श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ

यमलार्जुनांचा उद्धार -

भगवन् - हे शुकाचार्य - तयोः - त्या दोघा यक्षांच्या - शापस्य कारणं - शापाचे कारण असे - यत् एतत् विगर्हितं कर्म - जे हे निंद्य कर्म - येन वा - आणि ज्यामुळे - देवर्षेः तमः (जातम्) - नारदऋषीला क्रोध आला - तत् कथ्यतां - ते सांगावे. ॥१॥

रुद्रस्य - शंकराचे - अनुचरौ भूत्वा - सेवक झाल्यामुळे - सुदृप्तौ - अत्यंत गर्विष्ठ - मदोत्कटौ - व उन्मत्तपणाने पूर्ण भरलेले - धनदात्मजौ - ते कुबेराचे मुलगे - मन्दाकिन्याम् - गंगेच्या काठी - रम्ये कैलासोपवने - रमणीय अशा कैलासपर्वतावरील उपवनात - वारुणीं मदिरां पीत्वा - वारूणी नावाचे मद्य पिऊन - मदाघूर्णितलोचनौ (भूत्वा) - धुंदीने फिरत आहेत डोळे ज्यांचे असे होऊन - अनुगायद्भिः स्त्रीजनैः - गायन करणार्‍या स्त्रियांसह - पुष्पिते वने - फुलांनी बहरलेल्या उद्यानात - चेरतुः - हिंडते झाले. ॥२-३॥

तौ धनदात्मजौ - ते कुबेराचे दोघे मुलगे - युवतीभिः - स्त्रियांसह - अंभोजवनराजिनि - कमलांच्या समूहांनी शोभणार्‍या - गंगायां अंतः प्रविश्य - गंगेमध्ये प्रवेश करून - करेणुभिः गजौ इव - जसे हत्तिणींसह दोन हत्ती - चिक्रीडतुः - तसे क्रीडा करिते झाले. ॥४॥

कौरव - हे परीक्षित राजा - च - आणि - देवर्षिः भगवान् नारदः - देवर्षि ऐश्वर्यसंपन्न नारद - यदृच्छया तत्र (आगतः) - सहजगत्या तेथे आला असता - देवौ अपश्यत् - त्या दोघा गुह्यकांना पाहता झाला - (तौ च) क्षीबाणौ - आणि त्यांना मद्याने धुंद झालेले - समबुध्यत - असे ओळखिता झाला. ॥५॥

तं दृष्‍ट्‌वा - त्याला पाहून - व्रीडिताः - लज्जित झालेल्या - विवस्त्राः देव्यः - वस्त्रहीन अशा त्या स्त्रिया - शापशंकिताः - शापाची भीती वाटून - शीघ्रं वासांसि पर्यधुः - लगबगीने वस्त्रे नेसत्या झाल्या - विवस्त्रौ गुह्यकौ (तु) - पण नग्न असे ते दोघे गुह्यक - न एव वाससी पर्यधाताम् - वस्त्रे नेसते झाले नाहीत. ॥६॥

तौ मदिरामत्तौ - ते दोघे मदिरेने उन्मत्त झालेले - श्रीमदांधौ - व संपत्तीच्या गर्वाने अंध झालेले - सुरात्मजौ दृष्ट्वा - कुबेराचे पुत्र पाहून - तयोः अनुग्रहार्थाय - त्यांच्यावर कृपा करण्यासाठी - शापं दास्यन् - शाप द्यावा म्हणून - इदं जगौ - हे उद्‌गार काढिता झाला. ॥७॥

