श्रीमद् भागवत महापुराण

विषय प्रवेश

भारतीय प्राचीन वाङ्‍मय अपार आहे. त्या सर्व वाङ्मयाचें विहंगमावलोकन करावे म्हटले तरी ते एका आयुष्यांत शक्य नाही. श्रुति, स्मृति, इतिहास, पुराण, षड्दर्शने, काव्यें, नाटकें, ज्योतिष, वैद्यक, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र असे विभाग सामान्यततया दिसून येतात. यांतील प्रत्येक विभागाच्या तपशीलांत शिरल्यास कितीतरी उपविभाग दिसून येतील. नुसत्या पुराणांचा विचार केला तरी ते वाङ्मयही अपरंपार आहे असे दिसते. पुराणे अठरा आहेत आणि अठरा उपपुराणेंही आहेत. याशिवाया पुराण सदृश इतर कितीतरी वाङ्मय आहे. नुसत्या पुराणांचा विचार करायचे म्हटले तरी ते एका जन्मांत शक्य होईलसे वाटत नाही. म्हणून शौनकादि ऋषींनी म्हटले -

प्रायेण अल्पायुषो मर्त्याः कलौ अस्मिन् युगे जनाः ।
मंदाः सुमदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः ।
भूरीणि भूरिकर्माणि श्रोतव्यानि विभागशः ॥

बहुशः कलियुतांतील मानव, मंदबुद्धीचे, मंदभाग्याचे, मंद सामर्थ्याचे, नाना प्रकारच्या संकटांनी ग्रस्त झालेले असें आहेत. करावयाचें कर्म व ऐकावयाचे वाङ्मय विभागशः अनंत आहे. या विचाराची सद्य परिस्थिती जुळते असेच चित्र दिसते. म्हणून एका भागवताचे अध्ययन होणे तरी इष्ट आहे. भागवतासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ भारतील वाङ्मय जगातील इतर वाङ्मयांत सांपडणें दिर्मिळ आहे. म्हणूनच या भागवताला प्रत्यक्ष श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ति म्हणतात.

श्रीमद्‌भागवत हा ग्रंथ श्रीहरीचे अवतार असणार्‍या वेदव्यासांनीं रचलेला असून त्यात १२ स्कंध, ३३५ अध्याय व १८,००० ग्रंथसंख्या (श्लोक) आहेत. वेदव्यासांनीच अठरा पुराणे रचली ज्याची ग्रंथसंख्या चार लक्ष सांगितली जाते. त्यांनी एक लक्ष श्लोकांचे महाभारत रचले तसेच ५६४ सूत्रे असलेले ब्रह्मसूत्र रचले. त्यांनीच अपार वेदसाहित्याचे विभाजन करून त्याचे चार भाग केले. इतर आस्तिक दर्शनांत तत्त्वज्ञानाविषयी जी अफुर्ण ता दिसून येते ती काधून टाकून त्या सर्व दर्शनांचा समन्वय भागवतात केलेला आह्द्ळून येतो. श्रुतीतील ज्या तत्त्वाचें सम्यक् आकलन स्पष्टपणें झाले नाहीं तें तत्त्व स्पष्टपणे मंदबुद्धीच्या लोकांना कळेल अशा रीतीने भागवताद्वारा श्रीहरि अवतार असण्यार्‍या वेदव्यासांनी प्रतिपादन केले आहे, म्हणूनच भागवतास वेदरूपी कल्पवृक्षाचें मधुर फळ म्हटले आहे. या अद्‍भुत कल्पवृक्षाच्या एकाच प्रकारच्या फळातील निरनिराळ्या रसांचा आस्वाद घेतांना अवर्णनीय आनंद होतो. त्यामुळे या भागवताची पठण परंपरा अव्याहत टिकून राहिली आहे.

’अर्थोऽयं ब्रह्मसूत्राणां भारतार्थं विनिर्णयः’ बादरायण वेदव्यांनी ’ब्रह्मसूत्रे’ या नावाने ओळखली जाणारी वेदांतसुत्रे रचली. हा ग्रंथ सूत्ररूपाने असल्यामुळे त्यांचे यथार्थ ज्ञान होईना म्हणूनच त्यावर भाष्यात्मक हें भागवत नावाचे पुराण रचले असें कांहींचे म्हणणे आहे व कांहींचे म्हणणे आहे की यात भारताचाच्या अर्थाचाही निर्णय आहे तसेच हे गायत्री मंत्रावरील भाष्य आहे. ’गायत्री भाष्यरूप्०ऽसौ वेदार्थपरिबृंहितः । पुराणानां साररूपः साक्षात् भगवतोदितः ॥ तात्पर्य, भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे फळ म्हणून म्हटले आहे ते यथार्थ आहे. याला भगवम्ताची वाङ्मयी मूर्ति म्हणण्याचा प्रघात आहे हे वर आले आहेच. ’ स्वकीयं यद्‍भवेत्तेजः तद्वै भागवते व्यधात् । तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्‌भागवतार्णवम् । तेनेयं वाङ्मयी मूर्तिः प्र्तत्यक्षा वर्तते हरेः ॥ ’ आपले स्वतःचे तेज श्रीकृष्णांनी या भागवतांत ठेवले. अंतर्धान पावल्यानंतर स्वतः श्रीकृष्ण या भागवतरूपी समुद्रात प्रविष्ट झाले तें भागवत म्हणजे श्रीहरीची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ति होय. भागवताची परंपराही तशीच आहे.

१. प्रथमतः साक्षात् नारायणांनी ब्रह्मदेवास हे भागवत सांगितले. ब्रह्मदेवांनी तेच नारदास सांगून ’तद् एतत् विपुली कुरु’ - याचा विस्तार कर अशी आज्ञा केली. नारदांनी सांगितल्या वरून तेच भागवत वेदव्यासांनी श्लोकबद्ध केले व शुकाचार्यांना पढविले, ही एक परंपरा. २. ज्यावेळी नारायणांनी ब्रह्मदेवास या भागवताचा उपदेश केला, त्यावेळी शेषाने ते श्रवण केले. शेषापासून सनत्कुमार, त्यांचेपासून सांख्यायन व पुढे पराशर, बृहस्पति,, मैत्रेय व मैत्रेयापासून विदुर अशी दुसरी परंपरा सांगितली जाते. नारायणापासून अलौकिक परंपरेने प्राप्त झालेल्या भागवतांत सर्व काही अलौकिक असेल यांत आश्चर्य ते काय ?

