श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ११ वा - अन्वयार्थ

भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन -

भगवान् रामः - ऐश्वर्यसंपन्न रामचंद्र - आचार्यवान् - उपाध्यायाच्या साह्याने दीक्षा घेऊन - आत्मना - मनोभावाने - उत्तमकल्पकैः मखैः - चांगल्या विधियुक्त यज्ञांनी - आत्मानं - आत्मस्वरूपी अशा - सर्वदेवमयं देवं - सर्वदेवरूपी परमात्म्याला - ईजे - आराधिता झाला. ॥१॥ - सः प्रभुः - तो समर्थ रामचंद्र - होत्रे - होत्याला - प्राचीं दिशं - पूर्व दिशा - ब्रह्मणे - ब्रह्माला - दक्षिणां - दक्षिण दिशा - अध्वर्यवे - अध्वर्यूला - प्रतीचीं - पश्चिम दिशा - सामगाय च - आणि उद्‌गात्याला - उदीचीं - उत्तर दिशा - अददात् - देता झाला. ॥२॥

इदं कृत्स्नं - हे सर्व - ब्राह्मणः अर्हति - ब्राह्मणाला योग्य आहे असे - मन्यमानः - मानणारा - निःस्पृहः - निरिच्छ असा रामचंद्र - तदन्तरा यावती भूः (आसीत्) - पूर्वादि दिशांमधील जेवढी पृथ्वी होती - (तां) शेषां - ती अवशिष्ट राहिलेली पृथ्वी - आचार्याय - आचार्याला - ददौ - देता झाला. ॥३॥

इति - याप्रमाणे - अयं - हा राम - तत् - त्यावेळी - अलंकारवासोभ्यां - अलंकार व वस्त्रे यांनी - अवशेषितः - अवशिष्ट राहिला - तथा - त्याप्रमाणे - राज्ञी वैदेही अपि - महाराणी जानकीसुद्धा - सौ‌मंगल्यावशेषिता - सौ‌भाग्यालंकारच अवशिष्ट राहिले आहेत जिचे अशी झाली. ॥४॥

ब्रह्मण्यदेवस्य - ब्राह्मणाचा हितकारी जो देव रामचंद्र त्यांचे - संस्तुतं - अत्यंत स्तविलेले - वात्स्यल्यं - प्रेम - वीक्ष्य - पाहून - प्रीताः ते तु - संतुष्ट झालेले ते ब्राह्मण तर - क्लिन्नधियः - ज्यांची अंतःकरणे द्रवली आहेत असे - तस्मै प्रत्यर्प्य - त्या रामचंद्राला सर्व ऐश्वर्य परत देऊन - इदं बभाषिरे - असे म्हणाले. ॥५॥

भुवनेश्वर भगवन् - हे त्रैलोक्याधिपते भगवंता - त्वया - तुझ्याकडून - नः - आम्हाला - किं नु अप्रत्तं - न दिले गेलेले असे खरोखर काय आहे - यत् - कारण - नः अन्तर्हृदयं - आमच्या हृदयात - विश्य - शिरून - स्वरोचिषा - आपल्या प्रकाशाने - (त्वं) तमः हंसि - तू अज्ञानरूप अंधकार नष्ट करितोस. ॥६॥

ब्रह्मण्यदेवाय - ब्राह्मणांचा कैवारी जो देव अशा - अकुंठमेधसे - अकुंठित बुद्धीच्या - उत्तमश्लोकधुर्याय - पुण्यकीर्ति पुरुषात श्रेष्ठ अशा - न्यस्तदंडार्पितांघ्रये - व्यवहार सोडून दिलेल्या मुनींनी आपल्या हृदयात ज्याच्या चरणांना स्थापन केले आहे अशा - रामाय नमः - रामचंद्राला नमस्कार असो. ॥७॥