जोष्यान् - योग्य विषयांचा - जुषतः (पुंसः) - भोग घेणार्‍या पुरुषाला - श्रीमदात् अन्यः - संपत्तीच्या गर्वाहून इतर - आभिजात्यादिः - उत्तम कुलात जन्म इत्यादि - रजोगुणः - रजोगुणांचा विकार - (तादृशः) बुद्धिभ्रंशः - तितकासा बुद्धिभ्रंश करणारा - न हि (अस्ति) - खरोखर नाही - यत्र (श्रीमदे) - ज्या संपत्तीच्या गर्वात - स्त्री द्युतम् आसवः (सन्ति) - स्त्री, द्यूत आणि मद्य ही असतात. ॥८॥

यत्र (श्रीमदे) - ज्या संपत्तीच्या धुंदीत - इमं नश्वरं देहं - ह्या नश्वर देहाला - अजरामृत्यूं मन्यमानैः - जरामृत्यूरहित मानणार्‍या अशा - निर्दयैः अजितात्मभिः - क्रूर व इंद्रिये ज्याच्या स्वाधीन नाहीत अशा पुरुषांकडून - पशवः हन्यन्ते - पशु मारिले जातात. ॥९॥

देवसंज्ञितं अपि (शरीरं) - भूदेव, नरदेव इत्यादि नावे असलेले शरीर सुद्धा - अंते कृमिविड्‌भस्मसंज्ञितं (भवति) - शेवटी कृमी, विष्ठा, भस्म अशी नावे मिळणारे होते - तत्कृते - त्यासाठी - भूतध्रुक् - प्राण्य़ांचा द्रोह करणारा - किं स्वार्थं वेद - पुरुष काय स्वार्थ जाणतो - यतः निरयः (प्राप्यते) - ज्या भूतदेहापासून नरक प्राप्त होतो. ॥१०॥

अयं देहः किं - हा देह काय - अन्नदातुः स्वं (अस्ति) - अन्नदात्याच्या स्वामित्वाचा आहे - निषेक्तुः मातुः - बापाच्या, आईच्या - मातुः पितुः - अथवा आईच्या बापाच्या स्वामित्वाचा आहे - बलिनः क्रेतुः - किंवा एखाद्या दांडग्या पुरुषाच्या, विकत घेणार्‍याच्या, - अग्नेः शुनः अपि वा (स्वं स्यात्) - अग्नीच्या किंवा कुत्र्याच्याही स्वामित्वाचा असेल. ॥११॥

असतः (पुंसः) - मूर्ख मनुष्याशिवाय - ऋते कः विद्वान् - कोणता विद्वान मनुष्य - एवं अव्यक्तप्रभव्याप्ययं - अशा रीतीने ज्याची उत्पत्ति व नाश ज्याची न दिसणारी आहेत - साधारणं देहं आत्मसात् कृत्वा - अशा सामान्य देहाला आत्मा असे मानून - जंतून् हंति - प्राण्यांना मारील. ॥१२॥

असतः श्रीमदांधस्य (पुंसः) - दुष्ट व संपत्तीच्या मदाने अंध झालेल्या मनुष्याला - दारिद्र्यंद्‌र्‌यं परं अंजनं (भवति) - दारिद्र्य हेच उत्तम अंजन होय - दारिद्रः आत्मौपम्येन - दरिद्री मनुष्य आपल्या सारखीच - भूतानि परं ईक्षते - सर्व प्राण्यांची स्थिति आहे असे पाहतो. ॥१३॥

कंटकविद्धांगः - काटयांनी ज्याचे अंग भेदून गेले आहे असा - लिंगैः - आपल्या उदाहरणांनी - जीवसाम्यं गतः - सर्व जीवांना अशीच दुःखे होत असतील असे मानणारा मनुष्य - यथा जंतोः तां व्यथां न इच्छति - ज्याप्रमाणे प्राण्याला तसे दुःख व्हावे असे इच्छित नाही - तथा अविद्धकंटकः - त्याप्रमाणे ज्याच्या अंगाला काटे बोचलेले नाहीत - न (इच्छति) - असा मनुष्य इच्छित नाही. ॥१४॥

