श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ

विदुराचे प्रश्न -

द्वैपायनसुतः - व्यासाचा पुत्र - बुधः विदुरः - ज्ञानी असा विदुर - एवम् - या प्रकारे - ब्रुवाणम् मैत्रेयम् - बोलणार्‍या मैत्रेय ऋषीला - भारत्या - वाणीने - प्रीणयन् इव - जणू आनंद देत - प्रत्यभाषत - बोलला ॥१॥

ब्रह्मन् - हे मैत्रेया - अविकारिणः - विकार ज्याला नाही अशा - निर्गुणस्य - निर्गुण - चिन्मात्रस्य भगवतः - चैतन्यरूप षड्ग्णैश्वर्यसंपन्न परमेश्वराला - क्रियाः - क्रिया - च - आणि - गुणाः - सत्त्वादि गुण - लीलया अपि - लीलेने सुद्धा - कथं युज्येरन् - कसे संयुक्‍त करतील ॥२॥

अर्भस्य - बालकाच्या - क्रीडायाम - खेळण्याकडे होणार्‍या - उद्यमः - प्रवृत्तीचे कारण - कामः - इच्छा - अस्ति - आहे - च - आणि - चिक्रीडिषा - खेळण्याची इच्छा - अन्यतः - दुसर्‍या वस्तूमुळे किंवा दुसर्‍या मुलांच्या प्रेरणेने - भवति - होते - तु - परंतु - स्वतः तृप्तस्य - स्वतःच्याच योगे तृप्त असलेल्या - सदा - सर्वकाल - अन्यतः निवृतस्य - दुसर्‍यापासून निवृत्त असलेल्या परमेश्वराला - चिक्रीडिषा - खेळ्ण्याची इच्छा - कथम् - कशी - संभवति - संभवते. ॥३॥

भगवान् - भगवान् - गुणमय्या - सत्त्वादि गुण जीमध्ये आहेत अशा - आत्मयायया - आपल्या मायेने - एतत् विश्वम् अस्त्राक्षीत् - ह्या जगाला उत्पन्न करता झाला - तया - त्या मायेच्या योगाने - एतत् संस्थापयति - या विश्वाचे पालन करतो - च - आणि - भूयः - पुनः - प्रत्यपिधास्यति - लय करील. ॥४॥

यः - जो - असौ - हा जीव - देशतः - देशामुळे - कालतः - कालामुळे - अवस्थातः - अवस्थेमुळे - स्वतः - आपल्यामुळे - अन्यतः - दुसर्‍यामुळे - अविलुप्तावबोधात्मा - लुप्त झाले नाही ज्ञानस्वरूप ज्याचे असा - अस्ति - आहे - सः - तो जीव - अजया - मायेशी - कथं युज्येत - कसा युक्‍त होईल. ॥५॥

एषः - हा - भगवान् - भगवान् - एकः एव - एकटाच - सर्वक्षेत्रेषु - सर्व शरीरात - अवस्थितः - राहिलेला - अस्ति - आहे - अमुष्य - ह्या जीवाला - दुर्भगत्वम् - दुःख - वा - अथवा - कर्मभिः क्‍लेशः - कर्मामुळे होणारा क्‍लेश - वा कुतः - कोठून - संभवेत् - संभवणार ॥६॥

विद्वन् - हे ज्ञानी मैत्रेया - मे मनः - माझे मन - एतस्मिन् अज्ञानसंकटे - ह्या अज्ञानरूपी कठीण मार्गात - खिद्यते - खिन्न होते - विभो - हे प्रभो मैत्रेया - तत् - त्यास्तव - नः - आमच्या - महत् मानसं कश्मलम् - मोठ्या मानसिक मोहाला - पराणुद - दूर कर ॥७॥

तत्त्वजिज्ञासुना क्षत्‌त्रा - तत्त्व जाणण्याची इच्छा करणार्‍या विदुराने - इत्थम् - पूर्वोक्‍तप्रकारे - चोदितः - प्रेरणा केलेला - सः मुनिः - तो मैत्रेय ऋषि - भगवश्चित्तः - भगवन्ताच्या ठिकाणी चित्त आहे ज्याचे व - गतस्मयः - ज्याचा गर्व गेला आहे असा - स्मयन् इव प्रत्याह - हसतच जणू काय प्रत्युत्तर देता झाला ॥८॥

