीच्या अत्यंत आवडत्या अशा श्रीकृष्णाला - कान्तं लब्ध्वा - पति म्हणून मिळवून - तद्दोर्भ्यां गृहीतकण्ठयः - त्याच्या दोन्ही हातांनी आलिंगलेल्या अशा - गोप्यः - गोपी - तं गायन्त्यः विजह्लिरे - त्याचे गुण गात खेळत्या झाल्या. ॥१५॥ कर्णोत्पलालकविटङकपोल - कानांवरील कमळे, कुरळे केस, सुंदर असे गाल - घर्मवत्क्रश्रियः - व घर्मबिंदु यांच्या योगाने मुखावर शोभा आली आहे ज्याच्या अशा - स्वकेशस्रस्तस्रजः - स्वतःच्या केसातून गळून पडत आहेत फुलांचे गजरे ज्यांच्या अशा - गोप्यः - गोपी - भ्रमरगायकरासगोष्ठ्यां - ज्याठिकाणी भुंगे गवई आहेत अशा रासक्रीडेच्या स्थानी - वलयनूपुरघोषवाद्यैः - कंकणे व पैंजणांच्या घागर्या ह्याच वाद्यांच्या योगाने - भगवता समं ननृतुः - श्रीकृष्णाबरोबर नाचल्या. ॥१६॥ रमेशः - लक्ष्मीपति श्रीकृष्ण - एवं - याप्रमाणे - परिष्वङगकराभिमर्शस्निग्धेक्षण - आलिंगन, करस्पर्श, प्रेमळ दृष्टीने पाहणे, - उद्दामविलासहासैः - उत्कट अशा शृंगार चेष्टा, हसणे यांच्या योगाने - व्रजसुन्दरीभिः (सह) - गोकुळातील सुंदर स्त्रियांसह - यथा स्वप्रतिबिम्बविभ्रमः - ज्याप्रमाणे स्वतःच्या प्रतिबिंबाशी खेळणारे - अर्भकः (तथा) - लहान मूल त्याप्रमाणे - रेमे - खेळला. ॥१७॥ कुरूद्वह - हे परिक्षित राजा - तदङ्गसङ्ग - याच्या शरीराच्या स्पर्शाने - प्रमुदाकुलेन्द्रियाः - झालेल्या अत्यानंदाने व्याप्त झाली आहेत इंद्रिये ज्यांची अशा - विस्रस्तमालाभरणाः - विगलित झाली आहेत माला व अलंकार ज्यांचे अशा - व्रजस्त्रियः - गोकुळवासी स्त्रिया - केशान् दुकूलं कुचपट्टिकां वा - केसांना, रेशमी वस्त्रांना किंवा स्तनांवरील वस्त्राला - अञ्जः प्रतिव्योढुः - सहज रीतीने परत ओढण्यास - अलं न (बभूवुः) - समर्थ झाल्या नाहीत. ॥१८॥ कृष्णविक्रीडितं वीक्ष्य - कृष्णाचा खेळ पाहून - खेचरस्त्रियः - देवांच्या स्त्रिया - कामार्दिताः (सत्यः) - कामवासनेने पीडित होत्सात्या - मुमुहुः - मूर्च्छित झाल्या - च - आणि - सगणः शशाङकः - तारांगणासह चंद्र - विस्मितः अभवत् - आश्चर्यचकित झाला. ॥१९॥ सः भगवान् - तो श्रीकृष्ण - आत्मारामः (सन्) अपि - स्वसंतुष्ट असा असताहि - यावत्यः गोपयोषितः (आसन्) - जितक्या गोपी होत्या - तावन्तं आत्मानं कृत्वा - तितकी आपली स्वरूपे करून - ताभिः (सह) लीलया रेमे - त्यांच्या बरोबर मौजेने खेळला. ॥२०॥ अङग - हे राजा - करुणः सः - दयाळू असा तो - प्रेम्णा - प्रेमाने - अतिविहारेण श्रान्तानां तासां वदनानि - अति क्रीडेने थकलेल्या त्या स्त्रियांची मुखे - शन्तमेन - अत्यंत कल्याणकारक - पाणिना प्रासृजत् - अशा हाताने पुसता झाला. ॥