यांतील रचनाचातुर्य अलौकिक आहे. प्रसंगानुसार वृत्तरचना आहे. नऊ रसांचा परिपोष ठिकठिकाणी योग्य रीतीनें झालेला आहे. साहित्यशास्त्रांत काव्याचें लक्षण निरनिराळ्या रीतीनें सांगितलें आहे. कित्येकजण ध्वनीला उत्कृष्ट काव्य म्हणतात तर कित्येकजण ’वाक्यं रसात्मकं काव्यं’ असे म्हणतात, तर कांहीजण ’रीतीलाच काव्याचा आत्मा’ असे म्हणतात. या दृष्टीनें विचार केला तर ही सर्व काव्याची लक्षणे भागवतांत आढळून येतात. इतिहास आहे, भूगोल आहे, ज्योतिष आहे, सृष्टिविकासाचा इतिहास आहे, राजकारण आहे, धर्मचर्चा आहे, मंत्रतंत्रांचा विचार आहे, सामान्यधर्म व विशेषधर्मांची चर्चा आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या चार आश्रमांचे वर्णन आहे. स्त्रियांनी कशा तर्‍हेने वागावे ? त्यांचे धर्म कोणते हे सोदाहरण प्रतिपादन केले आहे. भरपूर निसर्गवर्णन आहे. प्रत्येकाने जगांत कसे वर्तावे हे सांगितले आहे. विधात्यानें निर्माण केलेल्या सृष्टीतील अनेक गोष्टींपासून, निसर्गापासून मानवांना काय शिकता येते हे निरनिराळ्या ऋतूंच्या वर्णनांच्या द्वारे जिज्ञासूपुढे ठेवले आहे. मानवाच्या स्वभावाचे चित्रण इतके वास्तववादी व सूक्ष्म आहे कीं, त्यापुढे सर्व श्रेष्ठ कवींनी नम्र व्हावे. वेदव्यासांनी कलियुगास प्रारंभ झाल्यावरचे भविष्य इतके अचूक वर्तविले आहे कीं, ते नुसते भविष्य वाचूनही ग्रंथकर्ता हा कोणींतरी अलौकिक असला पाहिजे याची खात्री पटल्यावाचून राहणार नाही. या सर्व गोष्टींचें वरआणन करताना जगांतील मानवांकडून केल्या जाणार्‍या कृतीचें पर्यवसान भगवंताच्या भक्तींत झालें पाहिजे व तसे झाले तरच मानव अंतिम कल्याणाला प्राप्त होईल अन्यथा नाही. हें निरनिराळ्या प्रसंगानुसार अत्यंत हृदयंगम रीतीने वर्णन केले आहे. सृष्टीला मूळ कारण असणार्‍या तत्त्वाचा विचार करतांना भागवतकारांनी सर्व दर्शनकारांचा समाचार घेतला असून "सृष्टीला मूळ कारण तो सर्वतंत्रस्वतंत्र परमात्मा" आहे हे तत्त्व विशद करून सांगितले आहे. बोपदेव ’हरिलीला’ नामक ग्रंथात म्हणतो - ’वेद, पुराण, काव्य हे धनी, मित्र, प्रिया या प्रमाणे होत. भागवतांत तीनही प्रकार आहेत. ज्याप्रमाणें धनी आपल्या नोकरांस आपल्या कामाची चिकित्सा न करतां आपलें काम करण्यास सांगतो, तद्वत् हे प्रत्येकास धन्याप्रमाणे आज्ञा करतात; मित्राप्रमाणें एकादी गोष्ट युक्तीनें सांगून त्याप्रमाणे आचरण करावयास लावतात. काव्य हे आपल्या स्त्रीप्रमाणें आहे. स्त्री ज्याप्रमाणें आपल्या मधुर भाषणानें रसालंकारादिकांनी युक्त असणार्‍या वाक्यानें पटवून देते तद्वत् काव्य आहे. श्रीमद्‍भागवतांत या तीनही पद्धतीनें विषय वर्णन केले आहे.

कित्येकजण भागवत हे द्वितीयास्कंधापासून खरे सुरू होते असे म्हणतात व प्रथम स्कंध हा उपोद्धातारासारखा आहे असे म्हणतात. पण त्यांचे म्हणणे प्रमाणाच्या कसोटीला उतरत नसल्यामुळे ते म्हणणें निर्मूल आहे. अगदी ’जन्माद्यस्य यतः" या श्लोकापासून भागवतास प्रारंभ होतो हे खुद्द भागवतांत व इतर अनेक पुराणांत स्पष्टपणे म्हटले आहे.
स्कंद, पद्म, मत्स्य या पुराणांत याविषयी स्पष्टपणे प्रमाणे आहेत.

आरभ्यः यत्र गायत्रीं वर्ण्यते धर्मविस्तरः ।
वृत्रासुरवधश्चापि यच्च भागवतं विदुः ॥

गायत्रीला प्रारंभ करून ज्यांत धर्मतत्त्वाचें व वृत्रासुरवधाचे वर्णन केले आहे तें भागवत होय.

उत्तमश्लोकचरितं चकार भगवान् ऋषिः । निःश्रेयसाय कोकस्य धन्यं स्वस्त्ययनं महत् । तदिदं ग्राहयामास सुतं आत्मविदां वरं ॥

अशा तर्‍हेचीच स्कंद व मत्स्य पुराणांतही वचनें आहेत. याशिवाय व्हागवतांतच वेदव्यास्यांच्या कर्तृत्वाबद्दल स्पष्टपणें केलेले उल्लेख आहेत.

भगवन वेदव्यासांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी मंगलकारक कृतकृत्य वाटावयास लावणारें परमात्म्याचे चरित्र रचले. नंतर तेंच चरित्र आत्मवेत्त्यांत श्रेष्ठ असणार्‍या आपल्या मुलास - शुकाचार्यास सांगितले.

खुद्द शुकाचार्य एके ठिकाणी म्हणतात -

इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंमितम् ।
अधीतवान द्वापरादौ पितुर्द्वैपायनाद् अहं ॥ १.२.८ ॥

मह्य पुत्राय शांताय परं गुह्यं इदं जगौ ॥

ब्रह्मदेवांना संमत असलेले हे भागवत पुराण द्वापरयुगाच्या प्रारंभी माझे वडील द्वैपायन वेदव्यास यांचेपासून शिकलो. समाधानी असलेल्या आपल्या मुलाला - मला हें गूड पुराण वेदव्यासांनी सांगितले. या सर्व उल्लेखांवरून भागवत हे वेदव्यासांनीच रचले आहे असे सिद्ध होते.

तात्पर्य या भूतलावर ज्या दोन मार्गांनी भागवताचा प्रसार झाला त्याचे कौशल्याने संकलन करून सुसंबद्धरीत्या त्याची रचना केली, हे स्पष्टपणे प्रतीत होते. म्हणून भागवत म्हणजे शुक-परीक्षित संवाद एवढेंच नसून "जन्माद्यस यतः या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत अठरा हजार ग्रंथ (श्लोक) म्हणजे भागवत होय."

या ग्रंथात जरी प्रसंगानुरोधाने अनेक विषय चर्चिले असले तरे मुख्यतः परमात्म्याचेच चरित्र वर्णन केले आहे. भागवतातील मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता हे कौशल्याने प्रथम स्कंधांत सुरुवातीसच व्यास-नारद संवादरूपाने दाखविले आहे.