विमुक्‍तस्य - सर्वस्वी बंधनरहित - जीवस्य - जीवाला - बन्धनम् - बन्धन - उत - आणि - कार्पण्यम् - दुःख - भवति - होते - इति यत् - हे जे - नयेन विरुध्यते - तर्काशी विरुद्ध दिसते - सा - ती - इयम् - ही - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न - ईश्वरस्य - ईश्वराची - माया - माया - अस्ति - आहे ॥९॥

यत् - कारण - अमुष्य उपद्रष्टुः पुंसः - ह्या स्वप्न पाहणार्‍या पुरुषाला - स्वशिरश्छेदनात्मकः - आपले मस्तक तुटणे इत्यादि - आत्मविपर्ययः - शरीरामध्ये होणारा भेद - अर्थेन विना - वास्तविक स्थितीवाचून - प्रतीयते - भासतो ॥१०॥

यथा - ज्याप्रमाणे - जले - पाण्यात - तत्कृतः - पाण्याने केलेला - कम्पादिः - हालणे इत्यादि व्यापार - चन्द्रमसः - चन्द्राचा - गुणः असन् अपि - गुण नसून देखील - दृश्यते - दिसतो - तथा - त्याप्रमाणे - अनात्मनः - देह, इन्द्रिये इत्यादिकांचा - गुणः - गुण - द्रष्टुः आत्मनः - देहादिकांचा अभिमानी अशा साक्षीभूत जीवात्म्याचा - दृश्यते - दिसतो ॥११॥

वै - खरोखर - सः - तो देहादिकांचा गुण - निवृत्तिधर्मेण - विषयत्यागरूप धर्माचरणाने - च - आणि - वासुदेवानुकम्पया - परमेश्वराच्या कृपेने - भगवद्भक्‍तियोगेन - भगवन्ताच्या ठिकाणी भक्‍ति जडल्यामुळे - इह - या लोकी - शनैः - हळूहळू - तिरोधत्ते - नाहीसा होतो ॥१२॥

अथ - नंतर - यदा - ज्यावेळी - द्रष्ट्रात्मनि परे हरौ - साक्षीरूपाने हृदयात राहून सर्वांचे दुःख हरण करणार्‍या परमेश्वराच्या ठिकाणी - इन्द्रियोपरामः - इन्दियांची निश्चलता - भवति - होते - तदा - त्यावेळी - संसुप्तस्य इव - निजलेल्या मनुष्याचे सर्व क्लेश जसे दूर होतात त्याप्रमाणे - क्लेशाः - क्लेश - कृत्स्त्रशः - सर्व प्रकारे - विलीयन्ते - नष्ट होतात. ॥१३॥

मुरारेः - मुरनामक दैत्याचा शत्रु अशा परमेश्वराच्या - गुणानुवादश्रवणम् - गुणांचे वर्णन आणि श्रवण - अशेषसंक्लेशशमम् - संपूर्ण दुःखाच्या शान्तीला - विधत्ते - करिते - आत्मलब्धा - मनात उत्पन्न झालेली - तच्चरणारविन्दपरागसेवारतिः - ईश्वराच्या चरणकमलावरील धुळीच्या सेवनाविषयीची प्रीति - विधत्ते - करिते - कुतः पुनः - हे काय पुनः सांगितले पाहिजे ॥१४॥

विभो - समर्था मैत्रेया - तव सूक्‍तासिना - तुझ्या उत्तम भाषणरूपी खड्गाने - मह्यम् - माझा - संशयः संच्छिन्नः - संशय पार तुटला - भगवन् - हे भगवन् - उभयत्र अपि - ईश्वराचे स्वातंत्र्य व जीवाचे पारतंत्र्य या दोन्हीविषयी - मे मनः संप्रधावति - माझ्या मनाची नीट समजूत पटली ॥१५॥

विद्वन् - हे ज्ञानसंपन्न विदुरा - अपार्थं निर्मूलम् एतत् - ज्यात काही अर्थ नाही व ज्याला खरा आधारहि नाही असे हे बंधनात्मक दुःख - हरेः आत्ममायायनम् आभाति - भगवन्ताची जीवविषयक जी माया तिच्या आश्रयाने भासते - यत् बहिः विश्वमूलम् - जिच्या बाहेर सृष्टीचे कारण - अन्यत् - दुसरे - न - नाही - इति - याप्रमाणे - साधु व्याहृतम् - चांगले सांगितले ॥१६॥

लोके यः मूढतमः - जगात जो अत्यन्त मूर्ख - च - आणि - बुद्धेः परं गतः - जो ज्ञानाच्या सीमेला पोचलेला आहे - तौ उभौ सुखम् एधेते - ते दोघे सुखाने राहतात - च - आणि - अन्तरितः जनः क्‍लिश्यति - या दोहोमधला मनुष्य दुःखाने पीडित होतो ॥१७॥