२१॥ तत्कररुहस्पर्शप्रमोदाः - त्याच्या हाताच्या नखांच्या स्पर्शाने झाला आहे आनंद ज्यांना अशा - स्फुरत्पुटकुण्डल - चकचकणार्या सोन्याच्या कुंडलांच्या, - कुन्तलत्विङगण्डश्रिया - कुरळ्या केसांच्या प्रभेने युक्त असलेल्या गालांच्या शोभेने अमृताप्रमाणे झालेल्या - सुधिनहासनिरीक्षणेन - हास्याने युक्त अशा निरखून पाहण्याने - (तस्य) ऋषभस्य मानं दधत्यः - त्या श्रेष्ठ पुरुषाचा सन्मान करणार्या - (ताः) गोप्यः - त्या गोपी - (तेन) कृतानि पुण्यानि (कर्माणि) जगुः - त्याने केलेली पुण्यकारक कृत्ये गात्या झाल्या. ॥२२॥ ताभिः युतः - त्या स्त्रियांनी युक्त असा - कुचकुङ्कुमरञ्जितायाः - स्तनांवरील केशराने रंगलेल्या अशा - अङगसङगघृष्टस्रजः - शरीराच्या स्पर्शाने चुरगळलेल्या माळेच्या - (सम्बन्धिभिः) गन्धर्वपालिभिः - बरोबरच्या गन्धर्वांच्या नायकांप्रमाणे गाणार्या भुंग्याकडून - अनुद्रुतः - पाठलाग केला गेलेला - श्रान्तः सः - दमलेला तो श्रीकृष्ण - श्रमं अपोहितुम - थकवा घालविण्यासाठी - भिन्नसेतु - फोडला आहे बांध ज्याने असा - गजीभिः (युतः) - हत्तिणींनी युक्त असलेला - इभराट् इव - हत्ती जसा तसा - वाः अविशत् - पाण्यात शिरला. ॥२३॥ अङग - हे राजा - स्वयं स्वरतिः (अपि) - स्वतः संतुष्ट असताहि - गजेन्द्रलीलः सः - मोठया हत्तीप्रमाणे आहेत लीला ज्याच्या असा श्रीकृष्ण - अत्र - ह्याठिकाणी - प्रहसतीभिः युवतिभिः - थट्टा करणार्या तरुण स्त्रियांकडून - इतः ततः - इकडून तिकडून - अलं परिषिच्यमानः - अतिवेगाने सभोवार शिंपडला गेलेला - प्रेम्णा ईक्षितः - प्रेमाने पाहिला गेलेला - कुसुमवर्षिभिः - फुलांचा वर्षाव करणार्या - वैमानिकैः ईडयमानः - देवांकडून स्तविला गेलेला असा - अम्भसि रेमे - पाण्यात खेळला. ॥२४॥ ततः - नंतर - यथा - ज्याप्रमाणे - करेणुभिः (युतः) मदच्युत् द्विरदः - हत्तीणींनी युक्त असा, मद गाळणारा हत्ती - भृङगप्रमदागणावृतः (सः) - भुंग्यांच्या व स्त्रियांच्या समुदायांनी व्यापलेला असा तो - जलस्थल - पाण्यातील व जमीनीवरील - प्रसूनगन्धनिल - फुलांनी सुवासिक झालेल्या वार्याने व्यापिली आहेत - जुष्टदिक्तटे - दिशांची टोके ज्यांची अशा - कृष्णोपवने - यमुनेच्या तीरावरील उपवनात - चचार - फिरला. ॥२५॥ एवं - याप्रमाणे - सत्यकामः - खरा आहे संकल्प ज्याचा असा - अनुरताबलागणः - प्रेमयुक्त झाला आहे स्त्रियांचा समूह ज्याच्याठिकाणी असा - आत्मनि अवरुद्धसौरतः - आपल्या ठिकाणी आवरून धरले आहे वीर्य ज्याने असा - सः - तो कृष्ण - एवम् - याप्रमाणे - शशाङ्कांशुविराजताः - चंद्राच्या किरणांनी सुशोभित झालेल्या - शरत्काव्यकथारसाश्रयाः - शरत् कालासंबंधी काव्यांच्या रसांना आश्रयभूत अशा - (ताः) सर्वाः निशाः - त्या सर्व रात्री - सिषेवे - उपभोगिता झाला. ॥२६॥ भगवान् जगदीश्वरः - भगवान श्रीविष्णु - धर्मस्य संस्थापनाय - धर्माच्या उत्तम प्रकारच्या स्थापनेसाठी - च - आणि - इतरस्य प्रशमाय - इतर जो अधर्म त्याच्या नाशासाठी - अंशेन अवतीर्णः (आसीत्) - अंशरूपाने अवतरला होता. ॥२७॥ ब्रह्मन् - हे शुकाचार्या - धर्मसेतूनां - धर्माच्या मर्यादांचा - वक्ता कर्ता भिरिक्षिता च सः - उपदेशक, उत्पादक व संरक्षक असा तो - प्रतीपं परदाराभिमर्शनम् - विपरीत असे दुसर्याच्या स्त्रियांचे सेवन - कथं आचरत् - कसे आचरता झाला. ॥२८॥ आप्तकामः - पूर्ण झालेल्या आहेत सर्व इच्छा ज्याच्या असा - यदुपतिः - श्रीकृष्ण - किमभिप्रायः - कोणत्या उद्देशाने - जुगुप्सितं कृतवान् - निंद्य कर्म करता झाला - सुव्रत - हे सदाचरणी शुकाचार्या - एतं नः संशयं छिन्धि - या आमच्या संशयाला तू छेदून टाक. ॥२९॥ ईश्वराणां धर्मव्यतिक्रमः दृष्टः - समर्थांनी केलेले धर्माचे उल्लंघन पाहण्यात आहे - च - आणि - साहसं (अपि) - धाडसहि पाहण्यात आहे - यथा सर्वभुजः वह्नेः (तथा) - ज्याप्रमाणे सर्वभक्षक अग्नीचे त्याप्रमाणे - तेजीयसां (तत्) दोषाय न (भवति) - तेजस्वी लोकांचे ते कृत्य दोषास पात्र होत नाही. ॥३०॥ अनीश्वरः - असमर्थ अशा मनुष्याने - जातु - केव्हाही - मनसा अपि - मनानेसुद्धा - न समाचरेत् - आचरण करू नये - मौढयात् (एतत्) आचरन् (पुरुषः) - मूर्खापणाने याचे आचरण करणारा मनुष्य - (यथा अब्धिजं विषं पिबन्) - ज्याप्रमाणे समुद्रमंथनापासून झालेले विष पिणारा शंकरावाचून - अरुद्रः (तथा) - अन्य मनुष्य त्याप्रमाणे - विनश्यति - नाश पावतो. ॥३१॥ ईश्वराणां वचः सत्यं (अस्ति) - समर्थांचे भाषण खरे असते - तथा आचरितं क्वचित् एव (अस्ति) - त्याप्रमाणे आचरण क्वचितच असते - बुद्धिमान् - शहाण्या मनुष्याने - यत् - जे - तेषां स्ववचोयुक्तं (अस्ति) - त्याच्या भाषणाशी जुळणारे असेल - तत् - ते - समाचरेत् - आचरण करावे. ॥३२॥ प्रभो - हे राजा - निरहंकारिणां एषां - अहंकाररहित अशा समर्थांना - इह - या जगात - कुशलाचरितेन - उत्तम आचरणाने - (कश्चित्) स्वार्थः - काही स्वतःचे हित - वा - किंवा - विपर्ययेण (कश्चित्) अनर्थः - विपरीत वर्तनाने काही अनहित - न विद्यते - नसते. ॥३३॥ ईशितव्यानां - संरक्षण करण्यास योग्य अशा - तिर्यङमर्त्यदिवौकसां - पशु, पक्षी इत्यादि प्राणी मनुष्ये व देव या - अखिलसत्त्वानां - सर्व प्राणिमात्रांच्या - ईशितुः - नियामकाला - कुशलाकुशलान्वयः - चांगल्यावाईटांचा संबंध - नास्ति इति किमुत (वक्तव्यम्) - नसतो काय हे आणखी सांगावयास पाहिजे. ॥३४॥ यत्पादपङकजपरानिषेवतृप्ताः - ज्यांच्या चरणकमळांच्या परागांच्या सेवनाने तृप्त झालेले - योगप्रभाव - योगाच्या सामर्थ्याने - विधुताखिलकर्मबन्धाः - नष्ट झाली आहेत कर्मांची बंधने ज्यांची असे - मुनयः अपि - ऋषीसुद्धा - न नह्यमानाः (सन्तः) - न बांधले जाणारे होत्साते - स्वैरं चरन्ति - यथेच्छ संचार करितात - इच्छया - स्वेच्छेने धारण केले आहे - आत्तवपुषः तस्य - शरीर ज्याने अशा श्रीकृष्णाला - बन्धः कुतः एव (अस्ति) - बंध कोठून असणार. ॥३५॥ यः - जो - गोपीनां तत्पतीनां च - गोपींच्या, त्यांच्या पतींच्या, - सर्वेषां एव देहिनां - किंबहुना सर्वच प्राणिमात्रांच्या - अन्तः चरति - अंतःकरणात राहतो - सः अध्यक्षः - तो परमेश्वर - इह - ह्या लोकी - क्रीडनेन - लीलेने - देहभाक् (जातः) - देहधारी झाला. ॥३६॥ भूतानां अनुग्रहाय - प्राणिमात्रांच्या अनुग्रहासाठी - मानुषं देहं आस्थितः - मनुष्यदेहाचा आश्रय केलेला - तादृशीः क्रीडाः भजते - तसे खेळ करतो - याः - जे ऐकून - (मनुष्यः) तत्परः भवेत् - मनुष्य त्याच्या ठिकाणी गढून गेलेला होईल. ॥३७॥ तस्य मायया मोहिताः - त्याच्या मायेने मूढ झालेले - स्वान् स्वान् दारान् - आपापल्या स्त्रियांना - स्वपार्श्वस्थान् मन्यमानाः - आपल्या बाजूला असलेल्या असे मानणारे - व्रजौकसः - गोकुळवासी लोक - खलु - खरोखर - कृष्णाय न असूयन् - श्रीकृष्णाचा मत्सर करते झाले नाहीत. ॥३८॥ ब्रह्मरात्रे उपावृत्ते (सति) - ब्राह्ममुहुर्त प्राप्त झाला असता - वासुदेवानुमोदिताः - श्रीकृष्णाने अनुमोदन दिलेल्या - भगवत्प्रियाः - भगवंताच्या प्रिय असलेल्या अशा - गोप्यः - गोपी - अनिच्छन्त्यः (अपि) - इच्छा नसताहि - स्वगृहान् ययुः - आपल्या घरी गेल्या. ॥३९॥ यः श्रद्धान्वितः (सन्) - जो श्रद्धेने युक्त असा होत्साता - विष्णोः व्रजवधूभिः (सह) - श्रीकृष्णाची गोकुळांतील स्त्रियांसह - इदं विक्रीडतं - झालेली ही क्रीडा - अनुश्रृणुयात् - ऐकेल - अथ वर्णयेत् - व वर्णन करील - (सः) भगवति - तो भगवंताच्या ठिकाणी - परांभक्तिं उपलभ्य - श्रेष्ठ प्रकारची भक्ति मिळवून - अचिरेण धीरः (सन्) - लवकरच जितेंद्रिय होत्साता - हृद्रोगं कामं - हृदयाचा रोग असा जो काम त्याला - आशु अपहिनोति - त्वरित नष्ट करितो. ॥४०॥ अध्याय तेहतीसावा समाप्त |