अनेक पुराणें, भारतासारखा प्रचंड ग्रंथ, वेद-विभाग, ब्रह्मसूत्रें इत्यादि रचली असताही वेदव्यासांना पालले कार्य पुरे झाले असे वाटेना. कार्यपूर्तीचे समाधान वाटेना. तेव्हा खिन्न झालेल्या वेदव्यासांना नारदांनी विचारले कीं, "हे वेद्यव्यासा तुझी खिन्न कां ?" हा प्रश्न ऐकून वेदव्यासांनी नारदास म्हटले कीं, "नारदा, मी पुराणें रचली, महाभारथासारखा ग्रंथ रचला, ब्रह्मसूत्रे रचली, वेदाचे विभाग केले. इत्यके कार्य जनतेसाठी केले असताही माझ्या मनास कृतकृत्यतेचें समाधान वाटत नाहीं, हें असे कां व्हावे ?"

या वेदव्यासांच्या प्रश्नांस नारदांनी विचारपूर्वक उत्तर दिले.

"हे वेदव्यासा, तुम्ही सर्व गोष्टी वर्णिल्या आहेत हे कबूल. पण त्याच्या योगाने तुमच्या मनास समाधान प्राप्त होणार नाही. अनेक विषयांचे वर्णन केले असले तरी तुम्ही प्रामुख्यानें भगवंताचे गुणानुवाद गाईले नाहीत. म्हणून केवळ श्रीहरीचेंच गुणवर्णन समाधिभाषेने करा. म्हणजे तुमच्या मनास समाधान, कृतकृत्यता वाटेल." - अजं प्रजातं जगतः शिवाय तन्महानुभावाभ्युदयोनुगण्यतां ॥ - जगाच्या कल्याणाकरितां जन्म-मृत्यूरहित असणार्‍या परमात्म्यानें जे जे अनेक अवतार घेतले त्या सर्वांचे गुण वर्णन करा.

मला स्वतःला जे हे पद प्राप्त झाले आहे त्याला कारण मी केलेले अखंड भगवच्चिंतन हे आहे. असे सांगून आपल्या पूर्वजन्मांचा सर्व इतिहास सांगितला. तेव्हां आपले अवतारकार्य कशाने पूर्ण होईल हे समजून आल्यामुळे वेदव्यासांनी भगवद्‌गुण-प्रधान वर्णन ज्यांत आहे असा भागवत ग्रंथ रचला.

या संवादातील गूढार्थ सोडला तरी या संवादाने ग्रंथातील प्रतिपाद्य विषय "भगवच्चरित्र" आहे हे कौशल्यानें दाखविले आहे. याशिवाय अनेक श्लोकांतून भागवतांतील प्रतिपाद्य विषयांचे दिग्दर्शन केले आहे.

यमादिभिः योगपथैः कामलोभहतो मुहुः ।
मुकुंदसेवया यद्वत् तथात्माद्धा न शाम्यति ॥

मुकुंदाच्या उपासनेने मनास समाधान प्राप्त होते तसे काम लोभादिकांनी पीडलेल्या मनवांस यमनियमादि योगकर्माने प्राप्त होत नाही.

यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे ।
भक्तिः उत्पद्यते पुंसां शोकमोहभयापहा ॥ १.१.७ ॥

जी संहिता ऐकली असतां शोक, मोह, भय इत्यादिकांचा नाश करणारी पुरुषोत्तम श्रेकृष्णांविषयी भक्ति उत्पन्न होते.

बाराव्या स्कंधातही प्रतिपाद्य विषयांचे दिग्‌दर्शन केले आहे.

कलिमलसंसृतिकालनोऽखिलेशो
हरिरितरत्र न गीयते ह्यभीक्ष्णं ।
इह तु पुनर्भगवानशेषमूर्तिः
परिपाठितोऽनुपदं कथाप्रसंगैः ॥ १२.१२.६५ ॥

कलिमलसंसार नाहीसा करणार्‍या श्रीहरीचें चरित्र इतरत्र कथा प्रसंगाने वर्णिले आहे. या ग्रंथांत मात्र सर्वव्यापी, सर्वतंत्र-स्वतंत्र परमात्म्याचे चरित्र प्रत्येक पदापदातून वर्णन केले आहे. याप्रमाणे भागवताचा प्रतिपाद्य विषय "परमात्मचरित्र" हाच होय. हे चरित्ररूपी भगवत अनन्य मनानें श्रवण-पठण करणार्‍यांस वैकुंठप्राप्ती होते हें निश्चयानें सांगितले आहे. या वेदव्यासांनी रचलेल्या पुराणसंहितेचे सावधान चित्तानें अध्ययन केले असतां ब्राह्मण श्रीहरीच्या श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. यांस प्रत्यक्ष उदाहरण परीक्षित् राजाचें आहे. परीक्षित् राजाने शुकाचार्यांच्या मुखांतून भागवत श्रवण केल्यावर त्याच्या मनास जें समाधान प्राप्त झाले तें त्याने बोलून दाखविले.

सिद्धोऽस्मि अनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना ।
श्रावितो यच्च मे साक्षात् अनादिनिधनो हरिः ॥ २ ॥
नात्यद्‌भुतमहं मन्ये महतां अच्युतात्मनाम् ।
अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः ॥ ३ ॥
पुराणसंहितां एतां अश्रौष्म भवतो वयम् ।
यस्यां खलूत्तमःश्लोको भगवान् अनवर्ण्यते ॥ ४ ॥
भगवन् तक्षकादिभ्यो मृत्युभ्यो न बिभेम्यहम् ।
प्रविष्टो ब्रह्म निर्वाणं अभयं दर्शितं त्वया ॥ ५ ॥
अनुजानीहि मां ब्रह्मन् वाचं यच्छाम्यधोक्षजे ।
मुक्तकामाशयं चेतः प्रवेश्य विसृजाम्यसून् ॥ ६ ॥
अज्ञानं च निरस्तं मे ज्ञानविज्ञाननिष्ठया ।
भवता दर्शितं क्षेमं परं भगवतः पदम् ॥ ७ ॥

राजा म्हणाला - भगवन ! करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी, अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. अनेक दु:खांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, असे मला वाटते. ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केले आहे, ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. गुरुवर्य ! आपण मला परम शांतिस्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. ब्रह्मन ! आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंतांच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. (२-७)

या प्रमाणे भागवताचे माहात्म्य आहे. या भागवताकडे नुसत्या पुराणाच्या चृष्टीने पाहिल्यास याचे चांगल्या तर्‍हेने ज्ञान होणार नाही. ब्रह्मसूत्रे, गायत्रीमंत्र यांच्या भाष्यरूप हा ग्रंथ आहे असे अनेकांनी म्हटले आहे. ते अगदी यथार्थ आहे. "जन्माद्यस्ययतः" या भागवताम्तील प्रथम श्लोकांत ब्रह्मसूत्राची प्रतीके घेतली आहेत - अथातो ब्रह्मजोञासा, जन्माद्यस्ययतः, तत्तुसमन्वयात्, शस्त्रयोनित्वात् इत्यादि सूत्रें दिग्‌दर्शित केली आहेत. हे दिग्‌दर्शन ब्रह्मसूत्र व त्याचा अर्थ करतलामलकवत् आहेत त्यांनाच होईल. अशा तर्‍हेने सर्व ब्रह्मसूत्रांचे दिग्‌दर्शन संपूर्ण भागवतांत भागवत पठण करताना होईल.