कदाचित् - एके प्रसंगी - लोकजिज्ञासुः - लोकांचे मन जाणू इच्छिणारा - गूढः - गुप्त वेष घेतलेला - रात्र्यां अलक्षितः चरन् - रात्री कोणाच्या दृष्टीस न पडता फिरणारा - रामः - रामचंद्र - भार्यां उद्दिश्य (उक्ताः) - स्त्रीला उद्देशून बोललेले - कस्यचित् वाचः - कोणा एकाचे शब्द - अशृणोत् - ऐकता झाला. ॥८॥

अहं - मी - दुष्टां असतीं परवेश्मगां त्वां - दुष्ट, व्यभिचारिणी व दुसर्‍याच्या घरी गमन करणार्‍या अशा तुला - न बिभर्मि - बाळगणार नाही - स्त्रीलोभी रामः - स्त्रीलंपट राम - सीता बिभृयात् - सीतेला बाळगो - अहं पुनः - मी मात्र. ॥९॥

इति - याप्रमाणे - बहुमुखात् - अनेक मुखांनी बोलणार्‍या - दुराराध्यात् - संतुष्ट राखण्यास कठीण अशा - असंविदः लोकात् - अज्ञानी लोकांपासून - भीतेन पत्या - भ्यालेल्या पति रामाने - त्यक्ता सा - त्याग केलेली ती सीता - प्राचेतसाश्रमं प्राप्ता - वाल्मीकीच्या आश्रमाला गेली. ॥१०॥

अंतर्वत्‍नी सा - गरोदर अशी ती सीता - काले आगते - समय प्राप्त झाला असता - कुशः लवः - कुश आणि लव - इति ख्यातौ - या नावांनी प्रख्यात झालेल्या - यमौ सुतौ - जुळ्या पुत्रांना - सुषुवे - प्रसवती झाली - मुनिः - तो वाल्मीकी मुनि - तयो क्रियां - त्या दोघांचे जातकर्मादि संस्कार - चक्रे - करिता झाला. ॥११॥

महीपते - हे राजा - लक्ष्मणस्य - लक्ष्मणाचे - अंगदः चित्रकेतुः च - अंगद आणि चित्रकेतु - (इति) आत्मजौ - असे दोन मुलगे - स्मृतौ - सांगितलेले आहेत - तक्षः पुष्कलः - तक्ष व पुष्कल - इति - असे - भरतस्य पुत्रौ आस्ताम् - भरताचे पुत्र होते. ॥१२॥

सुबाहुः श्रुतसेनः च - सुबाहु आणि श्रुतसेन - शत्रुघ्नस्य पुत्रौ - शत्रुघ्नाचे पुत्र - बभूवतुः - होते - भरतः - भरत - दिशां विजये - दिग्विजयाच्या वेळी - कोटिशः गंधर्वान् - कोटयावधी गंधर्वाना - जघ्ने - मारिता झाला - तदीयं - त्याचे - सर्वं द्रव्यं - सगळे द्रव्य - आनीय - आणून - राज्ञे - रामराजाला - न्यवेदयत् - अर्पण करिता झाला. ॥१३॥

च - आणि - शत्रुघ्नः - शत्रुघ्न - मधोः पुत्रं लवणं नाम राक्षसं - मधूचा मुलगा जो लवण नावाचा राक्षस त्याला - हत्वा - मारून - मधुवने - मधुवनात - मथुरां नाम पुरीं - मथुरा नावाची नगरी - चक्रे वै - खरोखर वसविता झाला. ॥१४॥

भर्त्रा विवासिता सीता - पतीने घालवून दिलेली सीता - तनयौ मुनौ निक्षिप्य - वाल्मिकि ऋषीजवळ मुलांना ठेवुन - रामचरणौ ध्यायन्ती - रामाच्या चरणांचे ध्यान करीत - विवरं प्रविवेश - पाताळात प्रवेश करिती झाली. ॥१५॥

