श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ

भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव -

अथ - मग काही दिवसांनी - सर्वगुणोपेतः परमशोभनः - सर्व उत्तम लक्षणांनी युक्त व अत्यंत शुभ असा - (भगवतः जन्मः) कालः - भगवंताच्या जन्माचा समय - प्राप्तः - प्राप्त झाला - यर्हि एव - ज्यावेळी - अजनजन्मर्क्षं - ब्रह्मदेव आहे देवता ज्याची असे रोहिणी नक्षत्र - शान्तर्क्षग्रहतारकम् - शांत आहेत नक्षत्रे, चंद्र आदिकरून ग्रह आणि तारका ज्यांत असे. ॥१॥

दिशः प्रसेदुः - दिशा प्रसन्न झाल्या - गगनं - आकाश - निर्मलोडुगणोदयम् - पवित्र नक्षत्रांचा उदय आहे ज्यात असे - मही - पृथ्वी - मंगल भूयिष्ठपुरग्रामव्रजाकरा - शुभ चिन्हे आणि रत्‍नादिकांच्या खाणींनी युक्त अशी नगरे, गावे, गौळवाडे. ॥२॥

नद्यः - नद्या - प्रसन्नसलिलाः (बभूवुः) - स्वच्छ आहे पाणी ज्यांचे अशा झाल्या - ह्लदाः - डोह - जलरुहश्रियः (आसन्) - कमळांची शोभा ज्यांत असे झाले - वनराजयः - रानातील वृक्षांच्या रांगा - द्विजालिकुलसंनादस्तबकाः (बभूवुः) - पक्षी आणि भुंगे यांच्या थव्यांच्या मधुर ध्वनीने युक्त झुबके आहेत ज्यांत अशा झाल्या. ॥३॥

सुखस्पर्शः - आनंददायक आहे स्पर्श ज्याचा असा - पुण्यगंधवहः - मंगल असा सुवास वाहून नेणारा - शुचिः वायुः - पवित्र वायु - ववौ - वाहू लागला - तत्र - त्याठिकाणी - द्विजातीनाम् अग्नयः - ब्राह्मणाचे अग्नि - शान्ताः समिन्धन्त - शांतपणे प्रज्वलित झाले. ॥४॥

असुरद्रुहाम् साधूनां मनांसि - असुरांचा द्वेष करणार्‍या सज्जनांची मने - प्रसन्नानि आसन् - प्रसन्न झाली - तस्मिन् अजने जायमाने - तो जन्मरहित असा भगवान जन्मास येत असता - दिवि - स्वर्गलोकात - दुंदुभयः नेदुः - दुंदुभी वाजू लागल्या. ॥५॥

किन्नरगंधर्वाः जगुः - किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले - सिद्धचारणाः तुष्टुवुः - सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले - विद्याधर्यः च - आणि विद्याधरांच्या स्त्रिया - तदा - त्यावेळी - अप्सरोभिः समं - अप्सरांसह - ननृतुः - नाचत्या झाल्या. ॥६॥

मुदान्विताः - आनंदित झालेले - मुनयः देवाः (च) - ऋषी आणि देव - सुमनांसि मुमुचुः - फुले उधळते झाले - जलधराः - मेघ - अनुसागरम् - समुद्राला अनुसरून - मन्दं मन्दं जगर्जुः - संथपणे गर्जना करू लागले. ॥७॥

तम‌उद्‌भूते निशीथे जनार्दने जायमाने - काळोखाने व्यापिलेला रात्रीचा समय लोकांना भयंकर असा होत असता - देवरूपिण्यां देवक्यां - देवस्वरूपी देवकीच्या पोटी - सर्वगुहाशयः विष्णुः - सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करणारा विष्णु - यथा(वत्) - योग्य स्वरूपाने - आविरासीत् - प्रकट झाला - प्राच्यां दिशि - पूर्व दिशेमध्ये - पुष्कलः इन्दुः इव - पूर्ण चंद्र जसा तसा. ॥८॥