भागवताचे भारताशी तत्त्वज्ञानाच्या बाबतींत निकटचे साम्य आहे. शांतिपर्वातील अनुशासनपर्वाचा कांहीं भाग भागवताच्या एकादशस्कधातील भागाशी ताडून पाहण्यासारखा आहे. आम्ही त्याचे विवेचन "भागवताचचा उपसंहार या भागात" केले आहे.

भागवताचे अध्ययन करतांना अनेक उपनिषद् वाक्यांचा प्रतिकार्थ आपणांस उपयोग केल्याचे आढळून येईल. ईशावास्य व तलवकाच (केनोपनिषद्) ही उपनिषदे भागवतात आहेत. व त्या ठिकाणी अर्थसादृश्याप्रमाणे शब्दसादृश्यहि आपणास आढळून येईल.

निरनिराळ्या सांप्रदायिक अशा उपनिषद भाष्यांचा विचार न करतां केवळ उपनिषदांचा व त्यांतील वाक्यांचा अर्थ जो भागवतांत केला आहे त्यावरून उपनिषदांचा यथार्थ अर्थहि जिज्ञासू वाचकांस कळून येईल. परब्रह्याचें लक्षण भागवताच्या प्रथम श्लोकांत "जन्माद्यस्य यत:" या श्लोकाने सांगितले ते "जन्माद्यस्य यत:" या ब्रह्मसूत्राचें जसे प्रतीक आहे तसेंच ते पद "यतो वा इमानि भूतानि जायंते । येन जातानि जीवंति । यत्प्रयंत्यभिसविशन्ति । तद्‌विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति- या उपनिषद् वाक्याचेहि प्रतीक आहे. ‍"स ऐक्षत, ऐतदाभ्यमिदं सर्वं, स आत्मा तत्त्वमसि- अहं ब्रह्मास्मि- इत्यादि अनेक वाक्यें भागवतांत आलेली आहेत. तात्पर्य भागवतांत उपनिषदोक्त अशी अनेक वाक्ये ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. उपनिषदांप्रमाणेच अनेक वेदांतील वाक्यांचा उपयोग भागवतांत केला आहे. विष्णुसूक्त, पुरुषसूक्त, श्रीसूक्त, मन्युसूक्त इत्यादि अनेक सूक्ते यांत आलेली अध्ययनाने वाचकांस कळून येईल.
भागवताचे आपणास यथार्थज्ञान व्हावे अशी इच्छा असल्यास सांख्य, वैशेषिक, पांचरात्रागम या तत्त्वज्ञान प्रणालींची माहिती चांगल्या तऱ्हेने असावयास पाहिजे. तसेंच दुसऱ्या पुराणांत सांगितलेल्या कथाहि अवगत असणे अत्यंत जरूर आहे. भागवतांत अशा अनेक कथा चरित्रे आहेत कीं, त्यांतील रहस्य कळण्यासाठी इतर पुराणांतील कथा लक्षात असणें जरूर आहे. एकादश स्कंधातील - "लोके व्यवायामिषमद्यसेवा" या श्लोकाचा अर्थ समजावून घ्यावयाचा असेल तर मीमांसा शास्त्राचें ज्ञान असावयास पाहिजे.
सांख्यशास्त्राच्या निरीश्वरवादी भागाचे खंडन करून सेश्वर सांख्यशास्त्राचे स्वरूप देतांना पंचरात्रागमांतील तत्त्वांचे साहाय्य घेतलेले आपणांस आढळून येईल. सेश्वर सांख्यशास्त्राला भक्तीची जोड अपूर्वतेनें देऊन नवे तत्वज्ञानच लोकांना दाखविले आहे.

एकादश स्कंधांत तत्त्वाचे (कॅटगेरी) विवेचन करतांना तत्त्वांची संख्या कोण कसें मांडतात याचे विवेचन करून मुख्य तत्त्वें किती आहेत याचे प्रतिपादन भागवतांत केलेले आहे. सर्व दर्शनकारांचा समन्वय करून त्या त्या दर्शनातील तत्त्वांना भक्तिमार्गांत अनुस्यूत करण्याचे कार्य यशस्वीपणे भागवतांत केले आहे. भागवत हा भक्तिमार्गाचा सिद्धांत ग्रंथ म्हणून ओळखला जातो.