तत् श्रुत्वा - ते श्रवण करून - भगवान् ईश्वरः रामः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रेष्ठ रामचंद्र - धिया - बुद्धीच्या योगाने - शुचः रुंधन् अपि - शोक आवरीत असतानाही - तस्याः - त्या सीतेच्या - तान् तान् गुणान् - त्या त्या गुणांना - स्मरन् - आठविणारा - (ताः) रोद्धुं न अशक्नोत् - तो शोक आवरू शकला नाही. ॥१६॥

स्त्रीपुंप्रसंगः - स्त्री-पुरुषांची परस्परांविषयी आसक्ति - सर्वत्र - सर्व ठिकाणी - ईश्वराणां अपि - समर्थ पुरुषांनाही - त्रासं आवहः (अस्ति) - त्रासदायक होते - किम् उत गृहचेतसः ग्राम्यस्य - मग ज्याचे मन संसारात गुंतले आहे अशा विषयलंपट पुरुषांची गोष्ट काय सांगावी ? ॥१७॥

ततः ऊर्ध्वं - तेव्हापासून पुढे - ब्रह्मचर्यं धारयन् - ब्रह्मचर्यव्रत धारण करणारा - प्रभुः - समर्थ राम - त्रयोदशाब्दसाहस्रं - तेरा हजार वर्षे - अखंडितं अग्निहोत्रं - सतत अग्निहोत्र - अजुहोत् - चालविता झाला. ॥१८॥

ततः - नंतर - स्मरतां हृदि - स्मरण करणार्‍यांच्या हृदयात - दण्डककंटकैः - दंडकारण्यातील काटयांनी टोचलेले - सिद्धं स्वपादवल्लभं विन्यस्य - आपले चरणपल्लव ठेवून - रामः आत्मज्योतिः अगात् - रामचंद्र आपल्या तेजात जाऊन मिळाला. ॥१९॥

सुरयाञ्चया - देवांच्या प्रार्थनेने - आत्तलीलातनोः - घेतले आहे लीलेने शरीर ज्याने अशा - अधिकसाम्यविमुक्तधाम्नः - अधिकपणा किंवा सारखेपणा यातून सुटलेले आहे सामर्थ्य ज्याचे अशा - रघुपतेः - रामचंद्राचे - अस्त्रपूगैः रक्षोवधः - अस्त्रसमूहाने केलेला राक्षसांचा वध - जलधिबंधनं - समुद्रावर केलेले सेतुबंधन - इदं यशः न - हे खरे यशच नव्हे - तस्य - त्याला - शत्रुहनने - शत्रुला मारण्याच्या कामी - किम् कपयः सहायाः (अपेक्षिताः) - काय सहाय्य करणारे वानर हवे होते. ॥२०॥

ऋषयः - ऋषी - यस्य - ज्यांचे - अमलं अघघ्नं - स्वच्छ व पापनाशन - दिगिभेन्द्रपटटं (भूषणीभूतं) यशः - दिग्विजांच्या अंगावरील भरजरी झुलीप्रमाणे भूषण झालेले यश - अधुना अपि - अद्यापि - नृपसदःसु - राजांच्या सभांमध्ये - गायंति - गात आहेत - तं - त्या - नाकपालवसुपालकिरीटजुष्टपादाम्बुजं - स्वर्गपालक व पृथ्वीपालक राजांच्या किरीटांनी ज्याच्या चरणकमलांचे सेवन केले आहे अशा - रघुपतिं - रामचंद्राला - शरणं प्रपद्ये - मी शरण जातो. ॥२१॥

यैः - ज्यांनी - सः - तो - स्पृष्टः - स्पर्शिला - अभिदृष्टः - पाहिला - वा संविष्टः - अथवा आसनावर बसविला - वा अनुगतः अपि - किंवा निदान अनुसरिला - ते कोशलाः - ते कोशल देशातील लोक - यत्र योगिनः गच्छंति - जेथे योगीच जातात - (तत्) स्थानं - त्या स्थानाला - ययुः - गेले. ॥२२॥