तं - त्या - अंबुजेक्षणम् - कमलाप्रमाणे नेत्र आहेत ज्याचे अशा - चतुर्भुजम् - चार हातांच्या - शंखगदार्युदायुधम् - शंख, गदा, चक्र आणि कमळ ही आयुधे आहेत ज्यांची अशा - श्रीवत्सलक्ष्मम् - श्रीवत्स हे चिन्ह आहे ज्याच्या अंगावर अशा - गलशोभि कौस्तुभम् - गळ्यात शोभत आहे कौस्तुभमणी ज्याच्या अशा - पीतांबरम् - पिवळे आहे वस्त्र ज्याचे अशा - सान्द्रपयोदसौभगम् - पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे आहे सुंदर वर्ण ज्याचा अशा - अद्‌भुत बालकं - अवर्णनीय बालकाला. ॥९॥

महार्हवैदूर्यकिरीटकुंडलत्विषा - अत्यंत मूल्यवान वैदूर्यमण्यांनी खचित अशा किरीटांच्या व कुंडलांच्या - परिष्वक्तसहस्रकुंतलम् - तेजाने चकाकत आहेत हजारो केस ज्यांचे असे - उद्दामकाञ्च्यगदकंकणादिभिः विरोचमानं - फार मोठा कमरपट्टा, बाहुभूषणे, कंकणे इत्यादि अलंकारांनी शोभणारे असे - वसुदेवः ऐक्षत - वसुदेव पाहता झाला. ॥१०॥

तदा - त्यावेळी - सविस्मयोत्फुल्लविलोचनः आनकदुंदुभिः - आश्चर्याने पूर्ण विकसित झाले आहेत डोळे ज्याचे असा वसुदेव - हरिं सुतं विलोक्य - श्रीहरीला आपला पुत्र पाहून - कृष्णावतारोत्सवसंभ्रमः - श्रीकृष्णाच्या जन्माविषयी आनंद करण्यासाठी गडबड झाली आहे ज्याची असा - मुदा आप्लुतः - आनंदाने भरलेला असा - द्विजेभ्यः - ब्राह्मणांना - गवां अयुतं अस्पृशत् - दहा हजार गाई देता झाला. ॥११॥

अथ - मग - भारत - हे परीक्षित राजा - एनम् - ह्या कृष्णाला - परं पुरुषं अवधार्य - श्रेष्ठ असा आदिपुरुष समजून - कृतधीः (वसुदेवः) - शुद्धबुद्धीचा वसुदेव - नतांगः - लवविले आहे मस्तक ज्याने असा - कृताञ्जलिः - केली आहे ओंजळ ज्याने असा - (कृष्णस्य) प्रभाववित् - कृष्णाचा पराक्रम जाणणारा - गतभीः (भूत्वा) - निर्भय होऊन - सूतिकागृहं विरोचयन्तं - सूतिकागृहाला प्रकाशित करणार्‍या - तं कृष्णं - त्या कृष्णाला - अस्तौत् - स्तविता झाला. ॥१२॥

विदितः असि - ओळखिलेला आहेस - भवान् - तू - साक्षात् - प्रत्यक्ष - केवलानंदस्वरूपः - केवळ आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा - सर्वबुद्धिदृक् - सर्वांच्या बुद्धीचा साक्षी असा - प्रकृतेः परः पुरुषः - मायेच्या पलीकडील पुरुष. ॥१३॥

सः त्वं एव - तो तूच - स्वप्रकृत्या - आपल्या मायेने - अग्रे - प्रथम - इदं त्रिगुणात्मकं - हे त्रिगुणात्मक विश्व - सृष्टवा - उत्पन्न करून - अनु - नंतर - तत् - त्यात - अप्रविष्टः - न शिरलेला - प्रविष्टः इव - शिरल्यासारखा - भाव्यसे - मानिला जातोस. ॥१४॥

यथा - जसे - इमे अविष्कृताः भावाः - हे विकाररहित असे महत्तत्त्व आदि करून पदार्थ - तथा - त्याप्रमाणे - ते - महत्तत्त्वादि पदार्थ - हि - खरोखर - नानावीर्याः (अपि) - अनेकप्रकारच्या शक्तींनी युक्त असताहि - पृथग्भूताः (सन्तः) - वेगवेगळे असताना - विकृतैः सह (मिलित्वा) - इंद्रियादि कार्याशी मिळून - विराजं जनयंति - विराटस्वरूप म्हणजे ब्रह्मांड उत्पन्न करतात. ॥१५॥

