भारतीय जनजीवन पद्धति धर्ममय आहे. या जीवन पद्धतीचा मूळ आधार आहे ती प्राचीन भारतीय संस्कृति, आणि तिचे अधिष्ठान म्हणजे ’वेद’. ’वेदोऽखिलो धर्ममूलम्’ - संपूर्ण वेद हे धर्माचे मूल आहे. वेदांना संस्कृत भाषेतील आद्य ग्रंथ म्हणतात. ’संस्कृतं संस्कृतेर्मूलम्’ - संस्कृत भाषेतील वाङ्‍मय हेच भारतील संस्कृतीचे मूळ आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे भारतीयांचे चतुर्विध पुरुषार्थ मानले गेले आहेत, आणि सर्व प्राचीन वाङ्‍मय आहे ते मुख्यतः या चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिसाठी.

वेदांवर आधारीत अनेक शास्त्रे, दर्शने निर्माण झाली. प्राचीन काळी शेकडो ऋषिमुनि, विद्वानांनी संस्कृत भाषेत विपुल शास्त्र वाङ्‍मयाची निर्मिती केली. वेदाधारीत स्मृतिग्रंथ, षड्दर्शने, उपनिषदे, गृह्यसूत्रे, रामायण महाभारत पुराणादि काव्यग्रंथ, या सर्वच ग्रंथांतून चतुर्विध पुरुषार्थसिद्धि, त्याच्या श्रद्धा, आकलनशक्ति प्रमाणे सर्व स्तरांतील जनांसाठी केलेल्या विविध व्याख्या, विधिनिषेध, मार्गदर्शन, उपाय, साधन काळात उद्‌भवणार्‍या अडचणी या सर्वांचे विवरण आहे. हे सर्व साहित्य अत्यंत रोचक व प्रभावशाली आहे. पण ते सर्व तितकेच गूढही आहे. म्हणून कालांतराने त्यावर बरेच टीका ग्रंथांची निर्मिती झाली. पण आणखी पुढे गूढ विषद करणारे टीकाग्रंथही भरपूर विद्वत्तापूर्ण असल्यामुळे आकलनास कठीण होऊ लागले तेव्हां असे ग्रंथ अभ्यासून विद्वानांद्वारा सामान्य जनतेच्या आकलन, वाङ्‍मय आस्वाद, त्यातील प्रमेये जीवनात उतरविणे यासाठी प्रयत्‍नशील असणार्‍या जनांसाठी प्राकृत ग्रंथ निर्मितीस सुरुवात झाली.

मराठी भाषाचे मूळ बरेच पूर्वकालीन मानले तरी त्यातील साहित्य उपलब्ध आहे ते जास्तीत जास्त एक हजार वर्षापूर्वीचे. मुकुंदमहाराज, श्रीज्ञानेश्वर यांच्या पूर्वसाहित्याची माहिती उपलब्ध नाही. पण ज्ञानेश्वरी व समकालीन नामदेवांची गाथा यातील प्रगल्भता पाहता तत्‍पूर्वी मराठी भाषा खूपच समृद्ध असली पाहिजे यात संशय असण्याचे कारण नाही.

मराठी साहित्यातही साधारण दिडशे वर्षपूर्व गद्य साहित्य फारच तुरळक प्रमाणात उपलब्ध आहे. तत्‍पूर्वीचे बरेचसे साहित्य पद्यात्मक आहे. पण ज्ञानेच्छुकांसाठी असे साहित्यही धर्म-अधर्म जाणून घेणार्‍या इच्छुकांसाठी अनुवादीत असेल, गद्यात असेल, तर ते जास्त सुलभतेने समजते.

मराठी साहित्यातील संतवाङ्‍मय व संस्कृत साहित्यातील, ज्याला आपण धर्मशास्त्र म्हणू असे सर्व साहित्य एके ठिकाणी उपलब्ध असावे हा या संकेतस्थळाचा [website] मुख्य उद्देश, त्यांतही प्राधान्यतः मराठीतील प्रस्थानत्रयी [ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत] मूल साहित्य, अनुवाद व शक्य तेथे श्राव्य [Audio] - जेणेकरून श्रवण, मनन, निदिध्यासन सर्वच शक्य व्हावे.

संस्कृत साहित्यातील चतुर्वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्र तसेच भगवद् गीता, रामायण, भागवत (व इतर पुराणे) हे सर्व काव्यग्रंथ हेही मराठी अनुवाद व श्राव्य प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे. Wishlist खूप मोठी आहे. कुणा एकट्याने हे सर्व करणे हे सर्वथा अशक्य आहे हेही जाणून आहोत. काही सज्जन मदत करीत आहेतच, आणखी हातभाराची अपेक्षा आहेच. प्रयत्‍न करीत राहणे एवढेच शक्य आहे, शेवटी ईश्वरेच्छा.

========================================