राजन् - हे राजा - श्रवणैः - कर्णांनी - रामचरितं उपधारयन् पुरुषः - रामचरित्र ऐकणारा मनुष्य - आनृशंस्यपरः (सन् अपि) - दयाधर्मात तत्पर असता - कर्मबन्धैः - कर्मबन्धनापासून - विमुच्यते - मुक्त होतो. ॥२३॥

भगवान् रामः (च) - आणि तो ऐश्वर्यसंपन्न रामचंद्र - स्वयं - स्वतः - आत्मनः भ्रातृन् (प्रति) - आपल्या भावांशी - कथं (अवर्तत) - कसा वागत असे - वा - अथवा - तस्मिन् - त्या रामचंद्राच्या ठिकाणी - ते (कथं) अवर्तंत - ते भाऊ कसे वागत होते - प्रजाः पौराः च - तसेच प्रजा आणि नागरिक - (तस्मिन्) ईश्वरे - त्या राजा रामचंद्राशी - (कथं) अन्ववर्तंत - कसे वागत होते. ॥२४॥

अथ - सिंहासनावर बसल्यानंतर - त्रिभुवनेश्वरः - त्रैलोक्यपालक रामचंद्र - भ्रातृन् - भावांना - दिग्विजये - दिग्विजय करण्याची - आदिशत् - आज्ञा देता झाला - सानुगः - अनुचरांसह - स्वानां आत्मानं दर्शयन् - पारैजनांना आपले दर्शन देत - गन्धोदैः - चंदनांच्या सडयांनी - करिणां मदसीकरैः - हत्तीच्या मदाच्या फवार्‍यांनी - आसिक्तमार्गां - शिंपिलेले आहेत रस्ते जिच्यातील अशा - वा - व - स्वामिनं प्राप्तं आलोक्य - आपला राजा आलेला पाहून - सुतरां मत्तां इव - अत्यंत उन्मत्त झाल्याप्रमाणे दिसणार्‍या - प्रासादगोपुरसभाचैत्यदेवगृहादिषु - राजवाडे, नगरीच्या वेशी, सभागृहे व देवालये इत्यादि ठिकाणी - विन्यस्तहेमकलशैः - ठेविलेल्या सुवर्णांच्या कलशांनी - पताकाभिः च - आणि पताकांनी - मण्डितां - सुशोभित केलेल्या - सवृन्तैः पूगैः - फलभारांनी लवलेल्या पोफळींनी - रंभाभिः - केळींनी - सुवाससां पट्टिकाभिः - उंची रेशमी कापडाच्या झालरींनी - आदर्शैः अंशुकैः स्रग्भिः - आरसे, उत्तम किनखापी छते व पुष्पमाळा यांनी - कृतकौतुकतोरणां - केली आहेत मंगलतोरणे जीत अशा - पुरीं - नगरीला - ऐक्षत - पाहता झाला. ॥२५-२६॥

अर्हणपाणयः पौराः - हातात भेटीच्या वस्तू घेतलेले नागरिक - तत्र तत्र - प्रत्येक ठिकाणी - तं उपेयुः - त्याला भेटावयास येत - देव - हे राजा - त्वया प्राक् उद्धृतां इमां (महीं अधुना) अपि पाहि - तू पूर्वी उद्धार केलेल्या त्या पृथ्वीचे आताही रक्षण कर. - (इति उक्त्वा) आशिषः युयुजुः - असे म्हणून आशिर्वाद देत. ॥२७॥