नात्मनः - आत्मस्वरूपी नव्हे अशा देहादि प्रपंचाचा - प्रतीतस्य अपि - अनुभवास येत असून सुद्धा - अर्ताभावं - वास्तविक खोटेपणा - युष्मच्चरणसेवया विनिश्चित्य - तुमच्या चरणांच्या सेवेने निश्चित करून - अहं - मी - तां - त्या प्रतीताला - अपि च - सुद्धा - पराणुदे - दूर करतो ॥१८॥

यत्सेवया - ज्या तुमच्यासारख्यांच्या सेवेमुळे - कूटस्थस्य - विकाररहित अशा - भगवतः मधुद्विषः - भगवान मधुसूदनाच्या - पादयोः - पायांच्या विषयी - व्यसनार्दनः - संकटाचा नाश करणारा असा - तीव्रः - अति उत्कट - रतिरासः - प्रेमाचा उत्साह - भवेत् - होतो ॥१९॥

हि - खरोखर - अल्पतपसः - थोडे आहे तप ज्याचे अशा पुरुषाला - वैकुण्ठवर्त्मसु - वैकुंठाच्या मार्गातील - सेवा - सेवा - दुरापा - प्राप्त होण्यास कठीण - यत्र - ज्या वैकुंठमार्गात - नित्यं - सतत - देवदेवः जर्नादनः - देवांचा देव असा जनार्दन - उपगीयते - स्तविला जातो ॥२०॥

अग्रे - प्रथम - सविकाराणि - इंद्रिये, देवता इत्यादी विकारांसहित - महदादीनि - महत्तत्त्व, अहंकार इत्यादिकांना - अनुक्रमात् - अनुक्रमाने - सृष्ट्वा - उत्पन्न करून - तेभ्यः - महत्तत्त्वादिकांपासून - विराजम् - विराट पुरुषाला - उद्धृत्य - उत्पन्न करून - तम् - त्या विराट पुरुषात - अनु प्राविशत् - प्रवेश करिता झाला ॥२१॥

यम् आद्यं पुरुषम् - ज्या आदिपुरुषाला - सहस्त्राङ्‌घ्र्‌यूरुबाहुकम् - हजारो पाय, मांड्या आणि बाहू ज्यास आहेत असा - आहुः - म्हणतात - यत्र - ज्या विराट पुरुषाच्या ठिकाणी - इमे - हे - विश्वे लोकः - सर्व लोक - सविकासम् - विस्तारासहित - आसते - रहातात ॥२२॥

यस्मिन् - ज्याच्या ठिकाणी - दशविधः - दहा प्रकारचा - सेंद्रियार्थेन्द्रियः - इंद्रिये, त्यांचे विषय आणि त्यांच्या देवता यांसह - त्रिवृत् - तीन वृत्तींचा - प्राणः - प्राण - त्वया - तुझ्याकडून - ईरितः - सांगितला गेला - यतः - ज्या विराट पुरुषापासून - वर्णाः - ब्राह्मणादि वर्ण - भवन्ति - उत्पन्न होतात - तद्विभूतीः - त्या विराट पुरुषाची ब्रह्मदेव आदि करून स्वरूपे - नः - आम्हाला - वदस्व - सांग ॥२३॥

यत्र - ज्या विभूतींच्या ठिकाणी - पुत्रैः पौत्रैः नप्तृभिः च गोत्रजैः सह - पुत्र, नातू, पणतू आणि इतर वंशज यांसह - विचित्राकृतयः - निरनिराळी आहेत स्वरूपे ज्यांची अशी - प्रजाः - प्रजा - आसन् - उत्पन्न झाल्या - याभिः - ज्या संततींनी - इदं ततम् - हे जग व्यापिले ॥२४॥

सः प्रजापतीनां पतिः - प्रजापतींचा स्वामी असा तो ब्रह्मदेव - कान् - कोणत्या - प्रजापतीन् - प्रजापतींना - सर्गान् - सृष्टीला - अनुसर्गान् - सृष्टींच्या भागांना - च - आणि - मन्वन्तराधिपान् - मन्वंतरांचे राजे अशा - मनून् - मनूंना - चक्लृपे - निर्माण करिता झाला ॥२५॥