इह निरहंस्तंभः - जगात अहंकाररहित - सर्वमदैः मुक्तः दरिद्रः - व सर्व गर्वापासून सुटलेला असा दरिद्री पुरुष - यदृच्छया कृच्छ् प्राप्नोति - आपोआप कष्टाला प्राप्त होतो - तत् हि तस्य परं तपः - खरोखर ती त्याची श्रेष्ठ तपश्चर्या होय. ॥१५॥

नित्यं अन्नकांक्षिणः - सदोदित अन्नाची इच्छा करणार्‍या - क्षुत्क्षामदेहस्य दरिद्रस्य - व क्षुधेने क्षीण देह झालेल्या दरिद्‌र्‌याची - इंद्रियाणि अनुशुष्यंति - इंद्रिये शुष्क होतात - हिंसा अपि विनिवर्तते - हिंसाबुद्धिसुद्धा नष्ट होते. ॥१६॥

समदर्शिनः साधवः - समदर्शी सज्जन - दरिद्रस्य एव युज्यंते - दरिद्री पुरुषाचीच मैत्री करितात - (सः) सद्भिः - दरिद्री सज्जनांच्या समागमाने - तं तर्षं क्षीणोति - त्या विषयेच्छा क्षीण करितो - ततः आरात् विशुध्यति - नंतर लवकर पवित्र होतो. ॥१७॥

मुकुंदचरणैषिणां - परमेश्वराच्या चरणकमलाची इच्छा करणार्‍या सर्वांवर - समचित्तानां साधूनां - समानदृष्टि ठेवणार्‍या साधूंना - उपेक्ष्यैः - ज्यांची उपेक्षा करणेच योग्य अशा, - धनस्तंभैः - धनाने गर्विष्ठ झालेल्या, - असदाश्रयैः - व दुष्ट लोकांना आश्रय देणार्‍या - असद्भिः किं कर्तव्यम् - दुष्ट पुरुषांशी काय प्रयोजन ? ॥१८॥

तत् - यास्तव - अहं - मी - वारुण्या माध्व्या मत्तयोः - वारुणीमदिरेने मत्त झालेल्या - श्रीमदांधयोः - लक्ष्मीच्या गर्वाने अंध झालेल्या, - स्त्रैणयोः अजितात्मनोः - स्त्रीवश व ज्यांनी आपले मन जिंकिले नाही अशा दोघांचा - तमोमदं हरिष्यामि - अज्ञानरूपी मद नाहीसा करतो. ॥१९॥

यत् - ज्याअर्थी - इमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा - हे दोघे कुबेराचे मुलगे असता - सुदुर्मदौ तमःप्लुतौः आत्मानं - अत्यंत उन्मत्त व अज्ञात पूर्णपणे बुडून गेलेले असे - विवाससं न विजानीतः - आपण नग्न आहो हेही जाणत नाहीत. ॥२०॥

अतः - त्याअर्थी - (तौ) स्थावरतां अर्हतः - ते दोघे वृक्षपणालाच योग्य आहेत - यथा पुनः - जेणेकरून पुनः - एवं न स्याताम् - असे उन्मत्त होणार नाहीत - तत्र अपि मत्प्रसादेन - त्या जन्मात सुद्धा माझ्या प्रसादाने - मदनुग्रहात् - व माझ्या कृपेने त्यांना आठवण राहील. ॥२१॥

दिव्यशरच्छते वृत्ते (च) - आणि देवांची शंभर वर्षे झाली असता - वासुदेवस्य सांनिध्यं - परमेश्वराची समीपता - भूयः स्वर्लोकतां (च) लब्ध्वा - व पुनः स्वर्ग ही मिळवून - लब्धभक्ति भविष्यंतः - ईश्वरावर भक्ति करणारे असे होतील. ॥२२॥