ततः - नंतर - (तस्य) दिदृक्षया - त्या रामाला पाहण्याच्या इच्छेने - उत्सृष्टगृहाः - सोडिली आहेत घरांतील कामे ज्यांनी असे - स्त्रियः नराः प्रजाः - सर्व स्त्री-पुरुष प्रजानन - हर्म्याणि आरुह्य - घरांवर चढून - चिरागतं अरविन्दलोचनं पतिं वीक्ष्य - फार दिवसांनी आलेल्या त्या कमलनेत्र राजाला पाहून - अतृप्तनेत्राः - तृप्त झाले नाहीत नेत्र ज्यांचे असे - कुसुमैः अवाकिरन् - फुलांनी वर्षाव करू लागले. ॥२८॥

अथ - नंतर - स्वैः पूर्वराजभिः जुष्टं - आपल्या वंशातील पूर्वी होऊन गेलेल्या राजांनी उपभोगिलेल्या - अनंताखिलकोशाढयः - सर्व द्रव्यांच्या कोशांनी अपरंपार भरलेल्या - अनर्घ्योरुपरिच्छदं - बहुमूल्य व विपुल आहे साहित्य ज्यातील अशा - विद्रुमोदुम्बरद्वारैः - पोवळ्यांनी बांधिलेल्या उंबरठयांनी व दारांनी - वैदुर्यस्तंभपंक्तिभिः - वैडूर्य मण्यांच्या खांबांच्या रांगांनी - मारकतैः स्वच्छैः स्थलैः - पाचेची फरशी केलेल्या निर्मळ स्थलांनी - भातस्फटिकभित्तिभिः - तेजस्वी स्फटिक मण्यांच्या भिंतींनी - चित्रस्रग्भिः - चित्रविचित्र पुष्पांच्या माळांनी - पट्टिभिः - रंगीबेरंगी झालरींनी - वासोमणिगणांशुकैः - सभागृहातील हंडयाझुंबरांना लाविलेल्या रत्‍नसमूहांच्या किरणांनी - चिदुल्लासैः मुक्ताफलैः - चैतन्यासारख्या उज्ज्वल मोत्यांच्या सरांनी - कान्तकामोपपत्तिभिः - जागजागी चतुरतेने मांडून ठेविलेली मनोहर अशी खाद्य, पेये, गाद्यागिरद्या, वाळ्याचे पंखे, आरामखुर्च्या, पलंग, पुष्पशय्या इत्यादि उपभोग साधनांनी - सुरभिभिः धूपदीपैः - सुवासिक धूपदीपांनी - पुष्पमंडनैः मंडितं - ठिकठिकाणी मोठया मार्मिक कौशल्याने बनविलेल्या विविध प्रकारच्या पुष्पगुच्छांनी शोभणार्‍या - सुरसंकाशैः भूषणभूषणैः - देवांसारख्या दैदिप्यमान भूषणांनी नटलेल्या - स्त्रीपुंभिः - स्त्रीपुरुषांनी - जुष्टं - सेविलेल्या - स्वगृहं - आपल्या राजवाडयात - प्रविष्टः - प्रवेश करिता झाला. ॥२९-३२॥

स्वारामधीराणां ऋषभः - स्वस्वरूपी रममाण असणार्‍या धीर पुरुषांत श्रेष्ठ असा - सः भगवान् रामः - तो ऐश्वर्यसंपन्न रामचंद्र - तस्मिन् - त्या राजवाडयात - स्निग्धया प्रियया इष्टया सीतया - स्नेहमयी, प्रेमळ व आवडत्या सीतेसह - रेमे किल - खरोखर रममाण झाला. ॥३३॥

नृणां अभिध्यातांघ्रिपल्लवः च - आणि भक्तजनांनी ध्यायिलेले आहेत कोमल चरण ज्याचे असा तो रामचंद्र - बहून् वर्षपूगान् - पुष्कळ वर्षेपर्यंत - धर्मं अपीडयन् - धर्माला पीडा न देता - यथाकालं कामान् बुभुजे - योग्यकाली विषय सेविता झाला. ॥३४॥

नवमः स्कन्धः - अध्याय अकरावा समाप्त

GO TOP