ज्यावेळी मीमांसकांनीं यज्ञाच्या नावाखाली पशुहत्या एकसारखी करण्यास प्रारंभ केला व शेवटी त्याचा कहर झाला त्यावेळीं सामान्य जनतेत त्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटून सामान्यजन त्यापासून परावृत्त होऊं लागला. तसेच सामान्यजनांना यज्ञाच्या प्रचंडत्वामुळे प्रेक्षकाव्यतिरिक्त अन्य स्थान उरले नाहीं. त्यावेळीं आपल्या वैयक्तिक हितासाठी आपण काय केले पाहिजे हे सामान्य जनतेस कळेनासे झाले. त्यामुळे त्यांचे ठिकाणी तत्त्वज्ञानविषयक जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी पंचरात्रगमांतील भक्तिमार्गीय तत्त्वज्ञानाने भरून काढली. वैयक्तिकरीत्या जगच्चालक परमात्म्याची पूजा कशी करावी याचे सूक्ष्म विवेचन करून भक्तीचा स्वीकार करण्यास लोकांना प्रवृत्त केले. तसेंच व्यक्तिश: परमात्म्याची पूजा करणें जसे आवश्यक आहे त्याप्रमाणेंच लोकांच्या संघटनेसाठी व झालेली संघटना प्रबल करण्यासाठीं निरनिराळ्या देवतांच्या सामुदायिक जत्रा, देवपूजापद्धति, निरनिराळे पर्वकालीन उत्सव रूढ कले. पण कालांतराने विशिष्ट लोकांच्या हातातच पुनः सामुदायिक व्रतवैकल्ये, पूजापद्धति जाऊन त्याचाही अतिरेक झाला तेव्हां ते मोडून काढून शुद्ध भक्तीची स्थापना भागवताने केली आहे. आणि मग भक्तिमार्गात सामुदायिकते बरोबरच वैयक्तिक भक्तीलाहि महत्त्व दिले गेले. नवविधात्मक भक्तीमध्यें श्रवण व कीर्तन हे प्रकार सामुदायिक उत्कर्षासाठीं भक्तीचे प्रकार असून पुढचे सात वैयक्तिक उन्नतीसाठी आहेत हे जिज्ञासू वाचकांस कळून येईल. हे सर्व करीत असतां कोणत्याहि दर्शनकाराचा अधिक्षेप केला नाहीं तर त्यांतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून व्यक्तीच्या उत्कर्षासाठी त्यांस योजिले. सध्यां आपणांत जी पंचमहायज्ञापैकीं, वैश्वदेव पद्धत ही यज्ञाचे प्रतीक म्हणूनच रूढ केली आहे. अशा तर्‍हेच्या अनेक गोष्टी भागवत व पंचरात्रागम यांनी लोकांत रूढ केल्या आहेत. जे पंचरात्रागम साक्षात् श्रीहरीनेच रूढ केले आहे. भारतांत पंचरात्रागमाविषयीं लिहितांना असें म्हटले आहे की,
पंचरात्रस्य कृत्स्नस्य वक्ता नारायण: स्वयं ॥
संपूर्ण पंचरात्रागमाचा वक्ता साक्षात् नारायण होय.
भागवतातही म्हटले आहे कीं,
तृतीय ऋषिसर्ग वै देवर्षित्त्वमुपैत्य स: ।
तंत्रं सात्वतमाचष्टे नैष्कर्म्यं कर्मणां यत: ॥
ज्यात कर्मांस मोक्षसाधनत्व सांगितले आहे असें सात्वत तंत्र सांगितले.
अशा रीतीनें निष्काम कर्मास पंचरात्रागमकारांनी महत्त्व दिले आहे. पण त्यानंतर वेदव्यासांनी या निष्काम कर्मास भगवदभक्तीची जोड दिली. आणि कंठरवानें सांगितले की,
नैष्कर्म्यक्रयच्युतभाववर्जित
न शोभते ज्ञानमलं निरंजन ॥
भगवंताच्या भक्तीने विरहित असें निष्कामकर्म अथवा ज्ञान असेल ते युक्त नव्हे. तात्पर्य, पंचरात्राने प्रसृत केलेल्या निष्काम कर्मास अपूर्वतेनें भगवदभक्तीची जोड भागवतामध्ये दिलेली असल्यानें या तत्त्वज्ञानाला अपूर्वत्व आले आहे.

वास्तविक पाहता मानसिक विश्लेषण केल्यास अखिल प्राण्यांत प्रेमाचा, प्रीतीचा सूक्ष्म अंश जन्मतःच असतो. तो अंश वयाबरोबर, ज्ञानाबरोबर वाढतच जात असतो. भागवतातील तत्त्वज्ञानाचा साकल्याने विचार केल्यास आपणांस कळून येईल कीं, जन्मतः बीजरूपानें असलेलें प्रेम जे पुढें वाढत जाते ते प्रेम संसाराकडे लावले तर नाना दुःखे, संकटे प्राप्त होतील. तेच प्रेम जर आपण परमात्म्याकडे लावले तर जीवास अंतिम समाधान प्राप्त होते. वेदव्यासानी आपल्या स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले कीं, मानव कितीही कर्तृत्ववान झाला तरी त्यास अंतिम समाधान प्राप्त होणार नाहीं. त्यासाठीं शेवटी कां होईना त्यानें परमात्मभक्ती केली पाहिजे, तर त्यास समाधान, कृतकृत्यता वाटेल. नारदांनी वेदव्यासांस (जरी त्यांना या सर्व गोष्टी माहीत होत्या, तरीहि लोकांना त्या कळाव्यात, आपल्या भक्ताचे महत्त्व वाढावे म्हणून नारदानी आपणांस हा मार्ग दाखविला असे भासविले.) स्पष्टपणे सांगितले कीं, तुम्ही पुष्कळ तत्त्वांचे विवेचन केले असले तरी भगवंताचे निर्दोष चरित्र वर्णन केले नाही.
भवतानुदितप्रायं यशो भगवतोऽमल ॥
येनैवासौ न तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम् ॥
म्हणून तुम्हांस समाधान, कृतकृत्यता वाटणार नाहीं म्हणून भगवंताचे यश वर्णन करा. तात्पर्य वृद्धापकालीं कां होईना परमात्म भक्ति आपल्या मनांत उत्पन्न झाल्यावांचून मनास समाधान प्राप्त होणार नाहीं.

ही भक्तिसुद्धा अंध भक्ती करावी असेहि प्रतिपादन कोठेहि केले नाहीं. भक्तीचे लक्षण - माहात्म्यज्ञानपूर्वस्तु स्नेहीभक्तिरिति स्मृत: ॥ - माहात्म्य ज्ञानपूर्वक जो स्नेह त्यांस भक्ति असें नांव आहे. या भक्तीच्या लक्षणावरून जिज्ञासू वाचकांस हे कळून येईल कीं, ज्याचेवर आपणास प्रेम करावयाचे आहे तो सर्वांपेक्षां किती मोठा आहे याचे ज्ञान आपणांस असेल तरच ती भक्ती चिरकाल टिकेल. एकदा कां भक्ती जडली कीं, कोणत्याहि प्रकाराने ती कमी तर होत नाहींच तर उत्तरोत्तर भक्ती वाढत जाते असे इतिहास सांगतो. तात्पर्य भागवत म्हणजे अलौकिक असा एक ग्रंथ आहे हे त्याच्या अध्ययनावरून, आपणांस कळून येईल. सर्व तत्त्वांची परिणति परमात्मचरणीच व्हावयास पाहिजे तरच मानवजन्म सार्थ होईल. अन्यथा नाहीं. भागवताकडे नुसते पुराण (कांहीं तरी भारूड कथा) या दृष्टीने पाहिल्यास त्यांचे हातीं कांहींच लागणार नाहीं. अनेक शास्त्रांच्या सूक्ष्म अध्ययनाशिवाय कोणांसहि भागवत कळणार नाहीं. म्हणूनच "विद्यावतां भागवते परीक्षा" अशा तऱ्हेची म्हण प्रचलित झाली आहे.

भागवतांत विद्वानांच्या बुद्धीला आव्हान देणारा तत्त्वविमर्श आहे तर प्रेमळ भक्तांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या परमात्म्याच्या कथा हृदयंगम रीतीनें वर्णन केल्या आहेत. धर्माचे मूलभूत सिद्धांत कथन केले आहेत. राजकीय मूलतत्त्वांचा उहापोह केलेला आढळून येईल. वर्णाश्रमीयांची कर्तव्ये, स्त्रियांची कर्तव्ये, राजाची कर्तव्ये इत्यादि अनेक गोष्टी सेतिहास वर्णन केल्या आहेत. मुख्यत्वे करून संसारांत राहून श्रीहरीची भक्ति करून मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा याचे उत्कृष्ट विवेचन भागवतांत केले आहे.