सः देवर्षिः - तो नारद ऋषी - एवं उक्त्वा - असे बोलून - नारायणाश्रमं गतः - नारायणाश्रमाला निघून गेला - नलकूबरमणिग्रीवौ - नलकूबर व मणिग्रीव हे दोघे जुळे - यमलार्जुनौ (भूत्वा) आसतुः - अर्जुनवृक्ष होऊन राहिले. ॥२३॥

हरिः - श्रीकृष्ण - भागवतमुख्यस्य ऋषेः - भागवतश्रेष्ठ नारदऋषींचे - वचः सत्यं कर्तुं - भाषण खरे करण्याकरिता - यत्र यमलार्जुनौ आस्तां - ज्याठिकाणी जुळे अर्जुन वृक्ष होते - तत्र शनकैः जगाम - तेथे हळूहळू गेला. ॥२४॥

यत् मे देवर्षिः - ज्याअर्थी मला नारदऋषि - प्रियतमः (अस्ति) - अत्यंत प्रिय आहे - तत् - त्याअर्थी - तन्महात्मना यत् गीतं - त्या महात्म्याने जे म्हटले - तथा - त्याप्रमाणे - इमौ (यमलार्जुनौ पुनः) - ह्या दोन अर्जुनवृक्षांना पुनः - धनदात्मजौ साधयिष्यामि - कुबेराचे मुलगे करून देईन. ॥२५॥

इति (मत्वा) कृष्णः - असे म्हणून श्रीकृष्ण - यमयोः अर्जुनयोः अंतरेण ययौ - त्या अर्जुनवृक्षांच्या मधून गेला - आत्मनिर्वेशमात्रेण - परमात्म्याच्या आत शिरण्यानेच - उलूखलं तिर्यक् गतं - केवळ उखळी आडवी पडली. ॥२६॥

तत् अन्वक् उलूखलं - ती मागून येणारी उखळी - निष्कर्षयता दामोदरेण बालेन - ओढणार्‍या व पोटाला दाव्याने बांधलेल्या कृष्णाने - तरसा उत्कलितांघ्रिबंधौ - जोराने उपटली आहेत बुंध्याची मुळे ज्यांची असे - परमविक्रमितातिवेपस्कंधप्रवालविटपौ (तौ) - जोराने ओढल्यामुळे अर्जुनवृक्षांच्या खांद्या, पाने व सगळा विस्तार कापत आहे असे - कृतचंडशब्दौ निष्पेततुः - केला आहे प्रचंड शब्द ज्यांनी असे खाली पडले.॥२७॥

तत्र कुजयोः - त्यावेळी त्या वृक्षांच्या पोटातून - जातवेदाः इव - अग्नीप्रमाणे - परमया श्रिया ककुभः स्फुरन्तौ - श्रेष्ठ कान्तीने दशदिशा प्रकाशित करणारे - विरजसौ सिद्धौ उपेत्य - गर्वरहित असे दोन सिद्ध पुरुष जवळ येऊन - बद्धांजली - जोडिले आहेत हात ज्यांनी असे - अखिल लोकनाथं कृष्णं - सकललोकाधिपती श्रीकृष्णाला - शिरसा प्रणम्य - मस्तकाने नमस्कार करून - इदं ऊचतुः स्म - हे बोलते झाले. ॥२८॥

कृष्ण कृष्ण महायोगिन् - हे कृष्णा, हे कृष्णा हे महायोगिन - त्वं आद्यः परः पुरुषः (असि) - तू सर्व जगाचे आदिकारण असा श्रेष्ठ पुरुष आहेस - ब्राह्मणाः - ब्रह्मज्ञानी पुरुष - इदं व्यक्ताव्यक्तं विश्वं - हे स्थूल व सूक्ष्म पदार्थांनी भरलेले सर्व जग - ते रूपं विदुः - तुझे स्वरूप आहे असे जाणतात. ॥२९॥