सन्निपत्य - एकत्र होऊन - समुत्पाद्य - सृष्टि उत्पन्न केल्यावर - अनुगताः इव दृश्यन्ते - आंत शिरल्यासारखे दिसतात - प्राक् एव - पूर्वीच - विद्यमानत्वात् - अस्तित्वात असल्यामुळे - तेषां - त्यांची - इह - त्या उत्पन्न केलेल्या पदार्थांत - संभवः न - उत्पत्ति होत नाही. ॥१६॥

एवं - याप्रमाणे - भवान् - तू - बुद्ध्यनुमेयलक्षणैः - बुद्धीने अनुमान करण्यासारखे स्वरूप आहे ज्यांचे - ग्राह्यैः गुणैः सन् अपि - अशा इंद्रियांना घेण्यासारख्या विषयांसह अस्तित्वात असताहि - तद्‌गुणाग्रहः (अस्ति) - त्या विषयांसह ज्याला घेता येत नाही असा आहेस - अनावृत्तत्वात् - अमर्यादित असल्यामुळे - सर्वस्य - विश्वरूपी अशा - सर्वात्मनः - सर्वव्यापी अशा - आत्मवस्तुनः ते - सर्वांचा अंतर्यामी व सर्वांचे सत्यस्वरूप अशा तुला - बहिः अंतरं न (अस्ति) - बाहेरचे व आंतले असा भेद नाही. ॥१७॥

यः - जो - आत्मनः दृश्यगुणेषु - आत्म्याच्या पाहता येणार्‍या त्याच्या देहादि विषयांच्या ठिकाणी - स्वव्यतिरेकतः - आत्म्याहून वेगळेपणाने - सन् इति व्यवस्यते - अस्तित्वात असणारा असा निश्चय करितो - (सः) पुमान् - तो पुरुष - त्यक्तंउपाददत् (सन्) - असत्य म्हणून टाकलेले मत स्वीकारणारा असल्यामुळे - अबुधः (अस्ति) - अज्ञानी होय - यत् - कारण - तन्मनीषितम् - त्याच्या मनातील निश्चय - अनुवादं विना - योग्य स्पष्टीकरणाच्या अभावी - सम्यक् न (अस्ति) - उचित ठरत नाही. ॥१८॥

(हे) विभो - हे सर्वव्यापका - अनीहात् अगुणात् अविक्रियात् - निरिच्छ, निर्गुण व निष्क्रिय अशा - त्वत्तः - तुझ्यापासून - अस्य (विश्वस्य) - ह्या विश्वाची - जन्मस्थितिसंयमान् - उत्पत्ति, स्थिति व लय ही - वदन्ति - म्हणतात - त्वयि ईश्वरे ब्रह्मणि - तू जो सर्वसमर्थ ब्रह्मःस्वरूप त्यात - नो विरुध्यते - विरोधी ठरत नाही - गुणैः त्वदाश्रयत्वात् - सत्त्वादि गुणांनी तुझा आश्रय केल्यामुळे - उपचर्यते - जुळते. ॥१९॥

सः त्वं - तो तू - स्वमायया - आपल्या मायाशक्तीने - त्रिलोकस्थितय - त्रैलोक्याच्या रक्षणासाठी - आत्मनः शुक्लं वर्णम् - आपला सत्त्वगुणमय शुभ्र वर्ण - खलु - खरोखर - बिभर्षि - धारण करितोस - सर्गाय - उत्पत्तीसाठी - रजसा उपबृंहितं - रजोगुणाने व्याप्त असा - रक्तं (वर्णं बिभर्षि) - रक्तवर्ण धारण करितोस - च - आणि - जनात्यये - लोकांच्या नाशाच्या प्रसंगी - तमसा (उपबृहितं) - तमोगुणाने व्याप्त असा - कृष्णं बिभर्षि वर्णं - कृष्णवर्ण धारण करितोस. ॥२०॥

विभो - हे सर्वव्यापका - अखिलेश्वर - हे सर्वांच्या नियन्त्या - रिरक्षिषुः - या जगाचे रक्षण करणार्‍याची इच्छा करणारा - मम गृहे - माझ्या घरी - अवतीर्णः असि - अवतरला आहेस - राजन्यसंज्ञासुरकोटियूथपैः - क्षत्रिय नाव धारण करणार्‍या असुरांच्या कोटयवधी सेनापतींकडून - निर्व्यूह्यमानाः चमूः - इकडून तिकडे नेली जाणारी सैन्ये - निहनिष्यसे - तू ठार करशील. ॥२१॥