पंचमस्कधाच्या प्रारंभीच शुकाचार्य यांना परीक्षित् राजाने प्रश्न विचारला. हे शुकाचार्य, प्रियव्रत राजा हा परमात्मभक्त असूनहि संसारांत कसा रममाण झाला ? कारण प्रायः जगांत असें दिसून येते कीं जे संसारांत आसक्त असतात ते एकनिष्ठ परमात्मभक्ति कधीं करीत नाहींत. तसेंच जे परमात्मभक्त असतात ते कधीं संसारांत रममाण होत नाहींत. या दोन्ही गोष्टी परस्परविरुद्ध आहेत. तेव्हां प्रियव्रतानें या दोन्ही गोष्टी कशा साध्य करून घेतल्या ते आम्हांस सांगा.

या परीक्षितीच्या प्रश्नाचें उत्तर शुक्राचार्य यांनी भरताचे आख्यान व जडभरत आणि रहूगण संवाद यांचे द्वारा सांगितला. त्या प्रतिपादनांत मुख्य सूत्र असें आहे की, "परमात्मपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी सर्वसंगपरित्याग म्हणजे संसाराचा त्याग करणें नव्हे, तर कामक्रोधादिकांचा त्याग करणें होय" कामक्रोधादिकांचा त्याग न करतां मानव अरण्यांत जाऊन तप करूं लागला तर त्यांस निर्विघ्नपणे भगवदाराधन करता येणार नाहीं. आणि जर मुमुक्षूने कामक्रोधादिकांचा पूर्णांशानें त्याग केला असेल तर त्याला घरांत राहूनहि भगवदाराधना करता येईल. भरताच्या इतिहासावरून हे दाखवून दिले कीं, कामक्रोधादिक हे अत्यंत मोहक रूप घेऊन मानवांना पछाडतात. ज्यावेळेस ते जीवास पछाडतात त्यावेळेस जीवांच्या लक्षांत येतच नाहीं कीं, आपण कामक्रोधादिकांकडून पछाडले जात आहोत.

भरताची स्थिति कांहीं अंशी तशीच झाली. प्रवाहांतून वाहात जाणाऱ्या नवजात हरिणशिशूविषयी दया उत्पन्न होऊन भूतदयेनें प्रेरित होत्साता त्याने त्या हरिणशिशूस वाचविले. त्याचे पालनपोषण केले. ती भूतदयाच त्याच्या बंधास कारण झाली.

यावर कोणी भूतदयावादी असें विचारतील कीं, भरतानें त्या नवजात हरिणशिशूवय दया दाखवून त्याचें रक्षण केले, पालनपोषण केले हे चुकले काय ? असा प्रश्न विचारून त्यापासून अनर्थकारक सिद्धांत मांडतील. भूतदया ही परमात्मप्राप्तीस बाधक आहे काय ? तेव्हां त्याचें उत्तर मिळण्यासाठीं आपणास भरताचे चरित्र सूक्ष्मपणे तपासून पाहिले पाहिजे.

भरताने भूतदयेनें प्रेरित होऊन त्या नवजात शिशूचे रक्षण केलें व त्याचें पालन-पोषण केले. ते सर्व योग्यच झाले. पण पुढें त्या हरिणशिशूचे पालन करतांना त्याचे ठिकाणी त्यानें आसक्तता उत्पन्न होऊं दिली इथेच त्याचे चुकले. संसारातील सर्व दुःखे, संकटे, बंध ही सर्व आसक्ततेमुळें उत्पन्न होतात. म्हणून जीवानें संसार न सोडता संसारातील आसक्तता सोडावी असें भरताच्या इतिहासावरून सुचविले आहे. तात्पर्य सर्वांच्या हृदयाला जाऊन भिडणाऱ्या भाषेत वेदव्यासांनीं भागवत रचले. सर्वांच्यासाठीं ते रचले म्हणूनच त्यांस अत्यंत लोकप्रियता लाभली आहे.

अशा या अपूर्व भागवताचा अनुवाद करणें हे सुद्धा अत्यंत धाडसाचे आहे. कालिदासाच्या भाषेत सांगावयाचे तर असें म्हणतां येईल.
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् ॥

मराठी भाषेत ओवीबद्ध असा अनुवादित टीकात्मक ग्रंथ प्राचीन असा आढळून येत नाही प्राचीन टीका एकनाथमहाराजांची एकादश स्कंधावर, कृष्णदयार्णवांची व मल्हार अंबाजीची दशमस्कंधावर टीका आहे. त्यापैकी कृष्णदयार्णवांनीं रचलेली टीका बहुतेक अद्वैत सांप्रदायानुसार आहे. तर मल्हार अंबाजीची दशमस्कंधावरील टीका ही माध्वसांप्रदायानुसार रचलेली आहे. याशिवाय महत्त्वाच्या टीका सर्व भागवतावर अथवा भागवताच्या एखाद्या भागावर असलेल्या आमचे अवलोकनीत नाहींत. कृष्णदयार्णवांची टीका, नुकतीच त्यांच्या वंशजांनी प्रसिद्ध केलेली आहे. एकनाथ महाराजांची टीकाहि (एकादशस्कंधावरील) प्रसिद्ध असून उपलब्ध आहे. पण मल्हार अंबाजीची दशमस्कंधावरील टीका मात्र अजून कोठे उपलब्ध नाहीं. पण त्याचा कांहीं थोडासा भाग आमचे वाचनांत आला त्यावरून त्यानें भागवताची दशमस्कंधापुरती टीका रचली असावी असें आढळून येते. मल्हार अंबाजी हा रामदासांचे सुप्रसिद्ध शिष्य कल्याणस्वामी यांचे आजोबा असावेत असें वाटते. हे माध्य घराणे अंबापुरी सध्याचे अंबड, जि. परभणी) येथील होय. रामदासांचे घराणेंहि माध्व वैष्णवांचेच होय. कारण या रामदास सांप्रदायीत अनेक गोष्टी माध्व सांप्रदायातून घेतल्या आहेत.