मित्रात्मज - हे मैत्रेया - एषेताम् - ह्या मनूंच्या व राजांच्या - वंशान् - वंशाना - अपि - सुद्धा - च - आणि - भूमेः - पृथ्वीच्या - उपरि - वर - च - आणि - अधः - खाली - ये लोकाः आसते - जे लोक आहेत - तेषाम् - त्यांच्या - च - आणि - भूर्लोकस्य - भूलोकाच्या - संस्थां - स्थितीला - च - आणि - प्रमाणम् - लांबी रुंदी इत्यादिकांनी - वर्णय - वर्णन कर ॥२६॥

तिर्यङ्‌मानुषदेवानाम् - पशु, मनुष्य आणि देव यांच्या - च - आणि - गार्भस्वेदद्विजोदिभदाम् - गर्भज, स्वेदज, द्विज आणि उद्‌भिज्ज यांच्या - सर्गसंव्यूहम् - उत्पत्तीचे विभाग - नः - आम्हाला - वद - सांग ॥२७॥

गुणावतारैः - त्रिगुणांच्या योगाने घेतलेल्या ब्रह्मादि अवतारांनी - विश्वस्य - जगाच्या - सर्गास्थित्यप्ययाश्रयम् - उत्पत्ति, पालन, संहार यांच्या आश्रयाला - सृजतः - निर्माण करणार्‍या - श्रीनिवासस्य - लक्ष्मीचे निवासस्थान अशा परमेश्वराच्या - उदारविक्रमम् - उत्कृष्ट पराक्रमाला - व्याचक्ष्व - सांग ॥२८॥

रूपशीलस्वभावतः - बाह्य चिन्हे, आचार व स्वभाव यांवरून - वर्णाश्रमविभागान् - ब्राह्मणादि वर्णविभाग व ब्रह्मचर्यादि आश्रमविभाग यांना - च - आणि - ऋषीणाम् - ऋषींची - जन्मकर्मादि - अवतार व कर्मे इत्यादि - च - आणि - वेदस्य - वेदाचे - विकर्षणम् - विभाग ॥२९॥

प्रभो - समर्था मैत्रेया - च - आणि - यज्ञस्य - यज्ञाचे - वितानानि - निरनिराळे प्रकार - च - आणि - यागस्य - योगशास्त्राच्या - सांख्यस्य - सांख्यशास्त्राच्या - च - आणि - नैष्कर्म्यस्य - कर्मत्यागयुक्‍त अशा - पथः - मार्गांना - च - आणि - भगवतसमृतम् - भगवंतांनी सांगितलेल्या - तन्त्रम् - तंत्रमार्गाला - वद - सांगा ॥३०॥

पाखण्डपथवैषम्यम् - पाखण्डमार्गाकडे होणारी विषम प्रवृत्ती - प्रतिलोमनिवेशनम् - उत्पत्तिक्रमाच्या विरुद्ध क्रमाने सर्वांचा लय किंवा खालच्या वर्णाच्या पुरुषांपासून वरच्या वर्णातील स्त्रियांना होणार्‍या संततीचा प्रकार - च - आणि - जीवस्य - जीवाच्या - याः यावतीः गुणकर्मजाः गतयः - ज्या व जितक्‍या गुण आणि कर्मे यांपासून उत्पन्न होणार्‍या गति - सन्ति - आहेत ॥३१॥

धर्मार्थकाममोक्षाणाम् - धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीचे - अविरोधतः निमित्तानि - परस्परांच्या विरोधाशिवाय उपाय - वार्तायाः - उपजीविकेच्या साधनांचा - च - आणि - दण्डनीतेः - राजनीतीचा - च - आणि - श्रुतस्य - शास्त्राचा - पृथक् विधिम् - वेगवेगळा प्रकार ॥३२॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मवेत्त्या मैत्रेया - च - आणि - श्राद्धस्य - श्राद्धाचा - विधिम् - प्रकार - च - आणि - पितृणां एव सर्गम् - पितरांचाहि उत्पत्ति प्रकार - च - आणि - ग्रहनक्षत्रताराणाम् - ग्रह, नक्षत्रे आणि तारा यांची - कालावयवसंस्थितिम् - कालचक्राच्या ठिकाणी रचना - कथय - सांग ॥३३॥

दानस्य - दानाचे - तपसः - तपश्चर्येचे - वा - अथवा - इष्टापूर्तयोः अपि - यज्ञादिक कर्मे आणि धर्मशाळा, कूप इत्यादी लोकोपयोगी कृत्ये यांचेही - यत् फलम् - जे फल असेल ते - च - आणि - प्रवासस्थस्य - प्रवासात असलेल्या - उत आपदि च - आणि संकटात सापडलेल्या - पुंसः - पुरुषाचा - यः धर्मः - जो धर्म असेल तो ॥३४॥