सुरेश्वर - हे देवांच्या देवा - अयं तु असभ्यः - हा दांडगा कंस - तव जन्म - तुझा जन्म - नो गृहे - आमच्या घरी - (भविता इति) श्रुत्वा - होणार असे ऐकून - ते अग्रजान् - तुझ्या पूर्वी झालेल्या भावांना - न्यवधीत् - मारिता झाला - सः - तो - ते अवतारम् - तुझा अवतार - पुरुषैः समर्पितम् श्रुत्वा - सेवकांनी सांगितलेला ऐकून - अधुना एव - आताच - उदायुधः - उचलले आहे आयुध ज्याने असा - अभिसरति - धावत येईल. ॥२२॥

अथ - मग - एनम् आत्मजं - या आपल्या पुत्राला - महापुरुषलक्षणं वीक्ष्य - परमेश्वराच्या चिन्हांनी युक्त असे पाहून - कंसात् भीता देवकी - कंसामुळे घाबरून गेलेली देवकी - शुचिस्मिता (सती) - पवित्र हास्य आहे जिच्या मुखावर अशी होऊन - तम् उपाधावत् - त्याला स्तविती झाली. ॥२३॥

यत् - जे - तत् रूपं - ते प्रसिद्ध स्वरूप - अव्यक्तम् - अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे प्रतीतीस न येणारे - आद्यम् - सर्वांचे आदिकरण - निर्गुणम् - गुणरहित - निर्विकारम् - विकाररहित - सत्तामात्रं - केवळ अस्तित्व हेच ज्याचे लक्षण आहे असे - निर्विशेषं - ज्यामध्ये भेद नाही असे - निरीहम् - निरिच्छ असे - ब्रह्मज्योति - ब्रह्मस्वरूप तेज म्हणून - वेदाः प्राहुः - वेद सांगतात - सः - तो - अध्यात्मदीपः - अध्यात्मज्ञानाचा प्रकाशक असा - साक्षात् विष्णुः (एव) - प्रत्यक्ष विष्णूच - त्वम् (असि) - तू आहेस. ॥२४॥

द्विपरार्धावसाने - दोन परार्धाच्या शेवटी - लोके नष्टे - सृष्टि नाहीशी झाली असता - महाभूतेषु आदिभूतं गतेषु - पंचमहाभूते आपल्या सूक्ष्म स्वरूपात लय पावली असता - कालवेगेनः - कालाच्या गतीने - व्यक्ते याते - व्यक्त भूते अव्यक्त प्रकृतीत लीन झाली असता - अशेषसंज्ञः - अशेष नावाचा - एकः भवान् - एकटा तू - शिष्यते - मागे राहतोस. ॥२५॥

अव्यक्तबंधो - हे मायेच्या चालका - यः अयं कालः (अस्ति) - जो हा काल म्हणून आहे - येन विश्वं चेष्टते - ज्याच्या योगाने विश्व चालते - (सः) निमेषादिः वत्सरान्तः - तो निमेषापासून संवत्सरापर्यंत - महीयान् - मोठा असा - तस्य ते - त्या तुझी - चेष्टां आहुः - लीला म्हणतात - तं त्वा - त्या तुला - ईशानम् - ईश्वराला - क्षेमधाम (इति) - कल्याणाचे माहेरघर म्हणून - प्रपद्ये - मी शरण आहे. ॥२६॥

मृत्यूव्यालभीतः - मृत्यूरूप सर्पाला भ्यालेला - मर्त्यः - मनुष्य - सर्वान् लोकान् - सर्व लोकांमध्ये - पलायन् - पळत असता - निर्भयं न अध्यगच्छत् - निर्भय स्थानाला प्राप्त होत नाही - आद्य - हे आदिपुरुषा - यदृच्छया - दैवगतीने - त्वत्पादाब्जं प्राप्य - तुझ्या चरणकमलाशी आल्यावर - स्वस्थः शेते - स्वस्थपणे झोप घेतो - मृत्युः अस्मात् बिभेति - मृत्यू याला भितो. ॥२७॥