महाराष्ट्रांत भागवताचा संपूर्णतया अनुवाद अजमासे पाउणशे वर्षांपूर्वी झाला आहे. कदाचित् यापूर्वीहि भागवताचा अनुवाद झाला असेल पण यापूर्वीचा अनुवाद माझे पाहण्यांत नाहीं, हा अनुवाद शके १८१६ मध्ये मुंबई येथील जगदीश्वर छापखान्यामध्ये छापला आहे. तो सांगलीजवळच्या हरिपुर क्षेत्रांत वास्तव्य करणारे विठ्ठल नारायणशास्त्री गोरे यांनी केला आहे. ते प्रत्येक स्कंधाच्या शेवटीं म्हणतात-
जो रामचंद्र तऊज सोहनी उपनामक ।
नारायण महादक्ष त्याच्या आज्ञेवरुनियां ॥ १ ॥
गोरे ह्या उपनावाचा वेदशास्त्रप्रवीण तो ।
नारायण तयाचा मी पुत्र विठ्ठल नामक ।। २ ॥
त्या मी भागवताचा हा प्राकृतार्थ यथामति ।
लिहिलासे श्रीहरीला होवो हा तोषकारक ॥ ३ ॥
यावरून विठ्ठल नाशयण शास्त्री गोरे यांनी हा अनुवाद केला आहे, हा ग्रंथ डेमीच्या चौथ्या पानाइतका मोठा असून भागवताचा मूळ श्लोक, त्या खालीं श्रीधरी टीका व त्याखाली अनुवाद पोथीच्या रूपांत जगदीश्वर छापखान्याचें मालक नारायण रामचंद्र सोहोनी यांनी छापला आहे. अनुवादक आपल्या प्रस्तावनेंत म्हणतात-
मुंबई येथील जगदीश्वर छापखान्याचे मालक श्री. नारायण रामचंद्र सोहनी यांनी भागवताचा अनुवाद छापून तो थोड्या किमतींत वाचकांना द्यावा या इच्छेने भागवाताचा अनुवाद करण्यास आम्हास सांगितले. त्यामुळें आम्ही हा अनुवाद करण्यास प्रवृत्त झालो आहोत. हा अनुवाद करतांना भागवतावरील श्रीधरी, तोषणी आदि टीकांचा आम्ही उपयोग केला आहे. क्वचित् प्रसंगी बालप्रबोषिनी या टीकेचाहि उपयोग केला आहे हे भाषांतर वाचकांना पसंत पडेल अशी मी आशा करतो. यांत कांहीं न्यून राहिले असल्यास ते पंडित वाचकांनी सुधारून घ्यावे अशी मी त्यांची प्रार्थना करतो.
विठ्ठल नारायणशास्त्री गोरे असें त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत म्हटले आहे. याप्रमाणे हे अनुवादाचे काम पूर्ण होऊन ते जगदीश्वर प्रेसने प्रकाशित केले.

यानंतर जानोरीकर यांनी आपल्या आर्यसेवक प्रेसमध्ये भागवताचा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. याचे अनुवादकर्ते कोण आहेत हे कळत नाहीं. पण यांनी पुस्तकरूपाने व पोथी रूपाने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. हा अनुवाद इ. स. १८९४ मध्ये प्रसिद्ध केला असून तो श्रीधरी टीकेप्रमाणें केला आहे. या अनुवादाचे एक वैशिष्ट्य असें कीं, हा नुसताच अनुवाद नसून प्रत्येक श्लोकाचा पदपदार्थ दिला आहे. व पुढें तात्पर्यार्थ दिला आहे. अन्वय, पदपदार्थ व तात्पर्य यांसह असलेला अनुवाद यापूर्वी प्रसिद्ध झाला नव्हता.

यानंतर भागवताचा सरळ नुसता अनुवाद चिपळूणकर आणि मंडळीने प्रसिद्ध केला होता. चिपळूणकर आणि मंडळीमार्फत भारत, रामायण, भागवत या तीन राष्ट्रीय पुस्तकांचा सरस अनुवाद सचित्र प्रसिद्ध केला होता. सचित्र अनुवाद यापूर्वी कोणीच प्रसिद्ध केलेला नाहीं.

यानंतर कै. दामोदर सावळाराम यंदे यांनी अनेक विद्वानांकडून लिहून घेऊन भागवत व महाभारत यांचा अनुवाद प्रसिद्ध केला होता. यांत पदपदार्थ असून तात्पर्यार्थहि दिला आहे. आधुनिक चिकित्सापद्धत स्वीकारली असल्यानें त्यात अनेक विवादास्पद विधाने उपसंहारांत केली आहेत. आणि त्यामुळें भागवतावर नितांत श्रद्धा असणाऱ्या लोकांच्या मनाला धक्का बसण्यासारखा आहे. आम्ही त्यांतील अनेक विधानांचा परामर्श आमच्या भागवताच्या उपसंहारांत घेणार आहोत.

यानंतर भागवतसार या नावाखाली कांही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यात अनेकांनी त्यांतील कथेवरच भर दिला आहे. भागवताचे जे महत्त्व आहे ते त्यांतील कथेमुळे नसून त्यांत प्रतिपादिलेल्या तत्वज्ञानावर त्याचें महत्त्व अवलंबून आहे.

यानंतच इ. स. १९५८-५९ सालीं भागवताचा चिकित्सक अनुवाद, (अन्वय, पदपदार्थ, पाठभेद, सरलार्थ इत्यादिकांनीं युक्त) आम्ही प्रसिद्ध करण्याचा विचार करून त्याप्रमाणें पहिला भाग प्रसिद्ध केला होता व दुसऱ्या भागाच्या मुद्रणासहि प्रारंभ झाला होता. पण इतक्यांत पानशेत पुराचा तडाखा आम्हांस बसल्याने आमच्या अनेक न्याय, वेदांतशास्त्रावरील अमूल्य ग्रंथांबरोबर आमचे भागवताच्या समग्र अनुवादाचे हस्तलिखित नष्ट झाले. व तसेंच भागवताच्या १ ल्या भागाच्या व दुसऱ्या भागाच्या छापलेल्या प्रतीहि निरुपयोगी झाल्या. आतां फक्त पुराच्या पाण्यांत भिजलेल्या कांही पाच पन्नास प्रति शिल्लक आहेत.