त्वं एकः - तू एकटा - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांची - देहास्वात्मेंद्रियेश्वरः (असि) - शरीरे, प्राण, मने व इंद्रिये ह्यांचा चालक आहे - त्वं एव कालः - तूच कालस्वरूपी आहेस - त्वं भगवान् विष्णुः - तूच षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा सर्व जगाला व्यापणारा - अव्ययः ईश्वरः - अविनाशी ईश्वर आहेस. ॥३०॥

त्वंत्त महान् (असि) - तूच महतत्त्व आहेस - (त्वम्) रजःसत्त्वतमोमयी - तूच सत्त्व, रज व तम हे गुण आहेत स्वरूप जिचे - सूक्ष्मा प्रकृतिः - अशी अव्यक्त प्रकृति आहेस - त्वं एव अध्यक्षः - तूच अंतर्यामी असा - सर्वक्षेत्र विकारवित् - सर्व शरीरातील इंद्रियांचे विकार जाणणारा - (पुराणः) पुरुषः (असि) - पुराणपुरुष आहेस.॥३१॥

त्वं - तू - प्राकृतैः गुणैः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या - गृह्यमाणैः विकारैः (सह) - इंद्रियांकडून घेतल्या जाणार्‍या पदार्थांच्या समागमे - अग्राह्यः (असि) - घेतला जाण्यास अशक्य आहेस - गुणसंवृतःकः नु - देह, इंद्रिये इत्यादि गुणांनी वेष्टिलेला कोणता जीव खरोखर - प्राक्‌सिद्धं त्वां - पूर्वीपासून सिद्ध असलेल्या तुला - विज्ञातुं अर्हति - जाणण्य़ाला समर्थ आहे - तस्मै भगवते - त्या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न, - वासुदेवाय वेधसे - सर्व प्राण्यांच्या शरीरात वास करणार्‍या सृष्टिकर्त्या अशा - आत्मद्योतगुणैः - स्वतःपासून प्रकाशित होणार्‍या - छन्नमहिम्ने - गुणांनी ज्यांचे माहात्म्य आच्छादित झाले आहे अशा - ब्रह्मणे तुभ्यं नमः - ब्रह्मस्वरूपी तुला नमस्कार असो. ॥३२-३३॥

अशरीरिणः - वास्तविक शरीररहित - यस्य तव - अशा ज्या तुझ्या - मत्स्यकूर्मादिषु शरीरेषु - मत्स्यकूर्मादि शरीरांच्या ठिकाणी - देहिषु असंगतैः - सामान्य प्राण्यांत न दिसणार्‍या - तैः तैः अतुल्यातिशयैः - त्या त्या अतुल्य आहे मोठेपणा ज्यांचा - वीर्यैः - अशा पराक्रमांच्या योगाने - अवताराः ज्ञायन्ते - ते तुझे अवतार होत असे जाणिले जातात. ॥३४॥

आशिषां पतिः - सर्व उपभोगांच्या साधनांचा स्वामी - सः भगवान् - असा तो परमेश्वर - सर्वलोकस्य भवाय - सर्व लोकांच्या उत्कर्षाकरिता - विभवाय च - आणि मोक्षाकरिता - सांप्रतं - सध्या - अंशभागेन अवतीर्णः - अंशरूपाने अवतरलेला आहे. ॥३५॥

परमकल्याण (तुभ्यं) नमः - हे अतिशय कल्याणकारका, तुला नमस्कार असो - परममंगल तुभ्यं नमः - हे अत्यंत मंगलकारका, तुला नमस्कार असो - वासुदेवाय शांताय - हे वसुदेवपुत्रा, गंभीरपुरुषा, - यदूनां पतये नमः - यादवाधीश्वरा तुला नमस्कार असो. ॥३६॥

भूमन् - हे विश्वव्यापका - तव अनुचरकिंकरौ - तुझ्या दासांचे दास - नौ (गन्तुं) अनुजानीहि - अशा आम्हांला जाण्यास आज्ञा दे - नौ - आम्हाला - ऋषेःअनुग्रहात् - नारदऋषीच्या अनुग्रहाने - भगवतः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा - तव दर्शनं आसीत् - तुझे दर्शन झाले.॥३७॥

