|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २० वा - अन्वयार्थ
पुरूचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन - भारत - हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा- पूरोः वंशं प्रवक्ष्यामि - मी पूरूचा वंश सांगतो- यत्र (त्वं) जातः असि - ज्या वंशात तू झाला आहेस- यत्र वंश्याः - आणि ज्या वंशात - राजर्षयः ब्रह्मवंश्याः च जज्ञिरे - अनेक राजर्षि व ब्राह्मणही उत्पन्न झाले. ॥१॥ पूरोः जन्मेजयः हि अभूत् - पूरूपासून खरोखर जन्मेजय झाला- तत्सुतः प्रचिन्वान् - त्याचा पुत्र प्रचिन्वान- ततः प्रवीरः - त्यापासून प्रवीर- अथ वै नमस्युः - त्यापासून नमस्यु- तस्मात् चारुपदः अभवत् - त्यापासून चारुपद झाला. ॥२॥ तस्य सुद्युः पुत्रः अभूत् - त्याला सुद्यु नावाचा पुत्र झाला- तस्मात् बहुगवः - त्यापासून बहुगव- ततः संयातिः (जातः) - त्यापासून संयाति झाला- तस्य (पुत्रः) अहंयातिः - त्याचा पुत्र अहंयाति- तत्सुतः - त्या अहंयातीचा पुत्र - रौद्राश्वःस्मृतः - रौद्राश्व म्हणून सांगितला आहे. ॥३॥ तस्य - त्याला- ऋतेयुः कुक्षेयुः स्थण्डिलेयुः - ऋतेयुः कुक्षेयुः स्थण्डिलेयुः - कृतेयुकः जलेयुः - कृतेयुकः जलेयुः नावाचे तसेच - संततेयुः धर्मसत्यव्रतेयवः च - संततेयु आणि धर्मेयु, सत्येयु, व्रतेयु आणि - वनेयुः अवमः स्मृतः (इति) - कनिष्ठ वनेयु नावाचा- एते दशः अप्सरसः पुत्राः (जाताः आसन्) - असे दहा अप्सरेपासून पुत्र झाले होते- घृताच्यां (जाताः) - घृताची अप्सरेच्या पोटी झालेले ते - मुख्यस्य जगदात्मनः - श्रेष्ठ परमात्म्याच्या - इंद्रायाणि इव - आधीन असलेल्या इंद्रियाप्रमाणे होते. ॥४-५॥ नृप - हे राजा- ऋतेयोः रंतिभारः अभूत् - ऋतेयूला रंतिभार झाला- तस्य सुमतिः - त्या रंतिभाराला सुमति, - ध्रुवः अप्रतिरथः (इति) त्रयः आत्मजाः (आसन्) - ध्रुव व अप्रतिरथ असे तीन मुलगे झाले- अप्रतिरथात्मजः कण्वः - अप्रतिरथाचा मुलगा कण्व. ॥६॥ तस्य मेधातिथिः - त्याचा पुत्र मेधातिथि- तस्मात् प्रस्कण्वाद्याः द्विजातयः (जाताः) - त्यापासून प्रस्कण्वादि ब्राह्मण उत्पन्न झाले- सुमतेः रैभ्यः पुत्रः अभूत् - सुमतीला रैभ्य नावाचा पुत्र झाला- तत्सुतः दुष्यन्तः मतः - त्याचा पुत्र दुष्यंत सांगितला आहे. ॥७॥ दुष्यन्तः मृगयां यातः - दुष्यंत मृगयेला गेला असता - कण्वाश्रमपदं गतः - कण्व ऋषींच्या आश्रमाला प्राप्त झाला- तत्र आसीनां रमाम् इव - तेथे राहणार्या व लक्ष्मीप्रमाणे - स्वप्रभया - स्वतःच्या कांतीने - मण्डयन्तीं स्त्रियं विलोक्य - आश्रमाला भूषविणार्या स्त्रीला पाहून- (लोकः) देवमायां - जसे लोक भगवंताच्या मायेला पाहून - इव सद्यः मुमुहे - मोहित होतात तसा तत्काळ मोहित झाला- कतिपयैः भटैः वृतः - कित्येक योद्ध्यांनी वेष्टिलेला - (सः) तां वरारोहां बभाषे - तो दुष्यंत त्या सुंदर स्त्रीला म्हणाला. ॥८-९॥ तद्दर्शनप्रमुदितः - त्या स्त्रीच्या दर्शनाने आनंदित होऊन - सन्निवृत्तपरिश्रमः - ज्याचे सर्व श्रम दूर झाले आहेत - कामसंतप्तः (सः) - व जो कामाने संतप्त झाला आहे असा तो दुष्यंत- प्रहसन् - हसत- श्लक्ष्णया गिरा पप्रच्छ - मधुर शब्दांनी विचारिता झाला. ॥१०॥ हे कमलपत्राक्षि हृदयंगमे - हे कमळाप्रमाणे नेत्र असणार्या सुंदरी- त्वं का कस्य असि - तू कोण व कोणाची आहेस- अत्र तु निर्जने वने - ह्या निर्जन अरण्यात तर- भवत्याः किं वा चिकीर्षितम् - तू काय करावयाचे इच्छिले आहेस. ॥११॥ सुमध्यमे - हे सुंदरी- अहं त्वां व्यक्तं राजन्यतनयां वेद्मि - मी तुला खरोखर क्षत्रियकन्या समजतो- हि पौरवाणां चेतः - कारण पुरुकुळात उत्पन्न झालेल्या राजांचे अंतःकरण- अधर्मे क्वचित् न रमते - अधर्माच्या ठिकाणी केव्हाही रमत नाही. ॥१२॥ विश्वामित्रात्मजा एव अहं - मी विश्वामित्राचीच कन्या आहे- मेनकया वने त्यक्ता - मेनकेने रानात टाकिली गेले- भगवान् कण्वः एतत् वेद - भगवान कण्वाला हे माहित आहे- वीर - हे पराक्रमी दुष्यंता- ते किं करवाम - आम्ही तुमचे काय काम करावे. ॥१३॥ अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा- आस्यतां - बसावे- नः अर्हणं गृह्यतां - आणि आमची पूजा स्वीकारावी- भुज्यतां - भोजन करावे- नीवाराः संति - तृणधान्ये येथे आहेत- यदि रोचते - जर रुचत असेल- उष्यतां - राहावे. ॥१४॥ कुशिकान्वये उपपन्नं जातायाः - कुशिकवंशात उत्पन्न झाल्याकारणाने - इदं सुभ्रु - तुला हे आदरातिथ्य करणे हे योग्यच आहे- राज्ञां कन्याः स्वयंहि - राजांच्या कन्या स्वतःच - सदृशं वरं वृणते - योग्य अशा पतीला वरतात. ॥१५॥ ‘ओम्’ इति (तया) उक्ते - ठीक आहे असे ती म्हणाली असता- देशकालविधानवित् राजा - देशकाल ह्यांना उचित असे कृत्य जाणणारा दुष्यंत राजा- गांधर्वविधिना शकुंतलां - गांधर्वविधीने शकुंतलेशी - यथाधर्मं उपयेमे - धर्मशास्त्रानुसार विवाह लाविता झाला. ॥१६॥ अमोघवीर्यः राजर्षिः - व्यर्थ न जाणारे आहे वीर्य ज्याचे असा दुष्यंत राजा- महिष्यां वीर्यम् आदधे - पट्टराणी शकुंतलेचे ठिकाणी वीर्य स्थापिता झाला- श्वोभूते स्वपुरं यातः - दुसरा दिवस उजाडल्यावर आपल्या नगराला गेला. - सा कालेन सुतं असूत् - ती शकुंतला योग्यकाळी पुत्र प्रसविती झाली. ॥१७॥ कण्वः वने कुमारस्य - कण्व मुनि अरण्यामध्ये त्या बालकाचे - समुचिताः क्रियाः चक्रे - योग्य संस्कार करिता झाला- स बालकः तरसा - तो बालक पराक्रमाने - मृगेन्द्रान् बद्ध्वा क्रीडति स्म - सिंहांना बांधून खेळत असे. ॥१८॥ दुरत्ययविक्रान्तं हरेः - अत्यंत पराक्रमी व विष्णूच्या - अंशांशसंभूतं तं आदाय - अंशापासून उत्पन्न झालेल्या बालकाला घेऊन- प्रमदोत्तमा - ती उत्तम स्त्री- भर्तुः अंतिकं आगतम् - पतीजवळ आली. ॥१९॥ राजा अनिन्दितौ भार्यापुत्रौ - दुष्यंत राजा जेव्हा सदाचारसंपन्न अशा स्त्रीला व पुत्राला - यदा न जगृहे - स्वीकारिता झाला नाही- तदा खे सर्वभूतानां - तेव्हा आकाशात सर्व लोक - शृण्वतां अशरीरिणी वाक् आह - श्रवण करीत असता आकाशवाणी झाली. ॥२०॥ माता भस्रा - आई ही चामडयाच्या भात्याप्रमाणे आहे- पितुः पुत्रः - पित्याचाच पुत्र होय- येन जातः सः एव सः - ज्याच्यामुळे झाला त्याचा तो पुत्र होय- दुष्यन्त पुत्रं भरस्व - हे दुष्यंत राजा पुत्राचे पोषण कर- शकुंतलां मा अवमंस्थाः - शकुंतलेचा अपमान करू नकोस. ॥२१॥ नरदेव - हे राजा- रेतोधाः पुत्रः (पितरं) यमक्षयात् नयति - वंशचालक पुत्र पित्याला यमयातनातून सोडवितो- त्वं अस्य गर्भस्य धाता (असि) - तूच या गर्भाचा संस्थापक आहेस- शकुंतला सत्यं आह - शकुंतला खरे बोलली. ॥२२॥ पितरि उपरते - पिता मृत झाला असता- सः अपि महाशयाः चक्रवर्तीं (बभूव) - तो बालकही मोठा कीर्तिमान सार्वभौम राजा झाला- हरेः अंशभुवः - विष्णूच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या - तस्य महिमा भुवि गीयते - त्या भरताचे माहात्म्य पृथ्वीवर गायिले जाते. ॥२३॥ अस्य दक्षिणहस्ते चक्रं (आसीत्) - ह्याच्या उजव्या हातावर चक्र चिन्ह होते- अस्य पादयोः पद्मकोशः - ह्याच्या दोन्ही पायावर कमलपुष्पाचे चिन्ह होते- महाभिषेकेण अभिषिक्तः - महाभिषेकविधीने अभिषेकिलेला - सः अधिराट् विभुः - तो समर्थ सार्वभौम राजा भरत- गंगायाम् अनु - गंगा नदीच्या काठी - पंचपंचाशता मेध्यैः वाजिभिः ईजे - पंचावन्न पवित्र अश्वांच्या योगे यज्ञ करिता झाला- मामतेयं पुरोधाय - ममतेचा पुत्र जो दीर्घतमा ह्याला उपाध्याय करून- प्रभुः (सः) - समर्थ असा तो भरत- वसु प्रददत् - द्रव्य देणारा असा- यमुनायां अनु अष्टसप्तति - यमुना नदीच्या काठी अठयाहत्तर - मेध्यान् अश्वान् बबंध - यज्ञीय अश्व बांधिता झाला. ॥२४-२५॥ हि - खरोखर- दौष्यन्तेः भरतस्य अग्निः - दुष्यन्तपुत्र भरताचा अग्नि- साची गुणे (प्रदेशे) चितः - उत्तम गुणयुक्त देशात सिद्ध केलेला होता- यस्मिन् सहस्रं ब्राह्मणाः - जेथे हजारो ब्राह्मण - गाःबद्वशः विभेजिरे - प्रत्येकी १३ हजार ८४ गाई वाटून घेते झाले. ॥२६॥ त्रयस्त्रिंशच्छतं अश्वान् बध्वा - एकशे तेहतीस अश्व बांधून- नृपान् विस्मापयन् मायां अत्यगात् - राजांना विस्मित करीत माया तरून गेला- देवानां गुरुं (च) आययौ - आणि देवांचा गुरु अशा विष्णूच्या पदाला गेला. ॥२७॥ मष्णोर कर्मणि - मष्णार नावाच्या कर्मामध्ये- शुक्लदतः कृष्णान् - पांढर्या दाताचे, कृष्णवर्णाचे - हिरण्येन परीवृतान् - व सुवर्णालंकारांनी वेष्टिलेले- चतुर्दश नियुतानि मृगान् - चौदा लक्ष हत्ती- अदात् - देता झाला. ॥२८॥ यथा बाहुभ्यां त्रिदिवं - जसा बाहूंनी स्वर्ग- (तथा) भरतस्य महत् कर्म - तसेच भरत राजाचे मोठे कृत्य- पूर्वे नृपा न एव आपुः - पूर्वीचे राजे न मिळविते झाले- अपरे (नृपाः) न एव (आपुः) - पुढील राजेही मिळविते झाले नाहीतच- न एव प्राप्स्यन्ति - पुढेही मिळणार नाहीत. ॥२९॥ दिग्विजये - दिग्विजयाच्या प्रसंगी- किरात्हूणान् यवनान् - किरात, हूण, - अंध्रान् कंकान् खशान् शकान् - आंध्र, कंक, खश व शक यांना- अब्रह्मण्यान् नृपान् - ब्रह्मद्वेषी राजांना- अखिलान् च म्लेच्छान् - आणि सर्व म्लेच्छांना- अहन् - मारिता झाला. ॥