सः त्वम् - तो तू - घोरात् उग्रसेनात्मजात् - भयंकर अशा उग्रसेनपुत्र कंसापासून - त्रस्तान् - त्रास पावलेल्या आम्हाला - त्राहि - राख - भृत्यवित्रासहा असि - सेवकांचे संकट नष्ट करणारा आहेस - च - आणि - इदं ध्यानधिष्ण्यं पौरुषं रूपं - हे ध्यानाने पाहण्याचे स्थान असे परब्रह्मस्वरूप - मांसदृशाम् - मांसाचे डोळे आहेत ज्यांना अशांना - प्रत्यक्षं मा कृषीष्ठाः - साक्षात करू नकोस. ॥२८॥

मधुसूदन - हे मधुसूदना - असौ पापः - हा पापी कंस - मयि ते जन्म - माझ्या ठिकाणी तुझा जन्म - मा विद्यात् - असे न जाणो - भवद्धेतो - तुझ्यासाठी - अधीरधीः अहम् - भित्र्या बुद्धीची मी - कंसात् समुद्विजे - कंसाला फार भिते. ॥२९॥

विश्वात्मन् - हे विश्वाच्या अंतर्यामी ईश्वरा - शंखचक्रगदापद्मश्रिया जुष्टुम् - शंख, चक्र, गदा आणि कमल यांच्या शोभेने युक्त असे - अदः अलौकिकं चतुर्भुजं रूपम् - हे असामान्य असे चार हातांचे रूप - उपसंहर - आवरून घे. ॥३०॥

यत् एतत् विश्वं - जे हे जगत - परः पुरुषः भवान् - श्रेष्ठ पुरुष असा तू - निशान्ते - प्रलयरूप रात्रीच्या शेवटी - यथावकाशम् - जितका त्याचा व्याप आहे तितके - स्वतनौ बिभर्ति - आपल्या शरीरात धारण करितोस - मम गर्भगः अभूत् - माझ्या गर्भात आलेला असा झालास - अहो - अहो - तत् हि - ते खरोखर - नृलोकस्य विडंबनम् (भवेत्) - मनुष्य लोकाची केवळ थट्टा होईल.॥३१॥

सति - हे साध्वी देवकी - त्वम् एव - तूच - स्वायंभुवे - स्वायंभुव मन्वंतरात - पूर्वे सर्गे - पूर्वीच्या अवतारात - पृश्निः अभूः - पृश्नि नावाची माझी माता होतीस - तदा - त्यावेळी - अयं - हा वसुदेव - सुतपाः नाम - सुतपा नावाचा - अकल्मषः प्रजापतिः (आसीत्) - निष्पाप असा प्रजापती होता.॥३२॥

यदा - ज्यावेळी - वै - खरोखर - युवाम् - तुम्ही - ब्रह्मणा प्रजासंगे आदिष्टौ - ब्रह्मदेवाकडून प्रजोत्पत्ती करण्यास सांगितले गेला - ततः - तेव्हा - इंद्रियग्रामं सन्नियम्य - इंद्रियांच्या समूहाचे नियमन करून - परमं तपः तेपाथे - मोठे तप केले. ॥३३॥

वर्षवातातपहिमधर्मकाल गुणान् - पाऊस, वारा, ऊन, थंडी, उष्णता या ऋतूंच्या भेदांना - अनु - नित्य - सहमानौ - सहन करीत - श्वासरोधविनिर्धूतमनोमलौ - ज्यांनी प्राणाचा अवरोध करून मनाचा मळ धुवून टाकिला आहे, अशी तुम्ही दोघे ; ॥३४॥

शीर्णपर्णानिलाहारौ - गळलेली पाने व वायु हाच आहे आहार ज्याचा अशी - मत्तः कामान् अभीप्सन्तौ - माझ्य़ापासून वर इच्छिणारी - उपशांतेन चेतसा - अगदी शांत अंतःकरणाने - मदाराधनं ईहतुः- माझे आराधन करण्यास इच्छिते झाला.॥३५॥

एवं - याप्रमाणे - परमदुष्करं तीव्रं तपः तप्यतोः - अत्यंत कठीण व दारुण तप करणार्‍या - मदात्मनोः वाम् - मत्स्वरूपी झालेल्या तुमची - द्वादश दिव्यवर्षसहस्राणि - देवांची बारा हजार वर्षे - ईयुः - गेली. ॥३६॥

तदा - त्यावेळी - अनघे - हे निष्पाप देवकी - तपसा श्रद्धया भक्त्या च - तप, निष्ठा आणि भक्ति यांनी - हृदि भावितः - हृदयात ध्यायिलेला - अहम् - मी - वां परितुष्टः - तुमच्यावर संतुष्ट झालो - अमुना वपुषा - या शरीराने. ॥३७॥