नः वाणी - आमच्या वाणी - तव गुणानुकथने (स्ताम्) - तुझ्या गुणांचे कथन करण्याविषयी तत्पर असोत - श्रवणौ कथायां (स्ताम्) - कान तुझ्या कथा श्रवणांत तत्पर असोत - हस्तौ कर्मसु (स्ताम्) - हात तुझ्या सेवेत तत्पर असोत - मनः तव पादयोः (स्मृत्यां अस्तु) - मन तुझ्या चरणांच्या स्मरणात दंग असो - शिरः तव निवासजगत् - मस्तक तुझे वसतिस्थान असे जे जग - प्रणामे (अस्तु) - त्याला वंदन करण्यात तत्पर असो - दृष्टिः सतां भवत्तनूनां - डोळे सत्पुरुषाचे व तुझ्या अवतारमूर्तीचे - च दर्शनं (अस्तु) - दर्शन करण्याविषयी उत्कंठित असोत. ॥३८॥

ताभ्यां इत्थं संकीर्तितः - त्या दोघांनी याप्रमाणे स्तविलेला - दाम्नाउलूखले बद्धः - दाव्याने उखळाशी बांधलेला - गोकुलेश्वरः भगवान् - गोकुळाधिपति श्रीकृष्ण - प्रहसन् गुह्यकौ आह - हसत हसत गुह्यकांना म्हणाला. ॥३९॥

मम - मला - पुरा एव - पूर्वीच - एतत् ज्ञातम् - हे कळले होते - यत् - की - करुणात्मना ऋषिणा - दयाळू मनाच्या नारद ऋषीने - श्रीमदान्धयोः (युवयोः) - संपत्तीच्या गर्वाने अंध झालेल्या तुम्हां दोघावर - वाग्भिः - शापरूपी शब्दांनी - विभ्रंशः अनुग्रहःकृतः - ऐश्वर्यभ्रष्टता हीच कृपा केली. ॥४०॥

समचित्तानां - ज्यांचे मन सदा सारख्या स्थितीत असते - सुतरां मत्कृतात्मनां - व माझ्या ठिकाणी ज्यांचे मन गढून गेले आहे - साधूनां दर्शनात् - अशा सत्पुरुषांच्या दर्शनाने - पुंसः बंधः नो भवेत् - प्राण्यांचे संसाररूपी बंधन नष्ट होते - यथा - जसे - सवितुः दर्शनात् - सूर्याच्या दर्शनाने - अक्ष्णोः (बंधनं न भवति तथा) - डोळ्यांवरील बंधन नष्ट होते तसे. ॥४१॥

नलकूबर वां इप्सितः - अहो नलकूबर तुमच्या इच्छेप्रमाणे - परमः अभवः भावः - तुमची संसारबंधने सुटणारी अशी श्रेष्ठ भक्ति - मयि संजातः - माझ्या ठिकाणी जडली आहे - तत् (युवाम्) मत्परमौ - तरी तुम्ही माझ्याठिकाणी - (सन्तौ) सादनं गच्छतं - पूर्णपणे चित्त देऊन आपल्या स्थानी जा. ॥४२॥

इति उक्तौ तौ - याप्रमाणे बोलले गेलेले ते दोघे - बद्धोलूखलं (कृष्णं) - उखळाशी बांधलेल्या त्या कृष्णाला - पुनः पुनः परिक्रम्य प्रणम्य च - वारंवार प्रदक्षिणा व प्रणाम करून - आमंत्र्य (च) - आणि त्याची आज्ञा घेऊन - उत्तरां दिशं जग्मतुः - उत्तर दिशेला निघून गेले. ॥४३॥

अध्याय दहावा समाप्त

GO TOP