३०॥ पुरा ये असुराः देवान् जित्वा - पूर्वी जे दैत्य देवांना जिंकून - रसौकासि भेजिरे - पाताळात जाऊन बसले होते- (तैः) प्राणिभिः रसां नीताः - त्या बलाढय पुरुषांनी पाताळात नेलेल्या - देवस्त्रियः (सः) पुनः आहरत् - देवस्त्रियांना आणून देता झाला. ॥३१॥ रोदसी तस्य प्रजानां - पृथ्वी व स्वर्ग त्या राजाच्या प्रजांच्या - सर्वकामान् दुदुहतुः - सर्व इच्छा पुरवीत असत- त्रिणवसाहस्त्रीः समाः - सत्तावीस हजार वर्षे चारही दिशांवर - (तस्य) दिक्षु चक्रम् अवर्तयत् - त्याचे राज्यचक्र चालत होते. ॥३२॥ सः सम्राट् - तो सार्वभौम भरत- लोकपालाख्यम् ऐश्वर्यं - लोकपाल नावाचे ऐश्वर्य- अधिराट्श्रियं - सार्वभौम संपत्ति- अस्खलितं चक्रं - अकुंठित सत्ता- प्राणान् - प्राण- मृषा इति - हे सर्व मिथ्या समजून - उपरराम ह - खरोखर उपराम पावला. ॥३३॥ नृप - हे परीक्षित राजा- तस्य तिस्रः सुसंमताः - त्याला अत्यंत मान्य अशा तीन - वैदर्भ्यः पत्न्यः आसन् - विदर्भकुळात जन्मलेल्या स्त्रिया होत्या- (पुत्राः) अनुरूपाः न - पुत्र आपल्याला योग्य नाहीत - इति ईरिते त्यागभयात् - असे म्हटले असता पती आपणास टाकून देईल ह्या भीतीने - (ताः) पुत्रान् जघ्नुः - त्या पुत्रांना मारून टाकित्या झाल्या. ॥३४॥ एवं वंशे वितथे - याप्रमाणे वंश व्यर्थ गेला असता- तदर्थंमरुत्स्तोमेन यजतः तस्य - त्यासाठी मरुत्स्तोमनामक यज्ञ करणार्या त्याला- मरुतः - मरुत् देव- भरद्वाजं सुतं (उपाददुः) - भरद्वाज हा पुत्र देते झाले. ॥३५॥ अन्तर्वत्न्यां भ्रातृपत्न्यां - गर्भिणी अशा बंधुस्त्रीच्या ठिकाणी- मैथुनाय प्रवृत्तः बृहस्पतिः - मैथुनाविषयी प्रवृत्त झालेला बृहस्पति- वारितः (सन्) - निषेधिला असता- गर्भं शप्त्वा वीर्यं अवासृजत् - गर्भाला शाप देऊन वीर्य सोडिता झाला. ॥३६॥ भर्तृत्यागविशङ्कितां - पती आपला त्याग करील अशी भीती बाळगणार्या - तं त्यक्तुकामां ममतां - व त्या पुत्राला टाकण्याची इच्छा करणार्या ममतेला उद्देशून- सुराः तस्य नामनिर्वचनं - देव त्या पुत्राचे नाव दर्शविणारा - एनं श्लोकं जगुः - हा श्लोक गाते झाले. ॥३७॥ मूढे द्वाजं इमं भर - हे मूर्ख स्त्रिये ह्या दोघांपासून झालेल्या पुत्राचे पोषण कर- बृहस्पते - हे बृहस्पते - द्वाजं भर - दोघांपासून जन्मलेल्या ह्याचे पोषण कर - (दूति सा तं आह) - असे ती त्या बृहस्पतीला म्हणाली- एवं उक्त्वा - ह्याप्रमाणे बोलून - पितरौ यत् यातौ - ते आईबाप ज्याअर्थी तेथून निघून गेले- ततः अयं भरद्वाजः (इति प्रसिद्धः) - त्यामुळे ह्याचे नाव भरद्वाज असे प्रसिद्ध झाले. ॥३८॥ सुरैः एवं चोद्यमाना ममता - देवांनी याप्रमाणे प्रेरिलेली ममता- आत्मजं वितथं मत्वा - पुत्र व्यर्थ मानून- (तं) व्यसृजत् - त्याला टाकून देती झाली- मरुतः (तं) अबिभ्रन् - मरुत त्याचे पोषण करिते झाले- (भरतस्य) अन्वये वितथे - भरताचा वंश व्यर्थ झाला असता - (देवैः) अयं दत्तः - देवांनी हा भरद्वाज त्याला दिला. ॥३९॥ नवमः स्कन्धः - अध्याय विसावा समाप्त |