यानंतर तशाच प्रकाराने भागवताचा अनुवाद करण्यास घेतला. पण ते काम दीर्घ कालावधीचे असें वाटूं लागले. म्हणून चिपळूणकर आणि मंडळीने प्रसिद्ध केलेल्या अनुवादाप्रमाणे अनुवाद केवळ प्रसिद्ध करावा असें वाटून आम्ही हा सध्याचा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत. मूळ भागवतांत अनेक पाठभेद आहेत. कथा, अध्याय यांच्यांतहि भिन्नता आहे, त्यामुळें भागवताचा अनुवाद करतांना फार अडचण वाटते. पण ती अडचण दूर केली. आम्ही या अनुवादांत सर्व सांप्रदायिक टीकाकारांचा स्वीकार केला आहे. आम्ही हा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत, त्याचा मूळ उद्देश भागवत घरोघरी वाचले गेले पाहिजे या भावने प्रसिद्ध करीत असल्याने सामान्य वाचकांना गोंधळात पाडील अशा तऱ्हेची चिकित्सक पद्धत स्वीकारली नाहीं. प्रत्येक श्लोक समोर आल्यावर त्याचा जो सरलार्थ निघतो, तसाच अनुवाद आम्ही केला आहे. या अनुवादापासून सर्वांना समाधान मिळावे एवढीच इच्छा हा अनुवाद करतांना ठेवली आहे. जरी भागवतावर सर्व सांप्रदायिकांच्या टीका आहेत तरीहि भागवताचा गूढार्थ सांगताना भागवत ज्या पंचरात्रागमाचा सिद्धांत ग्रंथ आहे त्या पंचरात्रागमाच्या सिद्धांतप्रणालीचा विचार करणें अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः भगवत्स्वरूपाचा विचार करतांना पंचरात्रागमोक्त भगवत्स्वरूपाचा विचार करून भागवताचा अर्थ लावला पाहिजे. भागवतातील वृत्त अथवा भागवताचा कालनिर्णय वगैरे विचार आधुनिक पंडितांनी चिकित्सा तुलना या नावाखाली केला असला तरी भागवतांत दिसणारे विरोधाभास, इतर पुराणांशी येणारा विरोध व त्याचा परिहार करण्याचा प्रयत्न आधुनिक पंडितानी मुळीच केला नाहीं असें मोठ्या खेदाने म्हणावे लागते. प्राचीन संस्कृत टीकाकारांनीं मात्र या विरोधाभासाचा परिहार केला आहे. या सर्व विरोधाभासाचा परिहार, पंचरात्रागमोक्त सिद्धांताचे व भागवत सिद्धांताचे ऐक्य दाखविणारे तुलनात्मक विवेचन करावे असा विचार होता. पण हा भागवताचा अनुवाद सामान्य जनांकरिता असल्यानें तसले तुलनात्मक विवेचन आम्ही या अनुवादांत केले नाहीं. पण आमच्या भागवत प्रकाशन संस्थेतर्फे भागवताची चिकित्सात्मक संस्कृत आवृत्ति, अनुवाद काढण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. वेद, पुराणे, महाभारत, रामायण हे सर्व ग्रंथ आमच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत. त्यामुळें मूळ भागवताचा जरी आस्वाद घेता आला नाही तरी या अनुवादानें मूळ भागवतातील मूळ रसाच्या मानाने अल्प आस्वाद घेता आला तरी मी स्वतःला धन्य समजेन. या भागवतावर जरी सर्व सांप्रदायिकांच्या टीका असल्या तरी माध्य, रामानुज या सांप्रदायांच्या टीका जितक्या आहेत तितक्या टीका इतर सांप्रदायांच्या असतील असें मला वाटत नाहीं. स्वतः श्रीमध्वाचार्यांनी "भागवत तात्पर्य निर्णय" नांवाचा ग्रंथ रचला. आहे. त्या ग्रंथाचे अध्ययन एकदा तरी करावे अशी विनंति करतो. हा ग्रंथ अत्यंत अलौकिक असून, अत्यंत चिकित्सक रीतीने भागवताचा विमर्श करून त्याचें श्रेष्ठत्व प्रतिपादन करतो. त्या ग्रंथाचा उपयोग आम्ही या अनुवादाचे वेळीं केला आहे. आजपर्यंत ज्यांनीं ज्यांनीं अनुवाद केलें आहेत त्यांचाहि किंचित् उपयोग करून घेतला. आहे.

भागवत-माहात्म्य

सामान्यतः भागवतसप्ताह करण्याचे वेळीं अगोदर भागवतमाहात्म्य वाचले जाते. व भागवतसप्ताहवाचन पूर्ण झाल्यानंतर श्रीमद्‌भगवद्‌गीता व विष्णुसहस्रनाम पठण केले जाते. त्याप्रमाणें आम्ही भागवताच्या पारायणाप्रमाणेंच हा अनुवाद प्रसिद्ध करण्याचे कार्य आम्ही समजत असल्यानें हे भागवतमाहात्म्य प्रारंभी या भागास जोडले आहे.
भागवत माहात्म्य हे अनेक पुराणांत जरी असले तरी पद्मपुराणांतर्गत भागवतमाहात्म्य व्यवहारांत वाचले जाते. त्यालाच जास्त महत्त्व दिले जाते.
पद्यपुरणांतर्गत भागवतमाहात्भ्य हे सहा अध्यायांचें असून स्कंदपुराणातील अठरा अध्यायांचें भागवत माहात्म्यहि आहे. पण ते विशेषत: प्रचलित नाहीं. त्यामुळें भागवत माहात्म्य हे आम्ही पद्यपुराणातील घेतले आहे. या भागवताच्या अनुवादाचे कार्य पूर्ण झाले की, गीता व विष्णुसहलनाम यांचे अनुवाद प्रसिद्ध करून हे भागवताचे अनुवादसत्र पुरे करणार आहोत.
भागवतमाहात्म्यामध्ये जरी भागवताचा सप्ताह कसा करावा हे सांगितले असले तरी भागवताचा रोज किती भाग वाचावा हें कांहीं पद्यपुराणांतर्गत भागवतमाहात्म्यांत सांगितले नाहीं. म्हणून सामान्यतः भागवत किती वाचावे याची परंपरा पुराणिकांत चालू आहे त्याप्रमाणें दररोज भागवत किती वाचावे याविषयींमाहिती देत आहे. त्याहि दोन प्रकारच्या परंपरा आहेत.
१ एक पद्धत अशी, स्थूलमानाने दररोज ४८ अध्याय वाचायाचे.
२ दुसरी पद्धत अशी की,
पहिल्या दिवशीं-वराह आख्यानपूर्ण (प्रथम, द्वितीय स्कंध पूर्ण व तृतीय स्कंधाचे १९ अध्याय.
दुसऱ्या दिवशीं- तृतीय, चतुर्थ, स्कंध पूर्ण व पंचम स्कंधाचे सात अध्यायाअखेर भरताचे आख्यानापर्यंत.
तिसऱ्या दिवशीं-पंचम, षष्ठ व सप्तम स्कंध पूर्ण.
चवथ्या दिवशीं- अष्टम व नवम स्कंध पूर्ण.
पाचव्या दिवशीं- दशम स्कंधाचा पूर्वार्ध पूर्ण अथवा कंसवधाअखेर.
सहाव्या दिवशीं- दशम स्कंध उत्तरार्ध पूर्ण.
सातव्या दिवशीं- एकादश, द्वादश हे स्कंध पूर्ण वाचून समाप्त करावयाचे. नंतर आठव्या दिवशीं गीता व विष्णुसहखनाम पूर्ण करून हे अनुष्ठान संपवितात.
अशातर्‍हेचे अनुष्ठानकरणें ते फक्त भागवताचेच केले जाते. त्याचे फल अनेकांना मिळाले असेल. भागवताच्याच अनुष्ठानानें सिद्ध झालेले अनेक महापुरुष आम्ही पाहिले आहेत.

हा भागवताचा अनुवाद एकदा वाचून विषय लक्षांत येणार नाहीं. याचे वारंवार, सतत वाचन झाल्यास याचे महत्व कळेल. म्हणून भागवतासारखे ग्रंथ आपल्या संग्रही असणें अत्यंत आवश्यक आहे.

श्री. रा. बा. अवधानी यांच्या ’भागवत’ ग्रंथावरून उद्धृत केला आहे.

GO TOP