वरदराट् - वर देणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा - प्रादुरासम् - प्रकट झालो - युवयोः कामदित्सया - तुमची कामना पूर्ण करण्याच्या इच्छेने - वरः व्रियताम् इति (मया) उक्ते - वर मागा असे मी म्हटले असता - मादृशः सुतः - माझ्यासारखा पुत्र - वाम् वृतः - तुमच्याकडून मागितला गेला. ॥३८॥

च - आणि - अजुष्टग्राम्यविषयौ - सेविलेले नाहीत हलके विषय ज्यांनी अशी - अनपत्यौ दंपती - अपत्यरहित अशी तुम्ही पतिपत्‍नी - देवमायया मोहितौ - देवाच्या मायेने मोहिलेली अशी - मे - माझ्यापासून - अपवर्गं - मोक्ष - न वव्राथे - मागितला नाही. ॥३९॥

मयि गते - मी निघून गेल्यावर - मत्सदृशं सुतं वरं लब्ध्वा - माझ्यासारखा पुत्र हाच वर मिळवून - युवाम् - तुम्ही दोघे - ग्राम्यान् भोगान् अभुञ्जाथाम् - क्षुद्र भोग भोगिता झाला - युवाम् - तुम्ही दोघे - प्राप्तमनोरथौ - पूर्ण झाली आहे मनीषा ज्यांची अशी - आस्ताम् - झाला. ॥४०॥

लोके - या लोकी - शीलौदार्यगुणैः - शील व औदार्य इत्यादि गुणांनी - (मया) समम् - माझ्याप्रमाणे - अन्यतमं अदृष्ट्‌वा - दुसरा कोणी न दिसल्यामुळे - अहम् (एव) - मीच - पृश्निगर्भः इति श्रुतः - पृश्निगर्भ नावाने प्रसिद्ध असा - वां सुतः - तुमचा पुत्र - अभवम् - झालो. ॥४१॥

तयोः वाम् - त्याच तुमच्याठायी - पुनः एव - पुनः देखील - अहम् - मी - कश्यपात् - कश्यपापासून - अदित्यां - अदितीच्या पोटी - उपेन्द्रः इति विख्यातः - उपेन्द्र या नावाने प्रसिद्ध लहान असल्यामुळे वामन या नावाने प्रसिद्ध असलेला - वामनत्वात् च वामनः इति (ख्यातः) - आणि आकारानी लहान असल्यामुळे वामन या नावाने प्रसिद्ध असा - (पुत्रः) आस - पुत्र झालो. ॥४२॥

अथ - आता - अस्मिन् तृतीये भवे - या तिसर्‍या जन्मी - अहं वै - मी खरोखर - तेन एव वपुषा - त्याच शरीराने - तयोः एव वाम् - त्याच तुम्हा दोघांच्या ठायी - भूयः जातः (अस्मि) - पुनः जन्मलो आहे - (हे) सति - हे साध्वी देवकी - (इति) मे व्याहृतं सत्यं - याप्रमाणे माझे वचन सत्य झाले आहे॥४३॥

एतत् मे रूपम् - हे माझे रूप - प्राग्जन्मस्मरणाय - पूर्वीच्या जन्माच्या स्मरणासाठी - वाम् दर्शितम् - तुम्हाला दाखविले - अन्यथा - एरवी - मद्‌भवं ज्ञानं - माझ्या संबंधाचे ज्ञान - मर्त्यलिंगेन न जायते - मनुष्य शरीराने होत नाही. ॥४४॥

युवां - तुम्ही दोघे - पुत्रभावेन ब्रह्मभावेन च - पुत्र या नात्याने तसेच परब्रह्मस्वरूपाने - मां असकृत् चिंतयन्तौ - ,मला नित्य चिंतणारी अशी - मयि कृतस्नेहौ - माझ्यावर प्रेम केले आहे ज्यांनी अशी - परां मद्‌गतिं यास्येथे - श्रेष्ठ अशा माझ्या स्थानाला याल. ॥४५॥