वा - किंवा - येन - ज्या योगाने - धर्मयोनिः भगवान् जनार्दनः तुष्येत् - धर्माचा उत्पादक असा भगवान् परमात्मा संतुष्ट होईल ते - वा - किंवा - अनघ - हे निष्पाप मुने - येषाम् प्रसीदति - ज्यांना प्रसन्न होतो - एतत् च - हेहि - आख्याहि - सांगा ॥३५॥

द्विजोत्तम - हे ब्राह्मणश्रेष्ठ मैत्रेया - अनुव्रतानां शिष्याणाम् - आपल्या आज्ञाधारक शिष्यांना - च - आणि - पुत्राणाम् - पुत्रांना - दीनवत्सलाः गुरवः - दीनावर दया करणारे गुरु - अनापुष्टम् अपि - न विचारलेले देखील - ब्रूयुः - सांगतात ॥३६॥

उ भगवन् - हे मैत्रेय मुने - तेषाम् - त्या - तत्त्वानाम् - तत्त्वांचा - प्रतिसंक्रमः - लय - कतिधा - किती प्रकारांनी - भवति - होतो - तत्र - प्रलय काळी - इमम् - ह्या ईश्वराला - के - कोण - उपासीरन् - भजतील - स्वित् - किंवा - इमं शयानम् - ईश्वर योगनिद्रा घेत असता त्याच्या ठायी - के अनुशेरते - कोण लीन होतात ॥३७॥

च - आणि - पुरुषस्य - जीवाच्या - संस्थानम् - शरीराची रचना - वा - अथवा - स्वरूपम् - स्वरूप - च - तसेच - परस्य - परमेश्वराचे - स्वरूपम् - स्वरूप - ब्रूहि - सांगा - च - आणि - यत् - जे - गुरुशिष्यप्रयोजनम् - गुरुशिष्यांचा संबंध ज्यास आवश्यक आहे असे - नैगमम् - उपनिषत्संबंधी - ज्ञानम् - ज्ञान - तत् - ते ॥३८॥

अनघ - हे निष्पाप मैत्रेया - च - आणि - इह - या लोकात - सूरिभिः - विद्वानांनी - प्रोक्‍तानि - सांगितलेली - तस्य - त्या ज्ञानाची - निमित्तानि - साधने - ब्रूहि - सांगा - हि - कारण - पुंसाम् - पुरुषांना - ज्ञानम् - ज्ञान - भक्‍तिः - भक्‍ती - वा - किंवा - वैराग्यम् एव - वैराग्य हेहि - स्वतः - आपोआप - कुतः - कोठून होणार ॥३९॥

हरेः - श्रीकृष्णाची - कर्मविवित्सया - चरित्रे जाणण्याच्या इच्छेने - एतान् प्रश्नान् - ह्या प्रश्नांना - पृच्छतः - विचारणार्‍या - मे - मला - अजया - मायेने - नष्टचक्षुषः - ज्याचे ज्ञान नष्ट झाले आहे अशा - अज्ञस्य - अज्ञानी अशा - मे - मला - मित्रत्वात् - मित्रसंबंधामुळे - ब्रूहि - सांगा ॥४०॥

अनघ - हे निष्पाप मैत्रेया - सर्वे वेदाः - संपूर्ण वेद - च - आणि - यज्ञाः - यज्ञ - च - आणि - तपः - तप - च - आणि - दानानि - दाने - जीवाभयप्रदानस्य - जीवाला जे अभय देणे त्याच्या - कलाम् अपि - अंशाला देखील - न कुर्वीरन् - करणार नाहीत ॥४१॥

कुरुप्रधानेन - कुरुवंशात श्रेष्ठ अशा विदुराने - इत्थम् - याप्रमाणे - आपृष्टपुराणकल्पः - पुराणप्रसिद्ध विषय विचारला आहे ज्याला असा - भगवत्कथायाम् - श्रीकृष्णाच्या कथेविषयी प्रेरणा केलेला - प्रवृद्धहर्षः - ज्याचा हर्ष वाढला आहे असा - मुनिप्रधानः सः - ऋषिश्रेष्ठ असा तो मैत्रेय - संचोदितः - प्रेरणा केलेला असता - प्रहसन इव - ह्सतच जणू काय - तम् - त्या विदुराला - आह - म्हणाला ॥४२॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त

GO TOP