इति उक्त्वा - असे बोलून - भगवान् हरिः - भगवान श्रीहरी - तूष्णीम् आसीत् - स्वस्थ राहिला - च - आणि - पित्रोः संपश्यतोः - आईबाप पाहत असता - आत्ममायया - आपल्या मायेने - सद्यः - तत्काल - प्राकृतः शिशुः बभूव - सामान्य लहान मूल झाला. ॥४६॥

ततः च - आणि मगच - भगवत्प्रचोदितः सः शौरिः - भगवंताने प्रेरिलेला तो वसुदेव - सुतं समादाय - मुलाला घेऊन - सूतिकागृहात् - बाळंतिणीच्या खोलीतून - यदा बहिः गन्तुम् इयेष - जेव्हा बाहेर जाउ लागला - तर्हि - त्यावेळी - या अजा योगमाया - जी जन्मरहित अशी योगमाया - नन्दजायया अजनि - नन्दभार्येच्या द्वारा जन्मास आली. ॥४७॥

तया - तिने - हृतप्रत्ययसर्ववृत्तिषु - हरण केले आहे ज्ञान व सर्व इंद्रियांचे व्यापार ज्यांचे - द्वाःस्थेषु - असे द्वारपाल झाले असता - अथ पौरेषु अपि शायितेषु - व त्यानंतर नागरिक लोक सुद्धा निजविले असता - बृहत्कपाटायसकीलशृंखलैः - मोठया लोखंडाचे खिळे आणि साखळदंड यामुळे - दुरत्ययाः - उघडण्यास दुर्घट अशीच - सर्वाः पिहिताः द्वारः तु - सगळी बंद केलेली द्वारे तर. ॥४८॥

ताः - ती - कृष्णवाहे वसुदेवे आगते - कृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव जवळ आला असता - यथा रवेः तमः (निवर्तते) - जसा सूर्योदयापासून काळोख परावृत्त होतो - स्वयं व्यवर्यन्त - स्वतःच उघडली - उपांशुगर्जितः पर्जन्यः - हळू हळू गर्जणारा पाऊस - ववर्ष - वृष्टि करिता झाला - शेषः - शेष - फणैः वारि निवारयन् - आपल्या फणांनी पाण्याचे निवारण करीत - अन्वगात् - मागोमाग चालला. ॥४९॥

मघोनि असकृत् वर्षति - इंद्र सारखा वर्षाव करीत असता - गंभीरतोयौघजवोर्मिफेनिला - खोल पाण्याच्या ओघाच्या वेगाने उठणार्‍या लाटांनी फेसाळलेली - भयानकावर्तशताकुला - भयंकर अशा शेकडो भोवर्‍यांनी गजबजलेली - यमानुजा नदी - यमाची धाकटी बहीण अशी यमुना नदी - सिन्धुः इव - समुद्राप्रमाणे - श्रियः पतेः - लक्ष्मीचा पती अशा श्रीकृष्णाला - मार्गं ददौ - वाट देती झाली. ॥५०॥

नन्दव्रजं उपेत्य - नंदाच्या गोकुळात आल्यावर - शौरिः - वसुदेव - तत्र - तेथे - तान् गोपालान् - त्या गवळ्यांना - निद्रया प्रसुप्तान् उपलभ्य - झोपेने सुस्त झालेले पाहून - सुतं यशोदाशयने निधाय - पुत्राला यशोदेच्या शय्येवर ठेवून - तत्सुताम् उपादाय - तिच्या कन्येला घेऊन - पुनः गृहान् अगात् - पुन्हा घरी आला. ॥५१॥

अथ - मग - वसुदेवः - वसुदेव - दारिकां देवक्याः शयने न्यस्य - मुलीला देवकीच्या शयनावर ठेवून - पदोः लोहं प्रतिमुच्य - पायांत शृंखला अडकवून - पूर्ववत् आवृतः आस्ते - पूर्वीप्रमाणे अडकलेला राहिला. ॥५२॥

च - आणि - नन्दपत्‍नी यशोदा - नंदाची पत्‍नी यशोदा - परं जातं अबुध्यत - केवळ मूल झाले एवढे जाणती झाली - परिश्रान्ता - थकलेली - निद्रया अपगतस्मृतिः - निद्रेमुळे नाहीशी झाली आहे स्मृती जिची अशी - तल्लिंगं न (अबुद्‌ध्‌यत) - त्या मुलाची जात जाणती झाली नाही.॥५३॥

अध्याय तिसरा समाप्त

GO TOP